पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी नव्याने बांधलेल्या टाईप-7 स्वरूपाच्या बहुमजली 184 सदनिकांचे उद्घाटन केले. अगदी काहीच दिवसांपूर्वी कर्तव्यपथ येथे बांधलेल्या कर्तव्य भवन या केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीचे उद्घाटन आपण केले आणि आज, संसदेतील आपल्या सहकाऱ्यांसाठी या निवासी संकुलाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. या संकुलातील चार बहुमजली इमारती - कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी यांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की त्यांची नावे चार महान नद्यांवरून दिलेली आहेत, ज्या नद्या लाखो जणांना जीवन देतात त्या नद्या आता लोकप्रतिनिधींच्या आयुष्यात आनंदाचा झरा निर्माण करतील. नद्यांची नावे देण्याच्या परंपरेमुळे देशाला एकतेच्या धाग्यात गुंफता येते असे ते म्हणाले. या नवीन संकुलामुळे खासदारांना नवी दिल्लीत राहणीमान सुलभता प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीत खासदारांसाठी सरकारी घरांची उपलब्धता आता वाढेल, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी सर्व संसद सदस्यांचे अभिनंदन केले आणि फ्लॅट्सच्या बांधकामात सहभागी अभियंते आणि श्रमजीवींचे कौतुक केले, तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या समर्पण भावनेची आणि कठोर परिश्रमाची त्यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान म्हणाले की आपल्याला खासदारांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या या निवासी संकुलातील एका सदनिकेला भेट देण्याची संधी मिळाली. जुन्या खासदार निवासस्थानांची स्थिती पाहण्याचे प्रसंगही त्यांच्यावर आले आहेत, असे त्यांनी सांगितले. जुन्या निवासस्थानांमध्ये बरेचदा दुर्लक्ष आणि आणि दुरवस्था होत, असे मत त्यांनी व्यक्त केले. खासदारांना त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानांच्या वाईट स्थितीमुळे वारंवार तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींचा त्यांनी उल्लेख केला. नवीन घरांमध्ये प्रवेश करताना संसद सदस्यांना आता या आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. ज्यावेळी खासदार त्यांच्या वैयक्तिक घरासंबंधीच्या अडचणींमधून मुक्त होतील तेव्हा त्यांना नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता अधिक वेळ आणि ऊर्जा मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

दिल्लीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांना घरे मिळवून देण्यात येणाऱ्या आव्हानांची दखल घेत, पंतप्रधान म्हणाले की, नव्याने बांधलेल्या इमारतींमुळे या अडचणी दूर होण्यास मदत होईल. या बहुमजली इमारतींमध्ये 180 हून अधिक खासदार एकत्र राहतील त्यावरून या नवीन गृहनिर्माण उपक्रमाचे महत्त्वपूर्ण आर्थिक परिमाण काय आहे हे लक्षात येते हे त्यांनी अधोरेखित केले. कर्तव्य भवनाच्या उद्घाटनाची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी सांगितले की अनेक मंत्रालये भाड्याने घेतलेल्या इमारतींमधून चालत होती, ज्यासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये वार्षिक भाडे होते, आणि हा सार्वजनिक निधीचा थेट अपव्यय होता. त्याचप्रमाणे खासदारांसाठी घरांचा तुटवडा असल्याने सरकारी खर्चात भर पडत असे. खासदारांसाठी निवासस्थानांची कमतरता असूनही, 2004 ते 2014 दरम्यान लोकसभा खासदारांसाठी एकही नवीन निवासस्थान बांधण्यात आले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वर्ष 2014 नंतर, आमच्या सरकारने हे काम एक ध्येय म्हणून हाती घेतले आणि नव्याने उद्घाटन झालेल्या फ्लॅट्ससह, 2014 पासून अंदाजे 350 खासदार निवासस्थाने बांधण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. या निवासस्थानांच्या पूर्णत्वामुळे आता जनतेचा पैसा वाचत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
“21 व्या शतकातील भारत विकासासाठी जितका उत्सुक आहे तितकाच तो आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल संवेदनशील आहे”, असे उद्गार काढत पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्र कर्तव्य पथ आणि कर्तव्य भवन निर्माण करत असतानाच, लाखो नागरिकांना नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे आपले कर्तव्य देखील पार पाडत आहे. ते पुढे म्हणाले की, देश आपल्या खासदारांसाठी नवीन घरे पूर्ण करत असताना, पंतप्रधान आवास योजनेद्वारे 4 कोटी गरीब कुटुंबांना त्यांच्या मालकीच्या घरांची सुविधा देखील प्रदान करतो. देश नवीन संसद भवन बांधत असताना, शेकडो नवीन वैद्यकीय महाविद्यालये देखील स्थापन करत आहे यावर मोदी यांनी भर दिला. या उपक्रमांचे फायदे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहेत याची त्यांनी पुष्टी केली.

नव्याने बांधलेल्या खासदार निवासस्थानांमध्ये शाश्वत विकासाचे प्रमुख घटक समाविष्ट आहेत याबद्दल समाधान व्यक्त करून, मोदी म्हणाले की हा उपक्रम देशाच्या पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी सुरक्षित दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. गृहनिर्माण संकुलात सौरऊर्जेवर चालणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. सौरऊर्जेतील क्षेत्रातील कामगिरी आणि नवीन विक्रमांमधून दिसून येते की भारत सतत शाश्वत विकासाच्या आपल्या दृष्टिकोनाला पुढे नेत आहे असे त्यांनी पुढे नमूद केले
नवीन निवासी संकुलाच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांनी संसद सदस्यांना अनेक आवाहने केली. त्यांनी नमूद केले की देशातील विविध राज्ये आणि प्रदेशातील खासदार आता एकत्र राहतील आणि त्यांची उपस्थिती 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे प्रतीक असावी. मोदी यांनी संकुलातील सांस्कृतिक चैतन्य वाढविण्यासाठी प्रादेशिक उत्सवांच्या सामूहिक आयोजनाला प्रोत्साहन दिले. त्यांनी मतदारांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचे सुचवले, जेणेकरून सार्वजनिक सहभाग वाढेल. भाषिक सुसंवाद वाढीला लागण्यासाठी पंतप्रधानांनी खासदारांना एकमेकांच्या प्रादेशिक भाषांमधून शब्द शिकवण्याचे आणि शिकण्याचे आवाहन केले. शाश्वतता आणि स्वच्छता ही या संकुलाची परिभाषित वैशिष्ट्ये असली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला आणि ही वचनबद्धता सर्वांनी सामायिक केली पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की केवळ निवासस्थानेच नव्हे तर संपूर्ण परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने राखला पाहिजे.

सर्व संसद सदस्य एकत्रितपणे एक संघ म्हणून काम करतील आणि त्यांचे सामूहिक प्रयत्न देशासाठी एक आदर्श ठरतील अशी आशा व्यक्त करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. त्यांनी मंत्रालय आणि गृहनिर्माण समितीला खासदारांच्या विविध निवासी संकुलांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहनही केले. या संकल्पासह, त्यांनी पुन्हा एकदा सर्व खासदारांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
नवी दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी बांधलेल्या 184 टाईप-7 बहुमजली सदनिकांच्या उद्घाटन प्रसंगी, पंतप्रधानांनी निवासस्थानाच्या परिसरात सिंदूरचे रोप लावले. यावेळी पंतप्रधानांनी श्रमजीवींशी संवाद साधला.

संकुलाचे डिझाइन स्वयंपूर्ण स्वरूपात करण्यात आले असून संसद सदस्यांच्या कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक सुविधांच्या संपूर्ण श्रेणीने सुसज्ज आहे. हरित तंत्रज्ञानाचा समावेश करून, हा प्रकल्प GRIHA 3-स्टार रेटिंगच्या मानकांचे आणि राष्ट्रीय इमारत संहिता (NBC) 2016 चे पालन करून उभारण्यात आला आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत वैशिष्ट्यांमुळे ऊर्जा संवर्धन, अक्षय ऊर्जा निर्मिती आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर - विशेषतः, अॅल्युमिनियम शटरिंगसह मोनोलिथिक काँक्रीट - यामुळे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे शक्य झाले आणि त्याचबरोबर संरचनात्मक टिकाऊपणा देखील सुनिश्चित झाला. हे संकुल दिव्यांगांसाठी देखील अनुकूल आहे. यातून सर्वसमावेशक डिझाइनसाठी वचनबद्धता अधोरेखित होते. संसद सदस्यांसाठी पुरेशा घरांच्या कमतरतेमुळे या प्रकल्पाचा विकास करणे आवश्यक होते. जमिनीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे, जमिनीचा वापर अनुकूल करण्यासाठी आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी घरांच्या उभ्या रचनेवर सतत भर दिला जात आहे.

प्रत्येक निवासी युनिटमध्ये अंदाजे 5000 चौरस फूट कार्पेट एरिया आहे, जो निवासी आणि अधिकृत दोन्ही कामांसाठी पुरेशी जागा प्रदान करतो. कार्यालये, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आणि सामुदायिक केंद्रासाठी समर्पित जागा समाविष्ट केल्याने संसद सदस्यांना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होईल.
या संकुलातील सर्व इमारती आधुनिक संरचनात्मक मानकांनुसार भूकंप प्रतिरोधक बनवल्या आहेत. सर्व रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक व्यापक आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कुछ ही दिन पहले मैंने कर्तव्य पथ पर कॉमन सेंट्रल सेक्रेटरियट…यानि कर्तव्य भवन का लोकार्पण किया है।
— PMO India (@PMOIndia) August 11, 2025
और, आज मुझे संसद में अपने सहयोगियों के लिए इस residential complex के उद्घाटन का अवसर मिल रहा है: PM @narendramodi
आज देश कर्तव्य पथ और कर्तव्य भवन का निर्माण करता है...
— PMO India (@PMOIndia) August 11, 2025
तो करोड़ों देशवासियों तक पाइप से पानी पहुंचाने का अपना कर्तव्य भी निभाता है: PM @narendramodi
आज देश अपने सांसदों के लिए नए घर का इंतज़ार पूरा करता है...
— PMO India (@PMOIndia) August 11, 2025
तो पीएम-आवास योजना के जरिए 4 करोड़ गरीबों का गृह प्रवेश भी करवाता है: PM @narendramodi
सोलर enabled इनफ्रास्ट्रक्चर से लेकर सोलर एनर्जी में देश के नए records तक… देश लगातार sustainable development के विज़न को आगे बढ़ा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 11, 2025


