मदुराईतील पायाभूत सुविधा कामांमुळे संपर्क व्यवस्था सुधारेल आणि संपूर्ण तामिळनाडूतील जनतेला मोठा लाभ होईल : पंतप्रधान
उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे लोकांना सक्षम बनवणे होय : पंतप्रधान
मागील 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूच्या महामार्ग जाळ्यात मोठी गुंतवणूक केली असून, यात्रेकरूंना सुलभ प्रवास आणि कृषी व सागरी उत्पादनांच्या सुरळीत वाहतुकीची खात्री केली आहे : पंतप्रधान
गेल्या दशकात भारतीय रेल्वेने ऐतिहासिक परिवर्तन अनुभवले असून ती आधुनिक, कार्यक्षम आणि लोककेंद्रित वाहतूक प्रणाली म्हणून उदयास आली आहे, आणि हे परिवर्तन विशेषतः तामिळनाडूमध्ये स्पष्टपणे दिसून येते : पंतप्रधान
‘मेक इन इंडिया’ या आपल्या दृष्टीकोनामुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळत असून युवकांसाठी रोजगारनिर्मिती होत आहे, ही अभिमानाची बाब आहे : पंतप्रधान
केंद्रीय अर्थसंकल्पात तामिळनाडूला दुर्मिळ खनिज विकास मार्गिकेचा भाग म्हणून स्थान देण्यात आले असून, प्रगत उत्पादन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या  विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस तामिळनाडूच्या विकास प्रवासातील अभिमानास्पद अध्याय आहे. हे प्रकल्प संपर्क व्यवस्थेचा आमूलाग्र बदल, अर्थव्यवस्थेला चालना आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतील.
 

उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे मूलतः लोकांना सक्षम बनवणे होय, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. “या विकासकामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ते उपलब्ध होतील, यात्रेकरू व पर्यटकांना सुलभ प्रवास करता येईल आणि उद्योग-व्यवसायांसाठी जलद वाहतूक शक्य होईल,” असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले, “मागील 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूच्या महामार्ग जाळ्यात लक्षणीय गुंतवणूक केली असून, 2014 पासून 4 हजार किलोमीटरहून अधिक महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे.”

मरक्कनम-पुद्दुचेरी मार्गाच्या चौपदरीकरणासह दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा त्यांनी उल्लेख केला. सुमारे 2,100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे किनारी पर्यटन आणि व्यापाराला बळकटी मिळणार आहे. तसेच, परमकुडी–रामनाथपुरम मार्गाच्या चौपदरीकरणाचाही यात समावेश असून, सुमारे 1,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे रामेश्वरम आणि धनुष्कोडी यांसारख्या ठिकाणांपर्यंत प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यामुळे भाविकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल तसेच कृषी आणि सागरी उत्पादनांच्या वाहतुकीलाही गती मिळेल.

 

गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडून आले असून ती आधुनिक, कार्यक्षम आणि लोककेंद्रित वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित झाली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे परिवर्तन विशेषतः तामिळनाडूमध्ये प्रकर्षाने दिसून येते. सध्याच्या सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत जवळपास नऊपट वाढ केली आहे, असे  मोदी यांनी सांगितले. 2009 ते 2014 या कालावधीत दरवर्षी सरासरी 880 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती; ती वाढून 2026–27 या वर्षासाठी 7,600 कोटी रुपये इतकी झाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्यात 1,300 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्गांची उभारणी करण्यात आली असून 97 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.  तसेच, शेकडो उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या बांधकामामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. महत्त्वाच्या टप्प्याचे स्मरण करत पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या वर्षी नवीन पंबन पुलाचे उद्घाटन करण्याचा सन्मान त्यांना लाभला. भारतातील पहिला उभा उचलता येणारा पूल म्हणून त्यांनी या पुलाचा विशेष उल्लेख केला.
 

सध्या तामिळनाडूतील जनतेच्या सेवेसाठी 9 वंदे भारत गाड्या आणि 9 अमृत भारत गाड्या कार्यरत असून, त्यांच्या डब्यांचे उत्पादन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  ‘मेक इन इंडिया’ या दृष्टीकोनाबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी नमूद केले की,  या उपक्रमामुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळत असून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुलभता आणि स्थानिक ओळख यांचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. यापैकी पुनर्विकसित करण्यात आलेल्या 8 स्थानकांचे उद्घाटन आज करण्यात येत असल्याची माहिती मोदी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, चेन्नई बीच -चेन्नई एग्मोर या चौथ्या मार्गिकेचे लोकार्पण केल्यानंतर हजारो प्रवाशांना दररोज  ये-जा करण्यासाठी त्याचा लाभ होईल. पंतप्रधानांनी कुंभकोणम, येरकॉड आणि वेल्लोर येथे आकाशवाणीच्या नवीन एफएम रिले ट्रान्समीटरचे उद्घाटन केले आणि या रेडिओ स्थानकांचेही जनसेवेसाठी लोकार्पण केले.
तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणारा निधी गेल्या दशकाच्या तुलनेत तिप्पटीने वाढला आहे, 2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातही याच राज्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रादेशिक अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणणाऱ्या बेंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद बुलेट ट्रेन  मार्गासाठी मागवलेल्या प्रस्तावांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.याशिवाय  "प्रगत उत्पादन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात तामिळनाडूला रेअर अर्थ कॉरिडॉरमध्ये स्थान देण्यात आले आहे, असेही पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

 

तामिळनाडूला समृद्ध इतिहास आणि वारसा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि आदिचनल्लूरसारख्या ऐतिहासिक स्थळांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये रुपांतर  केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. पुलिकत तलाव आणि पोधिगाई मलाई भोवतालच्या पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांमुळे नैसर्गिक परिसंस्थांचे जतन होऊन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही  मोदींनी नमूद केले. उत्पादन वाढविण्यासाठी देशभरात सुमारे दोनशे औद्योगिक केंद्रे तयार करण्यात येतील आणि त्यांना पाठिंबा दिला जाईल,असेही  त्यांनी सांगितले. तामिळनाडू अनेक उद्योगांचे माहेरघर आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी म्हणाले की या योजनांचा स्थानिक तरुणांना मोठा लाभ होईल.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक भारतीय प्रेरित झाला आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि देशाचे भवितव्य घडवण्यात तामिळनाडू निर्णायक भूमिका बजावेल असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.सर्वसमावेशक विकास आणि राज्याच्या  प्रगतीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे सांगत "विकसित भारतासाठी विकसित तमिळनाडू हे आमचे सामूहिक ध्येय आहे" असे अधोरेखित करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales

Media Coverage

How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मे 2026
May 19, 2026

Exports Up, Economy Strong, World Collaborating: PM Modi's Reforms Delivering Jobs, Growth & Green Future