पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

एखादे हस्तलिखित पाहणे म्हणजे काळाच्या ओघातील प्रवासासारखे आहे, असे सांगून मोदी यांनी आजच्या आणि भूतकाळातील परिस्थितीत असलेल्या मोठ्या तफावतीवर विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, आज की-बोर्डच्या मदतीने आपण डिलीट आणि करेक्शनच्या सोयीसह खूप काही लिहू शकतो, आणि प्रिंटरद्वारे एकाच पानांच्या हजारो प्रती तयार करू शकतो.
पंतप्रधानांनी उपस्थितांना अनेक शतकांपूर्वीच्या जगाची कल्पना करण्याचे आवाहन केले. त्यावेळी आधुनिक भौतिक संसाधने उपलब्ध नव्हती आणि आपले पूर्वज केवळ बौद्धिक संसाधनांवर अवलंबून होते, यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक अक्षर लिहिताना किती काळजी घ्यावी लागत असे, यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक ग्रंथ तयार करण्यासाठी केलेल्या प्रचंड प्रयत्नांवर भर देत मोदी म्हणाले की, त्या काळातही भारतातील लोकांनी मोठी ग्रंथालये बांधली, जी ज्ञानाची जागतिक केंद्रे बनली. भारताकडे आजही जगातील सर्वात मोठा हस्तलिखित संग्रह आहे आणि भारतात अंदाजे एक कोटी हस्तलिखिते आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. इतिहासाच्या क्रूर लाटांमध्ये लाखो हस्तलिखिते नष्ट झाली आणि हरवली, यावर प्रकाश टाकून मोदी यांनी यावर भर दिला की, जी हस्तलिखिते वाचली आहेत ती आपल्या पूर्वजांचे ज्ञान, विज्ञान, वाचन आणि शिक्षण याप्रति असलेले असीम समर्पण दर्शवतात. भूर्जपत्र आणि ताडाच्या पानांवर लिहिलेल्या ग्रंथांची नाजूक अवस्था आणि तांब्याच्या पत्रांवर लिहिलेल्या शब्दांना धातूची गंज लागण्याचा धोका असूनही, आपल्या पूर्वजांनी शब्दांना दैवी मानले आणि 'अक्षर ब्रह्म भावनेने' त्यांची सेवा केली, असे पंतप्रधानांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या, कुटुंबांनी हे ग्रंथ आणि हस्तलिखिते काळजीपूर्वक जपली, ज्यामुळे ज्ञानाप्रति असलेला असीम आदर दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भावी पिढ्यांबद्दलची चिंता व्यक्त केली आणि समाजाप्रति असलेल्या जबाबदारीच्या भावनेवर भर दिला. ते म्हणाले की, अशा समर्पणाचे याहून मोठे उदाहरण कुठेही सापडणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्राप्रति असलेल्या भक्तीच्या भावनेचा गौरव केला.

“भारताची ज्ञान परंपरा आजही समृद्ध आहे कारण ती जतन, नवोन्मेष, वर्धन, आणि अंगिकार या चार मूलभूत स्तंभांवर आधारित आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
पहिल्या स्तंभावर, म्हणजेच जतन यावर, अधिक स्पष्टीकरण देताना मोदी म्हणाले की, भारताचे सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या वेदांना, भारतीय संस्कृतीचा पाया मानले जाते. वेद सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगून, त्यांनी स्पष्ट केले की पूर्वी, वेद मौखिक परंपरेतून, म्हणजेच 'श्रुती' मार्गाने, पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केले जात होते. हजारो वर्षे वेदांचे जतन पूर्ण सत्यतेने आणि कोणत्याही त्रुटीशिवाय करण्यात आले, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी दुसऱ्या स्तंभाबद्दल, म्हणजेच नवोन्मेषाबद्दल बोलताना सांगितले की, भारताने आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि धातूशास्त्र यामध्ये सातत्याने नवनवीन शोध लावले. ते म्हणाले की, प्रत्येक पिढीने मागील पिढीच्या ज्ञानाला पुढे नेले आणि प्राचीन ज्ञान अधिक वैज्ञानिक बनवले. त्यांनी सततच्या विद्वत्तापूर्ण योगदानाचे आणि नवीन ज्ञानाच्या संवर्धनाचे उदाहरण म्हणून सूर्य सिद्धांत आणि वराहमिहिर संहिता या ग्रंथांचा उल्लेख केला. तिसऱ्या स्तंभाची, म्हणजेच वर्धनाचे विवेचन करताना मोदी यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पिढीने केवळ जुने ज्ञान जपले नाही, तर त्यात नवीन विचारांची भर घातली. त्यांनी मूळ वाल्मिकी रामायणानंतर अनेक रामायणे रचली गेल्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, याच परंपरेतून रामचरितमानस सारखे ग्रंथ उदयास आले, तर वेद आणि उपनिषदांवर भाष्ये लिहिली गेली. भारतीय आचार्यांनी द्वैत आणि अद्वैत सारख्या व्याख्या दिल्या, यावर त्यांनी भर दिला.
चौथ्या स्तंभावर, म्हणजेच अंगिकारावर बोलताना, पंतप्रधानांनी सांगितले की, काळानुसार भारताने आत्म-परीक्षण केले आणि आवश्यक ते बदल केले. त्यांनी चर्चांना दिलेले महत्त्व आणि शास्त्रार्थाची परंपरा कशी चालू राहिली यावर भर दिला. समाजाने कालबाह्य झालेल्या कल्पनांचा त्याग केला आणि नव्या कल्पना स्वीकारल्या, असे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, मध्ययुगीन काळात, जेव्हा समाजात अनेक कुप्रथा निर्माण झाल्या, तेव्हा अनेक थोर व्यक्तींनी समाजात जागृती केली. त्यांनी या व्यक्तींनी भारताचा बौद्धिक वारसा कसा जपला आणि त्याचे संरक्षण कसे केले, यावर भर दिला.

भारताचा इतिहास हा केवळ राजघराण्यांचा उदय आणि अस्त यापुरता मर्यादित नाही, यावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की राष्ट्रीयत्वाच्या आधुनिक संकल्पनांपेक्षा वेगळी , अशी भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख, स्वतःची जाणीव आणि स्वतःचा आत्मा आहे. काळाच्या ओघात संस्थाने आणि राजवटींच्या भौगोलिक सीमारेषा बदलल्या असल्या तरी भारत हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत तसूभरही बदलेला नाही, असे त्यांनी सांगितले. भारत हा एक असा जिवंत झरा आहे, ज्याला त्याचे विचार, कल्पना आणि मूल्यांनी आकार दिला आहे. "भारताच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये या संस्कृतीच्या प्रवासाचा सातत्यपूर्ण प्रवाह दिसून येतो", ही हस्तलिखिते विविधतेतील एकतेची घोषणापत्र आहेत असे ते म्हणाले.
देशभरात सुमारे 80 भाषांमध्ये हस्तलिखिते आढळतात असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील अनेक भाषांपैकी संस्कृत, प्राकृत, आसामी, बंगाली, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम आणि मराठी या भाषांमध्ये भारताचा विशाल ज्ञानसागर जतन केला आहे. गिलगिट मधील हस्तलिखिते काश्मीरमधील सत्य, ऐतिहासिक अंतर्दृष्टी प्रदान करतात तर कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रातील हस्तलिखिते राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांतील भारताच्या सखोल आकलनावर प्रकाश टाकतात, असे ते म्हणाले. आचार्य भद्रबाहूंचे कल्पसूत्र हस्तलिखित जैनधर्मातील प्राचीन ज्ञानाचे जतन करतात आणि सारनाथ मधील हस्तलिखिते भगवान बुद्धांची शिकवण सांगतात. रासमंजरी आणि गीतगोविंद या हस्तलिखितांमध्ये भक्ती, सौन्दर्य आणि साहित्य यांचा अनमोल साठा आहे.
भारतातील हस्तलिखिते मानवतेच्या संपूर्ण विकासयात्रेच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतात यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की या हस्तलिखितांमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा मागोवा घेतला आहे. या हस्तलिखितांमध्ये वैद्यकशास्त्र आणि तत्त्वज्ञान समाविष्ट आहे आणि कला, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचे ज्ञान देखील जपले जाते. अशी अगणित उदाहरणे दाखवता येतील ज्यातून हे दिसून येते की गणितापासून ते द्विमान अंक पद्धतीवर-आधारित संगणक विज्ञानापर्यंत आधुनिक विज्ञानाचा पाया हा शून्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. शून्याचा शोध हा भारतात लागला यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की बख्शाली हस्तलिखितात शून्य आणि गणितीय सूत्रांच्या प्राचीन वापराचे पुरावे आहेत. यशोमित्राचे बोवर हस्तलिखित शतकानुशतके जुन्या वैद्यकीय शास्त्राची अंतर्दृष्टी प्रदान करते असे त्यांनी नमूद केले. चरक संहिता आणि सुश्रुत संहितेसारख्या हस्तलिखितांमध्ये आजच्या काळातील आयुर्वेदाचे ज्ञान जतन केले आहे. सुल्वा सूत्रांनी प्राचीन भौमितीय ज्ञान प्रदान केले आहे तर कृषी पराशर मध्ये पारंपरिक कृषीविषयक ज्ञानाची माहिती दिली आहे. नाट्य शास्त्रासारख्या हस्तलिखितांमुळे मानवी भावभावनांमध्ये होत गेलेल्या विकासाचा प्रवास आपल्याला कळू शकला, असे पंतप्रधान म्हणाले.

प्रत्येक देश आपल्या ऐतिहासिक संपत्तीला आपल्या महान संस्कृतीचे प्रतीक म्हणून जगासमोर मांडतो, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की देश अगदी एखादे हस्तलिखित किंवा कलाकृती राष्ट्रीय खजिना म्हणून जतन करतात. भारताकडे तर हस्तलिखितांच्या स्वरूपात फार मोठी संपत्ती असून ही देशासाठी एक अभिमानाची बाब आहे.
पंतप्रधानांनी यासंदर्भात आपला एक वैयक्तिक अनुभव सामायिक केला. त्यांच्या कुवेत दौऱ्यात ते एका व्यक्तीला भेटले ज्यांच्याकडे भारताच्या प्राचीन सागरी वाहतुकीच्या व्यापारी मार्गांचे दर्शन घडवणाऱ्या ऐतिहासिक दस्तावेजांचा संग्रह होता. त्या गृहस्थांनी त्यांच्याशी मोठ्या अभिमानाने संपर्क साधला आणि शतकांपूर्वी भारत समुद्री व्यापार कसा करत होता हे दाखवणारे साहित्य सादर केले. अशा प्रकारचे संग्रह भारताच्या जागतिक स्तरावरील व्यवहारांची खोली दर्शवतो आणि सीमापार भारताला मिळणारा आदर यातून व्यक्त होतो, असे ते म्हणाले. या विखुरलेल्या खजिन्याला जतन करुन त्यांचे एकत्रीकरण करणे हा एक राष्ट्रीय स्तरावरील मोठा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या नोंदी - जिथे कुठेही सापडतील - त्यांचे दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन करुन भारताच्या संस्कृतीच्या वारशाचा भाग म्हणून आणि साजरे केले पाहिजे, असे ते म्हणाले.
"भारताने जगाचा विश्वास संपादन केला आहे. आज जग भारताकडे सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि गौरव करण्यासाठीचे योग्य स्थान म्हणून पाहत आहे." असे त्यांनी सांगितले. याआधी भारतातून चोरून नेलेल्या अगदी थोड्या भारतीय मूर्ती परत केल्या गेल्या. मात्र आता शंभराहून अधिक भारतीय मूर्ती परत भारतात पाठवल्या जात आहेत. या परत येणाऱ्या वस्तू काही कोणत्या भावनेतून किंवा सहानुभूती म्हणून परत केल्या जात नाहीत तर त्या एका विश्वासाने परत केल्या जात आहेत आणि तो विश्वास म्हणजे भारत आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे सन्मानपूर्वक जतन करेल हा आहे. जगाच्या दृष्टीने भारत हा वारशाचा एक विश्वासार्ह संरक्षक बनला आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्यांनी मंगोलियाच्या भेटीतील वैयक्तिक अनुभव सांगितला, जिथे त्यांनी बौद्ध भिक्षूंशी संवाद साधला आणि त्यांच्या समृद्ध हस्तलिखित संग्रहाचे निरीक्षण केले. त्यांनी त्या हस्तलिखितांवर काम करण्याची परवानगी मागितल्याचे आपल्याला आठवत असून, ती हस्तलिखिते नंतर भारतात आणण्यात आली , त्यांचे डिजिटायझेशन केले गेले आणि आदरपूर्वक परत करण्यात आली.ती हस्तलिखिते आता मंगोलियासाठी एक मौल्यवान वारसा बनली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत आता हा वारसा जगासमोर अभिमानाने सादर करण्याची तयारी करत आहे हे स्पष्ट करून, ज्ञान भारतम मिशन हे या भव्य उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे त्यांनी सांगितले. देशभरातील अनेक संस्था केंद्र सरकारबरोबर जनसहभागाच्या भावनेने कार्य करत आहे. काशी नागरी प्रचारिणी सभा, कोलकात्याची एशियाटिक सोसायटी, उदयपूरचे ‘धरोहर’, गुजरातमधील कोबा येथील आचार्य श्री कैलाशसुरी ज्ञानमंदिर, हरिद्वारमधील पतंजली, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि तंजावरमधील सरस्वती महाल लायब्ररी या संस्था हे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या संस्थांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत दहा लाखांहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटलीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नागरिक त्यांचा कौटुंबिक वारसा राष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आले आहेत असे सांगून पंतप्रधानांनी या सर्व संस्था आणि अशा प्रत्येक नागरिकाचे आभार मानले.
भारताने कधीही आपले ज्ञान पैशाच्या ताकदीवर मोजले नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय ऋषींच्या प्राचीन ज्ञानाचा उल्लेख करून ज्ञान हे सर्वात मोठे दान आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. प्राचीन काळात भारतातील लोक उदारतेच्या भावनेने हस्तलिखिते दान करत असत, असेही ते म्हणाले. मोदींनी नमूद केले की जेव्हा चिनी प्रवासी ह्युएन त्सांग भारताला भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी सहाशेहून अधिक हस्तलिखिते सोबत नेली होती. अनेक भारतीय हस्तलिखिते चीनमार्गे जपानमध्ये पोहोचली. 7 व्या शतकात, ही हस्तलिखिते जपानच्या होर्यू-जी मठात जतन करण्यात आली होती यावर त्यांनी प्रकाश टाकला. आजही जगातील अनेक देशांमध्ये भारताची प्राचीन हस्तलिखिते जतन केलेली आहेत, असे ते म्हणाले. ‘ज्ञान भारतम्’ मिशन अंतर्गत, भारत मानवतेच्या या सामायिक वारशाला एकत्रित करण्यासाठी देखील प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताने ही मोहीम जी-20 च्या सांस्कृतिक संवादादरम्यान सुरू केली होती याचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी सांगितले की भारताशी शतकानुशतके जुने सांस्कृतिक संबंध असलेले देश या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होत आहेत. मंगोलियन कांजूरचे पुनर्मुद्रित खंड मंगोलियाच्या राजदूताला भेट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 2022 मध्ये, हे 108 खंड मंगोलिया आणि रशियामधील मठांना देखील वितरित करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. भारताने थायलंड आणि व्हिएतनाममधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. या देशांतील विद्वानांना प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रयत्नांमुळे, पाली, लन्ना आणि चाम भाषांमधील अनेक हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. ‘ज्ञान भारतम्’ मिशनद्वारे, भारत या उपक्रमांचा आणखी विस्तार करेल, असेही त्यांनी सांगितले.

‘ज्ञान भारतम्’ मिशन भारतासमोरील एका मोठ्या आव्हानाला देखील तोंड देईल असे सांगून, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या भारताच्या पारंपारिक ज्ञान प्रणालीतील असंख्य घटकांची अनेकदा इतरांकडून कॉपी आणि पेटंट घेतली जातात. या प्रकारच्या वाड्:मयचौर्यला आळा घालण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. डिजिटल हस्तलिखिते अशा गैरवापराला रोखण्याच्या प्रयत्नांना गती देतील आणि बौद्धिक वाड्:मयचौर्य नियंत्रित करण्यास मदत करतील, असे ते म्हणाले. यातून जगाला विविध विषयांमधील प्रामाणिक आणि मूळ स्त्रोत उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्ञान भारतम् मिशनचा आणखी एक महत्त्वाचा पैलू अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की हे मिशन संशोधन आणि नवोन्मेषाचे नवीन क्षेत्र खुले करेल. जागतिक सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगाचे मूल्य अंदाजे 2.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे, हे त्यांनी सांगितले. डिजिटायझ्ड हस्तलिखिते या उद्योगाच्या मूल्य साखळीत भर घालतील, असे ते म्हणाले. ही कोट्यवधी हस्तलिखिते आणि त्यामध्ये अंतर्भूत असलेले प्राचीन ज्ञान, एक विशाल डेटा बँक म्हणून काम करतील, यामुळे डेटा-आधारित नवोन्मेषाला एक नवीन चालना मिळेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील आणि हस्तलिखितांचे डिजिटायझेशन जसजसे पुढे जाईल तसतशा शैक्षणिक संशोधनासाठी नवीन शक्यता देखील निर्माण होतील, असे ते म्हणाले.
या डिजिटायझ्ड हस्तलिखितांचा प्रभावीपणे अभ्यास करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल, असे नमूद करून पंतप्रधानांनी यावर भर दिला की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने, प्राचीन हस्तलिखिते अधिक खोलवर समजून घेता येतात आणि त्यांचे अधिक व्यापकपणे विश्लेषण करता येतात, असेही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता या हस्तलिखितांमध्ये असलेले ज्ञान जगासमोर प्रामाणिक आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यास देखील मदत करू शकते, हे त्यांनी स्पष्ट केले.

ज्ञान भारतम मिशनमध्ये देशातील सर्व तरुणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मोदी यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूतकाळाचा शोध घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पुराव्यावर आधारित निकषांवर हे ज्ञान मानवतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशभरातील विद्यापीठे आणि संस्थांना या दिशेने नवीन उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. संपूर्ण राष्ट्र स्वदेशीच्या भावनेने आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाने प्रेरित होऊन पुढे जात आहे हे अधोरेखित करत मोदी यांनी हे अभियान त्या राष्ट्रीय भावनेचा विस्तार असल्याचे प्रतिपादन केले. भारताने आपल्या वारशाला आपल्या सामर्थ्याचे प्रतिक बनवले पाहिजे. ज्ञान भारतम मिशन भविष्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राव इंद्रजीत सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
आंतरराष्ट्रीय ‘ज्ञान भारतम्’ परिषद 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ‘हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताचा ज्ञान वारसा पुन्हा मिळवणे’ या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारताच्या अतुलनीय हस्तलिखित संपत्तीचे पुनरुज्जीवन करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी आणि ती जागतिक ज्ञान संवादाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आघाडीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरण तज्ञ एकत्र येणार आहेत. या परिषदेत दुर्मिळ हस्तलिखिते प्रदर्शित करणारे प्रदर्शन तसेच हस्तलिखित संवर्धन, डिजिटायझेशन तंत्रज्ञान, मेटाडेटा मानके, कायदेशीर आराखडे, सांस्कृतिक कूटनीति आणि प्राचीन लिपींचा उलगडा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर अभ्यासपूर्ण सादरीकरणे देखील होतील.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
#GyanBharatam Mission is set to become the voice of India's culture, literature and consciousness. pic.twitter.com/zanqx4stxs
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
Today, India has the world's largest collection of about one crore manuscripts. pic.twitter.com/vnSXJAa2Kc
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
Throughout history, crores of manuscripts were destroyed, but the ones that remain show how devoted our ancestors were to knowledge, science and learning. pic.twitter.com/pQQ0JnlRv5
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
India's knowledge tradition is built on four pillars... pic.twitter.com/10gpfDBOrA
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
India's history is not just about the rise and fall of dynasties. pic.twitter.com/792omip0Tq
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
India is itself a living stream, shaped by its ideas, ideals and values. pic.twitter.com/WKUev33svO
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025
India's manuscripts contain footprints of the development journey of the entire humanity. pic.twitter.com/zAat3MzdQn
— PMO India (@PMOIndia) September 12, 2025


