पंतप्रधानांनी या भेटीत महाकुंभ मेळा 2025 साठी केल्या जात असलेल्या विकास कामांची केली पाहणी
पंतप्रधानांनी एआय आधारित कुंभ सहायक चॅटबॉटचा केला प्रारंभ
महाकुंभ हा आपल्या श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचा दिव्य महोत्सव आहे: पंतप्रधान
प्रयाग हे असे ठिकाण आहे जिथे पावलोपावली पवित्र स्थाने, पुण्य क्षेत्र आहेत: पंतप्रधान
कुंभ हे माणसाच्या अंतर्मनातील चेतनेचे नाव आहे: पंतप्रधान
महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.  उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची  पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले  आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले.  मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत.   महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी  संपूर्ण नवीन शहर उभारले जाते.  प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी  काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या  आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या  ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

“भारत ही पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांची भूमी आहे”, असे उद्गार  मोदी यांनी काढले. ते म्हणाले गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा आणि इतर असंख्य नद्यांची ही भूमी आहे.  नद्यांच्या  पवित्र प्रवाहाचा संगम, संग्रह, एकत्रीकरण, संयोग , प्रभाव आणि  शक्ती हा प्रयाग  आहे असे  सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रयाग हा केवळ तीन नद्यांचा संगम नाही  तर त्यापेक्षा अधिक  आहे . त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले केली की प्रयागबद्दल असे सांगण्यात आले आहे की जेव्हा सूर्य मकर राशीत  प्रवेश करतो तेव्हा सर्व दैवी शक्ती, सर्व तीर्थ, ऋषी आणि संत प्रयागमध्ये येतात. ते पुढे म्हणाले की प्रयाग हे एक असे ठिकाण आहे ज्याशिवाय पुराण अपूर्ण आहे.  त्यांनी पुढे नमूद केले की प्रयाग हे असेच एक ठिकाण आहे ज्याची वेदांच्या ऋचांमध्ये  स्तुती करण्यात आली आहे.

 

“प्रयाग हे ते ठिकाण आहे जिथे पावलोपावली  पवित्र स्थाने आणि पुण्यक्षेत्रे आहेत”, असे उद्गार मोदी यांनी काढले. प्रयागराजचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी संस्कृत श्लोकाचे पठण केले आणि स्पष्ट केले, “त्रिवेणीचा प्रभाव, वेणीमाधवचा महिमा, सोमेश्वराचा आशीर्वाद, ऋषी भारद्वाजांची तपोभूमी, भगवान नागराज वासुकीचे विशेष स्थान, अक्षयवटचे  अमरत्व आणि भगवंताची कृपा हे आपले तीर्थराज प्रयाग आहे. ” त्यांनी पुढे स्पष्ट केले की प्रयागराज हे असे ठिकाण आहे जिथे ‘धर्म’, ‘अर्थ’, ‘काम’ आणि ‘मोक्ष’ हे  चारही आहेत. “प्रयागराज हा केवळ भौगोलिक भूभाग नाही, तर ते आध्यात्माचा अनुभव घेण्याचे ठिकाण आहे” असे सांगून  प्रयागराजला वारंवार भेट देता येत असल्याबद्दल त्यांनी  नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मागील  कुंभात संगमात पवित्र स्नान केल्याची आठवण त्यांनी सांगितली आणि आजदेखील संधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. आज हनुमान मंदिर आणि अक्षयवट येथील दर्शन आणि पूजेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी भक्तांच्या सुविधेसाठी हनुमान कॉरिडॉर आणि अक्षयवट कॉरिडॉर विकसित केला जात असल्याची माहिती दिली . तसेच सरस्वती कूपच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत माहिती घेतल्याचेही सांगितले.  मोदी यांनी आजच्या हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांसाठी  नागरिकांचे अभिनंदन केले.

“महाकुंभ ही आपल्या श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीच्या दैवी उत्सवाच्या वारशाचे प्रतिनिधित्व करणारे  प्रतीक आहे”, असे उद्गार मोदी यांनी  काढले. ते पुढे म्हणाले की, या भव्य आयोजनात दरवेळी  धर्म, ज्ञान, भक्ती आणि कला यांचा दैवी समागम होतो.  एका संस्कृत श्लोकाचे पठण करत, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की संगमात  पवित्र स्नान करणे हे कोट्यवधी  तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासारखे आहे. ते पुढे म्हणाले की एखाद्या व्यक्तीने प्रयागमध्ये पवित्र स्नान केल्यास त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पंतप्रधान म्हणाले  की विविध राजे  आणि महाराजांच्या काळात  किंवा ब्रिटीशांच्या निरंकुश राजवटीतही विश्वासाचा हा चिरंतन प्रवाह कधीच थांबला नाही आणि यामागील प्रमुख कारण म्हणजे कुंभचा कारक कोणतीही बाह्य शक्ती नाही.  कुंभ  माणसाच्या अंतर्मनाच्या  चेतनेचे प्रतिनिधित्व करतो, ती चेतना जी आतून येते आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या  काठावर खेचून आणते, असे पंतप्रधान म्हणाले.ते पुढे म्हणाले की गावे आणि लहानमोठ्या शहरांमधील लोक प्रयागराजच्या दिशेने निघाली असून एवढ्या मंडळींची ताकद अशी एकत्र आलेली इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळते. मोदी यांनी सांगितले की व्यक्ती एकदा महाकुंभ मेळ्याला आली की ती एकरूप होऊन जाते, मग ते साधूसंत असोत, हुशार माणसे असोत किंवा सामान्य जन; जाती आणि पंथांमधील फरक नाहीसे होतात. ते पुढे म्हणाले की कोट्यवधी  लोक एक ध्येय आणि एका संकल्पनेशी जोडले जातात.  महाकुंभामध्ये विविध राज्यांमधील विविध भाषक, जातींचे, श्रद्धा बाळगणारे कोट्यवधी लोक संगमावर एकत्र येत आहेत. ते म्हणाले की महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ आहे असा माझा विश्वास आहे तो याच कारणामुळे; इथे सर्व प्रकारच्या भेदभावाचा त्याग होतो आणि प्रत्येक भारतीय जो संगमात डुबकी मारतो तो एक भारत, श्रेष्ठ भारताच्या सुंदर चित्राचे प्रतिनिधीत्व करतो.

 

भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेत कुंभाचे महत्त्व अधोरेखित करीत मोदी यांनी भूतकाळात संवादाची अत्याधुनिक साधने अस्तित्वात नव्हती तेव्हा कुंभ हे संतांसाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय आव्हानांबाबत चर्चा करण्याचे व्यासपीठ राहिल्याचे सांगितले. ते म्हणाले की सामाजिक बदलांचा पाया कुंभ स्थळी एकत्र येऊन संत आणि विद्वानांनी राष्ट्राचे कल्याण, वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांबाबत चर्चा करून, नव्या दिशा देऊन आणि देशाच्या विचाराला ऊर्जा देऊन घातला. पंतप्रधान म्हणाले, आजही अशा चर्चा करण्याचा मंच म्हणून कुंभाचे महत्त्व कायम आहे, देशभरात सकारात्मक संदेश आणि राष्ट्रकल्याणाच्या एकत्रित विचाराला प्रेरणा यातून मिळते. नावे, मैलाचे टप्पे आणि या एकत्र येण्याचे मार्ग बदलले तरी उद्देश आणि प्रवास कायम राहिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वर्तमानातील राष्ट्रीय चर्चा आणि भविष्यातील प्रगतीचे चिन्ह अशी कुंभाची ओळखही कायम असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सांगितले की कुंभ आणि धार्मिक स्थळांकडे ती महत्त्वाची असूनही यापूर्वीच्या सरकारांकडून  झालेल्या दुर्लक्षामुळे श्रद्धाळूंना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा तुटलेला संबंध याला कारणीभूत असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना दिलासा दिला की वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकारांना भारतीय परंपरा आणि श्रद्धा यांच्या प्रती सखोल आदर आहे. ते म्हणाले की केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे कुंभासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा पुरविणे ही आपली जबाबदारी मानतात. त्यांनी हजारो कोटींच्या निधीची विविध प्रकल्पांसाठी तरतूद केली असून कुंभाच्या तयारीसाठी केंद्र व राज्य सरकारे एकत्र येऊन काम करीत आहेत. अयोध्या, वाराणसी, रायबरेली आणि लखनौ आदी शहरांपासून प्रयागराजपर्यंतचा प्रवास सोयीस्कर व्हावा याकरीता विशेष भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध सरकारी विभाग या भव्य सोहळ्याच्या तयारीसाठी करीत असलेल्या एकत्रित प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली व हे प्रयत्न ‘संपूर्ण सरकार’ दृष्टीकोन कृतीत उतरवित असल्याचे ते म्हणाले.

 

भारताचा विकास आणि संस्कृतीचा वारसा समृद्ध करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित  केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशभरात विविध पर्यटन परिक्रमांचा विकास केला जात असून त्यामध्ये रामायण परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, बौद्ध परिक्रमा आणि तीर्थंकर परिक्रमा आदींचा समावेश आहे, असे ते म्हणाले. स्वदेश दर्शन आणि प्रसाद यासारख्या योजनांचा उल्लेख करून सरकार तीर्थस्थळी सुविधा विकसित करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. भव्य राम मंदिर बांधल्यामुळे संपूर्ण अयोध्या शहराचेच उत्थान झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. विश्वनाथ धाम आणि महाकाल महालोक प्रकल्पांनी जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की प्रयागराजमध्ये अक्षय वट कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर आणि भारद्वाज ऋषी आश्रम कॉरिडॉर प्रकल्प याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत.  ; तर सरस्वती कूप, पाताळपुरी, नागवासुकी आणि द्वादश  माधव मंदिर  या स्थळांना यात्रेकरूंसाठी नवचैतन्य बहाल केले जात आहे.

प्रयागराज हा निशादराजाचा भूप्रदेश असून प्रभू रामाच्या मर्यादा पुरुषोत्तम होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचे स्थळ आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. केवटाने प्रभू रामाचे पाय धुतले आणि आपल्या नौकेतून त्याला नदी पार करण्यास मदत केली ही प्रभू राम आणि केवटाची समर्पण व मैत्रीची कथा आपल्याला कायम प्रेरणादायी ठरेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. खुद्द भगवानही भक्ताकडे मदतीची याचना करतो असे ही कथा सांगते, असे ते म्हणाले. शृंगवेरपूर धाम हे या मैत्रीचे चिन्ह असून प्रभू राम आणि निशादराजाचे पुतळे भावी पिढ्यांना एकोप्याचा संदेश कायम देत राहतील, अशी अपेक्षा मोदी यांनी यांनी व्यक्त केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ प्रचंड यशस्वी करण्यामध्ये स्वच्छतेची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. नमामि गंगे कार्यक्रमामुळे प्रयागराजमध्ये योग्य स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गंगा दूत, गंगा प्रहरी आणि गंगा मित्रांची नियुक्ती असे उपक्रम जागरूकता निर्मितीसाठी राबवले जात असल्याचे ते म्हणाले.

यावेळी 15,000 हून अधिक स्वच्छता कर्मचारी कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्वच्छता राहील याकडे लक्ष देतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधानांनी या कार्यकर्त्यांप्रती कार्यसंपन्नतेपूर्वीच कृतज्ञता व्यक्त केली. कोट्यवधी भाविकांना आध्यात्मिक आणि स्वच्छ वातावरण प्रदान करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जेवलेली ताट उचलून प्रत्येक काम महत्त्वाचे असल्याचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची उपमा पंतप्रधानांनी दिली आणि स्वच्छता कर्मचारी त्यांच्या स्वच्छतेच्या कृतीने या कार्यक्रमाची महती वाढवतील असे सांगितले.  2019 मधील कुंभमेळ्या दरम्यान राखलेल्या स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि त्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुवून आपण कृतज्ञता कशी दाखवली, याची आठवण करून दिली. हा अनुभव आपल्यासाठी चिरस्मरणीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कुंभमेळ्यामुळे आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय विस्तार होतो, ज्याकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच या भागातील आर्थिक घडामोडी वेगाने वाढत असल्याचेही ते म्हणाले. सुमारे दीड महिन्यासाठी संगमच्या काठावर एक तात्पुरते शहर वसवले जाईल, ज्याला दररोज लाखो लोक भेट देतील, असे त्यांनी सांगितले.  या काळात प्रयागराजमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गरज भासेल, असेही ते म्हणाले. 6,000 हून अधिक नावाडी, हजारो दुकानदार तसेच धार्मिक विधी आणि पवित्र स्नानासाठी मदत करणाऱ्यांना या काळात त्यांच्या कामात वाढ झालेली दिसेल, ज्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी व्यापाऱ्यांना इतर शहरांमधून माल आणावा लागेल. कुंभमेळ्याचा प्रभाव आसपासच्या जिल्ह्यांवरही जाणवेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. इतर राज्यातून येणारे यात्रेकरू रेल्वे किंवा हवाई सेवा वापरतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, यावर त्यांनी प्रकाश टाकला.  कुंभमेळा केवळ समाजालाच बळकट करणार नाही तर लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणातही योगदान देईल यावर मोदींनी भर दिला.

 

आगामी महाकुंभ 2025 ला आकार देणाऱ्या तंत्रज्ञानातील लक्षणीय प्रगती देखील पंतप्रधानांनी नोंदवली. मागील वर्षांच्या तुलनेत स्मार्टफोन वापरकर्ते वाढले आहेत आणि 2013 च्या तुलनेत डेटा खूपच स्वस्त आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.  वापरकर्ता-अनुकूल ॲप्स उपलब्ध असल्यामुळे ज्यांना तंत्रज्ञानाचे मर्यादित ज्ञान आहे ते देखील त्यांचा सहज वापर करू शकतात, असे पंतप्रधान 'कुंभ सहाय्यक' चॅटबॉटच्या प्रारंभाचा संदर्भ देत म्हणाले. कुंभमेळा काळात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटबॉट तंत्रज्ञानाचा वापर करून अकरा भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास लोक  सक्षम होतील, असे त्यांनी सांगितले. अधिकाधिक लोक  डेटा आणि तंत्रज्ञानाच्या या संगमात जोडले जाण्याविषयी पंतप्रधानांनी सुचवले.  उदाहरणार्थ - एकतेचे प्रतीक म्हणून कुंभमेळ्याचे सार टिपणाऱ्या छायाचित्रांची स्पर्धा आयोजित करणे. समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर सामायिक केलेली ही छायाचित्रे एक अद्भुत दृश्यपटल तयार करतील, सोबतच अगणित भावना आणि रंगांचे मिश्रण यांची अनुभूती येईल, असे  ते म्हणाले. याव्यतिरिक्त, त्यांनी अध्यात्म आणि निसर्गावर केंद्रित स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे कुंभमेळ्याचे आकर्षण, विशेषतः तरुणांमध्ये वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाकुंभातून निर्माण होणारी सामूहिक आणि अध्यात्मिक ऊर्जा विकसित भारताचा  संकल्प अधिक बळकट करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी  व्यक्त केला.  कुंभस्नान हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सोहळा व्हावा यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.  तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमातून मानवतेचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना केली. सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी प्रयागराज या पवित्र शहरात सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले.

 

 

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराजला भेट देऊन  संगमावर पूजा करुन दर्शन घेतले आणि त्यानंतर अक्षय वटवृक्ष येथे पूजा केली आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन घेऊन पूजा केली.  पंतप्रधानांनी महाकुंभ प्रदर्शन स्थळाची पाहणी केली.

पंतप्रधानांनी महाकुंभ 2025 साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तसेच प्रयागराजमध्ये अखंड संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 10 नवीन रोड ओव्हर ब्रिज (RoBs) किंवा उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीकिनाऱ्यावरील रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे.

 

स्वच्छ आणि निर्मल गंगा याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधानांनी गंगा नदीकडे जाणाऱ्या लहान नाल्यांचे अडथळे, टॅपिंग, वळणे आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले ज्यामुळे प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा नदीत शून्य विसर्ग सुनिश्चित होईल. पिण्याचे पाणी आणि वीज यासंबंधीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.

भारद्वाज आश्रम कॉरिडॉर,  शृंगवेरपूर  धाम कॉरिडॉर, अक्षयवत कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर यासह प्रमुख मंदिर कॉरिडॉरचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे भाविकांना येथे सहज पोहोचणे शक्य होईल आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.  पंतप्रधानांनी कुंभ सहय्यक चॅटबॉटचा प्रारंभ  केला जो महाकुंभ मेळा 2025 मधील भक्तांना मार्गदर्शन आणि कार्यक्रमांबद्दल अद्यतने देण्यासाठी तपशीलही प्रदान करेल.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions