देशाच्या धोरण-आखणीत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे: पंतप्रधान
विकसित भारत उभारणीची मोहीम अविरतपणे सुरू आहे; आणि जेव्हा मी विकसित भारताबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ भारताची नारीशक्ती आहे: पंतप्रधान
काशीचा खासदार म्हणून आणि देशाचा पंतप्रधान म्हणून, मला राष्ट्रीय हिताचे एक महत्त्वपूर्ण ध्येय साध्य करण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत आणि हे प्रमुख ध्येय आहे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिला आरक्षण लागू करणे: पंतप्रधान
आमच्या सरकारच्या धोरणांमध्ये महिलांच्या कल्याणाला सातत्याने सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे: पंतप्रधान
सोयी-सुविधा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याबरोबरच, आम्ही महिलांचा आर्थिक सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे एका संमेलनात महिलांच्या भव्य  मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

या प्रसंगाचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी नमूद केले की, काशी ही माता शृंगार गौरी, माता अन्नपूर्णा, माता विशालाक्षी, माता  संकठा आणि माता गंगा यांसारख्या दैवी शक्तींची भूमी आहे. भगिनी आणि कन्यांच्या या भव्य मेळाव्याने  या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने पवित्र स्वरूप दिले आहे. "काशीच्या या भूमीवर, मी तुम्हा सर्व माता, भगिनी आणि कन्या यांना वंदन करतो," असे मोदी म्हणाले.

हा प्रसंग नारीशक्ती आणि विकास या दोन्हींचा उत्सव असल्याचे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी नमूद केले की, काशीमधील सर्व प्रकारच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून, काशी आणि अयोध्या दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढवणाऱ्या कामांचाही यात समावेश आहे. काशी ते पुणे आणि अयोध्या ते मुंबई या दोन अमृत भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना या पवित्र शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक कनेक्टिव्हिटीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. "यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल, आणि लोकांना अयोध्या धाम व काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचण्यासाठी आणखी एक आधुनिक पर्याय मिळाला आहे " असे मोदी म्हणाले.

 

राष्ट्रउभारणीतील  महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत, पंतप्रधानांनी नारीशक्तीला 'विकसित भारताचा' सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हटले. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्याचे एक मोठे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आशीर्वाद मागितले. "मी तुम्हाला आश्वासन देतो की, तुमचा आरक्षणाचा हक्क प्रत्यक्षात लागू करण्यात  मी कोणतीही कसर सोडणार नाही," असे मोदी म्हणाले.

महिला सक्षमीकरणाची परिवर्तनकारी शक्ती अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, जेव्हा घरातील एखादी महिला सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला बळ मिळते, ज्यामुळे समाज आणि देशही मजबूत होतो. भारतीय महिलांना सामोरे जावे लागलेल्या ऐतिहासिक आव्हानांकडे लक्ष वेधत  पंतप्रधानांनी, पिढ्यानपिढ्या मुलींना सहन कराव्या लागलेल्या क्षमता, आवश्यकता आणि योग्यतेविषयीच्या तुच्छतापूर्ण प्रश्नांची आणि आदेशांची आठवण करून दिली. असा भेदभाव केवळ काशीपुरता मर्यादित नव्हता तर  संपूर्ण देशभरात अस्तित्वात होता असे त्यांनी नमूद केले. समाजात या अन्यायाला सहज  स्वीकारले गेले.  "हे अडथळे स्वाभाविक व्यवस्था म्हणून सहज स्वीकारले गेले होते आणि हे बदललेच पाहिजे," असे मोदींनी निक्षून  सांगितले.

जुनाट समजूती मोडून काढण्याच्या आपल्या कटिबद्धतेविषयी बोलतांना पंतप्रधानांनी आपली 25 वर्षे जुनी आठवण सांगितली. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी मुलींसाठी दोन अत्यंत पथदर्शी योजना सुरू केल्या होत्या. शाळा प्रवेशोत्सव, ज्याद्वारे अधिकाधिक मुली शाळेत येतील आणि शिक्षण पूर्ण करतील, हे सुनिश्चित केले गेले, आणि मुख्यमंत्री कन्या केलवनी निधी, ज्याद्वारे मुलींना शिक्षण शुल्कात मदत केली गेली. "तेव्हापासून आजपर्यंत, आमच्या सरकारच्या धोरणांमध्ये महिलांना सातत्याने सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे" असे मोदी यांनी सांगितले.

2014 पासून राबवलेल्या सर्वसमावेशक कल्याणकारी उपक्रमांची माहिती देताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, महिलांसाठी 12 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली, 30 कोटींहून अधिक महिलांची बँक खाती उघडण्यात आली, अडीच कोटींहून अधिक घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि 12 कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात आले. या उपक्रमांमुळे भगिनी आणि कन्यांना राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी स्थान मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना, मातृ वंदना योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांनी यात महत्वाची भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. “सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या योजनेच्या केंद्रस्थानी भगिनी आणि मुली होत्या, हेच आमच्या खऱ्या कटिबद्धतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

 

काशीमधल्या एका यशस्वी मोहिमेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की,  दोन वर्षांपूर्वी अवघ्या एका महिन्यात 27,000 मुलींची सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली आणि प्रत्येक खात्यात 300 रुपये जमा करण्यात आले. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला बळ मिळाले, तर मुद्रा योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आहे. तसेच, प्रथमच कोट्यवधी महिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मालमत्ता नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “आज आपल्या माता आणि भगिनी खऱ्या अर्थाने त्यांच्या घरांच्या मालकीण बनत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.

सोय आणि सुरक्षा, ह्या दोन गोष्टी, सक्षमीकरणाचा आधार ठरतात, यावर भर देत, उत्तर प्रदेशातील, सध्याची स्थिती आणि आधीची स्थिती यातील भेद त्यांनी उलगडून दाखवला. पूर्वी उत्तर प्रदेशात,  मुलींना घरातून बाहेर पडणेही कठीण होते, याची आठवण त्यांनी केली. भारतीय न्याय संहितेने,  महिलांबाबत होणाऱ्या गुन्ह्यात, त्वरित शिक्षा देण्याची तरतूद असल्याने, महिलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे,  असे त्यांनी सांगितले. त्याच वेळी, महिला पोलिस ठाण्यांचे जाळे आणि समुपदेशन केंद्रे यांचाही सातत्याने विस्तार केला जात असल्याचे ते म्हणाले. “आमच्या मुलींच्या बाबतीत कोणीही कुठलाही वाईट हेतू ठेवला, तर त्याचे काय परिणाम होतील, हे आता गुन्हेगारांनाही कळले आहे,’ असे मोदी म्हणाले.

आर्थिक सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी नमूद केले की, महिलांची आर्थिक ताकद वाढली की त्यांचा कुटुंबातील आवाजही तितकाच मजबूत होतो. गेल्या 11 वर्षांत सुमारे 10 कोटी महिलांना स्वयं-सहायता गटांशी जोडण्यात आले आहे. यामध्ये काशीतील सुमारे 1.25 लाख भगिनींचा समावेश असून, लाखो रुपयांच्या सहाय्यामुळे त्यांना स्वावलंबी होऊन काम करता आले आहे. “अशा प्रयत्नांमुळे आतापर्यंत 3 कोटी भगिनी ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत, ज्यामध्ये बनारसच्या हजारो महिलांचाही समावेश आहे,”  असेही त्यांनी अधोरेखित केले.

महिला सक्षमीकरणात दुग्धव्यवसायाचेही मोठं योगदान असल्याचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी बनास डेअरीशी संबंधित लाखो भगिनींचे अभिनंदन केले. आज तिथल्या महिलांना, 106 कोटी रुपयांचा बोनस थेट देण्यात आला आहे. काशीतील दुग्धक्षेत्रात कार्यरत महिलांना आपले काम अधिक विस्तारण्याचे आवाहन करत त्यांनी सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त केला. “ही तर फक्त सुरुवात आहे; बनारस वाढेल, बनास डेअरी वाढेल आणि हा बोनसही सतत वाढत राहील,” असेही पंतप्रधान म्हणाले.

स्त्री मध्ये परिवर्तनाचे नेतृत्व करण्याची शक्ती असते, असा सरकारचा दृष्टिकोन आहे, असं सांगत, पंतप्रधानांनी त्यांना आत्मनिर्भर बनवत, विकसित भारताच्या उभारणीचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्याचे सरकारचे प्रयत्न अधोरेखित केले.  बँकिंग सखी, डिजिटल पेमेंट्सला गती देत आहेत, विमा सखी विमा उपक्रमांचे नेतृत्व करत आहेत,  कृषी सखी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहेत, तर नमो ड्रोन दीदी कृषी क्षेत्रातील ड्रोन क्रांतीचे नेतृत्व करत आहेत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, लष्कर, नौदल, हवाई दल, सैनिकी शाळा आणि संरक्षण अकादमी अशा सर्व क्षेत्रात, मुलींसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. “आमचे सरकार म्हणजे महिला सक्षमीकरण, महिला उत्थान आणि महिलांचे जीवन अधिक सुलभ बनविण्याची कटिबद्धता,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

 

सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी दाखवलेली उत्कृष्टता लक्षात घेता त्यांना धोरणनिर्मितीमध्ये तसेच राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत अधिक उत्तम भूमिका मिळायला हवी यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की भगिनींच्या सहभागाची कल्पना हे नव्या संसद भवनाच्या उभारणीमागील प्रमुख कारण होते. वर्ष 2023 मध्ये नवे संसदभवन उभे राहिल्यानंतर, 40 वर्षे रखडलेला आणि महिलांसाठी 33 टक्के राखीव जागा देऊ करणारा नारी शक्ती वंदन कायदा मंजूर होणे हे त्या इमारतीत सर्वप्रथम झालेले कार्य होते. “आता हा कायदा लवकरात लवकर लागू होणे आवश्यक आहे,” मोदी म्हणाले.

अलीकडे संसदेत झालेल्या घडामोडींबद्दल निराशा व्यक्त पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की अधिकाधिक महिलांना विधानसभा तसेच संसदेपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे या उद्देशाने ही घटनात्मक सुधारणा मांडण्यात आली होती मात्र ती मंजूर होऊ शकली नाही. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, बंगाल तसेच तामिळनाडू येथील महिलांनी केलेल्या विक्रमी मतदानाकडे निर्देश करत पंतप्रधानांनी या बाबतीत समाधान व्यक्त केले.

“नागरिक देवो भव” या मंत्रासह, सरकारने स्वीकारलेल्या नागरिक-केंद्रित दृष्टीकोनाची रूपरेषा मांडत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण, मिळकत, आरोग्यसुविधा, सिंचन तसेच तक्रार निवारण या बाबींना सर्वोच्च प्राधान्य आहे यावर अधिक भर दिला. या भावनेसह, आज विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या रुपात काशीच्या विकासाचा विस्तार झाला आहे असे त्यांनी नमूद केले. “गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला वैशिष्ट्यपूर्ण पूल पूर्वांचलाची संपर्क जोडणी बळकट करेल,” निरीक्षण नोंदवत मोदी म्हणाले.

 

गेल्या दशकभरात उत्तर आणि पूर्व भारतासाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून काशीच्या उदयाकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की 500 खाटांचे मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय आरोग्यसेवा परिसंस्थेला आणखी मजबूत करेल. या व्यतिरिक्त, गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी 100 खाटांच्या विभागाची कोनशिला देखील रचण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला. “यामुळे गंभीर आजार झालेल्यांवरील उपचाराच्या बाबतीत काशीमध्ये भरीव सुविधेची भर पडेल,” मोदी म्हणाले.

काशीच्या विकासाच्या व्यापक आणि संवेदनशील स्वरूपाचे वर्णन करत, पंतप्रधानांनी गंगा नदीची स्वच्छता, घाटांचा विकास, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, हरहुआ तसेच भवानीपूर येथील शेतकऱ्यांसाठी साठवण सुविधा, वृद्धाश्रम तसेच महिलांसाठी वसतिगृहे यांसह विविध उपक्रमांची गणना केली. “हे सर्व प्रकल्प वाराणसीच्या रहिवाशांसाठी थेटपणे लाभदायक आहेत आणि त्यातून संवेदनशील, लोक-केंद्री विकासाप्रती आमची बांधिलकी दिसून येते,” पंतप्रधानांनी टिप्पणी केली.

 

काशीचा वारसा तसेच परंपरा बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेवर अधिक भर देत पंतप्रधान मोदी यांनी संत कबीर स्थळीचा विकास तसेच नागवा येथील संत रविदास पार्कचे पुनरुज्जीवन ही कार्ये ठळकपणे नमूद केली. “ही कामे आपला वारसा जतन करण्यासाठी आणि आणखी बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या आमच्या मोहिमेचाच एक भाग आहे,” मोदी म्हणाले.  

काशीचे शाश्वत स्वरूप आणि सध्या सुरु असलेली विकास मोहीम यांची तुलना करत पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला. काशीमध्ये हाती घेण्यात आलेल्या विकास कार्यांबद्दल शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांच्या आशिर्वादाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. “आपली काशी अविनाशी आहे आणि ती सतत वाहत राहते, त्याच पद्धतीने, विकासाची ही मोहीम देखील सतत गतिमान आहे,” ग्वाही देत मोदी म्हणाले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet

Media Coverage

India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses grief over loss of lives in mishap in Nanded
September 11, 2026
Prime Minister announces ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra.

The Prime Minister conveyed his thoughts to the bereaved families in this hour of grief and prayed for the speedy recovery of the injured.

Shri Modi announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.

In a post on X, the Prime Minister’s Office said;

“Saddened by the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”