शांतता आणि उद्यमशीलतेसाठी ओळखले जाणारे सिक्कीम वेगाने प्रगती करत आहे : पंतप्रधान
येथे येताना संपूर्ण रस्त्यात मला जाणवलेली एक सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सिक्कीमच्या रस्त्यांची स्वच्छता: पंतप्रधान
दूर-दूरपर्यंत कुठेही कचरा नाही, हवेतही स्वच्छता, रस्त्यांवरही स्वच्छता, सिक्कीमचे लोक निसर्गाचे खरे रक्षक आहेत, ब्रँड ॲम्बेसेडर आहेत: पंतप्रधान
आम्ही सिक्कीममध्ये संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहोत; गेल्या काही वर्षांमध्ये येथे शेकडो किलोमीटरचे महामार्ग बांधण्यात आले आहेत, प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचे काम जलद गतीने सुरू आहे: पंतप्रधान
सिक्कीमसाठी संधींचे आणखी एक मोठे क्षितिज क्रीडा क्षेत्रात आहे; येथील युवकांनी मोठ्या मंचांवर आपली क्षमता आणि प्रतिभेचे दर्शन घडवले आहे: पंतप्रधान
मजबूत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांबरोबरच लोकांना किफायतशीर वैद्यकीय उपचारही मिळावेत यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे: पंतप्रधान
पूर्वी, आम्ही गरीबांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी आयुष्मान कार्ड दिले होते; आता, ही सुविधा 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे, जन औषधी केंद्रांवर औषधे अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत: पंतप्रधान
सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीचे सिक्कीमचे हे मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे: पंतप्रधान
सिक्कीमची जीवनशैली आणि सिक्कीमचा संकल्प आज देशाच्या दूरदृष्टीचा अविभाज्य भाग बनला आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या गंगटोक येथे सिक्कीमच्या राज्यस्थापनेच्या 50व्या वर्षाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि उद्घाटन केले.

पालजोर स्टेडियममध्ये उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधानांनी या राज्याशी आपले गहिरे  नाते असल्याचे सांगितले.  ऑर्किड बागांना दिलेल्या भेटीचा अनुभव सांगताना पंतप्रधान म्हणाले की, निसर्गाच्या चैतन्यमय रंगांनी आणि उल्हासाने ते मंत्रमुग्ध झाले होते. राज्याच्या नैसर्गिक खजिन्याचा उल्लेख करत  ते म्हणाले की, ऑर्किड बाग म्हणून ओळखले जाणारे सिक्कीमचे 'पूर्वेकडील नंदनवन' अप्रतिम  सौंदर्य, शांती आणि आध्यात्मिक आनंदाची अनुभूती  देते. "हा अनुभव केवळ सौभाग्यानेच मिळतो. माझे मन अजूनही त्या रंगांमध्ये आणि त्या उल्हासात रमले आहे," असे मोदी म्हणाले..

सिक्कीमचा  50 वर्षांचा प्रवास एका दिव्य वातावरणात साजरा करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. जेव्हा एखादा प्रसंग इतका ऐतिहासिक असतो आणि अशा दिव्य वातावरणात साजरा होतो, तेव्हा त्याची भव्यता कैक पटींनी वाढते.  सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण, लोकांचा उत्साह आणि समोर पर्वतरांगा आणि आकाशातील सुंदर छटांनी  पालजोर स्टेडियममध्ये एक जादुई वातावरण निर्माण केले होते. "जणू काही निसर्ग आणि संस्कृती एकत्र जिवंत झाले होते, असे वाटले. या आठवणी माझ्या हृदयात कायम राहतील," असे मोदी म्हणाले.

 

अखेर सिक्कीमला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि, गेल्या वेळच्या दौऱ्यात,  खराब हवामानामुळे, त्यांना गंगटोकला पोहोचता आले नव्हते, आणि बागडोगरावरुनच लोकांशी ऑनलाईन संवाद साधावा लागला होता याचे त्यांनी स्मरण केले. त्यावेळी सर्व लोकांना प्रत्यक्ष भेटता आले नाही, याची निराशा त्यांच्या मनात होती, त्यामुळे, असं भेटण्याची संधी ते शोधत होते. “अखेर ती प्रतीक्षा आज या प्रसंगामुळे संपली” असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी, सिक्कीमच्या लोकांना भेटण्याचा अनुभव सांगत, त्यांच्याविषयीचा स्नेह व्यक्त केला. सिक्कीमचे लोक अत्यंत साधे-सभ्य असल्याचे सांगत, त्यांचे हसरे चेहरे आपल्या मनात कायम शांत भावना निर्माण करतात, असे पंतप्रधान म्हणाले. मुख्य कार्यक्रमाआधी पंतप्रधानांनी, सिक्कीमच्या अनेक प्रतिभासंपन्न लोकांची भेट घेतली. यात, नामवंत लोक, पद्म पुरस्कार विजेते, कलावंत आणि फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी, या सर्वांशी विविध विषयांवर चर्चाही केली. “सिक्कीमच्या लोकांशी होणारी भेट, कायमच मला एक आगळेवेगळे समाधान देणारी असते” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

त्यांच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या रोड शोचे अत्यंत सविस्तर वर्णन करत,  आपल्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव असल्याचे, पंतप्रधानांनी सांगितले. गुंजा लामा द्वार ते लोकभवनापर्यंतच्या रस्त्यावर, सिक्कीमच्या जनतेने मोठ्या संख्येने दुतर्फा उभे राहून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी, 21 स्थानिक मूळ समुदायांचे लोक, त्यांच्या पारंपरिक वेशभूषा करून आले होते, त्यांनी आपल्या पारंपरिक कला आणि संगीताचे प्रदर्शन केल्याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. संपूर्ण वातावरणच अत्यंत उत्सवी झाले होते. “सगळे दृश्य असे मनोहर होते, जणू, निसर्गाच्या कुशीतून, विविध रंग फुलताहेत, लोकांच्या हातात आपला प्रिय तिरंगा होता, त्यांच्या मुखात भारत माता की जय आणि वंदे मातरम, चा जयघोष होता; संपूर्ण वातावरणात, एक भारत-श्रेष्ठ भारत” चे मर्मच प्रतिबिंबित होत होते” असे वर्णन मोदी यांनी केले आहे.

 

यावेळी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वात महत्वाचे म्हणजे, सिक्कीमच्या रस्त्यावर असलेली संपूर्ण स्वच्छता अत्यंत लक्षवेधी होती, कुठेही कचरा किंवा धूळ नव्हती, हवा आणि रस्ते दोन्हीही स्वच्छ होते, असे त्यांनी अधोरेखित केले. “तुम्ही सगळे निसर्गाचे एकनिष्ठ रक्षक आणि शुभेच्छादूतही आहात” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

रोड शो आणि या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पंतप्रधानांनी सर्व नागरिक आणि कलावंतांचे आभार मानले. तसेच या उत्सवाबद्दल, सिक्कीमचे लोक आणि संपूर्ण देशाचेही अभिनंदन केले. “तुम्हा सर्वांचे हे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाच्या ऋणाची परतफेड करण्यात, कोणतीही कसूर करणार नाही” अशी ग्वाही पंतप्रधानांनी उपस्थितांना दिली

सिक्कीमचा प्रवास, हा मानवी मूल्ये आणि परंपरांचा हात धरुन केलेल्या विकासाचा प्रवास आहे, असे वर्णन करत, पंतप्रधानांनी या प्रवासात वाटचाल केलेल्या अनेक पिढ्यांचे स्मरण करत, त्यांचा विशेष उल्लेख केला. राज्य सरकार, अत्यंत प्रामाणिकपणे, सिक्कीमचा वारसा आणि परंपरा जपत विकासाला गती देण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारसाठी, सिक्कीम आणि एकूणच ईशान्य भारत, हा केवळ देशाचा एक भाग नाही, तर ही राज्ये भारताच्या अष्टलक्ष्मीचे प्रतिनिधित्व करतात, असे ते म्हणाले. “म्हणूनच, ज्यावेळी आम्ही ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणावर काम करतो, त्याचवेळी आम्ही, ‘अॅक्ट फास्ट फॉर द नॉर्थ-ईस्ट’ (ईशान्य भारतासाठी जलद काम करा) असाही संकल्प घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.

रस्ते, उर्जा, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक प्रकल्पांचे आज उद्घाटन आणि भूमीपूजन झाले हे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. वर्ष 2023 नंतर सिक्कीमच्या उत्तर भागात निर्माण झालेल्या समस्यांकडे, विशेषतः येथील प्रभावित संपर्क सुविधा पुनर्स्थापित करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. “ज्या भागात संपर्क सुविधा यंत्रणा प्रभावित झाली होती तेथे ही यंत्रणा बळकट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे,” पंतप्रधान म्हणाले.

 

पर्यटनसंबंधी अर्थव्यवस्था ही सिक्कीमची सर्वात मोठी ताकद आहे हे मान्य करत पंतप्रधानांनी असे नमूद केले की भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या एक टक्क्याहूनही कमी भूभाग असलेल्या सिक्कीममध्ये भारताच्या एकूण पुष्प विविधतेपैकी 25 टक्के वैविध्य दिसून येते, तसेच येथे सुमारे 25 प्रकारचे पक्षी, फुलपाखरांच्या सुमारे 700 जाती, सुंदर वनाच्छादन आणि भव्य कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणातील निसर्ग संपदेमुळे प्रत्येकाला पुन्हा पुन्हा सिक्कीम भेटीवर यावेसे वाटते,” पंतप्रधान म्हणाले.

सिक्कीममधील पर्यटन व्यवसाय मोठ्या संख्येने लोकांना उत्पन्न मिळवून देतो आणि राज्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा असतील तेव्हाच पर्यटन व्यवसाय भरभराटीला येतो यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. अलीकडच्या काही वर्षांमध्ये शेकडो किलोमीटर्सचे महामार्ग बांधण्यात आले असून या भागातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. एकेकाळी अकल्पनीय असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा आता वास्तवात निर्माण होत आहेत. “म्हणूनच आम्ही सिक्कीमच्या संपर्क जोडणी व्यवस्थेवर आणि पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत.

प्रमुख संपर्क जोडणी प्रकल्पांना अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी बागडोगरा-गंगटोक द्रुतगती महामार्ग आणि सेवॉक-रँगपो रेल्वे मार्ग हे सिक्कीमला संपूर्ण देशाशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत असे नमूद केले. नवीन राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येत आहेत आणि गंगटोकसारख्या शहरांमध्ये रिंग रोड सारखे अत्यावश्यक भविष्यकालीन प्रकल्पांचे काम देखील प्रगतीपथावर आहे. “या दिशेने सुद्धा काम वेगाने सुरू आहे,” मोदी म्हणाले.

वर्ष 2008-09 मध्ये मंजुरी मिळालेल्या पण फाईल्समध्ये अडकल्यामुळे प्रत्यक्ष कोणतेही काम न झालेल्या सेवॉक-रँगपो रेल्वे मार्गाचे उदाहरण देत ते म्हणाले की सध्याचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर विकासाला गती मिळाली याकडे त्यांनी निर्देश केला. “पहिल्यांदाच, रेल्वे सेवा सिक्कीमपर्यंत पोहोचत आहे,”पंतप्रधान मोदी यांनी ठळकपणे नमूद केले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी नव्या संकल्पनांच्या गरजेवर अधिक लक्ष केंद्रित करत पंतप्रधानांनी भालेधुंगा येथे उभारण्यात येत असलेला स्कायवॉक आणि सिंगशोर पुलाच्या ठिकाणी काचेचा डेक असलेला स्कायवॉक उभारण्यासाठी सुरु असलेल्या तयारीसह भालेधुंगा, येन-येंग तसेच पेलिंग येथील रोपवेचे बांधकाम अधोरेखित केले. नथुला आणि नामली यांसारख्या जागांवर सीमासंबंधी अनुभवत भर टाकण्यासाठी देखील काम सुरु आहे. “या सर्व प्रयत्नांमुळे तुमचे जीवन आणखी सुलभ होईल, पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, तुमचे उत्पन्न सुधारेल आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील,” पंतप्रधान ग्वाही देत म्हणाले.

 

सरकारतर्फे सक्रियतेने चालना देण्यात येत असलेल्या इको-वेलनेस पर्यटनासाठी देखील सिक्कीममध्ये बराच वाव आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. स्थानिक जनतेला पर्यटनातून कमाल प्रमाणात उत्पन्न मिळण्याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी, 1,000 गृह-निवास बांधण्यात येत आहेत आणि साहसी पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांना देखील पाठबळ पुरवण्यात येत आहे असे ते म्हणाले. “पर्यटनापासून थेट लाभ मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण करत आहोत,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

सिक्कीमसाठी असीम क्षमतेचे आणखी एक क्षेत्र म्हणून क्रीडा क्षेत्राकडे लक्ष वेधताना पंतप्रधानांनी फुटबॉल, मुष्टियुद्ध आणि तिरंदाजी यांसारख्या प्रकारात आपली क्षमता आणि प्रतिभा सिद्ध करत राज्याचे आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या युवांचे कौतुक केले. ''तुमच्या युवा प्रतिभेने सिक्कीम आणि भारताचे नाव उंचावले आहे.'' असे पंतप्रधान म्हणाले.

सिक्कीमच्या आणि देशाच्या गौरवात भर घालणाऱ्या अशा अनन्यसाधारण क्रीडा प्रतिभेचे संवर्धन करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. 'खेलो इंडिया' आणि 'फिट इंडिया' चळवळीतून सरकारच्या बहुआयामी दृष्टिकोनाकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्य क्रीडा अकादमीचे पुनरुज्जीवन, सिक्कीम प्रीमियर लीगसारख्या स्पर्धांना प्रोत्साहन, तसेच जसलाल प्रधान यांच्या नावाने उभारली जाणारी अत्याधुनिक मुष्टियुद्ध अकादमी आणि एकात्मिक क्रीडा व सांस्कृतिक गावे  यांसारख्या आगामी प्रकल्पांच्या जोरावर, हे राज्य आता जागतिक दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सज्ज झाले आहे. ''यांमुळे सिक्कीमच्या युवांना अधिक चांगल्या सुविधा पुरवल्या जातील आणि क्रीडा क्षेत्रात आणखी उज्ज्वल कामगिरी करण्यास त्यांना साहाय्य मिळेल,'' असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आज उदघाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. एकेकाळी अत्यंत मर्यादित असलेल्या आरोग्यसेवा, त्यामुळे पर्यटकांची इथे येण्याबाबत पराङ्मुखता, याची आठवण  पंतप्रधानांनी करून दिली आणि या स्थितीत  झालेले परिवर्तन अधोरेखित केले. ''आज हे आव्हानदेखील संपत आहे'', असे पंतप्रधान म्हणाले.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सविस्तर माहिती  पंतप्रधानांनी दिली. सध्या सिक्कीममध्ये सुमारे 200 'आयुष्मान आरोग्य मंदिर' सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच चार जिल्हा रुग्णालये, तृतीयक उपचार रुग्णालये आणि निरामयता  केंद्रेदेखील कार्यरत असून, तिथे हजारो लोक आयुष सुविधांचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. "ड्रेजॉन्ग नामग्यल सोवा रिग्पा रुग्णालयाच्या उद्घाटनामुळे, सिक्कीमची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल'', असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांसोबतच किफायतशीर उपचार पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर देऊन पंतप्रधानांनी यासंदर्भातल्या विविध पुढाकारांविषयी सांगितले. मोफत उपचारांसाठी सुरुवातीला गरिबांना आयुष्मान कार्ड देण्यात आली आणि आता  70 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही सुविधा  विस्तारण्यात आली आहे. जन औषधी केंद्रांमध्ये  अत्यंत किफायतशीर दरात औषधे उपलब्ध आहेत. "या प्रयत्नांमुळे तुमचे जीवन सुलभ होण्यासोबतच तुमच्या वैद्यकीय खर्चातही कपात झाली आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले.

आर्थिक प्रगती आणि संसाधनांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून, आता जगाचे पूर्ण लक्ष शाश्वत जीवनशैली, स्वच्छ ऊर्जा आणि सेंद्रीय अन्नावर केंद्रित झाले आहे, असे पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले.  ईशान्य भारत आणि सिक्कीम हे भविष्यातील प्रगतीची प्रमुख केंद्रे आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच सिक्कीमने संपूर्ण देशाला दिशा दाखवल्याचेही त्यांनी नमूद केले. सिक्कीमने 2016 मध्ये स्वतःला पूर्णपणे सेंद्रीय राज्य घोषित केले आणि देशासमोर एक आदर्श ठेवला आहे, असे मोदी म्हणाले.

सिक्कीमच्या सेंद्रीय शेतीतील पुढाकाराचे कौतुक करतांना पंतप्रधानांनी नमूद केले की, देमाजोंग आता केवळ तांदूळ उत्पादनासाठीच नाही तर सेंद्रीय तांदळासाठी ओळखल्या जात आहे. मोठी वेलची, आले, हळद, एवोकॅडो आणि कीवी ही उत्पादने आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत, तर औषधी वनस्पतींच्या शेकडो प्रजाती स्थानिक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनत आहेत. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक सेंद्रीय प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. "सिक्कीमचे सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीचे मॉडेल संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, असे मोदी म्हणाले.  तुमची जीवनशैली आणि तुमचा निर्धार आता राष्ट्राच्या ध्येयाचा भाग बनला आहे.

सिक्कीमच्या आर्थिक प्रगतीमध्ये बचत गट आणि महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, त्यांची उत्पादने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात डिजिटल इंडिया मोठी भूमिका बजावत आहे. आज 'स्वयम सिक्कीम' सारखे व्यासपीठ या महिलांना सक्षम बनवत आहेत, असे मोदी म्हणाले.

 

सिक्कीममध्ये स्वच्छ ऊर्जेची मोठी क्षमता आहे, पर्यावरणाचे रक्षण करून त्याचा वापर करणे आवश्यक आह, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पर्यावरणाचे रक्षण करणे हा सिक्कीमच्या लोकांचा स्वभाव आहे, असे अधोरेखित करत त्यांनी 'एक पेड माँ के नाम' मोहिमेतील त्यांच्या सहभागाचे कौतुक केले. तसेच, त्यांनी स्थानिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या मेरो रुख मेरो संतती उपक्रमाची प्रशंसा केली, या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक बालकाच्या जन्मानंतर 108 झाडे लावली जातात. मला विश्वास आहे की हा उपक्रम संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे, असे मोदी म्हणाले.

सर्वांनी याच निष्ठेने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करतांनाच पंतप्रधानांनी हा एक वारसा असल्याचे वर्णन केले. पुढच्या पिढीसाठी त्याचे जतन करणे आवश्यक आहे, हा आपला वारसा आहे जो आपण भविष्यातील पिढ्यांसाठी संरक्षित केला पाहिजे, यावर मोदी यांनी भर दिला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सिक्कीमच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या संकल्पासह सिक्कीमला नव्या उंचीवर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत त्यांनी, पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्य आणि निरंतर समृद्धीसाठी मी शुभेच्छा देतो, असे म्हणत मोदी यांनी आपले भाषण संपवले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth