पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या आजचा दिवस अत्यंत उल्लेखनीय असून, हा क्षण खऱ्या अर्थाने अनमोल असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आपण पाहिलेले कलाविष्काराचे सादरीकरण, अनुभवलेला उत्साह आणि त्यातल्या समन्वयाने आपण खूप भारावून गेलो असल्याची भावनाही त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केली. या संपूर्ण कार्यक्रमात भूपेन दा यांच्या संगीताचा ताल निनादत होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या मनात सतत भूपेन हजारिका यांच्या गाण्यातील काही शब्द रुंजी घालत असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. भूपेन दा यांच्या संगीतलाटांचे तरंग सर्वत्र उमटत राहाव्यात अशी आपली आंतरिक इच्छाही त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे पंतप्रधानांनी मनःपूर्वक कौतुक केले. आसामध्ये सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा कार्यक्रम ठरतो, अशीच इथली उर्जा आहे असे ते म्हणाले. आज झालेले कलाविष्काराचे सादरीकरण अपवादात्मक असल्याचे म्हणत, त्यांनी सर्व कलाकारांची प्रशंसा केली तसेच त्यांचे अभिनंदनही केले.
काही दिवसांपूर्वीच, 8 सप्टेंबर रोजी, भूपेन हजारिका यांची जयंती साजरी करण्यात आल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. त्या दिवशी आपण भूपेन दा यांचा गौरव करणारा एक विशेष लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. भूपेन दा यांच्या 100 व्या जयंती सोहळ्याचा भाग होता आले, हा आपल्याला स्वतःचा विशेष सन्मानच वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. भूपेन दा यांना सर्वजण प्रेमाने शुद्धा कंठो म्हणून संबोधत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे वर्ष म्हणजे भारताच्या भावनांना आवाज देणाऱ्या, संगीताला संवेदनशीलतेसोबत जोडणाऱ्या, आपल्या संगीतातून भारताची स्वप्ने जपणाऱ्या तसेच गंगा मातेच्या माध्यमातून भारत मातेच्या करुणेचे वर्णन करणाऱ्या त्याच शुद्धा कंठो यांची यांच्या 100 व्या जयंतीचे वर्ष असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

भूपेन दा यांनी आपल्या संगीताने भारताला जोडणारी आणि भारतीयांच्या अनेक पिढ्यांवर गारुड घालणारी अजरामर गीते रचली अशा शब्दांत त्यांनी भूपेन हजारिका यांच्या कार्याचा गौरव केला. आज भूपेन दा आपल्यात जरी नसले तरी त्यांची गाणी आणि आवाज भारताच्या विकासाच्या वाटचालीचे साक्षीदार आहेत आणि त्याला ऊर्जाही देत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकार अभिमानाने भूपेन दा यांची 100 वी जयंती साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, भूपेन हजारिका यांची गाणी, त्यांनी दिलेला संदेश आणि त्यांचा जीवनप्रवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे, ही बाबही पंतप्रधानांनी नमूद केले. या कार्यक्रमात भूपेन हजारिका यांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या चरित्राचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भूपेन दा यांच्या 100 व्या जयंतीबद्दल आसामच्या जनतेला आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला शुभेच्छाही दिल्या.
भूपेन हजारिका यांनी आपले अवघे आयुष्य संगीत कलेच्या सेवेसाठी समर्पित केल्याचे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा संगीताला एक आध्यात्मिक साधनेचे स्वरुप येते, तेव्हा ते आपल्या आत्म्याला स्पर्श करते आणि जेव्हा संगीत एक संकल्प बनते, तेव्हा ते समाजाला मार्गदर्शन करण्याचे माध्यम बनते, अशी शब्दांत त्यांनी संगीत कलेचे महत्व उपस्थितांना सांगितले. भूपेन दा यांचे संगीत इतके अद्वितीय असण्यामागचेही हेच कारण होते असे ते म्हणाले. भूपेन दा यांनी आपल्या आयुष्यात जपलेली मूल्ये आणि त्यांचे अनुभव त्यांच्या गाण्यांमध्ये प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते असे ते म्हणाले. भूपेन दा यांच्या संगीतात दिसून येणारे भारतमातेवरचे गहीरे प्रेम, हे त्यांच्या एक भारत, श्रेष्ठ भारताच्या कल्पनेशी असलेल्या दृढ बांधिलकीतून आले होते, असे पंतप्रधान म्हणाले. भूपेन दा यांचा जन्म ईशान्य भारतात झाला आणि ब्रह्मपुत्रेच्या पवित्र जलतरंगांनी त्यांना संगीत कलेची शिकवण दिली असे त्यांनी सांगितले. भूपेन दा हे नंतर आपल्या पदवीच्या शिक्षणासाठी काशीला गेले होते याचा संदर्भही त्यांनी आपल्या संबोधनातून मांडला. ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर सुरू झालेला भूपेन दा यांचा संगीत कारकिर्दीचा प्रवास गंगेच्या प्रवाहाच्या तालाने संगीतातील पारंगततेपर्यंत पोहचला असे ते म्हणाले. काशीच्या बहुआयामित्वाने भूपेन हजारिका यांच्या जीवनाला अविरत गती मिळवून दिली, ही बाबही पंतप्रधानांनी नमूद केली.भूपेनदा हे एक भटके प्रवासी होते, त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि पीएचडीसाठी अमेरिकेलाही गेले, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भूपेनदा आसामचे सच्चे पुत्र म्हणून तिथल्या मातीशी जोडलेले राहिले. यामुळेच भूपेन दा भारतात परतले आणि चित्रपटांद्वारे सामान्य माणसाचा आवाज बनले, असे त्यांनी पुढे सांगितले. भूपेन -दा यांनी सामान्य लोकांच्या वेदनांना आवाज दिला आणि तो आवाज आजही देशाला प्रेरित करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.भूपेनदा यांच्या एका गीताचा संदर्भ देत पंतप्रधानांनी त्याचा अर्थ स्पष्ट केला: जर माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःख, वेदना यांचा विचार केला नाही, तर या जगात एकमेकांची पर्वा कोण करेल? ही कल्पना किती प्रेरणादायी आहे, याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. हाच विचार आज भारताला गरीब, वंचित, दलित आणि आदिवासी समुदायांचे जीवन उंचाविण्यासाठी मार्गदर्शन करत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

भूपेनदा यांना भारताच्या एकता आणि अखंडतेचे महान पुरस्कर्ते म्हणून संबोधताना, अनेक दशकांपूर्वी, जेव्हा ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केले जात होते आणि तो हिंसाचार आणि फुटीरतावादाने ग्रस्त होता, तेव्हाही भूपेन दा यांनी भारताच्या एकतेसाठी आवाज उठवला याची मोदी यांनी आठवण करुन दिली. भूपेनदा यांनी समृद्ध ईशान्य भारताचे स्वप्न पाहिले आणि या प्रदेशाच्या नैसर्गिक सौंदर्याची गाणी गायली, असे त्यांनी सांगितले. आसामविषयी भूपेनदा यांच्या काही ओळींचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, जेव्हा आपण हे गाणे गुणगुणतो, तेव्हा आपल्याला आसामची विविधता, सामर्थ्य आणि क्षमता यांचा अभिमान वाटतो.
भूपेनदा यांना अरुणाचल प्रदेशबद्दलही तितकेच प्रेम होते, हे नमूद करत पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशवरील भूपेनदा यांच्या गाण्यातील काही ओळी उद्धृत केल्या. एका खऱ्या देशभक्ताच्या हृदयातून निघालेला आवाज कधीही व्यर्थ जात नाही, असे ते म्हणाले. ईशान्य भारतासाठी भूपेनदा यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सरकार दिवसरात्र काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. भूपेनदा यांना भारतरत्न देऊन सरकारने ईशान्य भारताच्या आकांक्षा आणि अभिमानाचा सन्मान केला आणि या प्रदेशाला राष्ट्रीय प्राधान्य दिले, असे मोदी म्हणाले. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब पुलांपैकी एका पुलाला भूपेन हजारिका पूल असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारत वेगाने प्रगती करत आहे आणि विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. ही उपलब्धी म्हणजे देशाकडून भूपेनदा यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असे त्यांनी सांगितले.
“आसाम आणि ईशान्य भारताने नेहमीच भारताच्या सांस्कृतिक विविधतेत मोठे योगदान दिले आहे”, असे पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या समृद्ध इतिहास, उत्सव आणि कला, नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरणाचा उल्लेख करत सांगितले. या सर्वांबरोबरच, भारताच्या सन्मान आणि संरक्षणासाठी या प्रदेशातील लोकांनी केलेले बलिदान अविस्मरणीय आहे, असे ते म्हणाले. या योगदानाशिवाय आपण आपल्या महान भारताची कल्पना करू शकत नाही, असे मोदी म्हणाले. त्यांनी ईशान्य भारताचे देशाला नवा प्रकाश आणि नवी पहाट देणारी भूमी असे वर्णन केले. देशाचा पहिला सूर्योदय याच प्रदेशात होतो, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी भूपेनदा यांच्या गाण्यातील काही ओळीचा उल्लेख करत त्या ओळींतून हीच भावना व्यक्त झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा आपण आसामचा इतिहास साजरा करतो, तेव्हाच भारताचा इतिहास पूर्ण होतो—तेव्हाच भारताचा आनंद पूर्ण होतो आणि या वारशाचा अभिमान बाळगूनच आपण पुढे गेले पाहिजे.

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलताना लोक अनेकदा रेल्वे, रस्ता किंवा हवाई कनेक्टिव्हिटीचा विचार करतात, मात्र राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणखी एक प्रकारची कनेक्टिव्हिटी तितकीच आवश्यक आहे—ती म्हणजे सांस्कृतिक कनेक्टिव्हिटी, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. गेल्या 11 वर्षांत देशाने ईशान्य भारताच्या विकासाबरोबरच सांस्कृतिक कनेक्टिव्हिटीलाही खूप महत्त्व दिले आहे आणि ही एक सतत चालणारी मोहीम आहे, असे त्यांनी सांगितले. आजचा हा कार्यक्रम या मोहिमेची एक झलक दर्शवतो, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी वीर लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती नुकतीच राष्ट्रीय स्तरावर साजरी करण्यात आल्याचे सांगितले. स्वातंत्र्य संग्रामादरम्यान, आसाम आणि ईशान्य भारतातील अनेक शूर स्वातंत्र्यसैनिकांनी असाधारण बलिदान दिले, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान, सरकारने ईशान्य भारतातील या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला पुन्हा एकदा उजाळा दिला. आज संपूर्ण देशाला आसामचा इतिहास आणि त्याचे योगदान यांचे महत्व समजू लागले आहे, असे मोदी म्हणाले. नुकत्याच दिल्लीत आयोजित केलेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाचा उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले की, त्या कार्यक्रमातही आसामचे सामर्थ्य आणि कौशल्य ठळकपणे दाखवण्यात आले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की, कोणत्याही परिस्थितीत आसामने सदैव राष्ट्राच्या अभिमानाला आवाज दिला आहे. भूपेन दांचे गाणे हाच आत्मविश्वास प्रतिबिंबित करतात. 1962 च्या युद्धकाळात आसामने प्रत्यक्ष संघर्ष अनुभवला होता आणि त्या वेळी भूपेन दांनी आपल्या संगीताद्वारे देशाच्या निश्चयाला बळ दिले, असे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांनी सांगितले की, त्या काळात भूपेन दांनी लिहिलेल्या काव्य पंक्तीनी भारतवासीयांना नवी ऊर्जा दिली होती.
पंतप्रधानांनी भारताच्या जनतेचा दृढ आत्मविश्वास आणि संकल्प अधोरेखित करताना सांगितले की, हेच मनोबल ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्पष्टपणे दिसून आले. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना भारताने निर्णायक प्रत्युत्तर दिले आणि राष्ट्रशक्तीचा नाद जगभर घुमला, असे त्यांनी नमूद केले. “नवीन भारत आपल्या सुरक्षेवर आणि अभिमानावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही,” असे ठामपणे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने दाखवून दिले आहे की राष्ट्राचा कोणताही शत्रू कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित राहू शकणार नाही.
प्रधानमंत्री म्हणाले की आसामची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता विलक्षण आहे. आसामची परंपरागत वेशभूषा, खाद्यसंस्कृती, पर्यटन आणि उत्पादने ही केवळ समृद्ध वारशाचीच नव्हे तर प्रचंड संधींची द्योतक आहेत, असे त्यांनी सांगितले. आसामच्या या वैशिष्ट्यांना भारतातच नव्हे तर जगभरात ओळख मिळणे गरजेचे असल्यावर त्यांनी भर दिला. आसामच्या गमछा ब्रँडिंगचे वैयक्तिकरित्या प्रोत्साहन देण्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. आसाममधील प्रत्येक उत्पादन जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

“भूपेन दांचे संपूर्ण आयुष्य हे राष्ट्राच्या उद्दिष्टांना अर्पण होते,” असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, भूपेन दांच्या शताब्दी जयंती वर्षानिमित्त आपल्याला आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा लागेल. आसाममधील बांधवांना उद्देशून त्यांनी “व्होकल फॉर लोकल” चळवळीचे सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) बनण्याचे आवाहन केले. स्वदेशी उत्पादनांचा अभिमान बाळगण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्वांना स्थानिक वस्तू खरेदी व विक्री करण्याचे आवाहन केले. या मोहिमांना जितक्या जलद गतीने पुढे नेले जाईल, तितक्या लवकर विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, केवळ 13 व्या वर्षी भूपेन दांनी एक गीत रचले होते ज्यात त्यांनी स्वत:ला ज्वालेची ठिणगी मानले आणि नवीन भारत घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक शोषित आणि वंचिताला आपले हक्काचे स्थान मिळेल असा देश त्यांनी त्या गीतात पाहिला होता. आज भूपेन दांनी पाहिलेले त्या नव्या भारताचे स्वप्न हे आता राष्ट्राचा सामूहिक संकल्प बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे ध्येय हे प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक संकल्पाचा केंद्रबिंदू बनवण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनसाठी प्रेरणा भूपेन दांच्या गीतांमधून आणि त्यांच्या आयुष्यातूनच मिळेल, असे सांगून पंतप्रधानांनी या संकल्पांमुळे भूपेन हजारिका जींची स्वप्ने पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त देशवासीयांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, तसेच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती वर्षाच्या उत्सवांमध्ये सहभाग घेतला. आसामी संगीत, साहित्य आणि संस्कृतीतील त्यांचे योगदान अद्वितीय आहे, याच गौरवासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Bhupen Da's music united India and inspired generations. pic.twitter.com/YSPVfJrC3C
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Bhupen Da's life reflected the spirit of 'Ek Bharat, Shreshtha Bharat'. pic.twitter.com/jjFCzGQw7y
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Bhupen Da always gave voice to India's unity. pic.twitter.com/wlyV97gbuR
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Bharat Ratna for Bhupen Da reflects our government's commitment to the North East. pic.twitter.com/aTCdd5JJNZ
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Cultural connectivity is vital for national unity. pic.twitter.com/VuyW1RrX91
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
New India will never compromise on its security or dignity. pic.twitter.com/hkye7iyGr2
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Let us be brand ambassadors of Vocal for Local.
— PMO India (@PMOIndia) September 13, 2025
Let us take pride in our Swadeshi products. pic.twitter.com/7SAPflLj5Q


