पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोमानियाचे पंतप्रधान निकोलाय- इयोनेल चिऊका यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेत रोमानिया भारताला करत असलेल्या मदतीबद्दल पंतप्रधानांनी निकोलाय- इयोनेल चिऊका यांचे आभार मानले. विशेषतः अशा कठीण परिस्थितीत, भारतीय नागरिकांना रोमानियाचा व्हिसा नसतांनाही प्रवेश देणे तसेच, या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानांचे उड्डाण त्यांच्या भूमीवरून करण्यास परवानगी दिल्याबद्दल, त्यांनी चिऊका यांचे आभार मानले.
भारताचे, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून तिथे येत असून, ते पुढचे काही दिवस तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेवर देखरेख ठेवतील, अशी माहितीही मोदी यांनी चिऊका यांना दिली.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि मानवतेवर आलेल्या संकटावर दुःख व्यक्त केले आणि भारत सतत करत असलेल्या, युद्धबंदी करून चर्चेने प्रश्न सोडविण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी देशांचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रांची प्रादेशिक एकात्मता याचा सन्मान करणे महत्वाचे आहे यावर भर दिला.


