माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.
मित्रांनो, भारतात आपल्या लोकांमध्ये हा जो आक्रोश आहे, तसाच आक्रोश आज संपूर्ण जगात आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोक संदेश येत आहेत. जागतिक नेत्यांनी मला दूरध्वनी केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत खंबीरपणे उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना विश्वास देतो की त्यांना न्याय मिळेल, नक्कीच न्याय मिळेल. या हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
मित्रांनो, दोन दिवसांपूर्वी आपण देशाचे महान वैज्ञानिक डॉ. के. कस्तुरीरंगनजी यांना गमावलं. जेव्हा जेव्हा मी कस्तुरीरंगनजींना भेटायचो , तेव्हा आम्ही भारतातील युवकांची प्रतिभा, आधुनिक शिक्षण, अंतराळ-विज्ञान यासारख्या विषयांवर खूप चर्चा करायचो. विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोला एक नवीन ओळख मिळाली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या अंतराळ कार्यक्रमांना गती मिळाली त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता मिळाली. आज भारत जे उपग्रह वापरत आहे त्यातले अनेक डॉ. कस्तुरीरंगन यांच्या देखरेखीखालीच प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी एक गोष्ट खूप खास होती, ज्यातून युवा पिढी त्यांच्याकडून शिकू शकते. त्यांनी नेहमीच नावीन्यतेला महत्त्व दिलं . काहीतरी नवीन शिकण्याचा , जाणून घेण्याचा आणि नवीन काहीतरी करण्याचा दृष्टिकोन खूप प्रेरणादायी आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन जी यांनी देशाचं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती . डॉ. कस्तुरीरंगन यांनी 21 व्या शतकाच्या आधुनिक गरजांनुसार भविष्याचा विचार करून शिक्षणाची कल्पना मांडली होती. देशाची निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. मी डॉ. के. कस्तुरीरंगनजी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो , याच महिन्यात एप्रिलमध्ये , आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज, जेव्हा आपण मागे वळून पाहतो, 50 वर्षांचा हा प्रवास आठवतो तेव्हा वाटतं की आपण केवढा मोठा पल्ला गाठला आहे. अंतराळातील भारताच्या स्वप्नांची ही भरारी एकेकाळी धाडसाने सुरू झाली होती. देशासाठी काहीतरी करण्याची भावना मनी बाळगलेले काही तरुण शास्त्रज्ञ - त्यांच्याकडे ना आजच्यासारखी आधुनिक संसाधने होती , ना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होतं . मात्र जर काही होतं तर ती होती प्रतिभा, समर्पण, कठोर परिश्रम आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द. बैलगाड्या आणि सायकलींवरून महत्त्वाची उपकरणे स्वतः घेऊन जाणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांची छायाचित्रं तुम्ही देखील पाहिली असतील. ते समर्पण आणि राष्ट्रसेवेच्या भावनेमुळेच आज एवढे मोठं परिवर्तन झालं आहे.
आज भारत अंतराळ क्षेत्रात जागतिक स्तरावर सामर्थ्यवान देश बनला आहे. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून आपण विक्रम रचला आहे . आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनलो आहोत. भारताने मंगळयान मोहीम सुरू केली आहे आणि आदित्य - L1 मोहिमेद्वारे आपण सूर्याच्या खूप जवळ पोहचलो आहोत. आज भारत जगातील सर्वात किफायतशीर आणि यशस्वी अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहे. जगातील अनेक देश त्यांचे उपग्रह आणि अंतराळ मोहिमांसाठी इस्रोची मदत घेत आहेत.
मित्रांनो, जेव्हा आपण इस्रोद्वारे एखाद्या उपग्रहाचं प्रक्षेपण पाहतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. असाच अनुभव मला 2014 मध्ये आला होता जेव्हा मी PSLV-C-23 प्रक्षेपित होताना तिथं उपस्थित होतो. 2019 मध्ये चांद्रयान- 2 च्या लँडिंगच्या वेळी देखील मी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित होतो. त्यावेळी चांद्रयानाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, शास्त्रज्ञांसाठी तो खूप कठीण काळ होता. मात्र मी माझ्या डोळ्यांनी शास्त्रज्ञांचं धैर्य आणि काहीतरी साध्य करून दाखवण्याची जिद्द देखील पाहत होतो. आणि काही वर्षांनंतर संपूर्ण जगाने देखील पाहिलं की त्याच शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे चांद्रयान-3 यशस्वी करून दाखवलं.
मित्रांनो, आता भारतानं आपलं अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी देखील खुलं केलं आहे. आज अनेक युवक स्पेस स्टार्टअप्स मध्ये नवी उंची गाठत आहेत. 10 वर्षांपूर्वी या क्षेत्रात केवळ एक कंपनी होती, मात्र आज देशात सव्वा तीनशेहून अधिक स्पेस स्टार्टअप्स कार्यरत आहेत . येणारा काळ अंतराळ क्षेत्रात अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. भारत नवी शिखरं गाठणार आहे. देशात गगनयान, SpaDeX आणि चांद्रयान -4 सारख्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांसाठी तयारी जोमानं सुरु आहे. आपण व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडर मिशनवर देखील काम करत आहोत.
आपले अंतराळ शास्त्रज्ञ त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे देशवासियांसाठी पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी करणार आहेत.
मित्रांनो, गेल्या महिन्यात म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपाची भीतीदायक छायाचित्रं तुम्ही पाहिली असतील. भूकंपामुळे तिथं खूप मोठे नुकसान झाले , ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी, प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण मौल्यवान होता. म्हणूनच भारताने म्यानमारमधील आपल्या बंधू -भगिनींसाठी त्वरित ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलं. हवाई दलाची विमानं, नौदलाची जहाजे म्यानमारच्या मदतीसाठी रवाना झाली.
भारतीय चमूनं तिथं एक फील्ड हॉस्पिटल तयार केलं. अभियंत्यांच्या एका पथकानं महत्त्वाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात मदत केली. भारतीय चमूने तिथे ब्लँकेट, तंबू, स्लीपिंग बॅग्स , औषधे, खाण्यापिण्याचं सामान आणि इतर अनेक गोष्टी पुरवल्या. या काळात, भारतीय चमूला तिथल्या लोकांकडून कौतुकाची थापही मिळाली.
मित्रांनो, या संकटात, साहस, धैर्य आणि प्रसंगावधान राखणारी अनेक हृदयस्पर्शी उदाहरणे समोर आली. भारताच्या चमूनं 70 वर्षांहून अधिक वयाच्या एका वृद्ध महिलेला वाचवलं जी ढिगाऱ्याखाली 18 तास अडकली होती. जे लोक आता टीव्हीवर 'मन की बात' पाहत आहेत, त्यांना त्या वृद्ध महिलेचा चेहरा देखील दिसत असेल. भारतातून गेलेल्या पथकाने त्यांची ऑक्सिजनची पातळी स्थिर करण्यापासून ते त्यांच्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यापर्यंत शक्य ते सर्व उपचार केले. जेव्हा या वृद्ध महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्या चमूचे आभार मानले. त्या म्हणाल्या की भारतीय बचाव पथकामुळे त्यांना नवीन जीवन मिळालं आहे. अनेकांनी आपल्या चमूला सांगितले की त्यांच्यामुळेच ते त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांना शोधू शकले.
मित्रांनो, भूकंपानंतर, म्यानमारमधील मांडले येथील मठातही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत होती. आपल्या सहकाऱ्यांनी तिथे देखील मदत आणि बचाव अभियान राबवलं , त्यामुळे त्यांना बौद्ध भिक्षूंकडून भरपूर आशीर्वाद मिळाले. ऑपरेशन ब्रह्मामध्ये सहभागी झालेल्या त्या सर्व लोकांचा आपल्याला खूप अभिमान वाटतो. आपली परंपरा आहे, आपले संस्कार आहेत, 'वसुधैव कुटुंबकम' ची भावना - संपूर्ण जग एक कुटुंब आहे.
संकटाच्या काळात विश्व मित्र म्हणून भारताची तत्परता आणि मानवतेप्रती भारताची वचनबद्धता ही आपली ओळख बनत आहे.
मित्रांनो, मला आफ्रिकेतील इथिओपिया येथील अनिवासी भारतीयांच्या एका अभिनव उपक्रमाबाबत माहिती मिळाली आहे . इथिओपियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी जन्मापासूनच हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या मुलांना उपचारासाठी भारतात पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अशा अनेक मुलांना भारतीय कुटुंबांकडून आर्थिक मदतही दिली जात आहे. जर एखाद्या मुलाचे कुटुंब पैशांअभावी भारतात येऊ शकत नसतील , तर त्याचीही व्यवस्था आपले भारतीय बंधू-भगिनी करत आहेत . गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या इथिओपियातील प्रत्येक गरजू मुलाला चांगले उपचार मिळावेत यासाठी हा प्रयत्न आहे. भारतीय समुदायाच्या या उदात्त कृतीचे इथिओपियामध्ये भरपूर कौतुक होत आहे. तुम्हाला माहितच आहे की भारतातील वैद्यकीय सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. इतर देशांचे नागरिकही याचा लाभ घेत आहेत.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच भारताने अफगाणिस्तानातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात लस पाठवली आहे. ही लस, रेबीज, धनुर्वात, हेपेटायटीस बी आणि इन्फ्लूएंझा सारख्या धोकादायक आजारांपासून बचावासाठी उपयुक्त ठरेल. भारताने याच आठवड्यात नेपाळच्या विनंतीवरून तिथं औषधे आणि लसीचा मोठा साठा पाठवला आहे. यामुळे थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराने त्रस्त रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतील. जेव्हा मानवतेच्या सेवेचा विषय येतो, तेव्हा भारत नेहमीच यात आघाडीवर राहिला आहे आणि भविष्यातही अशा प्रत्येक गरजेच्या प्रसंगी आघाडीवर राहील.
मित्रहो,
आत्ताच आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोललो. आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करताना alertness म्हणजे आपलं चित्त सावधान असणं अतिशय महत्त्वाचं. या alertness साठी आता आपल्याला आपल्या एका विशेष मोबाईल ॲपची मदत होऊ शकते. एखाद्या नैसर्गिक संकटात अडकण्यापासून हे ॲप आपल्याला वाचवू शकतं आणि याचं नावही तसंच आहे- सचेत. हे सचेत app भारताच्या NDMA म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलं आहे. पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सूनामी, वणवे, हिमस्खलन, वादळ, वावटळ किंवा वीज कोसळण्यासारख्या संकटांमध्ये सचेत ॲप आपल्याला माहिती देण्याचा आणि सुरक्षित ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतं. या ॲपच्या माध्यमातून आपण हवामान विभागाशी संबंधित अपडेट्स मिळवू शकता. एक विशेष गोष्ट म्हणजे सचेत ॲप अनेक प्रकारची माहिती प्रादेशिक भाषांमधूनही उपलब्ध करून देतं. आपणही या ॲपचा लाभ घ्या आणि आपले अनुभव आम्हाला जरूर सांगा.
प्रिय देशबांधवांनो,
आज आपण जगभरात भारताच्या प्रतिभेची प्रशंसा होताना पाहतो. भारताच्या तरुणाईनं जगाचा भारताप्रती असणारा दृष्टिकोन बदलला आहे. आणि कोणत्याही देशातल्या तरुणांची कशात आहे, कोणत्या दिशेला आहे यावरून त्या देशाचं भविष्य कसं असेल ते समजतं. आज भारताचा युवावर्ग विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करतो आहे. पूर्वी जे प्रदेश मागासलेपणा आणि अन्य गोष्टींवरून ओळखले जात, तिथेही तरुणांनी आपल्या कृतीतून नवीन विश्वास जागवणारी उदाहरणं घालून दिली आहेत. छत्तीसगडच्या दंतेवाडामधलं विज्ञान केंद्र आताशा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. काही काळापूर्वी पर्यंत दंतेवाडाचं नाव केवळ हिंसा आणि अशांतीसाठी ओळखलं जाई, पण आता तिथलं विज्ञान केंद्र बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आशेचा नवीन किरण ठरतं आहे. या science centre मध्ये जायला मुलांना खूप आवडतंय. ती आता तिथे नवनवीन यंत्रं घडवण्यापासून ते तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन उत्पादन तयार करायला शिकत आहेत. थ्रीडी प्रिंटर्स आणि रोबोटिक cars यांच्याबरोबरच इतर अभिनव गोष्टी समजून घेण्याची संधी मिळाली आहे. काही काळापूर्वीच मी गुजरात सायन्स सिटीमध्येही सायन्स गॅलरीजचं उद्घाटन केलं. आधुनिक विज्ञानाची क्षमता किती आहे आणि विज्ञान आपल्यासाठी काय काय करू शकतं.
याची झलक या गॅलरीजमधून मिळते. या गॅलरीजबद्दल तिकडे मुलांमध्ये खूप उत्साह आहे, असं मला समजलंय. विज्ञान आणि नवोन्मेषाबद्दल वाढत चाललेली ही ओढ भारताला निश्चितच एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपले १४० कोटी नागरिक, त्यांचं सामर्थ्य, त्यांची इच्छाशक्ती हे आपल्या देशाचं सर्वात मोठं बळ आहे. जेव्हा कोट्यवधी लोक एकजुटीने एखाद्या मोहिमेत सहभागी होतात तेव्हा त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो. याचं एक उदाहरण म्हणजे- 'एक पेड माॅं के नाम' हे अभियान. आपल्या जन्मदात्या आईसाठी तर हे अभियान आहेत आपल्याला कुशीत घेऊन सांभाळणाऱ्या धरतीमातेसाठीही ते आहे. मित्रहो, ५ जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाला या अभियानाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात या अभियानांतर्गत देशाभरात १४० कोटींपेक्षा जास्त झाड लावली गेली. भारताचा हा उपक्रम पाहून देशाबाहेरही लोकांनी आपल्या आईच्या नावानं झाडं लावली. आपणही या अभियानात सहभागी व्हा, जेणेकरून एक वर्ष पूर्ण होताना तुमच्या सहभागाचा तुम्हाला अभिमान वाटेल.
मित्रहो,
झाडांमुळे गारवा मिळतो, झाडांच्या सावलीत उकाड्यापासून दिलासा मिळतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित आणखी एका बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात गेल्या काही वर्षात ७० लाखांहून अधिक झाडं लावली गेली आहेत. या झाडांमुळे अहमदाबादमध्ये हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याच्याबरोबरच साबरमती नदीवर रिव्हर फ्रंट तयार झाल्यामुळे आणि कांकरिया कालव्यासारख्या काही कालव्यांच्या पुनर्निर्मितीमुळे तिथे जलपिंडांची संख्याही वाढली आहे. जागतिक तापमानवाढीशी दोन हात करणाऱ्या प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत अहमदाबादनं स्थान मिळवलं आहे असं काही अहवाल सांगतात. तिथल्या लोकांनाही हे परिवर्तन आणि वातावरणात आलेला गारवा जाणवतो. अहमदाबादमध्ये लागलेल्या झाडांमुळे तिथे नवीन संपन्नता निर्माण होते आहे. मी आपणा सर्वांना पुन्हा आग्रह करेन, की पृथ्वीचं आरोग्य सांभाळण्यासाठी, हवामानबदलाच्या आह्वानाचा समाचार घेण्यासाठी, आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी झाडं अवश्य लावा- एक पेड माॅं के नाम !
मित्रांनो,
एक खूप जुनी म्हण आहे, इच्छा तिथे मार्ग ! आपण जेव्हा काहीतरी नवीन करण्याचा निर्धार करतो तेव्हा निश्चितपणे ध्येयप्राप्ती होते. डोंगराळ भागात तयार होणारी सफरचंदं तर तुम्ही खूप खाल्ली असतील. पण जर मी विचारलं की तुम्ही कर्नाटकच्या सफरचंदाची चव घेतलीय का? तर तुम्ही चकित व्हाल. सफरचंदाचं उत्पादन डोंगराळ भागातच होतं, असंच आपल्याला सामान्यपणे वाटतं. पण कर्नाटकच्या बागलकोटमध्ये राहणारे श्री शैल तेली यांनी मैदानी भागात सफरचंदं पिकवली आहेत. त्यांच्या कुलाली गावात ३५ अंशापेक्षा अधिक तापमानातही सफरचंदाच्या झाडांना फळं धरू लागली आहेत. श्री शैल तेली यांना शेतीचा खरोखरच छंद होता, त्यांनी सफरचंदा शेतीच्याही प्रयोगाचे प्रयत्न केले आणि त्यांना यात यशही आलं. त्यांनी लावलेल्या सफरचंदाच्या झाडांना आज मोठ्या प्रमाणात सफरचंदं लागतात आणि त्यातून त्यांना उत्पन्नही चांगलं मिळतं.
दोस्तांनो,
आता सफरचंदांचा विषय निघालाच आहे तर तुम्ही किन्नौरी सफरचंदाचं नाव नक्की ऐकलं असणार. सफरचंदासाठी प्रसिद्ध असणाऱ्या किन्नौरमध्ये आता केशराचं उत्पादनही होतं. सर्वसामान्यपणे हिमाचलच्या भागात केशराची शेती कमीच होती पण आता किन्नौरच्या सुंदरशा सांगला खोऱ्यात केशराची शेती होऊ लागली आहे. असंच एक उदाहरण केरळच्या वायनाडचं. तिथेही केशर पिकवण्यात यश आलंय. आणि वायनाडमध्ये हे केशर एखाद्या शेतात किंवा मातीत नव्हे, तर Aeroponics technique ने पिकवला जाताय. लिचीच्या उत्पादनाबाबतही असंच थक्क करणारं काम झालंय. लिची बिहार, पश्चिम बंगाल किंवा झारखंडमध्ये होते, असंच आपण ऐकत आलो आहोत. परंतु आता लिचीचं उत्पादन दक्षिण भारतात आणि राजस्थानमध्येही होतंय. तमिळनाडूचे थिरू वीरा अरासू कॉफीची शेती करत असत. पण त्यांनी कोडाईकनालमध्ये लिचीची झाडं लावली आणि त्यांच्या ७ वर्षांच्या परिश्रमान्ती या झाडांना फळं धरली. लिची पिकवण्यातल्या या यशामुळे भोवतालच्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. राजस्थानात जितेंद्र सिंह राणावत हेही लिची पिकवण्यात यशस्वी झाले आहेत. या सगळ्या उदाहरणातून खूप मोठी प्रेरणा मिळते. आपण काही नवीन करण्याचा ध्यास घेतला आणि अडीअडचणींतही ठाम राहिलो, तर असाध्य तेही साध्य होऊ शकतं.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज एप्रिल मधला शेवटचा रविवार. काही दिवसातच मे महिना सुरू होईल. आता मी तुम्हाला जवळपास १०८ वर्षं मागे नेतो आहे. साल १९१७- याच एप्रिल आणि मे महिन्यात देशात स्वातंत्र्याचा एकक आगळावेगळा लढा सुरू होता. इंग्रज अनन्वित अत्याचार करत होते. गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांचं शोषण अमानुषतेच्याही पलिकडे पोहोचलं होतं. हे इंग्रज बिहारच्या सुपीक जमिनीवर, निळीची शेती करायला शेतकऱ्यांना भाग पाडत होते. निळीच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी उजाड होत चालल्या होत्या, पण इंग्रजी सत्तेला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. अशा परिस्थितीत १९१७ मध्ये गांधीजी बिहारच्या चंपारणमध्ये दाखल झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली- आमच्या जमिनी मरत चालल्या आहेत, खायला अन्नाचा कण नाही. लक्षावधी शेतकऱ्यांच्या त्या व्यथेमुळे गांधीजींच्या हृदयात एक संकल्प उमटला. आणि तिथेच चंपारणचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू झाला. 'चंपारण सत्याग्रह' हा बापूंनी भारतात केलेला पहिला मोठा प्रयोग होता. बापूंच्या सत्याग्रहानं संपूर्ण इंग्रजी सत्ता हादरली. निळीच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या कायद्याला इंग्रजांना स्थगिती द्यावी लागली. या विजयानं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नवा विश्वास जागा झाला. या सत्याग्रहात बिहारच्या आणखी एका सुपुत्राचंही मोठं योगदान होतं, हे आपल्या सर्वांना माहीत असेल. स्वातंत्र्यानंतर तेच भारताचे पहिले राष्ट्रपती बनले. हे महान नेते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांनी चंपारण सत्याग्रहावर एक पुस्तकही लिहिलं- Satyagraha in Champaran- हे पुस्तक प्रत्येक युवकानं वाचलं पाहिजे. बंधूभगिनींनो, एप्रिल महिन्याशी स्वातंत्र्यलढ्याचे अनेक आणि अमिट अध्याय जोडले गेले आहेत. एप्रिलच्याच ६ तारखेला गांधीजींची दांडी यात्रा पूर्ण झाली होती. १२ मार्चला सुरू होऊन २४ दिवस चाललेल्या या यात्रेनं इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते. जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेही एप्रिलमध्येच. या रक्तरंजित इतिहासाच्या खाणाखुणा पंजाबच्या धरतीवर आजही आपलं अस्तित्व दाखवतात.
मित्रहो,
काही दिवसातच म्हणजे १० मे ला पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचा स्मृतिदिन येईल. स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या संग्रामात जे स्फुल्लिंग चेतलं होतं, त्यानं पुढे जाऊन लक्षावधी सैनिकांसाठी धगधगत्या मशालीचं स्वरूप घेतलं. आताच २६ एप्रिलला आपण १८५७ च्या क्रांतीचे महान नायक बाबू वीर कुंवर सिंह यांची पुण्यतिथी साजरी केली. बिहारच्या या महान सेनानीमुळे साऱ्या देशाला प्रेरणा मिळते. अशाच लक्षावधी स्वातंत्र्यसनानींच्या अमर प्रेरणा आपल्याला जिवंत ठेवायच्या आहेत. आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते आणि अमृतकाळातल्या आपल्या संकल्पांना या ऊर्जेमुळे नवं बळ मिळतं.
मित्रांनो,
'मन की बात' च्या या दीर्घ प्रवासात आपण या कार्यक्रमाशी एक आपुलकीचं नातं जोडलं आहे. देशवासीयांना जे यश इतरांसमोर मांडावसं वाटतं, ते या मन की बात च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येतं. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन देशाच्या विविधता आणि गौरवशाली परंपरा तसंच नवीन सफलतांविषयी बोलू. आपल्या समर्पण आणि सेवाभावनेने समाजात परिवर्तन आणणाऱ्या लोकांविषयी आपण जाणून घेऊ. आपण नेहमीप्रमाणेच आपले विचार आणि सूचना आमच्यापर्यंत पोहोचवत राहा.
धन्यवाद, नमस्कार!
The perpetrators and conspirators of this attack will be served with the harshest response: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/mjF5ezrtes
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
In the war against terrorism, the unity of the country, the solidarity of 140 crore Indians, is our biggest strength: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/WI5BlQFDQG
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
There is a deep anguish in my heart. The terrorist attack that took place in Pahalgam on the 22nd of April has hurt every citizen of the country: PM @narendramodi in #MannKiBaat pic.twitter.com/oAmct2pZOF
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
Dr. K. Kasturirangan Ji's selfless service to the country and contribution to nation building will always be remembered: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/h2FzD5xaxf
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
Today, India has become a Global Space Power. #MannKiBaat pic.twitter.com/0oJliacysa
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
We are very proud of all those who participated in Operation Brahma: PM @narendramodi in #MannKiBaat pic.twitter.com/lXuubTALo0
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
Whenever it comes to serving humanity, India has always been and will always be at the forefront. #MannKiBaat pic.twitter.com/whLG6VWWO7
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
SACHET App for disaster preparedness. #MannKiBaat pic.twitter.com/ntWYM8N44R
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
Growing curiosity for science and innovation amongst youth will take India to new heights. #MannKiBaat pic.twitter.com/sWAHzpZfcV
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
#EkPedMaaKeNaam initiative shows the power of collective action. #MannKiBaat pic.twitter.com/cK9gTpktFU
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
A noteworthy effort in Karnataka to grow apples. #MannKiBaat pic.twitter.com/TDiuBUEbcg
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025
Champaran Satyagraha infused new confidence in the freedom movement. #MannKiBaat pic.twitter.com/5kbGkzrM8G
— PMO India (@PMOIndia) April 27, 2025