जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा सचिवालयाचे सरचिटणीस शिगेरु कितामुरा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितामुरा यांचे स्वागत केले. कितामुरा यांनी सप्टेंबर 2019 मध्ये पदभार सांभाळल्यांनंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आशियाई प्रदेशात शांतता, प्रगती आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी भारत आणि जपान यांच्यातले राजनैतिक संबंध अधिक वृद्धिंगत होणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केले. जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात कितामुरा यांची भूमिका महत्वाची ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे स्मरण करत येत्या महिन्यात भारतात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी आबे यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.


