पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे लोकार्पण केले
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरण आणि पायाभरणी
कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या संयंत्राचे उद्‌घाटन
"पुणे हे एक चैतन्यदायी शहर असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे आणि संपूर्ण देशभरातील युवकांच्या स्वप्नांच्या परिपूर्तीचे स्थान आहे"
"आमचे सरकार नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध आहे"
"आधुनिक भारतातील शहरांसाठी मेट्रो ही एक नवीन जीवनवाहिनी बनत आहे"
"महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला"
"गरीब असो वा मध्यमवर्गीय, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची हमी"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे लोकार्पण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1,280 हून अधिक घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेली 2,650 हून अधिक घरे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1,190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. 

 

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की ऑगस्ट हा महिना सणासुदीचा आणि क्रांतिकारक घटनांच्या स्मृतीचा आहे. या शहराने देशाला बाळ गंगाधर टिळकांसह अनेक स्वातंत्र्यसैनिक दिले आहेत असे स्वातंत्र्यलढ्यातील पुणे शहराच्या योगदानाविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले. थोर समाजसुधारक अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती असून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाने प्रेरित झाले होते असे पंतप्रधान म्हणाले.  अगदी आजसुद्धा अनेक विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञ अण्णाभाऊंच्या साहित्यावर संशोधन करतात, त्यांचे कार्य आणि आदर्श प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे, असे ते म्हणाले.

"पुणे हे एक चैतन्यदायी शहर असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे आणि संपूर्ण देशभरातील युवकांच्या स्वप्नांच्या परिपूर्तीचे स्थान आहे." आजचे सुमारे 15 हजार कोटींचे प्रकल्प ही ओळख आणखी मजबूत करतील,” असे पंतप्रधान म्हणाले.

शहरी मध्यमवर्गाच्या जीवनमानाच्या दर्जाबाबत सरकारला असलेले गांभीर्य पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पाच वर्षांपूर्वी मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्याची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, या काळात २४ किमीचे मेट्रो नेटवर्क सुरु झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला. याच उद्देशाने देशात  मेट्रोचे जाळे वाढवले जात आहे, नवीन उड्डाणपूल बांधले जात आहेत आणि वाहतूक नियंत्रक दिव्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की 2014 पूर्वी देशात केवळ 250 किमी लांबीचे  मेट्रोचे जाळे होते आणि बहुतांश मेट्रो जाळे दिल्लीपर्यंतच मर्यादित होते, मात्र आज मेट्रोचे जाळ्याची लांबी 800 किमीच्या पुढे गेली  आहे आणि देशात 1,000 किमी लांबीच्या नवीन मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 पूर्वी, मेट्रोचे जाळे भारतातील केवळ 5 शहरांपुरते मर्यादित होते, तर आज पुणे, नागपूर आणि मुंबईसह 20 शहरांमध्ये मेट्रो कार्यरत असून पुणे, नागपूर आणि मुंबई या शहरात मेट्रो जाळ्याच्या विस्तारिकरणाचे केले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. "आधुनिक भारतातील शहरांसाठी मेट्रो ही नवीन जीवनरेखा बनत आहे" असे सांगत पंतप्रधानांनी पुण्यासारख्या शहरात हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मेट्रोच्या विस्ताराची गरज असल्याचे भाष्य केले.

 

पंतप्रधान मोदी यांनी शहरी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छतेच्या महत्वावर भर दिला. स्वच्छ भारत अभियान हे केवळ शौचालय उपलब्धेपुरतेच मर्यादित नसून कचरा व्यवस्थापन हे देखील एक मोठे केंद्रित क्षेत्र असल्याचे ते म्हणाले. मिशन मोडमध्ये कचऱ्याचे डोंगर हटवले जात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) अंतर्गत सुरु असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे फायदे पंतप्रधानांनी विशद केले.

“स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे संपूर्ण भारताच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्यातील औद्योगिक विकासाची गरज अधोरेखित करून पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सरकारकडून होत असलेल्या अभूतपूर्व गुंतवणूकीवर प्रकाश टाकला. या संदर्भात त्यांनी राज्यातील नवीन द्रुतगती मार्ग, रेल्वे मार्ग आणि विमानतळांच्या विकासाची उदाहरणे दिली.  2014 पूर्वीच्या तुलनेत रेल्वेच्या विस्तारासाठीच्या खर्चात बारा पटीने वाढ झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. महाराष्ट्रातील विविध शहरे ही शेजारील राज्यांच्या आर्थिक केंद्रांशीही जोडली गेली आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी यासाठी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेची उदाहरणे दिले आणि यामुळे महाराष्ट्र तसेच गुजरात दोघांनाही फायदा होईल असे सांगितले. यासोबतच, महाराष्ट्राला मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर राज्यांशी जोडणारा दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर, महाराष्ट्र आणि उत्तर भारतादरम्यानच्या रेल्वे संपर्क सुविधेचा कायापालट करणारा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि उद्योग, तेल आणि गॅस पाइपलाइन यांना फायदा पोहचवत महाराष्ट्राला छत्तीसगड, तेलंगणा आणि इतर शेजारील राज्यांशी जोडणारी ट्रान्समिशन लाइन नेटवर्क, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रियल पार्क यांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. अशा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत नवी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.

 

राज्याच्या विकासातून देशाचा विकास या मंत्राने सरकार वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल. जेव्हा भारताचा विकास होईल, तेव्हा महाराष्ट्रालाही लाभ मिळेल”, असे ते म्हणाले. नवोन्मेष आणि स्टार्टअप्सचे केंद्र म्हणून भारताची ओळख वाढत असल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सांगितले की, 9 वर्षांपूर्वीच्या काहीशे च्या तुलनेत भारताने 1 लाख स्टार्टअपचा टप्पा ओलांडला आहे. या यशाचे श्रेय त्यांनी डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्ताराला दिले आणि भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या पायाभरणीत पुण्याच्या भूमिकेचे त्यांनी  कौतुक केले. “स्वस्त डेटा, परवडणारे फोन आणि इंटरनेट सुविधा प्रत्येक गावात पोहोचल्याने हे क्षेत्र मजबूत झाले आहे. सर्वात जलद 5G सेवा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो”, ते म्हणाले. फिनटेक, बायोटेक आणि अॅग्रीटेकमध्ये तरुणांनी केलेल्या प्रगतीचा पुण्याला फायदा होत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

कर्नाटक आणि बेंगळुरूच्या राजकीय स्वार्थाच्या परिणामांबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. कर्नाटक आणि राजस्थानमधील विकास रखडल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

मोदी म्हणाले की, "देशाला पुढे नेण्यासाठी धोरणे, हेतू आणि नियम (निती निष्ठा आणि नियम) तितकेच महत्त्वाचे आहेत." विकासासाठी ही एक निर्णायक स्थिती आहे, असे ते म्हणाले. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत तत्कालीन दोन योजनांमध्ये केवळ 8 लाख घरे बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 50 हजारांसह अशी 2 लाखांहून अधिक घरे निकृष्ट दर्जामुळे लाभार्थ्यांनी नाकारली, असे त्यांनी सांगितले.

 

2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर सरकारने योग्य हेतूने काम करण्यास सुरुवात केली आणि धोरणात बदल केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या 9 वर्षांत सरकारने खेड्यांमध्ये गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक पक्की घरे बांधली तर शहरी गरिबांसाठी शहरांमध्ये 75 लाखांहून अधिक घरे बांधली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. बांधकामात आलेली पारदर्शकता आणि त्यांच्या दर्जात झालेली सुधारणा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. देशात पहिल्यांदाच आज नोंदणी झालेली बहुतांश घरे महिलांच्या नावावर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या घरांची किंमत अनेक लाख रुपये आहे हे नमूद करून गेल्या 9 वर्षांत देशातील करोडो महिला ‘लखपती’ बनल्या आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यांना नवीन घराचा ताबा मिळाला त्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

गरीब असो वा मध्यमवर्गीय कुटुंब, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणे ही मोदींची हमी आहे, असे ते म्हणाले. एका स्वप्नाच्या पूर्ततेमुळे अनेक संकल्पांचा श्रीगणेशा होतो जो त्या व्यक्तीच्या जीवनात एक प्रेरक शक्ती ठरतो असे त्यांनी अधोरेखित केले. "आम्हाला तुमच्या मुलांची, तुमच्या वर्तमानाची आणि तुमच्या भावी पिढ्यांची काळजी आहे", असेही ते म्हणाले.भाषण संपवताना पंतप्रधान मोदी यांनी एक मराठी वाक्प्रचार उधृत केला आणि स्पष्ट केले की केवळ देशवासियांची वर्तमान स्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर अधिक उत्तम भविष्यकाळासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. विकसित भारताची उभारणी करण्याचा निर्धार हे याच भावनेचे प्रकटीकरण आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे समान कारणासाठी अनेक विविध पक्ष एकत्र आले आहेत त्याच पद्धतीने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. “प्रत्येकाच्या सहभागासह महाराष्ट्रासाठी उत्तम कार्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्राचा जलदगतीने विकास झाला पाहिजे,” पंतप्रधान शेवटी म्हणाले.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य सरकारमधील अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी यावेळी पुणे मेट्रो टप्पा 2 मधील दोन मार्गिकांच्या ज्या भागाचे काम पूर्ण झाले आहे त्या भागातील सेवांच्या उद्घाटनासाठी मेट्रो गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. फुगेवाडी स्थानक ते सिव्हील कोर्ट स्थानक आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन भागांमधील सेवांचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ष 2016 मध्ये या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ झाला होता. मेट्रो रेल्वेचे हे नवे विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, सिव्हील कोर्ट, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहेत. आज झालेले उद्घाटन म्हणजे देशातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरण-स्नेही सार्वजनिक जलद शहरी वाहतूक व्यवस्था पुरवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

या मार्गावरील काही मेट्रो स्थानके छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन उभारली आहेत. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक यांवरील काही वैशिष्टयपूर्ण डिझाईन्स छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैनिक परिधान करत असलेल्या  ‘मावळा पगडी’ सारखी दिसतात. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.

सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक हे देशातील सर्वाधिक खोलवर उभारण्यात आलेले स्थानक आहे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या स्थानकातील सर्वात खोल जागा जमिनीच्या स्तरापासून 33.1 मीटरवर आहे. छतातून सूर्यप्रकाश थेट प्लॅटफॉर्मवर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत तयार केले आहे

सर्वांसाठी घरे निर्माण करण्याच्या अभियानात पुढील पाऊल टाकत, पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे (पीसीएमसी) बांधण्यात आलेल्या  1280 घरांच्या तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे या योजनेतून बांधण्यात आलेल्या 2650 घरांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्द केल्या. याचबरोबर, पंतप्रधानांनी  पीसीएमसीतर्फे बांधण्यात येणाऱ्या 1190 पीएमएवाय घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणाऱ्या 6400 घरांची कोनशिला देखील रचली.

पंतप्रधानांच्या हस्ते पीसीएमसीच्या अखत्यारीत उभारण्यात आलेल्या ‘कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती’ प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख टन कचरा वापरला जाईल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
The Clearest Sign of India's Very Good Year

Media Coverage

The Clearest Sign of India's Very Good Year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 नोव्हेंबर 2023
November 28, 2023

PM Modi’s Viksit Bharat – Sabka Saath, Sabka Vikas – Economy, Digital, Welfare and Social