शेअर करा
 
Comments
कोरोना काळातल्या अभूतपूर्व सेवेबद्दल महिला बचत गटांचे केले कौतुक
सर्व भगिनींना आपल्या गावांचे नाते समृद्धी आणि संपन्नतेशी जोडता यावे याकरता वातावरण आणि परिस्थीती निर्माण करण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न - पंतप्रधान
भारतात निर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्याबाबत बचत गटांची मोठी क्षमता : पंतप्रधान
पंतप्रधानांनी 4 लाखापेक्षा अधिक बचत गटांसाठी 1,625 कोटी रुपयांचा निधी केला जारी.

नमस्कार,

आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या  गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!

 

बंधू आणि भगिनींनो,

आता ज्यावेळी मी स्वमदत समूहांमध्ये सहभागी असलेल्या भगिनींबरोबर बोलत होतो, त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास मी अनुभवत होतो. तुम्हीही पाहिलंच असेल, त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची किती आस लागली आहे. काही करून दाखवण्याची इच्छा खरोखरीच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे. यामुळे आपल्याला देशभरात सुरू असलेल्या नारीशक्तीच्या सशक्त आंदोलनाचं दर्शन झालं आहे.

 

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये, ज्याप्रकारे आपल्या भगिनींनी स्वमदत समूहांच्या माध्यमातून देशवासियांची सेवा केली ती अभूतपूर्व म्हणावी लागेल. मास्क आणि सॅनिटायझर बनवायचे असो, गरजवंतांपर्यंत भोजन पोहोचवायचे असो, जागरूकता निर्माण करण्याचे काम असो, सर्व प्रकारे आपल्या सखी समूहांचे योगदान अतुलनीय होते. आपल्या परिवाराला चांगले जीवन देण्याबरोबरच देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेणा-या आमच्या करोडो भगिनीेंचे मी अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

महिलांमधल्या उद्योगशीलतेला अधिक व्यापक बनविण्यासाठी, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पामध्ये अधिकाधिक भागीदारी असावी, यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत जाहीर केली आहे. अन्नप्रक्रियाशी संबंधित उद्योग असो, महिला शेतकरी उत्पादक संघ असो अथवा दुसरे स्वमदत समूह असो, भगिनींच्या अशा लाखो समूहांसाठी सोळाशे कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी वितरीत केला आहे.  राखी पौर्णिमेच्या आधी वितरीत केलेल्या या निधीमुळे कोट्यवधी भगिनींच्या जीवनामध्ये आनंद येईल, तुम्हा सर्वांच्या कामाचा अधिक विस्तार होईल. तुम्हा सर्वांना त्यासाठी माझ्या खूप-खूप शुभेच्छा!

 

मित्रांनो,

स्वमदत समूह आणि दीनदयाळ अंत्योदय योजना, आज ग्रामीण भारतामध्ये एक नवीन क्रांती आणत आहेत. आणि या क्रांतीची मशाल महिला स्वमदत समूहांमुळे पेटती राहणे शक्य झाले आहे. या महिलांनी ही मशाल सांभाळली आहे. गेल्या 6-7 वर्षांमध्ये महिला स्वमदत समूहाच्या या आंदोलनाने अधिक वेग घेतला आहे. आज देशभरामध्ये जवळपास 70 लाख स्वमदत समूह आहेत. या समूहांशी जवळपास 8 कोटी भगिनी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या 6-7 वर्षांच्या काळात स्वमदत समूहांमध्ये तिपटीपेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. तिपटीपेक्षा जास्त भगिनींची भागिदारी सुनिश्चित झाली आहे. याला अतिशय महत्व आहे. कारण अनेक वर्षांपर्यंत भगिनींचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी जितके आवश्यक होते तितके, फारसे प्रयत्नच केले गेले नव्हते. ज्यावेळी आमचे सरकार आले, त्यावेळी आम्ही पाहिले की, देशाच्या कोट्यवधी भगिनींचे बँकेत खातेही नाही. त्या बँकिंग कार्यप्रणालीपासून कोसभर दूर होत्या. म्हणूनच आम्ही सर्वात प्रथम जनधन खाते उघडण्याचे मोठे अभियान सुरू केले. आज देशामध्ये 42 कोटींपेक्षा जास्त जनधन खाती आहेत. यापैकी जवळपास 55 टक्के खाती आमच्या माता-भगिनींची आहेत. या खात्यांमध्ये हजारो कोटी रूपये जमा आहेत. आता स्वयंपाक घरातल्या धान्यांच्या डब्यांमध्ये पैसे ठेवले जात नाहीत. माहित आहे ना, गावांमध्ये काय केले जाते. घरातल्या धान्यांचे डबे असतात, त्यामध्ये जे काही वाचतील ते पैसे ठेवले जात होते. आता पैसे स्वयंपाक घरातल्या डब्यांमध्ये नाही, तर बँकेच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

आम्ही बँक खातीही उघडली आणि बँकांकडून कर्ज घेणेही सोपे, सुकर केले. एकीकडे मुद्रा योजनेतून लाखो महिला उद्योजिकांना विनातारण सहजतेने कर्ज उपलब्ध करून दिले. तर दुसरीकडे स्वमदत गटांना विनातारण, विनाहमी ऋण देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले. राष्ट्रीय जीवन्नती अभियानाअंतर्गत जितकी मदत सरकारने भगिनींना दिली आहे. ती आधीच्या सरकारने दिलेल्या मदतीच्या अनेकपटींनी जास्त आहे. इतकंच नाही तर जवळपास पावणे चार लाख कोटी रूपयांचे विनातारण, विना हमीचे ऋणही स्वमदत समूहांना उपलब्ध करून दिले आहे.

 

मित्रांनो,

आमच्या भगिनी किती प्रामाणिक आणि किती उद्योगशील आहेत, याची चर्चा करणेही आवश्यक आहे. सात वर्षांमध्ये स्वमदत समूहांनी बँकांच्या कर्जाची परतफेडीचे कामही खूप चांगल्या पद्धतीने केले आहे. एक काळ असा होता की, ज्यावेळी बँकांचे कर्ज बुडण्याचे प्रमाण जवळपास 9 टक्के होते, असे आत्ता गिरीराज जी सांगत होते. याचा अर्थ कर्जाची परतफेड केली जात नव्हती. मात्र आता हे प्रमाण कमी होऊन ते दोन ते अडीच टक्क्यांवर आले आहे. आपल्या उद्योगशीलतेला, आपल्या प्रामाणिकपणाला आज देश अभिवादन करीत आहे. म्हणूनच आता आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या स्वमदत समूहाला आधी 10 लाख रूपयांपर्यंत विनाहमी ऋण दिले जात होते. त्याऐवजी आता ही मर्यादा दुप्पट केली आहे. म्हणजे 20 लाखांपर्यंत विनाहमी कर्ज मिळू शकणार आहे. आधी ज्यावेळी तुम्ही बँकेकडून कर्ज घेत होता, त्यावेळी बँक तुमचे बचत खाते  कर्जाला जोडण्यास सांगत होती. आणि काही पैसेही जमा करायला सांगत होती. आता या अटीही काढून टाकल्या आहेत. असे अनेक प्रयत्न आता तुम्हाला आत्मनिर्भरतेच्या अभियानामध्ये अधिक उत्साहाने पुढे जाण्यासाठी मदतगार ठरणार आहेत.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा काळ नवीन लक्ष्य निश्चित करण्याचा आणि नवीन ऊर्जेने पुढे जाण्याचा आहे. भगिनींच्या समूह शक्तीलाही नवीन ताकद देऊन पुढे जायचे आहे. सरकार यासाठी सातत्याने वातावरण निर्मिती करीत आहे. आपण सर्व भगिनींनी आपल्या गावांना समृद्धीच्या मार्गावर न्यावे  आणि संपन्न  बनवावे. कृषी आणि कृषीआधारित उद्योग नेहमीच असे क्षेत्र आहे की, तिथे महिला स्वमदत समूहासाठी अनंत शक्यता असतात. गावांमध्ये भांडार, गोदाम आणि शीतगृहांची शृंखला उभी करण्याची सुविधा तयार करायची असो, शेतामध्ये यंत्रसामुग्री लावायची असो, दूध-फळे-भाजीपाला खराब होण्यापासून वाचवण्याचे काम असो, त्यासाठी काही प्रकल्प उभारणी असो, अशा अनेक कामांसाठी विशेष निधी तयार केला आहे. या निधीतून मदत घेऊन स्वमदत समूह अशा सुविधा निर्माण करू शकतात. इतकेच नाही तर, ज्या सुविधांची निर्मिती केली जाईल, त्यांचे योग्य दरही निश्चित करून सर्व सदस्यांना त्याचा लाभ घेता येईल. आणि इतरांनाही भाडेतत्वावर सुविधा देणे शक्य होईल. उद्योगशील भगिनींनो, आमचे सरकार, महिला शेतक-यांना विशेष प्रशिक्षण आणि जागरूकता यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यामध्ये आत्तापर्यंत जवळपास सव्वा कोटी शेतकरी आणि पशुपालक भगिनींना लाभ मिळाला आहे. ज्य नवीन कृषी सुधारणा केल्या आहेत, त्यामुळे देशातल्या आमच्या शेतकरी वर्गापर्यंत लाभ तर होणार आहेच. तसेच स्वमदत समूहांनाही कामाची अमर्याद संधी असणार आहेत. आता तुम्ही थेट शेतक-यांशी, शेतावरच सहकार्य करून अन्नधान्य आणि डाळी सारख्या पिकांचे वितरण थेट घरापर्यंत करू शकणार आहे. इकडे कोरोना काळामध्ये आम्ही अशा प्रकारे कितीतरी ठिकाणी काम होताना पाहिले आहे. आता तुम्हाला भंडारणाची सुविधा निर्माण करणे शक्य असणार आहे. तुम्ही धान्याची साठवणूक किती करावी, यासाठी कसलीही मर्यादा नाही. तुम्हाला वाटलं तर थेट शेतातून पिकाची विक्री करावी किंवा अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारून, चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून थेट विक्री करण्याचाही पर्याय तुमच्याजवळ असेल. आजकाल  ऑनलाईन माध्यमातून विक्री करण्याची पद्धत खूपच प्रचलित झाली आहे. त्याचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे. तुम्ही ऑनलाइन कंपन्यांबरोबर ताळमेळ घालून, मस्त पॅकेजिंग करून अगदी सहजपणे शहरांपर्यंत आपली उत्पादने पाठवू शकता. इतकेच नाही तर भारत सरकारच्या जेम-(GeM) या पोर्टलवर जाऊन सरकारला ज्या गोष्टी खरेदी करावयाच्या आहेत, त्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही थेट सरकारलाही विकू शकता.

मित्रांनो,

भारतामध्ये बनलेल्या खेळण्यांनाही सरकार खूप प्रोत्साहन देत आहे. यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत्वाने आपल्या आदिवासी क्षेत्रांतल्या भगिनी तर पारंपरिक रूपाने याच्याशी जोडलेल्या असतात. यामध्ये स्वमदत समूहांला खूप काही करता येणे शक्य आहे. याचप्रकारे, आज देशाला एकदा वापरलेल्या प्लास्टिकमधून मुक्त करण्याचे अभियान सुरू आहे. आणि आत्ताच आपण तामिळनाडूतल्या आपल्या भगिनींच्या कामाची माहिती ऐकली. जयंती भगिनीने ज्याप्रकारे ही आकडेवारी सांगितली, ती प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. यामध्ये स्वमदत समूहांना दोन बाजूंनी भूमिका पार पाडता येईल. एक तर एकदाच वापरात येणा-या प्लास्टिकविषयी जागरूकता वाढविणे आणि दुसरे म्हणजे यासाठी असलेल्या पर्यायासाठी काम करणे. प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी तागाची किंवा सूती तसेच इतर आकर्षक पिशव्या तुम्ही जास्तीत जास्त बनवू शकता. तुम्ही आपले सामान  थेट सरकारला विकू शकता. यासाठीही एक व्यवस्था दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. ज्याप्रमाणे आपण आधी सांगितले त्या जेम म्हणजेच गव्हर्नमेंट ई-मार्केट स्थान. याचाही स्वमदत समूहांनी पूर्ण लाभ घेतला पाहिजे.

 

मित्रांनो,

आज बदलत्या भारतामध्ये भगिनी-कन्यांनाही पुढे जाण्याच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. घरकुल, शौचालये, वीज, पाणी, गॅस यासारख्या सुविधांशी सर्व भगिनींना जोडले जात आहे. भगिनी-कन्यांच्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पोषणाच्या, लसीकरणाच्या आणि इतर सर्व गरजांची पूर्तता करण्यासाइी सरकार पूर्णपणे संवेदनशीलतेनं काम करीत आहे. यामुळे केवळ महिलांचा सन्मान वाढतोय असे नाही तर सर्व कन्या आणि भगिनींचा आत्मविश्वासही वाढतोय. हा आत्मविश्वास आपण क्रीडा मैदानांपासून ते विज्ञान-तंत्रज्ञान आणि युद्धाच्या मैदानापर्यंत पहात आहोत. हा आत्मनिर्भर भारतासाठी सुखद संकेत आहे. या आत्मविश्वासामुळे, राष्ट्रनिर्माणाच्या या प्रयत्नांना आता आपण अमृत महोत्सवाशीही जोडायचे आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष होत असताना सुरू झालेला अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. 8 कोटींपेक्षा जास्त भगिनी -कन्यांच्या सामूहिक शक्तीमुळे अमृत महोत्सवाला नवीन उंची प्राप्त होणार आहे. आपण सर्वांनी विचार करावा की, आपली आर्थिक प्रगती तर होत आहे. इतक्या सर्व भगिनींच्या समूहाला कोणत्या ना कोणत्या सामाजिक काम हाती घेणे शक्य आहे का, याचा आपणही विचार करावा. यामध्ये रूपये -पैशांचा कारभार नाही. फक्त सेवा भाव आहे. कारण सामाजिक जीवनामध्ये हे फार प्रभावी ठरते. ज्याप्रमाणे आपण आपल्या क्षेत्रामध्ये इतर महिलांना कुपोषणामुळे नेमका कोणता त्रास होता. 12,15,16 वर्षांच्या कन्या जर कुपोषित असल्या तर त्यांना किती त्रास होईल, याविषयी जागरूकता निर्माण करू शकलो तर किती तरी मोठे काम होईल. आपण आपल्या समूहाच्यावतीने असे अभियान चालवू शकता. आता देशात कोरोनाविरोधी लसीकरण सुरू आहे. सर्वांना मोफत लसी दिली जात आहे. आपली वेळ आल्यानंतर सर्वांनी लस घ्यावी. आणि आपल्या गावातल्या इतर लोकांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

तुम्ही आपल्या गावांमध्ये निर्णय घेऊन स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात कमीत कमी एक वर्षामध्ये 75 तास, मी जास्त काही सांगत नाही. एका वर्षभरात 75 तास, या 15 ऑगस्ट ते पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत 75 तास आपण सर्व सखी मंडळाच्या भगिनींपैकी कोणी ना कोणी स्वच्छतेचं काम करावं. कोणी जलसंरक्षणाचं काम करावं. आपल्या गावातल्या विहिरी, तळी यांच्या डागडुजींचं, त्यांच्या जीर्णोद्धाराचं काम करण्याचं अभियान सुरू करावं. कारण फक्त पैसे आणि त्यासाठी हा समूह आहे असे नाही. तर समाजासाठी समूह आहे, असेही होऊ शकते. तसेच असेही करू शकता की, आपण सर्वांनी आपल्या स्वमदत समूहामध्ये महिना-दोन महिन्या एखाद्या डाॅक्टरांना बोलावून त्यांच्याकडून महिलांना कोणत्याप्रकारचे आजार होतात. त्यांच्यापासून संरक्षण कसे करायचे याची माहिती घ्यावी. गावामध्ये बैठक भरवून महिलांना आरोग्य विषयक माहिती देणारे डाॅक्टरांचे भाषण ठेवावे. याचा तुम्हा सर्व भगिनींना लाभ होईल. त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूती निर्माण होईल. मुलांच्या पालनपोषणासंबंधी चांगले व्याख्यान ठेवता येईल. एखाद्या महिन्यात तुम्ही सर्वजणी मिळून सहल काढली पाहिजे. मला असं वाटतं की, तुम्ही जे काम लहान प्रमाणात करता, तेच काम मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रकल्पांमध्ये कशाप्रकारे केले जाते, हे वर्षातून एकदा जावून पाहिले पाहिजे. त्याचा खूप लाभ होईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. एक मोठी बसगाडी भाड्याने घेऊन मोठा दुग्धालयाचा प्रकल्प पहायला जाता येईल. एखाद्या गोबरगॅस प्रकल्पाला किंवा जवळच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करता येईल. आपण आत्ताच ऐकलं की, प्लास्टिकचा पुनर्वापर कसा केला जातो. जयंतीजींना भेटून त्यांचे काम पाहू शकता. आपण आत्ता ऐकलं की उत्तराखंडमध्ये बेकरी आहे. बिस्कीट तयार केली जातात. तुमच्या भगिनींचे हे काम तुम्ही जाऊन पाहू शकता. म्हणजेच एकमेकांपासून माहिती घेऊन शिकता येईल. आणि त्याला तर काही खर्चही लागणार नाही. उलट इतरांचे काम पाहून आपलीही हिम्मत वाढणार आहे. यामुळे आपल्याला शिकायला मिळणार आहे. तेही देशासाठी महत्वाचे ठरणार आहे. मी हे सांगण्याचे कारण असे आहे की, काम तर तुम्ही सर्वजण करीत आहातच, त्याच्याच जोडीला तुम्ही थोडा वेळ काढावा. समाजालाही वाटलं पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी नक्कीच करीत आहात. कोणाचं तरी भलं करीत आहात. कोणाच्यातरी कल्याणासाठी काम करीत आहात.

तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांमुळे अमृत महोत्सव हा यशाचे अमृत बनणार आहे. देशाला त्याचा खूप लाभ होईल. आणि आपण विचार करा, भारताच्या 8 कोटी महिलांच्या सामूहिक शक्तीचा किती मोठा परिणाम मिळू शकतो. देशाला किती पुढे घेवून जाऊ शकतो. मी तर या आठ कोटी माता -भगिनींना सांगतो की, तुम्हीच निश्चित करून आपल्या समूहातल्या ज्या माता-भगिनींना लिहिता-वाचता येत नाही, त्यांना शिकवावं. यासाठी खूप काही करण्याची गरज नाही. थोडेफार केले तरी किती तरी मोठी सेवा होणार आहे. त्या भगिनींच्या माध्यमातून इतरांनाही शिकवा. मी तर आपल्याकडून जे काही ऐकत होतो, त्यावेळी वाटत होतं की, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सर्वांनाच शिकण्यासारखे आहे. किती आत्मविश्वासाने आणि किती अवघड परिस्थितीत तुम्ही पुढची वाटचाल करीत आहात. व्यक्तिगत जीवनामध्ये कितीही कष्ट आले तरी तुम्ही हार मानली नाही आणि काहीतरी नवीन करून दाखवले आहे. तुमची प्रत्येक गोष्ट देशाच्या माता-भगिनींनाच नाही तर माझ्यासारख्या लोकांनाही प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सर्व भगिनींच्या मंगल आरोग्याची कामना करून येणा-या राखीपौर्णिमेच्या सणानिमित्त तुमचे आशीर्वाद असेच कायम रहावेत, अशी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आशीर्वादच मला नवनवीन कामे करण्याची प्रेरणा देत आहेत. निरंतर काम करण्याची प्रेरणा मिळावी. यासाठी आपल्या आशीर्वादाची कामना करून राखीपौर्णिमेच्या आधीच शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो.

खूप-खूप धन्यवाद!

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report

Media Coverage

Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 28 ऑक्टोबर 2021
October 28, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens cheer in pride as PM Modi addresses the India-ASEAN Summit.

India appreciates the various initiatives under the visionary leadership of PM Modi.