आश्चर्याचा सुखद धक्का देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसईच्या इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. शिक्षण मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
या आभासी संवादात देशाच्या विविध भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी हिंदी भाषिक नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांच्या भाषेतले शब्द वापरले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या सकारात्मकतेचे आणि व्यावहारिकतेचे कौतुक केले आणि ते म्हणाले की आपल्या देशासाठी ही आनंदाची बाब आहे की आपले विद्यार्थी सर्व अडचणी व आव्हानांना त्यांच्या सामर्थ्यात रूपांतरित करतात आणि हीच आपल्या देशाची ताकद आहे. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे देखील त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान म्हणाले की तुमचे अनुभव खूप महत्वाचे आहेत आणि तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ते उपयुक्त ठरतील. आपण आपली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या संघभावनेचे त्यांनी उदाहरण दिले. कोरोना कालावधीत आपण हे धडे एका नवीन प्रकारे शिकलो आहोत आणि या कठीण काळात आपल्या देशातील संघभावनांची शक्ती आपण पाहिली आहे.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना 5 जून रोजी पर्यावरण दिनी पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचे आणि त्याचप्रमाणे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या कुटुंबियांसमवेत योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच लसीकरण नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांना मदत करण्याचे देखील आवाहन केले.


