पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाचा (BRCP) तिसरा टप्पा सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि युनायटेड किंगडमच्या वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीत आणि विशेष उद्देश संस्था असलेल्या इंडिया अलायन्स मार्फत राबवण्यात येत आहे. 2025-26 ते 2030-31 या तिसऱ्या टप्प्यासाठी तसेच 2030-31 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्त्या आणि अनुदानांसाठी पुढील सहा वर्षे (2031-32 ते 2037-38) तो सुरू राहील. यासाठी एकूण 1500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, त्यात जैवतंत्रज्ञान विभाग 1000 कोटी रुपये आणि यूकेमधील वेलकम ट्रस्ट 500 कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे.
कौशल्य आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या विकसित भारताच्या ध्येयांशी सुसंगत राहून, जैवतंत्रज्ञान विभागाने जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम अद्ययावत जैववैद्यकीय संशोधनासाठी उच्च-स्तरीय वैज्ञानिक प्रतिभेची जोपासना करेल आणि उपयुक्त नवनिर्मितीसाठी आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देईल. जागतिक स्तरावर परिणाम करणारी जागतिक दर्जाची जैववैद्यकीय संशोधन क्षमता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम उच्च-गुणवत्तेच्या संशोधनाला आधार देणाऱ्या प्रणाली अधिक बळकट करेल आणि वैज्ञानिक क्षेत्रातली प्रादेशिक विषमता कमी करेल.
जैवतंत्रज्ञान विभागाने यूकेमधल्या वेलकम ट्रस्टच्या भागीदारीसह मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, डीबीटी/वेलकम ट्रस्ट इंडिया अलायन्स (इंडिया अलायन्स) या समर्पित विशेष उद्देश संस्थेद्वारे 2008-2009 मध्ये "जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रम" सुरू केला. यात जागतिक दर्जाच्या जैववैद्यकीय संशोधनासाठी भारतात संशोधन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्यानंतर, 2018/19 मध्ये विस्तारित कार्यक्षेत्रासह त्याचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात खालील कार्यक्रम प्रस्तावित आहेत: i) मूलभूत, चिकित्साविषयक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रारंभिक कारकीर्द आणि इंटरमिजिएट संशोधन शिष्यवृत्ती. यांना जागतिक स्तरावर मान्यता आहे आणि त्या वैज्ञानिक कारकिर्दीच्या प्रारंभिक टप्प्यांसाठी तयार केल्या आहेत. ii) सहयोगी अनुदान कार्यक्रम. यात कारकीर्द विकास अर्थसहाय्य आणि उत्प्रेरक सहकार्य अर्थसहाय्याचा समावेश आहे. अनुक्रमे प्रारंभिक आणि कारकीर्दीच्या मध्यम-उच्च टप्प्यावर असलेल्या संशोधकांसाठी भारतात संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या 2-3 अन्वेषक चमूंसाठी हे अनुदान असेल. iii) संशोधन व्यवस्थापन कार्यक्रम मुख्य संशोधन प्रयत्नांना बळकट करण्यासाठी आहे. तिसरा टप्पा मार्गदर्शन, संपर्कनिर्माण, सार्वजनिक सहभाग आणि नवीन व नाविन्यपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित करेल.
एकत्रितपणे, अखिल भारतीय अंमलबजावणीसह संशोधन शिष्यवृत्ती, सहयोगी अनुदान आणि संशोधन व्यवस्थापन कार्यक्रम वैज्ञानिक उत्कृष्टतेला, कौशल्य विकासाला, सहकार्याला आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देतील. अपेक्षित परिणामांमध्ये 2,000 हून अधिक विद्यार्थी आणि पोस्ट-डॉक्टोरल शिष्यवृत्तीधारकांना प्रशिक्षण देणे, उच्च-प्रभावशाली प्रकाशने (high-impact publications) काढणे, पेटंटसाठी योग्य असलेल्या शोधाला चालना देणे, सहकाऱ्यांची मान्यता मिळवणे, महिलांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात 10-15% वाढ करणे, सहयोगी कार्यक्रमांपैकी 25-30% कार्यक्रमांना टीआरएल-4 आणि त्याहून वरच्या स्तरावर पोहोचवणे आणि टियर-2/3 भागात उपक्रम आणि सहभागाचा विस्तार करणे यांचा समावेश आहे.
पहिले आणि दुसरे टप्पे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर जैववैद्यकीय विज्ञानाचे एक उगवते केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. विज्ञान क्षेत्रात भारताची वाढती गुंतवणूक आणि जागतिक ज्ञान अर्थव्यवस्थेतला वाढता सहभाग पाहता, आता धोरणात्मक प्रयत्नांच्या नवीन टप्प्याची गरज आहे. पूर्वीच्या टप्प्यांमध्ये मिळालेल्या यशावर आधारित असलेला तिसरा टप्पा राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक मानकांशी जुळवून घेत प्रतिभा, क्षमता आणि संशोधनाच्या उपयोगामध्ये गुंतवणूक करेल.


