भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल सिंग्ये वांगचुक यांच्या निमंत्रणाला मान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 या दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर गेले होते.
या भेटीदरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी महामहीम चौथे ड्रुक ग्याल्पो यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त चांगलिमिथांग येथे आयोजित कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला.
थिम्फू येथे सध्या सुरु असलेल्या जागतिक शांततासंबंधी प्रार्थना महोत्सवात देखील ते सहभागी झाले. या महोत्सवादरम्यान सार्वजनिक दर्शनासाठी भगवान बुद्धांचे पवित्र पिप्रहवा अवशेष भारतातून थिम्फूमध्ये आणून प्रदर्शित करण्यात आल्याबद्दल भूतानच्या राजांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांच्या भूतान भेटीनिमित्त भूतानचे राजे, चौथे ड्रुक ग्याल्पो यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान दाशो त्सेरिंग तोबग्ये यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांची महत्त्वाची क्षेत्रे आणि परस्पर हिताच्या क्षेत्रीय तसेच प्रादेशिक मुद्द्यांबद्दल चर्चा केली.
दिल्ली येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात मौल्यवान जीवितहानीच्या दुःखद घटनेबद्दल भूतान सरकार आणि भूतानमधील जनतेतर्फे मनापासून शोक व्यक्त केला तसेच जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली. भूतानने दिलेल्या पाठींबा आणि ऐक्यभावाच्या संदेशाबद्दल भारतातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भूतानच्या विक्साविषयक प्राधान्यक्रमांच्या पूर्ततेसाठी भूतानला सक्रियतेने मदत करण्याप्रती तसेच विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास साधण्याप्रती भारताच्या बांधिलकीवर अधिक भर देत आर्थिक प्रोत्साहन कार्यक्रमासह भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेला असलेल्या भारताच्या अढळ पाठिंब्याला पंतप्रधानांनी दुजोरा दिला. भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत भूतानमध्ये आकाराला येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात भारताने केलेय मदतीबद्दल तसेच भूतानच्या विकासात भारताने दिलेल्या योगदानाबद्दल भूतानतर्फे देखील कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गेलेफू सजगता शहराच्या उभारणीचे महामहीम यांचे स्वप्न साकार करण्याच्या कार्यात पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकारतर्फे संपूर्ण पाठींबा व्यक्त केला. गेलेफू येथे जाऊ इच्छिणारे गुंतवणूकदार आणि अभ्यागत यांच्या सुरळीत गतिमानतेसाठी आसाममध्ये हातीसार येथे एक इमिग्रेशन चेक पोस्ट उभारण्याच्या निर्णयाची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली. भूतानच्या राजांनी ग्यालसुंग अकादमींच्या उभारणीसाठी भारत सरकारने केलेल्या मदतीची प्रशंसा केली.
भूतानचे राजे आणि पंतप्रधान मोदी यांनी काल 11 नोव्हेंबर 2025 रोजी, भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या सान्निध्यात, 1020 मेगावॉट क्षमतेच्या पुनात्सांगचू- II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. हा प्रकल्प म्हणजे जलविद्युत क्षेत्रात भारत आणि भूतान यांच्या दरम्यान असलेली मैत्री तसेच अनुकरणीय सहकार्याचा पुरावा आहे. या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी पुनात्सांगचू- II प्रकल्पातून भारताला सुरु झालेल्या वीजनिर्यातीचे स्वागत केले. मार्च 2024 मधील उर्जा भागीदारी बाबतच्या संयुक्त संकल्पनेच्या अंमलबजावणीबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त करण्यात आले.
दोन्ही देशांच्या नेत्यांनी 1200 मेगावॉट क्षमतेच्या पुनात्सांगचू- I जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पुन्हा सुरु करण्यासंदर्भात झालेल्या सामंजस्याचे स्वागत केले आणि हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याबाबत सहमती दर्शवली. काम पूर्ण झाल्यावर पुनात्सांगचू- I प्रकल्प हा या दोन सरकारांनी संयुक्तपणे विकसित केलेला सर्वात भव्य जलविद्युत प्रकल्प असेल.
या नेत्यांनी भूतानमधील जलविद्युत प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांनी सक्रियतेने घेतलेल्या सहभागाचे स्वागत केले.भूतानमधील विद्युत प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी भारत सरकारतर्फे सवलतीच्या दरात 40 अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या घोषणेचे भूतानने कौतुक केले आहे.
दोन्ही बाजूंनी सीमापार संपर्क जोडणी सुधारण्याचे आणि एकात्मिक तपासणी नाके स्थापन करण्यासह सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी दारंगा येथे उभारलेल्या इमिग्रेशन चेक पोस्टचे कार्य नोव्हेंबर 2024 मध्ये सुरु झाल्याबद्दल तसेच मार्च 2025मध्ये जोगिगोफा येथे अंतर्गत जलमार्ग टर्मिनल आणि बहुपद्धतीय लॉजिस्टिक्स पार्क सुरु झाल्याबद्दल स्वागत केले. दोन्ही बाजूंनी सीमापार रेल्वे मार्गांच्या स्थापनेसाठी (गेलेफू-कोक्राझार आणि साम्त्से-बनारहाट) सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या प्रकल्प सुकाणू समितीच्या स्थापनेचे देखील स्वागत केले.
भूतानला अत्यावश्यक वस्तू आणि खतांचा अखंडित पुरवठा करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्यात भारत सरकारने उचललेल्या पावलांची भूतानच्या नेत्यांनी प्रशंसा केली. नव्या व्यवस्थेअंतर्गत भारतातून निघालेल्या खतांच्या पहिल्या फेरीचे भूतान येथे आगमन झाल्याबद्दल दोन्ही बाजूंनी आनंद व्यक्त केला.
एसटीईएम, वित्त तंत्रज्ञान आणि अवकाश या नव्या क्षेत्रांमध्ये वाढत्या सहकार्याबद्दल दोन्ही देशांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भूतानहून भारतात येणाऱ्या अभ्यागतांना क्यूआर कॉस स्कॅन करुन स्थानिक मोबाईल अॅपच्या वापरासह पैसे देणे शक्य करणाऱ्या युपीआयच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे त्यांनी स्वागत केले. अवकाश क्षेत्रातील सहकार्याबाबत संयुक्त कृती योजनेच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. एसटीईएम शिक्षण तसेच आरोग्य सुविधा क्षेत्रात भारतीय शिक्षक आणि नर्सेस यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची त्यांनी पोचपावती दिली.
राजगीर येथील शाही भूतान मंदिराच्या अभिषेक कार्याचे तसेच भूतानी मंदिर तसेच अतिथीनिवास बांधण्यासाठी वाराणसी येथे जागा देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
सदर दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये खालील सामंजस्य करार करण्यात आले:
- नवीकरणीय उर्जा क्षेत्रात केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय आणि भूतान सरकारचे उर्जा आणि नैसर्गिक स्त्रोत मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार;
- आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा क्षेत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ई भूतानचे आरोग्य मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार;
- संस्थात्मक संबंध निर्माण करण्यासाठी भारत सरकारची राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्युरोसायन्सेस संस्था आणि भूतान येथील पेम सचिवालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार;
भारत-भूतान भागीदारी सर्व स्तरांवरील दृढ विश्वास, स्नेहपूर्ण मैत्री, परस्पर आदर आणि समजून घेण्यावर आधारलेली आहे आणि दोन्ही देशांतील जनतेमधील सशक्त नाती तसेच आर्थिक आणि विकासात्मक सहकार्य यामुळे ती आणखी घट्ट होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या भूतान भेटीने या दोन्ही देशांतील नियमित उच्च-स्तरीय विचारविनिमयाच्या परंपरेला आणखी बळकटी मिळाली आणि भविष्यात असेच कार्य करत राहण्यावर दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली.


