ख्रिस्ती समुदायाच्या नेत्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार आणि देशासाठी त्यांच्या दृष्टीकोनाची केली प्रशंसा
ख्रिस्ती समुदायाच्या योगदानाचा देशाला अभिमान आहे- पंतप्रधान
पवित्र पोप यांचा दारिद्र्य निर्मूलनाचा संदेश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासशी साधर्म्य साधणारा आहे- पंतप्रधान
विकासाचे लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत आहेत आणि कोणीही वंचित राहात नाही आहे हे आमचे सरकार सुनिश्चित करत आहे-पंतप्रधान

मित्रांनो,

सर्वात आधी तर मी तुम्हा सर्वांना आणि जगभरातल्या लोकांना, विशेषतः ख्रिस्ती बांधवांना, आज या महत्वाच्या सणानिमित्त, अनेक अनेक शुभेच्छा देतो. मेरी ख्रिसमस !!

 

आज माझ्यासाठी ही अत्यंत सुखद गोष्ट आहे, की ह्या विशेष आणि प्रसंगी, आपण सगळे माझ्या निवासस्थानी आले आहात. जेव्हा भारतीय अल्पसंख्याक संघटनेने हा प्रस्ताव मांडला होता, की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, ख्रिसमस साजरा करूया, त्यावेळी मी त्यांना सुचवलं की, मग माझ्याकडेच साजरा करु, आणि त्या कल्पनेतूनच या कार्यक्रमाचं नियोजन झालं.

त्यामुळे, माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. अनिल जी यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे, त्यांचे ही मी विशेष आभार मानतो. या उपक्रमासाठी मी मायनॉरिटी फौंडेशनचा देखील आभारी आहे.

 

ख्रिस्ती समुदायासोबत तर, माझे संबंध काही आजचे नाहीत, माझे त्यांच्याशी खूप जुने, अत्यंत आत्मीय नाते आणि अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गुजरातचा मुख्यमंत्री असतांना, ख्रिस्ती समुदाय आणि त्यांच्या नेत्यांशी माझ्या सतत भेटीगाठी होत असत, आणि मणिनगर, जिथून मी निवडणूक लढवत असे, तिथेही ख्रिस्ती बांधवांची खूप मोठी संख्या आहे, आणि म्हणूनच माझे त्यांच्याशी स्वाभाविक नाते होते. काही वर्षांपूर्वीच, मला, होली पोप यांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले होते. ते खरोखरच, आमच्यासाठी अत्यंत संस्मरणीय क्षण होते. आम्ही, या भूमीला उत्तम जागा बनवण्यासाठी सामाजिक सौहार्द, वैश्विक बंधुभाव, हवामान बदल आणि एकात्मिक विकास, अशा अनेक विषयांवर दीर्घकाळ बसून गप्पा मारल्या होत्या.

मित्रांनो,

ख्रिसमस तो दिवस आहे, ज्या दिवशी, आपण येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करतो. हा त्यांचे आयुष्य, संदेश आणि मूल्ये यांचे स्मरण करण्याचाही दिवस आहे. येशू ख्रिस्ताने करुणा आणि सेवेची मूल्ये प्रत्यक्षात आचरणात आणली होती. त्यांनी एक असा समाज बनवण्यासाठी काम केले, ज्यात सर्वांसाठी न्याय असेल आणि जो समाज सर्वसमावेशक असेल, एकात्मिक असेल. आपल्या देशाच्या विकास यात्रेत देखील हीच मूल्ये,एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवत आहेत.

मित्रांनो,

समाज जीवनातील, वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये आपल्याला अशी अनेक समान मूल्ये दिसतात, जी आपल्या सर्वांना एकत्र आणतात. उदाहरणार्थ, पवित्र बायबल मध्ये सांगितले गेले आहे, की ईश्वराने आपल्याला जी काही भेट दिली आहे, जे सामर्थ्य दिले आहे, त्याचा उपयोग आपण इतरांची सेवा करण्यासाठी करायला हवा. आणि हाच तर सेवा परमो धर्म: आहे. द होली बायबल मध्ये सत्याला अत्यंत महत्व देण्यात आले आहे आणि असे सांगण्यात आले आहे, की सत्य हेच आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल. आणि योगायोग बघा, सगळ्या पवित्र उपनिषदांत देखील, अंतिम सत्य समजून घेण्यावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून, आपण स्वतःला मुक्त करु शकू, आपण आपली समान मूल्ये, आणि आपला वारसा यावर लक्ष केंद्रित करुन, त्यासोबत पुढे वाटचाल करु शकतो. एकविसाव्या शतकातील आधुनिक भारतासाठी हे सहकार्य, हे सामंजस्य, सबका प्रयासची ही भावना, भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल.

 

मित्रांनो,

द होली पोप यांनी आपल्या एका ख्रिसमस संदेशात येशू ख्रिस्ताकडे, प्रार्थना केली होती, की जे लोक दारिद्र्य संपवण्यासाठी कार्य करत आहेत, त्यांना, त्यांचा (येशूचा) आशीर्वाद मिळावा. त्यांचं असं म्हणणं होतं, की गरीबी, व्यक्तीच्या सन्मानावर आघात करणारी असते. द होली पोप यांच्या या शब्दांमधे त्याच भावनेची झलक आहे, जी विकासासाठीच्या आपल्या मंत्रात आहे. आपला मंत्र आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास.

सरकार म्हणून आम्ही हे सुनिश्चित करतो आहोत, की विकासाचा लाभ, प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि कोणीही त्यापासून वंचित राहू नये. ख्रिस्ती समुदायाच्या अनेक लोकांपर्यंत विशेषतः गरीब आणि वंचित लोकांपर्यंत, देखील, देशात आज सुरु असलेल्या विकासाचा लाभ पोहोचतो आहे. मला आठवतं, जेव्हा आम्ही मत्स्यव्यवसायासाठी एका स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली होती, त्यावेळी ख्रिस्ती समुदायाच्या अनेक मच्छिमार बंधू भगिनींनी, आमच्या या निर्णयाची सार्वजनिक स्वरूपात प्रशंसा केली होती, माझा सन्मान देखील केला होता, माझे खूप अभिनंदन केले होते.

 

मित्रांनो,

ख्रिसमसच्या या पवित्र प्रसंगी, मी देशभरातील ख्रिस्ती समुदायाला, एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, की आपल्या योगदानाचा भारताला अत्यंत अभिमान आहे. ख्रिस्ती बांधवांनी, स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. स्वातंत्र्य लढ्यात, ख्रिस्ती समुदायाचे अनेक विचारवंत आणि नेते सहभागी झाले होते. गांधीजी यांनी स्वतः सांगितले होते, की असहकार चळवळीची कल्पना त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजचे प्राचार्य, सुशील कुमार रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आखली होती.

मित्रांनो,

ख्रिस्ती समुदायाने, समाजाला दिशा देण्यात सातत्याने महत्वाची भूमिका पार पाडली आहे, समाजसेवेत ख्रिस्ती समुदाय, अतिशय मनापासून पुढाकार घेत असतो आणि तुमचा समुदाय, गरीब तसेच वंचितांच्या सेवेसाठी सतत पुढे येत असतो. शिक्षण आणि आरोग्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात, आज देखील संपूर्ण भारत भरात, ख्रिस्ती समुदायाच्या संस्था, मोठे योगदान देत आहेत.

मित्रांनो,

2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्याचे जे लक्ष्य आहे, ते उद्दिष्ट मनात ठेवून, आम्ही आपली विकास यात्रा अत्यंत वेगाने पुढे नेत आहोत, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. या विकास यात्रेत, जर आपले सर्वात महत्वाचे साथीदार कोणी असतील तर, ते आपले युवा आहेत. शाश्वत विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, की आपले युवा शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निरोगी आणि स्वस्थ असावेत. या उद्देशाने चालवले जाणारे उपक्रम आणि अभियान, जसे की फिट इंडिया, भरड धान्याचा वापर, पोषक आहारावर भर, मानसिक आरोग्याप्रती जागरूकता आणि अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेले अभियान, एक लोकचळवळ बनले आहे. मी ख्रिस्ती समुदायाच्या नेत्यांना, विशेषत: जे शिक्षण आणि आरोग्यविषयक संस्थांमधे कार्यरत आहेत, अशा सर्वांना आग्रह करेन, की त्यांनी या विषयाबाबत लोकांना अधिक जागरूक बनवावे.

 

मित्रांनो,

ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे, मला देखील आताच एक खूप पवित्र भेट मिळाली आहे, आताच. आणि म्हणूनच या प्रसंगी, आपण हा विचार करायला हवा, की येणाऱ्या पिढ्यांना आपण एका उत्तम पृथ्वीची भेट देऊ शकतो का? शाश्वतता, आजच्या काळाची गरज आहे. एक शाश्वत जीवनशैली जगणे, हाच लाईफ या अभियानाचा मुख्य संदेश आहे. ही भारताच्या नेतृत्वाखाली चालवली जात असलेली एक आंतरराष्ट्रीय चळवळ आहे.

हे अभियान, पृथ्वीविषयी प्रेम असलेल्या व्यक्तींना वसुंधरा स्नेही जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा देत असते. आणि संपत जी यांनी त्या छोट्या पुस्तकात, हिरवाई आणण्याविषयी जे लिहिले आहे, त्याचा हा देखील एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, पुनर्वापर, आणि पुनर्प्रक्रिया, जैव विघटन होणाऱ्या पदार्थांचा वापर, भरड धान्ये-श्री धान्याचा वापर, कमीत कमी कार्बन उत्सर्जन होणाऱ्या उत्पादनांची खरेदी, अशा अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनू शकतात आणि समाजात मोठे परिवर्तन घडवू शकतात. आणि माझा असा विश्वास आहे, सामाजिक दृष्ट्या अत्यंत सजग असलेला ख्रिस्ती समुदाय, या अभियानात एक महत्वाची भूमिका पार पाडू शकतो, अभियानाचे नेतृत्व करु शकतो.

मित्रांनो,

एक विषय व्होकल फॉर लोकलचा देखील आहे. जेव्हा आपण स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतो, जेव्हा आपण भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचे सदिच्छादूत बनतो, त्यावेळी ती सुद्धा एक प्रकारची देशसेवाच असते. व्होकल फॉर लोकल च्या मंत्राच्या यशाशी, देशातील लक्षावधी छोट्या व्यापाऱ्यांचा रोजगार जोडला गेला आहे, स्वयंरोजगार जोडला गेला आहे, आणि म्हणूनच मी ख्रिस्ती समुदायाला, असा आग्रह करेन, की लोकल म्हणजेच स्थानिक गोष्टींचा प्रचार करण्याच्या या अभियानात, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन मिळत राहावे.

मित्रांनो,

पुन्हा एकदा, आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो, की हा उत्सवांचा काळ, आपल्याला एक राष्ट्र म्हणून, अधिक मजबूत करणारा ठरावा, सर्व देशबांधवांना परस्परांच्या अधिक जवळ आणणारा ठरावा. हे उत्सव, आपल्या विविधतेतही, आपल्याला एकत्रित ठेवण्यासाठीचे बंध अधिक मजबूत करणारे ठरावेत.

आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ! आणि आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आलात, आणि आपण तर मुंबईहून विशेषतः या वयात, दगदग करत आलात. तसे तर मला आपल्यापैकी अनेकांचे, आशीर्वाद सतत मिळत असतात, भेटीगाठी, मार्गदर्शन मिळत असते. मात्र आज सर्वांना एकत्र भेटण्याची संधी मिळाली.

मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या मुलांचेही मी विशेष आभार मानतो, कारण आज त्यांनी आपल्या या समारंभात, त्यांचे विशेष स्वर, भावना यांनी अधिकच सुरेल, आनंदी केले आहे. या मुलांना माझे खूप खूप आशीर्वाद !

धन्यवाद

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India among the few vibrant democracies across world, says White House

Media Coverage

India among the few vibrant democracies across world, says White House
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 मे 2024
May 18, 2024

India’s Holistic Growth under the leadership of PM Modi