सर्वात आधी मी मुंबईच्या रुग्णालय दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतो. यासंदर्भात माझे मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. राज्य सरकार, अपघातग्रस्त कुटुंबाची सर्वतोपरी मदत करत आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या स्वकीयांना गमावले आहे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
मित्रांनो,
पत्रकारांकडून प्रेरणा घेऊन, पत्रकारा द्वारा संचलित, शुद्ध पत्रकारीते प्रती वचनबद्ध, रिपब्लिकन टिव्ही, एक- सशक्त प्रयोग आहे. फार कमी वेळात तुमच्या वाहिनीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तुम्ही सर्व देशाच्या प्रत्येक नागरीकापर्यंत योग्य माहिती पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. मी रिपब्लिक टीव्हीच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे, इथे काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे, देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करत असलेल्या वार्ताहरांचे आणि स्ट्रिंगर्सचे अभिनंदन करतो. देशाची परिस्थिती आणि दिशेवर विचार करण्यासाठी, अशाप्रकारचे आयोजन करून तुम्ही नवीन कल्पना, नवीन उपाय योजनांसाठी सर्वांना प्रेरित करत आहात. या सगळ्यासाठी देखील तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
मित्रांनो,
स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्याने भारावलेलेच पत्रकारिता करायचे. पत्र- पत्रिकाच, स्वातंत्र्याचे बिगुल वाजवायच्या. स्वतंत्र भारतात, सुखी-समृद्ध देशासाठी सकारात्मक बातम्यांची देखील आवश्यकता आहे. देशवासियांमध्ये काहीतरी करण्याची इच्छा जागृत होणे, देशाला पुढे घेऊन जाण्याची इच्छा निर्माण होणे, हे अत्यंत गरजेचे आहे. जसा स्वराज्य चळवळीचा उत्साह होता, तशीच सुराज्य चळवळीची ऊर्जा असायला पाहिजे. भारताने जर संपूर्ण जगात एक शक्ती म्हणून उदयास यायला हवे असेल तर अनेक क्षेत्रांमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार राहायला हवे, तेवढी उंची गाठायला हवी.
विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, नवोन्मेश असो, क्रीडा असो, त्याचप्रमाणे जगभरात भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या प्रसार माध्यमांनी देखील जागतिक दर्जा प्राप्त केला पाहिजे,जागितक ओळख निर्माण केली पाहिजे ही काळाची मागणी आहे. आज भारताच्या प्रसारमाध्यमांच्या जगाने हे आव्हान स्वीकारले पाहिजे.
मित्रांनो,
सर्जिंग इंडिया (शक्तिशाली होणारा भारत), हे दोन शब्द 130 कोटी भारतीयांची भावना व्यक्त करतात. ही ती भावना आहे, ती स्पंदन आहेत, ज्याचा अनुभव आज संपूर्ण जग घेत आहे. सामाजिक जीवनातील प्रत्येक पैलू मध्ये तो जागतिक व्यासपीठावरील आपल्या योग्य जागेच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे. भारताची अर्थव्यवस्था असो, भारताची प्रतिभा असो, भारताची सामाजिक व्यवस्था असो, भारताचे सांस्कृतिक मूल्य असो नाहीतर भारताची रणनीतिक शक्ती असो, प्रत्येक स्तरावर भारताची ओळख अजून मजबूत होत आहे.
मित्रांनो,
आज मी प्रसारमाध्यमाच्या व्यासपीठावर आहे, तुम्हाला प्रश्न खूप आवडतात, म्हणूनच मी देखील काही प्रश्नांसोबतच माझ्या संवादाची सुरवात करतो. असं म्हणतात जशी संगत तसा रंग,काहीवेळापासून मी तुमच्या सोबत आहे तर मला पण सवय झाली. जसे तुमच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात, तसेच माझ्या प्रश्नांमध्ये देखील तुम्हाला सर्जिंग इंडियाच्या संदर्भात अनेक उत्तर सापडतील.
मित्रांनो,
चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, भारत एवढ्या लवकर पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करेल? चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, सुलभ व्यवसायाच्या मानांकनात भारत 142व्या स्थानावरून ७७ व्या स्थानावर पोहोचेल, भारत पहिल्या 50 मध्ये येण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, भारतात वातानुकुलीत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल? चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, रिक्षाचालकही, भाजीविक्रेता देखील आणि चहावाला देखील भीम ऍपचा उपयोग करतील, आपल्या खिशात रूपे डेबिट कार्ड ठेवून स्वतःचा आत्मविश्वास वाढवतील?
चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्रात एवढा विकास होईल की कंपन्यांना एक हजार नवीन विमान मागवावी लागतील? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या देशात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण 450 विमानं कार्यरत आहेत, मग ती खाजगी असो, सार्वजनिक असो, सरकारी असो, कोणतीही असोत. एका वर्षात एक हजार नवीन विमानांची ऑर्डर हे सांगते.
चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता की, भारतात, जलमार्ग सत्यात उतरतील, कोलकत्त्यापासून गंगा नदीमधून एका जहाजाचा प्रवास सुरु होऊन ते बनारस पर्यंत सामान घेऊन जाईल? चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, आपण भारतातच निर्मित, इंजिन नसलेल्या एका अशा ट्रेनचे परीक्षण करू ज्याचा वेग तशी 180 किलोमीटर इतका असेल?चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, भारत एकाचवेळी 100 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम करेल, आणि इतकेच नाही तर आपल्या गगनयानाच्या लक्ष्याच्या दिशेने देखील तो पुढे जात आहे. चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, स्टार्ट अप च्या जगापासून ते क्रीडेच्या जगापर्यंत भारताची प्रतिष्ठा इतकी वेगाने वाढेल?
मित्रांनो,
चार वर्षांपूर्वी कोणी हा विचार केला होता का की, हेलीकॉप्टर घोटाळ्याचा इतका मोठा साक्षीदार, क्रिश्चियन मिशेल भारतात असेल. चार वर्षांपूर्वी कोणी हा देखील विचार केला नसेल की, 1984च्या शिख नरसंहारातील दोषी काँग्रेस नेत्यांना शिक्षा होईल, लोकांना न्याय मिळेल. हे परिवर्तन कशामुळे आले? देश तोच आहे, तिचं लोकं आहेत, नोकरशाही तीच आहे, आपले साधन तेच आहेत, मग ह्या बदलाचे कारण काय आहे?
मित्रांनो,
आपल्याकडे ही मानसिकता आहे की, सरकारच्या विरुद्ध दोषारोपण करत कोणी न्यायालयात जातं तेव्हा असे मानले जाते की, सरकार चुकीचे आहे आणि आरोप लावणारी व्यक्ती बरोबर असेल. सर्वसाधारणपणे आपला हा समज आहे, घोटाळा असो, भ्रष्टाचाराचे आरोप सो, हीच एक मानसिकता आपल्या मनात घर करून बसली आहे, कारण आतापर्यंत आपण तेच पाहत आलो आहोत. परंतु हे देखील पहिल्यांदाच घडले आहे की, जेव्हा काही लोकं सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने त्यांना उत्तर दिले की, जे काम झाले आहे त्यात पूर्ण पारदर्शकता आहे आणि ते काम इमानदारीने झाले आहे. आपल्या देशात असे काही घडेल, याचा चार वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नव्हता.
बंधू आणि भगिनींनो, मी बऱ्याचदा पहिले आहे की, तुम्ही लोकं प्रक्षेपणा दरम्यान आधीची आणि आताची टू विंडो म्हजेच दोन परिस्थितीतला फरक खूप मनोरंजक पणे दाखवता. माझ्याकडे देखील पाहिले आणि आताचे खूप मनोरंजक चित्र आहेत जी सर्जिंग इंडियाला अधिक प्रभावी करतात.
मित्रांनो,
आज देशाच्या समोर 2014च्या पूर्वीचे चित्र आहे जेव्हा स्वच्छतेची व्याप्ती 40 टक्क्यांहून देखील कमी होती. आता 2018 च्या शेवटी तीच व्याप्ती वाढून 97 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आज देशाच्या समोर 2014 च्या पूर्वीचे चित्र आहे, जेव्हा देशातील 50 टक्के लोकांकडे बँक खाते नव्हते. आज 2018 च्या शेवटी देशातील प्रत्येक कुटुंब बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहे. आज देशाच्या समोर 2014 च्या पूर्वीचे अजून एक चित्र आहे जिथे करदात्यांची संख्या 3 कोटी 80 लाख होती. यावर्षी या संख्येत वाढ होऊन ती अंदाजे 7 कोटी इतकी झाली आहे.
आज देशासमोर 2014 च्या पूर्वीचे एक चित्र आहे जिथे केवळ 65 लाख नोंदणीकृत उद्योजक कर भरत होते. आज स्थिती अशी देखील आहे की, केवळ दीड वर्षात 55 लाख नवीन उद्योजक नोंदणीसाठी पुढे आले आहेत. आज देशासमोर 2014 वर्षापूर्वीचे एक चित्र आहे जिथे मोबाईल निर्मितीच्या केवळ 2 कंपन्या होत्या. आज त्याच मोबाईलचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याची संख्या वाढून 120 झाली आहे.
मित्रांनो,
आधीचे आणि आताचे हे बदल, सर्जिंग इंडियाचे एक प्रभावी चित्र समोर प्रदर्शित करत आहे. हे सर्व शक्य होत आहे कारण आज देशात आमचे सरकार धोरण आधारित शासन आणि अपेक्षित पारदर्शी धोरणांच्या आधारे पुढे मार्गक्रमण करत आहे. याचाच परिणाम म्हणजे, भारतात दुप्पट वेगाने महामार्गांचे बांधकाम होत आहे, दुप्पट वेगाने रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण होत आहे, विद्युतीकरण होत आहे, 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि हेलीपोर्टचे काम सुरु आहे, 30-30, 40-40 वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण केली जात आहेत.
आज तुम्ही भारतात कुठेही गेलात तर तुम्हाला एक फलक नक्की दिसेल-‘Work in Progress’.
मित्रांनो,
हा फलक खऱ्या अर्थाने हे दर्शवतो की, भारत विकास करत आहे. केवळ रस्ते, उड्डाणपूल, मेट्रोच नाही, तर इथे नव भारताच्या निर्मितीचे काम सुरु आहे. मी आज त्या शहरात आहे ज्याच्याबद्दल बोलले जाते की, हे शहर कधीच झोपत नाही. मी तुम्हाला इथे उभे राहून हे सांगू इच्छितो की, आज, ‘भारत हा असा देश आहे जो यापुढे कधीच थांबणार नाही’. थांबणार नाही, गती मंदावणार नाही, विश्रांती घेणार नाही: हे भारताने ठरवले आहे!
मित्रांनो,
इथे मुंबईमध्ये देखील 22 किलोमीटर लांबीच्या मुंबई ट्रांस हार्बर लिंकची निर्मिती, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम, डबल लाईन सब-अर्बन कॉरीडोरचे काम, शेकडो किलोमीटर लांबीच्या मेट्रो कॉरीडोरचे काम, सर्व 2014 मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतरच सुरु झाले. मला सांगितले आहे की, अंधेरी-विरार या व्यस्त टप्प्यासाठी नवीन ट्रेन देखील दिली जात आहे, ज्यामुळे त्या रेल्वे मार्गाची क्षमता 33 टक्क्यांपर्यंत वाढेल.
मित्रांनो,
देशाच्या या गरजा आधीदेखील होत्या, मुंबईच्या या गरजा, आवश्यकता, आधीदेखील होत्या, कित्येक दशकांपासून होत्या. परंतु काम आता होत आहे. विचार करा का? याचे उत्तर देखील मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि मी हा प्रयत्न करेन की तुम्हा टिव्ही वाल्यांप्रमाणेच याचे उत्तर देईन.
मला जेव्हा केंव्हा वेळ मिळतो, मी अर्नब ला बघतो, बघण्यापेक्षा जास्त ऐकतो की, कशाप्रकारे तो अनेक पाहुण्यांना एकाच वेळी प्रश्न विचारतो. टू विंडो आणि मल्टीपल विण्डोचा खेळ सुरु असतो.
मित्रांनो,
अशीच मल्टीपल विंडो प्रत्येक महिन्याला दिल्ली मध्ये पंतप्रधान कार्यालयात देखील बनवली जाते. ही बैठक असते प्रगतीची आणि ह्यात हिशोब मांडला जातो, दशकांपासून रखडलेल्या प्रकल्पांचा. गेल्या चार वर्षात मी असे प्रकल्प शोधले आहेत जे न जाणो कधीपासून सरकारी दस्तावेजांमध्ये बंद होते. मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की, आतापर्यंत, या बैठकीत 12 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जुन्या प्रकल्पांचे पुनरावलोकन करण्यात आले आहे. एक-एक प्रकल्पाचे काय महत्व असते, किती मेहनत असते, हे सर्व मी तुम्हाला मुंबईचेच उदाहरण देऊन सांगतो.
मित्रांनो,
मला आठवते अंदाजे तीन वर्षांपूर्वी ‘प्रगती’ च्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय आला होता, मला तर आश्चर्य वाटले. मुंबईमध्ये दुसऱ्या विमानतळाच्या निर्मितीसाठी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा समितीची स्थापना झाली होती. तेव्हापासून जवळजवळ 20 वर्षांपर्यंत फक्त कागदपत्रच इथून तिथे धावत होती, मी तर म्हणेन उडत होती. या दरम्यान किती सरकारे आली, किती गेली, कागदपत्र उडत राहिली, विमानं कधी उडालीच नाहीत. परंतु नवी मुंबई विमानतळाची फाईल पुढे सरकलीच नाही.
प्रगतीच्या बैठकीत मल्टीपल विंडो तयार करुन, सर्व अधिकारी, सर्व विभागांना एकत्र आणून, एकमेकांसमोर आणून, आमच्या सरकारने या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्या आणि आता नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे.
विचार करा ही केवळ एका प्रकल्पाची गोष्ट आहे. आणि मी पुन्हा सांगतो की, अशाच प्रकारच्या 12 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम आम्ही जलद गतीने सुरु केले आहे. सर्जिंग इंडियासाठी कार्य-संस्कृती मध्ये जे परिवर्तन आले आहे, हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी एका व्यासपीठावरून मी 2 मित्रांची गोष्ट सांगितली होती. एकदा हे दोन मित्र जंगलात फिरायला जातात. खूप दाट जंगल होते आणि त्यात हिंस्र जनावरे देखील होती म्हणून त्यांनी आपल्या सोबत सुरक्षेची साधने देखील घेतली होती, उत्तम दर्जाची बंदूक सोबत होती; त्यांना काही दिसत नव्हते म्हणून गाडी थांबवून, त्यातून उतरून थोडे चालावे असा विचार करून ते दोघे फिरायला निघतात तेव्हाच अचानक त्यांच्या समोर एक वाघ येतो. आता ह्या परिस्थितीचा सामना कसा करायचा? धावणार तरी कुठे? त्यातील एकाने स्वतःजवळील बंदुकीचा परवाना वाघाला दाखवला.
मित्रांनो,
आपल्या देशात हेच होते. मित्रांनो, आपल्या पहिल्या सरकारचा हाच दृष्टीकोन होता. काहीही झाले तर काम देवून टाका कारवाईचा पत्ता नाही. जेव्हा मी ही गोष्ट सांगितली होती, तेव्हा तर मी पंतप्रधान देखील नव्हतो. तेव्हा मी सांगितले होते, आपल्याला कामापेक्षा कारवाईची आवश्यकता आहे. सरकार मध्ये आल्यानंतर हे आम्ही कशाप्रकारे साध्य केले हे मी तुम्हाला सांगतो.
मित्रांनो,
मागील सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला, खूप गाणी गायली गेली, त्यांचे जे गाणी गाणारे लोकं होते खूप मोठ्यामोठ्याने गाणी गायचे. खूप गाजावाजा केला, टाळ्या मिळवल्या, परंतु जेव्हा 2014 मध्ये आमचे सरकार सत्तेत आले तोपर्यंत केवळ 11 राज्यांनीच याचा लाभ घेतला होता. विचार करा इतक्या टाळ्या कामवल्या नंतरही भारतातील खूप मोठी लोकसंख्या याचा लाभ घेऊ शकत नव्हती.
आम्ही सत्तेत आल्यानंतर हे सुनिश्चित केले की, सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना याचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे 2013-14 मध्ये मोठी चर्चा सुरु होती की, 10 गॅस सिलेंडर द्यायचे की 12 सिलेंडर द्यायचे आणि याच विषयावर निवडणूक लढवली जात होती. परंतु 2014 पर्यंत भारतातील केवळ 55 टक्के घरांमध्येच गॅस जोडणी होती.
तुम्ही विचार करा 10 सिलेंडर- 12 सिलेंडरच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि देशातील अर्ध्या लोकसंख्येकडे तर गॅसची जोडणीच नव्हती.
मित्रांनो,
आमचे सरकार, समस्यांच्या कायमस्वरूपी उपाय योजनांवर काम करत आहे, देशासमोर जी आव्हाने आहेत त्यांच्या कायमस्वरूपी उपाययोजनांच्या दिशेने पुढे जात आहे. आम्ही अशा व्यवस्था मोडीत काढत आहोत, ज्यांनी दशकांपासून देशाच्या विकासाला खीळ बसवली आहे. मी तुम्हाला नादारी आणि दिवाळखोरी कायदा म्हणजे आयबीसी चे उदाहरण देतो.
मित्रांनो,
आपल्या देशात कर्जाबाबतीत एक अजब परंपरा होती, कोणी गरीब किंवा अल्प मध्यम वर्गातील व्यक्तीने बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते फेडू शकले नाही तर त्याचे जगणे मुश्कील केले जायचे. परंतु याव्यतिरिक्त तुम्हाला अजून एक परिस्थिती नक्कीच माहित होती. देशात हजारो अशा मोठ्या-मोठ्या कंपन्या होत्या, ज्या बँकांकडून 5-10 लाख नाही, 5-10 कोटी नाही, तर पाचशे हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यायचे.
परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे जेव्हा ह्या कंपन्या आजारी पडायच्या, तोट्यात जायच्या, बँकांचे पैसे फेडू शकत नव्हत्या, तेव्हा या कंपन्यांना आणि या कंपन्यांच्या मालकांना काहीच शिक्षा होत नव्हती.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपासून देशात हीच व्यवस्था सुरु होती. माहिती आहे, हे असे का सुरु होते? ह्या कंपन्यांना एक विशेष सुरक्षा कवच मिळाल्यामुळे हे सर्व सुरु होते. हे असे सुरक्षा कवच होते ज्यात काही विशेष व्यक्ती, काही विशेष कुटुंबांचे आदेश पाळले जायचे. हे असे सुरक्षा कवच होते जे बँकांना कारवाई करण्यापासून थांबवायचे. ते कंपन्यांना पैसे परत करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे.
बंधू आणि भगिनींनो, मला माहित आहे की किती अडथळे आले, किती प्रकारच्या दबावाचा सामना करायला लागला, परंतु 2016 मध्ये नादारी आणि दिवाळखोरी कायदा बनवून मी हे सर्व चक्र तोडले. आज मी अभिमानाने सांगू शकतो की, बँकांकडून कर्ज घेऊन न फेडणारे, आजारी कंपन्यांचे कारण पुढे करून देशाचे हजारो रुपये बुडवणाऱ्या कंपन्या स्वतःहून पैसे परत करत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,
अशा कंपन्यांनी केवळ दोन वर्षात आतापर्यंत सव्वा लाख कोटी रुपये स्वतःहून बँकांना परत केले आहेत. यातील बरीच मोठी रक्कम छोटे पुरवठादार, छोटे उद्योजक, एमएसएमई क्षेत्राची होती. ज्या कंपन्यांवर या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली, अशा कंपन्यांकडून आतापर्यंत दोन लाख कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड झाली आहे. म्हणजे एक प्रकारे बघायला गेले तर 2016 मध्ये जो नवीन कायदा तयार करण्यात आला, त्यानंतर अंदाजे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज या करोडपतींना, यांच्या कंपन्यांना आपल्या बँकांना आणि देणेकरांना परत देण्यास भाग पाडले.
मित्रांनो,
याचप्रकारे, बँकांचे कर्ज बुडवून जे पळून जातात त्यांच्यासाठी देखील कठोर कायदा आपले काम करत आहे. आता देशातच नाही तर परदेशातही अशा गुन्हेगारांची संपत्ती जप्त होत आहे. अशा सर्व गुन्हेगारांना जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात लपायला जागा मिळणार नाही यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे.
मित्रांनो,
भ्रष्टाचाराला भारतात सामान्य गोष्ट समजली जायची. भारतात हे तर चालतेच, एवढे तर चालतेच. जर कोणी याविरुद्ध आवाज उठवला, कायद्याची आठवण करून दिली, तर समोरून लगेच उत्तर मिळायचे इथे तर हे असेच चालते. हे असेच का सुरु राहिले पाहिजे? केव्हा पर्यंत सुरु राहील? परिस्थिती तशीच का राहावी? परिस्थिती का बदलू नये?
मित्रांनो,
मागील चार साडे चार वर्षात, मी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे, देशाला मागे घेऊन जाणाऱ्या साखळदंडांना तोडण्याचे काम करत आहे. काही लोकं देशाला भ्रमित करण्याचे काम करत आहेत. पण मला सत्याच्या शक्तीवर विश्वास आहे, आणि सत्यनिष्ठ देशवासियांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
बंधू आणि भगिनींनो, आज भारताचे परराष्ट्र धोरण, देशांतर्गत प्रकरण कोणत्याही दबावाखाली राबवत नाही तर आमची सर्व धोरणे, सर्व योजना सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या उक्तीनुसार निश्चित केली जातात. आम्हाला कुठे जायचे आहे, कोणत्या देशासोबत संबंध ठेवायचे आहेत, ते दोन्ही देशांच्या परस्पर हितानुसार ठरवले जाते.
हेच कारण आहे की, भारताच्या पारपत्राची ताकद आज वाढली आहे. आज संपूर्ण जगात भारताचा आवाज गंभीरतेने ऐकला जातो. जगातील शक्तिशाली संस्थामध्ये भारताला प्रतिनिधित्व मिळत आहे. भारताच्या चिंतांवर संवेदनशिलतेने विचार केला जात आहे आणि भारतासाठी विशेष तरतुदी केल्या जात आहेत. ओपीईसी सारख्या संस्थाचे प्रतिनिधित्व नसतानाही भारताचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे.
मित्रांनो,
हा जगभरात भारताप्रती वाढलेला विश्वास आणि आपल्या मजबूत संबंधांचाच परिणाम आहे की, भारताला फसवणारे, आपल्या व्यवस्थेशी खेळणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत उभे केले जात आहे. त्यांना भारताकडे देण्यात येत आहे.
मित्रांनो,
जेव्हा सार्वजनिक आयुष्यात पारदर्शकता असेल आणि लोकांसाठी काम करण्याची खात्री असेल तर मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत आपोआप येते. आपल्या देशात दशकांपासून जीएसटीची मागणी केली जात होती. आज आम्ही आनंदाने सांगू शकतो की, जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारातील विसंगती दूर होत आहे आणि व्यवस्थेची कार्यक्षमता वाढत आहे. अर्थव्यवस्थेत आम्ही पारदर्शकतेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत.
समाजातील मेहनती आणि उद्योजक लोक, जे बाजाराशी निगडित आहेत, त्यांना स्वच्छ, सरळ आणि निरीक्षक-मुक्त प्रणाली मिळत आहे. संपूर्ण भारताने, एक मनाने, इतक्या मोठ्या कर सुधारणेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपले योगदान दिले आहे. आमचे व्यापारी आणि लोकांच्या याच भावनेमुळे भारतात इतका मोठा बदल शक्य झाला. विकसित देशांमध्ये देखील लहान-लहान कर सुधारणा लागू करणे सोपे नाही.
जसे मी आधी सांगितले- जीएसटी लागू करण्यापूर्वी नोंदणीकृत उद्योगांची संख्या केवळ 66 लाख होती. जी आता वाढून 1 कोटी 20 लाख झाली आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट आणि एक्साइजची जी व्यवस्था होती, त्यानुसार जीएसटी मध्ये सुधारणा होत होती. जसा जसा विचार विनिमय झाला, भागधारकांशी, राज्य सरकारांशी, अर्थशास्त्रज्ञांशी, कर प्रॅक्टिशनर्सशी चर्चा झाली तसे हळू हळू त्यात बदल करण्यात आले.
मित्रांनो,
आज जीएसटी प्रणाली बऱ्याच प्रमाणात स्थापित झाली आहे. आणि आम्ही अजूनही आवश्यकतेनुसार नागरिकांच्या अनुकूलते नुसार त्यात बदल करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आज खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की, आज आपण त्या स्थितीच्या दिशेने जात आहोत, जिथे 99 टक्के गोष्टींवर, 18 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कर आकारात येऊ शकतो. आणि आम्ही त्या दिशेने पुढे जात आहोत. त्यानंतर कदाचित एखाद टक्का चैनीच्या गोष्टीच केवळ 18 टक्क्यांच्या बाहेर राहतील, ज्यामध्ये कोणी विमान खरेदी करून आणतो, कोणी खूप मोठी महाग गाडी विकत घेतो, दारू आहे, सिगारेट आहे अशा काही गोष्टी आहेत. आमचे असे मत आहे की, जीएसटीला जितके सुलभ आणि सोयीस्कर बनवता येईल, तितके केले पाहिजे. आणि हे स्पष्ट आहे, आणि आता जे जीएसटी परिषदेची जी बैठक होणार आहे त्यासाठीही मी स्वत: काही सूचना दिल्या आहेत, कारण ते सर्व राज्य एकत्र येऊन ठरवतात, 99 टक्के गोष्टी 18 टक्क्यांहून खाली येतील, अर्धा किंवा एक टक्का, विमान, महाग गाडी, दारू, सिगारेट अशा वस्तू सोडल्या तर सामान्य नागरिकांशी निगडीत सर्व वस्तू 18 टक्क्यांहून खाली येतील. आणि हे काम आम्ही सतत करत असल्याने, लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आम्ही पोहोचत आहोत.
मित्रांनो,
माझे आणि माझे सरकारचे विचार आणि दृष्टीकोन स्पष्ट आहे. जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असलेला देश लहान स्वप्ने पाहू शकत नाही. स्वप्ने, आकांक्षा आणि लक्ष्य तर उंचच असली पाहिजेत. आम्ही मोठ्या लक्ष्यासाठी इमानदारीने प्रयत्न केला तर ते प्राप्त देखील करू शकतो. परंतु लक्ष्य देखील छोटे ठेवले तर यश देखील छोटेच दिसेल.
मित्रांनो,
सरकारची संपूर्ण प्रणाली, संपूर्ण यंत्रणा 70 वर्षांचा सततच्या विकासाने तयार झाली आहे. चार साडे चार वर्षांपूर्वीही हीच प्रणाली होती, हीच यंत्रणा होती. पण आज काम करण्याचा वेग आणि टप्पा दोन्ही कित्येक पटीने वाढला आहे. आज अनेक असे लक्ष्य आहेत ज्यांच्या दिशेने आम्ही वेगाने पुढे जात आहोत. सगळ्यांकडे स्वतःचे घर असावे, प्रत्येक घरात 24 तास वीज असावी, स्वच्छ पाणी आणि सर्वांना स्वच्छ इंधन उपलब्ध होईल या लक्ष्याच्या जवळ आज भारत पोहोचत आहे. मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन आणि नागरिकांना न्याय, या लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी आमचा एक-एक क्षण समर्पित आहे.
मित्रांनो,
एक नवीन विश्वास घेऊन, नव भारत, जगाच्या मंचावर आपली भूमिका निश्चित करत आहे. नवीन जागतिक परीदृशात स्वतःच्या भूमिकेचे पुनरावलोकन करत आहेत. आगामी दोन दिवसात या भूमिकेवर देश परदेशातील इथे आलेले पाहुणे गंभीर चर्चा करतील, यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन ऊर्जेवर स्वार नव भारताविषयी बोलण्याची संधी तुम्ही दिलीत यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला विश्वास आहे की, जे स्वप्न बघत पत्रकारितेशी निगडीत काही युवकांनी जो हा रिपब्लिकन टीव्हीचा प्रयोग केला आहे आणि आता तर ही वाहिनी हिंदी मध्ये देखील सुरु होत आहे. देशातील इतर भाषांमध्ये देखील ही वाहिनी सुरु करण्याचा विचार तुम्ही कराल आणि त्यासोबतच जागतिक स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न देखील तुम्ही बघाल या शुभेच्छांसह तुमचे खूप खूप आभार.


