विश्वचषक जिंकण्यासाठी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी संपूर्ण संघाचे केले अभिनंदन
आपल्या यशोगाथांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरित करण्याचे पंतप्रधानांनी केले खेळाडूंना आवाहन, एका वर्षात तीन शाळांची निवड करण्याची खेळाडूंना केली सूचना
लठ्ठपणावर मात करण्यासाठी फिट इंडिया चळवळीवर पंतप्रधानांनी दिला भर, या चळवळीचा सर्वांना, विशेषतः देशातील सुकन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तिचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे खेळाडूंना केले आवाहन

पंतप्रधान: आजचा दिवस खूप मोठा आहे, देव दिवाळी देखील आहे आणि गुरु पूरब देखील आहे, त्यामुळे खूपच महत्त्वाचा दिवस आहे.

खेळाडू: गुरुपुरबच्या शुभेच्छा, सर.

पंतप्रधान: तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!

प्रशिक्षक: माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.

हरमनप्रीत कौर: सर, मला अजूनही आठवते आहे, 2017 मध्ये आम्ही आपल्याला भेटलो होतो, त्या वेळी आम्ही चषक घेऊन आलो नव्हतो. पण आज आमच्यासाठी हा मोठा सन्मान आहे की या वेळी आम्ही तो चषक, ज्यासाठी आम्ही अनेक वर्षे मेहनत केली, ती घेऊन आलो आहोत. आणि आज आपण आमचा आनंद दुप्पट केला आहे. आमच्यासाठी हा सन्मान आहे आणि आमचे लक्ष्य असे आहे की भविष्यातही आम्ही असेच जिंकत राहू आणि पुन्हा पुन्हा आपल्यासोबत छायाचित्र काढू.

पंतप्रधान: खरेच तुम्ही खूप मोठे काम केले आहे. भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. क्रिकेटमध्ये भारत चांगले खेळला की संपूर्ण देश आनंदी होतो, आणि थोडेसे काही चुकले की सगळा देश हलतो. जेव्हा तुम्ही तीन सामने सलग हरलात, तेव्हा `ट्रोलिंग`ची सेना तुमच्या मागे लागली होती.

हरमनप्रीत कौर: 2017 मध्ये आम्ही अंतिम सामना हरून आलो होतो, तेव्हा सरांनी आम्हाला खूप प्रेरणा दिली होती की पुढच्या वेळी संधी मिळाली तर कसे खेळायचे आणि स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करायची. आणि आज जेव्हा आम्ही चषक  जिंकून आलो आहोत, तेव्हा त्यांच्याशी बोलताना खूप छान वाटले.

पंतप्रधान: हो, स्मृतीजी, तुम्ही सांगा.

स्मृती मंधाना: आम्ही 2017 मध्ये आलो होतो, पण चषक घेऊन येऊ शकलो नव्हतो. पण मला आठवते आहे, आपण तेव्हा आम्हाला अपेक्षांबद्दल प्रश्न विचारला होता आणि आपले उत्तर अजूनही आठवते, आणि ते आम्हाला खूप उपयोगी पडले. पुढच्या 6-7 वर्षांमध्ये आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही वेळा विश्व चषकामध्ये निराशाजनक कामगिरी झाली. पण हा विश्वचषक शेवटी भारतातच आला, ही आमच्यासाठी नियती होती असे वाटते. आपण नेहमी आमच्यासाठी प्रेरणास्थान राहिला आहात. विशेषतः आज प्रत्येक क्षेत्रात मुली दिसतात, मग ते इस्रोचे प्रक्षेपण असो किंवा इतर काही, आणि हे सगळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते.

पंतप्रधान: हे तर सगळा देश पाहतो आहे आणि देशातील प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून आला आहे. मी तर तुमचे अनुभव ऐकू इच्छितो.

स्मृती मंधाना: सर, या मोहिमेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडू आपल्या घरी गेल्यावर सांगेल की कुणाचेही योगदान कमी नव्हते.

 

स्मृती मंधाना: गेल्या वेळी तुम्ही अपेक्षा कशा हाताळायच्या याबद्दल सांगितले होते. तो सल्ला नेहमी लक्षात राहिला. आणि ज्या शांतपणे आणि स्थिरपणे तुम्ही राहता, तेही आमच्यासाठी प्रेरणादायक आहे.

जेमिमा रॉड्रिग्स: मला वाटते, जेव्हा आम्ही ते तीन सामने हरलो, अशा वेळी खरा संघ तो असतो जो किती वेळा जिंकला हे नाही, तर हरल्यानंतर स्वतःला पुन्हा उभे करू शकतो का हे दाखवतो, ते महत्त्वाचे असते आणि आमच्या संघाने तेच केले. त्यामुळेच हा संच अजिंक्य संघ ठरला. दुसरी गोष्ट म्हणजे या संघामध्ये जी एकता होती, ती मी कधीच पाहिली नव्हती. जेव्हा कुणी चांगले खेळत होते, तेव्हा सगळे आनंदी व्हायचे, टाळ्या वाजवायचे, जणू त्यांनीच धावा केल्या किंवा गडी बाद केला आहे, आणि जेव्हा कुणी निराश असायचे, तेव्हा कुणीतरी जाऊन खांद्यावर हात ठेवून म्हणायचे, काही हरकत नाही, पुढच्या वेळी तू करशील. आणि मला वाटते, हेच या संघाचे वैशिष्ट्य आहे.

स्नेह राणा: मी जेमीशी पूर्ण सहमत आहे. आम्ही ठरवले होते की सगळे यशाच्या वेळी तर सोबत असतात, पण जेव्हा कुणी अडचणीत असते, तेव्हा साथ देणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ठरवले होते की काहीही झाले तरी एकमेकांना सोडायचे नाही आणि नेहमी एकमेकांना पुढे ठेवायचे. हेच आमच्या संघाचे बळ होते.

क्रांती गौड: हरमन दी नेहमी सांगते की सगळे हसत राहा. त्यामुळे जर कुणी थोडे निराश  बसले असेल, तर सगळे हसवायचा प्रयत्न करत. सगळ्यांना हसताना पाहून आमचेही मन हलके व्हायचे.

पंतप्रधान: पण हसवणारा कुणीतरी तरी असेल ना तुमच्या संघामध्ये?

खेळाडू: जेमी दी आहे ना.

जेमिमा रॉड्रिग्स: सर, खरे तर हरलीनही आहे, कारण ती संघाला एकत्र ठेवण्याला खूप महत्त्व देते.

 

हरलीन कौर देओल: सर, खरे सांगायचे  तर  संघामध्ये एक-दोन लोक असावेतच जे वातावरण हलके ठेवतात. मला जेव्हा वाटते की कुणी शांत आहे किंवा थोडे उदास आहे, तेव्हा मी काहीतरी करते, बोलते, मस्करी करते, ज्यामुळे सगळे हसतात. मला असे वाटते सर, जेव्हा माझ्या आसपास सगळे आनंदी असतात, तेव्हा मलाही खूप छान वाटते.

पंतप्रधान: इथे आल्यावरही काही केले असेल ना?

हरलीन कौर देओल: सर, आम्हाला इथे तंबी मिळाली. म्हणाले शांत बसा थोडे. आवाज जरा जास्त झाला होता म्हणून तंबी मिळाली.

हरलीन कौर देओल: सर, मला आपली त्वचेची निगा राखायचा दिनक्रम विचारायचा होता. आपल्या चेहऱ्यावर खूप तेज असते सर.

पंतप्रधान: मी या विषयाकडे फार लक्ष दिले नाही.

खेळाडू: सर, हे सगळे देशवासियांच्या प्रेमाचे तेज आहे तुमच्यावर.

पंतप्रधान: हो, ते तर आहेच. समाजाकडून मिळणारे हे प्रेम ही फार मोठी शक्ती असते. आता शासन प्रमुख म्हणून सरकारमध्ये माझा 25 वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. एवढ्या काळानंतरही जेव्हा एवढे प्रेम आणि आशीर्वाद मिळतो, तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो.

प्रशिक्षक: सर तुम्ही पाहिले असेलच कसे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. गेल्या दोन वर्षापासून मी यांचा मुख्य प्रशिक्षक आहे. आता माझे केस देखील पांढरे झाले आहेत. सर, एक गोष्ट सांगू इच्छितो. एक किस्सा आहे, आम्ही जून महिन्यात इंग्लंडमध्ये होतो, तेथे आम्ही किंग चार्ल्स यांची भेट घेतली. तेथील शिष्टाचाराप्रमाणे केवळ 20 जणांनाच भेटीची परवानगी होती. त्यामुळे जो सहाय्यक कर्मचारी वर्ग होता, तो येऊ शकला नाही. सगळे खेळाडू आणि तीन कुशल प्रशिक्षक गेले होते. तेव्हा मी आमच्या सहाय्यक कर्मचारी वर्गाला म्हणालो की माफ करा, पण शिष्टाचारामुळे केवळ 20च जणांना जाता येणार आहे. तेव्हा त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली आणि मग म्हणाले ठीक आहे. किंग चार्ल्स बरोबर फोटो काढता नाही आला तरी चालेल आम्हाला. पण आम्हाला चार नोव्हेंबर किंवा पाच नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर एक फोटो नक्की मिळाला पाहिजे. आणि आज तो दिवस आहे. 

हरमनप्रीत कौर: कधी कधी तर असे वाटायचे की ‘साडे नाल ही क्युं हो रहा है’ (आमच्याबरोबरच असे का होत आहे) आमच्या दैवात संघर्ष लिहिला होता जेणेकरून आम्ही मानसिक दृष्ट्या कणखर बनू आणि सोबतच शारीरिक दृष्ट्या देखील बळकट बनू शकू.

पंतप्रधान: जेव्हा तुम्ही हे सांगत होता, तेव्हा हरमन तुमच्या मनात कोणत्या भावना होत्या? की अचानकच लोकांना प्रेरित करण्याचा मामला होता. 

 

हरमनप्रीत कौर: कुठे ना कुठेतरी मनात असे वाटत होते की एक दिवस असा येईल, ज्या दिवशी विश्वचषक आमच्या हातात असेल. या संघात एक खासियत होती आणि ती पहिल्या दिवसापासूनच लक्षात येत होती.

पंतप्रधान: मात्र तुमच्या मनात ही जी भावना आली की, आमच्या सोबतच असे का घडत आहे, पुन्हा पुन्हा घडत आहे, अशा परिस्थितीत देखील इतकी हिम्मत गोळा करणे आणि सर्वांमध्ये एक विश्वास जागृत करणे, याचे काहीतरी कारण असेलच ना! 

हरमनप्रीत कौर: हो, खरे आहे, या सर्वाचे श्रेय आमच्या संघातील सर्व सदस्यांना जाते कारण आम्हा सर्वांमध्येच एक आत्मविश्वास होता की प्रत्येक सामन्यानंतर आमची कामगिरी आणखी चांगली होत आहे. आत्ताच सर म्हणाले त्याप्रमाणे मागील दोन वर्षांपासून ते आमच्या सोबत काम करत आहेत आणि या दोन वर्षात आम्ही आमचे मनोबल वाढवण्यावर खूप मेहनत घेतली आहे. कारण जे घडून गेले होते तो भूतकाळ होता आणि आम्ही त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नव्हतो. 

पंतप्रधान: म्हणजे त्यांनी तुम्हालाही वर्तमानात जगण्याची कला शिकवली.

हरमनप्रीत कौर: हो, म्हणूनच माझा प्रश्न तुमच्यासाठी होता की तुम्ही असे वेगळे काय करता त्यामुळे संघातील सदस्यांपर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल म्हणजे आपण आपल्या विचारावर म्हणजे वर्तमानात जगण्याच्या या दृष्टिकोनावर अधिक विश्वास ठेवू शकू. आणि ही गोष्ट खरोखरच आमच्यासाठी उपयोगी ठरली आहे तसेच ही प्रेरणा तुमच्याकडूनही यावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे आम्हाला वाटते की आमचे सर आणि प्रशिक्षकांनी आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे त्यानुसार आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत. 

पंतप्रधान: तर मग डीएसपी! आज तुम्ही काय केले? सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले असेल. 

दीप्ती शर्मा: नाही सर, तुम्हाला भेटण्याची प्रतीक्षा केली आणि या क्षणांचा आनंद घेतला. बरेच दिवसापासून तुमची भेट घेण्याची उत्सुकता होती. पण माझ्या लक्षात आहे की, तुम्ही 2017 मध्ये मला सांगितले होते की, ‘खरा खेळाडू तोच आहे जो पडल्यानंतरही उठून चालू लागतो किंवा आपल्या अपयशातून बाहेर पडतो’. बस, मेहनत करत रहा, मेहनत करणे सोडू नका. तुमचे हे शब्द मला नेहमी प्रेरणा देत असतात. मी नेहमी आपले भाषण ऐकत असते. कोणी कितीही गोंधळ केला तरी तुम्ही ज्या शांत आणि संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळतात, ते पाहून मला माझ्या वैयक्तिक खेळात खूप मदत झाली आहे.

पंतप्रधान: तुम्ही हा जो टॅटू काढून घेतला आहे तर मग हनुमान जी तुम्हाला काय मदत करतात? 

दीप्ती शर्मा: सर, मला माझ्यापेक्षा जास्त हनुमान जी वर विश्वास आहे. जेव्हा कधी आयुष्यात अडचणी येतात तेव्हा मी हनुमानजीचे नाव घेते, आणि मग मी त्या कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडते असे मला वाटते. माझा त्यांच्यावर इतका दृढ विश्वास आहे.

 

पंतप्रधान: आणि तुम्ही तर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर देखील ‘जय श्रीराम’ लिहिले आहे? 

दीप्ती शर्मा: हो सर, माझ्या अकाउंटवर असेच लिहिलेले आहे.

पंतप्रधान: श्रद्धा भाव जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धेचा आयुष्यात एक लाभ देखील आहे, की आपण स्वतःला कोणाकडे तरी सुपूर्द करून शांत झोपू शकतो, त्यावेळी मनात भाव असतो की तो सर्व काही करेल. पण मी असे ऐकले की मैदानात तुमची खुपच दादागिरी चालते, ही बाब किती खरी आहे? 

दीप्ती शर्मा: नाही सर, असे काही नाही. एका गोष्टीची मात्र भीती सर्वांना असते ते मी सांगू शकते. ते म्हणजे मी कशी गोलंदाजी करेन याची भीती सर्वांना वाटते. माझ्या संघातल्या सहकारी मला आरामात गोलंदाजी करायला सांगत असतात. 

दीप्ती शर्मा: सर, तुम्ही लक्षात ठेवून माझ्या हातावरच्या हनुमानजीच्या टॅटूबद्दल विचारले, तो चितारण्यामागचा उद्देश आवर्जून जाणून घेतला. तुम्ही सर्वांच्या बाबतीत किती आत्मियता दाखवता. आणि या सर्वांमध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे सर, तुम्हाला माझी इन्स्टाग्रामची टॅग लाईन देखील माहिती आहे. 

पंतप्रधान: अच्छा, हरमन मला हे सांगा की जिंकल्यानंतर तुम्ही सामन्यात खेळलेला चेंडू खिशामध्ये ठेवला, यामागे काय कारण होते? हे तुम्ही उत्स्फूर्तपणे केले की, तुम्हाला असे कोणी करायला सांगितले होते अथवा याबाबत मार्गदर्शन केले होते. 

हरमनप्रीत कौर: नाही सर, ही एक प्रकारे दैवी योजनाच होती. कारण या सामन्यातला शेवटचा चेंडू, शेवटची कॅच माझ्याच हातात येईल हे काही पक्के नव्हते. पण, जेव्हा तो चेंडू माझ्याकडे आला आणि हे मला माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचे, प्रतिक्षेचे फळ असल्यागत वाटले, आणि तो मी माझ्याकडे ठेवून घेतला. आत्ता देखील तो चेंडू माझ्या बॅगेतच आहे.

पंतप्रधान: शेफाली आपण रोहतकच्या रहिवासी आहात, बरोबर? ते तर पहिलवानांचे शहर आहे, मग तुम्ही या क्रिडा प्रकारात कसा काय प्रवेश केला. 

शेफाली वर्मा: हो सर, आजवर त्या गावाच्या मातीतून अनेक पहिलवान आणि कबड्डीपटू जन्माला आले आहेत. पण, मला असे वाटते की माझ्या वडिलांचे यात खूप मोठे योगदान आहे. कारण त्यांना,

पंतप्रधान: पूर्वी कधी आखाड्याचे खेळ खेळला आहात का ?

शेफाली वर्मा: नाही सर.

पंतप्रधान: कधीच खेळला नाहीत का ?

शेफाली वर्मा: नाही खेळले सर.

पंतप्रधान: अच्छा.

शेफाली वर्मा: माझ्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती, मात्र ते बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ती आवड आपल्या मुलांमध्ये रुजवली. मी आणि माझा भाऊ क्रिकेट खेळत असू. आम्ही खूप सारे सामने पाहत असू. म्हणून मला वाटते की त्यातूनच मला क्रिकेट जास्त आवडू लागले आणि मग मी क्रिकेटपटू झाले. 

पंतप्रधान: शेफाली, जेव्हा मी ते पाहिले तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. एखादा क्रिकेटपटू कॅच घेतल्यानंतर हसला तर ते मी समजू शकतो, तुम्ही मात्र कॅच घेण्यापूर्वीच हसत होता. याचे कारण काय होते ?

 

शेफाली वर्मा: सर, बस मी माझ्या मनात चेंडूला ‘माझ्याकडे ये’ असे म्हणत होते. आणि तो झेल माझ्याच हातात आला त्यामुळे मला हसू येत होते.

पंतप्रधान: नाही, मला असे वाटले की तुम्हाला याचा पूर्ण विश्वास होता की तो चेंडू तुम्हाला सोडून इतरांकडे जाऊच शकत नाही. 

शेफाली वर्मा: तो चेंडू इतरत्र गेला असता तर सर मी उडी मारुन तिथेही पोहोचले असते.

पंतप्रधान: त्यावेळी तुमच्या मनात कोणत्या भावना होत्या यांचे वर्णन करु शकता का तुम्ही?

जेमिमाह रॉड्रिग्स: खरं तर सर, उपांत्य फेरी होती आणि नेहमीच आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच अगदी जवळ येऊन हरत होतो, त्यामुळे जेव्हा मी खेळायला गेले होते, तेव्हा हेच होते, की संघाला जिंकवायचे आहे. कसेही करून शेवटपर्यंत खेळायचे आहे, संघाला जिंकवायचे आहे. आणि जेव्हा हरलो होतो, आणि आम्ही आलो होतो, एकत्र, तेव्हा आमच्या सर्वांचे फक्त, आम्ही फक्त हेच बोलत होतो की, एक भागीदारी, एक दीर्घ भागीदारी, ना, आणि ते they will go down. That's what we are trying to do and I would say at that moment, की तो एक सामूहिक सांघिक प्रयत्न होता सर! होय, कदाचित माझे शतक झाले, पण मला वाटते की जर हॅरी दी ची भागीदारी आणि माझी भागिदारी झाली नसती. नाहीतर दीप्ती मैदानात येऊन ती प्रभावी खेळी, रिचा आणि मग अमनच्या त्या 8 चेंडूत 15 धावा, if that would not happen maybe we would have not won the semi-finals. But I think everyone collectively had that belief की, नाही, आम्ही, हा संघ हे करू शकतो, आणि करून दाखवले सगळ्यांनी!

जेमिमाह रॉड्रिग्स: He wanted to motivate than anything, he wanted to know our experience how was it winning the world cup?

पंतप्रधान: जेव्हा तीन सामने हरले, तेव्हा कसे वाटत होते, तुम्ही लोकांनी पुन्हा कशी उसळी घेतली?

क्रांती गौड: जेव्हा मी सामनावीर झाले, विश्वचषकाच्या सामन्यात, तेव्हा सर्वात आधी मला खूप अभिमान, माझ्या गावातील लोकांना खूप अभिमान वाटेल.

क्रांती गौड: जेव्हा मी चेंडू टाकते, तेव्हा हरमन दी फक्त हेच बोलायच्या, की बस, तुला विकेट काढायची आहे, तूच आहेस जी पहिली विकेट काढून देईल, तर बस हीच गोष्ट त्या बोलायच्या, म्हणून मला फक्त असे वाटायचे की, पहिली विकेट मीच काढावी, तर त्या विचाराने, म्हणजे विकेट काढण्याच्या त्याच विचाराने मी चेंडू टाकायची, की पहिली विकेट तर मीच काढणार. मला मोठे भाऊ आहेत, त्यांना क्रिकेट खूप आवडते. ते तुम्हालाही खूप मानतात. तर त्यांना क्रिकेट खेळायला खूप आवडायचे, पण त्यावेळी वडिलांची नोकरी गेली होती, त्यामुळे त्यांनी अकादमी वगैरे काही जॉईन केली नव्हती, पण असेच नुसते खेळायचे. तर मला लहानपणापासूनच खेळण्याचा छंद होता, म्हणून मी मुलांना बघून, बघून त्यांच्यासोबत टेनिस बॉलने खेळू लागले, मग लेदर बॉलची स्पर्धा झाली, तेव्हा आमच्या गावात एक आमदार चषक झाला होता, तर त्यात मी खेळले होते. दोन संघ आले होते, तर एका दीदीची अचानक तब्येत खराब झाली, तेव्हा मी तिथे होते आणि माझे केस लांब होते, तर सर येऊन मला म्हणाले, तू खेळशील का? मी म्हणाले, हो सर, तर त्यांनी मला त्यांच्या संघात खेळवले. तो पहिला सामना मी खेळले होते लेदर बॉलने आणि मी त्यात सामनावीर देखील होते. मी 2 विकेट घेतल्या आणि 25 धावा केल्या होत्या. तेव्हापासून माझे क्रिकेट असे सुरू झाले.

पंतप्रधान: शेफालीलाही कदाचित शेवटच्या 2 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हो.

शेफाली वर्मा: हो सर. सर मी त्यापूर्वी देशांतर्गत खेळत होते. पण जेव्हा मला बोलावणे आले, खरे तर, जे प्रतिका सोबत झाले, कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते, कोणासोबतही व्हावे अशी. पण जेव्हा बोलावणे आले, तेव्हा आपसूकच मी आत्मविश्वास दाखवला आणि संपूर्ण संघाने माझ्यावर आत्मविश्वास दाखवला. मला बोलावले आणि मग माझ्या मनात हेच होते की मला जिंकवून द्यायचे आहे. भले कसेही करून जिंकवेन.

 

प्रतिका रावल: मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला हेच सांगू इच्छिते की, जेव्हा मला दुखापत झाली होती, तेव्हा इथल्या अनेक लोकांनी, म्हणजे संघाने, म्हटले होते की हा विश्वचषक आम्ही प्रतिकासाठी जिंकू इच्छितो. तर मला या लोकांनी नाही सांगितले, पण मला दुसऱ्या कोणीतरी सांगितले, टीमबाहेरच्याने की, असे तुमच्यासाठी बोलत आहेत तिथे. तर जेव्हा मी बाहेर बसले होते आणि जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो, तेव्हा मी तांत्रिकदृष्ट्या संघात नव्हते. मी 16 वी खेळाडू होते. पण सर, मला जसे व्हीलचेअरवरच स्टेजवर उभे केले, तसेच सगळा मान दिला, ते सगळे दिले. तर हा संघ सर एका कुटुंबासारखा आहे. तर जेव्हा तुम्ही सर्व खेळाडूंचा एक, म्हणजे आदर करता, जेव्हा सर्व खेळाडूंना एकसारखेच जाणवून देता, तेव्हा ते कुटुंब जेव्हा एकजूट होऊन खेळते, तेव्हा सर त्या संघाला हरवणे खूप कठीण होऊन जाते. म्हणून, असा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र होता, अंतिम सामना जिंकण्यासाठी पात्र होता.

पंतप्रधान: नाही, तुमचे बोलणे बरोबर आहे की, शेवटी खेळात सांघिक भावना खूप महत्त्वाची असते हो. आणि सांघिक भावना फक्त मैदानात दाखवतात, असे नाही. आता चोवीस तास जेव्हा सोबत राहता, तेव्हा एक प्रकारचे बंधन तयार व्हायला हवे, तेव्हा कुठे घडून येते आणि प्रत्येकाच्या कमजोर बाजूची माहिती असते, तर ती भरून काढण्याचा प्रयत्न, आणि प्रत्येकाची ताकद असते, तर तिला पाठबळ देण्याचा आणि ती समोर आणण्याचा प्रयत्न, तेव्हाच घडून येते.

पंतप्रधान: सांगा, हा तुमचा झेलच तर सर्वात जास्त प्रसिद्ध झाला आहे.

अमनजोत कौर: इतके सर मी खूप चांगले झेलही पकडले आहेत, पण इतका प्रसिद्ध कोणताही झेल झाला नाही. आणि पहिल्यांदा असे फंबल झाल्यावर चांगले वाटत होते.

पंतप्रधान: जेव्हा तुम्ही हा झेल घेतला, तेव्हा तो एका प्रकारे टर्निंग पॉईंट बनला.

अमनजोत कौर: हो सर.

पंतप्रधान: त्यानंतर, म्हणजे तुम्हाला झेल घेईपर्यंत ठीक आहे, एक चेंडू दिसत असेल. त्यानंतर तुम्हाला चषक दिसू लागला असेल.

अमनजोत कौर: सर मला त्या झेलात चषक दिसत होता. त्यानंतर माझ्यावर इतक्या जणी होत्या, मला श्वास घेता येत नव्हता. मला हे देखील माहित नाही की किती जणी होत्या माझ्यावर.

पंतप्रधान: तुम्हाला माहित आहे ना, मागच्या वेळी सूर्य यादवनेही असाच झेल घेतला होता.

अमनजोत कौर: हो सर.

पंतप्रधान: तुमच्यापैकी कदाचित कोणाचा तरी एक झेल होता, कोणतातरी मागच्या वेळी, जो मी रीट्वीट केला होता. हो, मी, त्यावेळी मला ते खूप चांगला, तो प्रसंग वाटला होता.

हरलीन कौर देओल: हो सर. सर म्हणजे आम्ही जेव्हा इंग्लंडमध्ये होतो, जेव्हा, जेव्हा हा झेल पकडला होता, तेव्हा आम्ही खूप दिवसांपासून सराव करत होतो, अशा झेलांची, तर मला आठवले, मी क्षेत्ररक्षण करत होते, तेव्हा एक झेल पुढे पडणार होता, तर मी धावले आणि मला वाटले मी नाही पोहोचले. हॅरी दी ओरडून म्हणाल्या, काय फायदा तुमचा, चांगले क्षेत्ररक्षक असून तुम्ही असे झेल घेत नाही. तर जेमी माझ्या मागे उभी होती, तर जेमीने मला सांगितले की, म्हणाली काही हरकत नाही. मी तिला विचारले की, होऊ शकले असते का, म्हणाली, हो तुझ्यासाठी होऊ शकले असते. तर मी तिला म्हणाले की,  अजून दोन षटके बाकी आहेत. तुला मी एक चांगला झेल पकडून दाखवेन. तर सर, त्याच्या अगदी नंतर हा चेंडू आला and.

पंतप्रधान: अच्छा, आव्हानावर काम केले होते तर. रिचा, तू जिथे खेळतेस, सामना जिंकून येतेस ना, संधी प्रत्येक ठिकाणी मिळते रिचाला, आहे ना.

रिचा घोष: नाही माहित सर, पण हो, जसे की 19 वर्षांखालील, वरिष्ठ आणि महिला प्रीमियर लीगचीही ट्रॉफी जिंकली होती, खूप दूर-दूर षटकार मारले.

पंतप्रधान: चर चला, सांगा.

रिचा घोष: जेव्हा फलंदाजी केली होती, जसे की, षटकार आणि मला वाटते हॅरी दी, स्मृती दीदी आणि सगळ्या जणी जणू विश्वास, संपूर्ण संघाचा विश्वास आहे, की अशी जर कोणतीही परिस्थिती आली, जिथे चेंडू कमी आहेत, पण धावा जास्त पाहिजेत. मला वाटते की, ही गोष्ट यांनी दाखवली, विश्वास. मला वाटते की, त्यामुळे, मला वाटते की, मलाही आत्मविश्वास मिळाला की, हो, तू करू शकतेस. तर मला वाटते की, त्यामुळे प्रत्येक सामन्यात मला तसा, माझी देहबोली तशी दिसते.

 

राधा यादव: आम्ही 3 सामने हरलो. पण सर्वात चांगली गोष्ट हीच होती की, पराभवातही आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि एकमेकांना पाठिंबा देत होतो, एकमेकांशी बोलत होतो. तर ते सगळं प्रामाणिकपणे येत होतं, शुद्ध होतं. म्हणूनच कदाचित देवाने आम्हाला हा चषक दिला.

पंतप्रधान: नाही नाही, तुमच्या मेहनतीने मिळाला आहे जी! या क्षेत्रात तुम्ही स्वतःला अशा प्रकारे कसे तयार केले?

राधा यादव: सर, जसे सरांनी  सांगितले की आम्ही खूप दिवसांपासून खूप चांगले क्रिकेट खेळत आहोत आणि म्हणजे प्रत्येक परिस्थितीसाठी तयारी करत होतो. तंदुरूस्तीच्या दृष्टीने, क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीने किंवा कौशल्याच्या दृष्टीने, तर आम्ही बऱ्याच काळापासून या गोष्टींसाठी मेहनत घेत होतो आणि जसे मी म्हणाले की, सर्वजण एकत्र राहतात, तेव्हा ते सोपे होते. जर कुणी एकटे पडले, तर त्यांच्यासाठी एकट्याने काम करणे खूप कठीण आहे.

पंतप्रधान: पण मी ऐकले आहे की, तुम्हाला सुरुवातीला जे बक्षीस मिळाले, ते तुम्ही वडिलांना मदत करण्यासाठी खर्च केले.

राधा यादव: होय सर.

पंतप्रधान: आणि वडिलांनी पूर्णपणे प्रोत्साहन दिले.

राधा यादव: हो, नेहमीच... म्हणजे आमच्या कुटुंबात त्या वेळी तेवढे सोपे नव्हते, पण पप्पांनी कधीच तसे भासवले नाही, मम्मीनेही जाणवून दिले नाही.

स्नेह राणा: सर, बस…. खूप वर्षांची मेहनत आहे आणि आमचे जे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत, आविष्कार सर, त्यांच्यासोबतही बरीच चर्चा सुरू असायची की, कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारे सामोरे जायचे. तर त्या सगळ्या रणनीती, ज्या कर्णधारासोबत, उपकर्णधारासोबत आणि आपल्या मुख्य प्रशिक्षकासोबत ठरलेल्या असतात, त्याच मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि सुदैवाने ते जुळून येते. बऱ्याच सामन्यांमध्ये असं जुळून येतही नाही. पण तरीही स्वतःला प्रेरित करतो की, पुढच्या वेळी करू, तर यापेक्षाही जास्त चांगले करू.

उमा क्षेत्री: सर, आता तुमच्यासमोर काय बोलू, हेच कळत नाहीये. पण...

पंतप्रधान: जे मनात येईल, ते बोला.

उमा क्षेत्री: सर, ते माझे पदार्पण होते, पण माझ्यासोबत दरवेळी असेच होते सर. जेव्हाही पदार्पण होते, तेव्हा पाऊस पडतो, तर त्या दिवशीही तसेच झाले सर, पाऊस पडला आणि मी फक्त यष्टीरक्षणच केले. पण असे असले, तरी… म्हणजे मी स्वतः खूप आनंदी होते त्या दिवशी, कारण भारतासाठी पदार्पण करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही विश्वचषकात झाले माझे, तर मी खूप उत्साही  होते त्या सामन्याबद्दल की, देशासाठी खेळेन आणि मला असे वाटत होते की, मी त्या दिवशी भारताला सामना जिंकवून देईन, म्हणजे माझ्याकडून जेवढे होऊ शकेल आणि मी जेवढा प्रयत्न करेन. आणि एक गोष्ट सर…सर्वात चांगली होती, कारण संपूर्ण संघ माझ्यावर विश्वास ठेवत होता आणि सगळेजण येऊन मला….. म्हणजे… प्रत्येक गोष्ट सांगत होते, प्रत्येक जण बोलत होते.

प्रशिक्षक: भारतासाठी खेळलेली ईशान्य भारतातील पहिली मुलगी.

पंतप्रधान: आसामची आहे.

 

रेणुका सिंह ठाकूर: ड्रेसिंग रूममधील  वातावरण शांत-थंड ठेवायचे होते, म्हणून आम्ही विचार केला की असे काय करावे, ज्यामुळे वातावरणनिर्मिती  होईल. जसे मी एक मोर काढला, ते एक सकारात्मकतेचे  चिन्ह असते. मग त्यानंतर आम्ही विचार केला की, हे आणखी स्वारस्यपूर्ण कसे बनवता येऊ शकेल, तर…जशा स्मृतीच्या 50 धावा झाल्या, तेव्हा आम्हाला वाटले की ठीक आहे, आता आपण 100 च्या दिशेने...

पंतप्रधान: तर इथे येताच मोर पाहिले असतील.

रेणुका सिंह ठाकूर: हो सर, मी तेच म्हणाले, एक आणखी मोर दिसला. मला फक्त एक मोरच काढता येत होता चित्रकलेत, म्हणून मी तोच काढून ठेवला. सर, दुसरे काही येत नाही काढायला.

खेळाडू: पुढच्या वेळी ती चिमणी काढत होती, आम्ही तिला नकार दिला.

पंतप्रधान: नाही, पण मी तुमच्या मातोश्रींना विशेषत्वाने प्रणाम करेन. किती खडतर आयुष्यातून त्यांनी तुमच्या इतक्या प्रगतीसाठी खूप मोठे योगदान दिले. आणि एकच पालक असूनही, तुमचे आयुष्य घडवण्यासाठी,  एक आई इतकी मेहनत घेते आणि मुलीसाठी करते. ही आपल्याजागी एक खूप मोठी गोष्ट आहे जी! मी…. माझ्या वतीने त्यांना जरूर प्रणाम सांगा.

रेणुका सिंह ठाकूर: हो जी सर.

अरुंधती रेड्डी: सर्वात आधी मला माझ्या आईचा संदेश  तुम्हाला द्यायचा होता. मला वाटले नव्हते की, तुमच्याशी बोलणे होईल. पण ती म्हणते की, तुम्ही तिच्या दृष्टीने नायक (हिरो) आहात. आतापर्यंत तिचे चार-पाच वेळा कॉल आले आहेत की, मी तिच्या हिरोंना कधी भेटतेय? तिच्या हिरोंना कधी भेटतेय?

पंतप्रधान: तुम्हा मंडळींना काय वाटते की, तुम्ही खेळाच्या मैदानात तर यश मिळवले आहे… आता पुढे देश तुमच्याकडून काय अपेक्षा करत असेल? काय करू शकता तुम्ही मंडळी ?

स्मृती मंधाना: म्हणजे आम्ही जेव्हा विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी उतरतो, तेव्हा नेहमी पहिली गोष्ट हीच मनात येते की, जर आज आम्ही विश्वचषक जिंकलो, तर त्याचा परिणाम महिला क्रीडा क्षेत्रावर पडेल... फक्त क्रिकेटसाठीच नाही, तर संपूर्ण महिला क्रीडा क्षेत्रावर पडेल आणि तो खूप प्रचंड असेल आणि तो भारतात एका नव्या क्रांतीची  सुरुवात करेल. तर पुढेही आमचा हाच प्रयत्न राहील की, केवळ महिला क्रिकेटच नव्हे, तर महिला खेळांना  भारतात क्रांतिकारक चांगले दिवस आणू शकतो आपण आणि मला वाटते की, या संघामध्ये ती क्षमता आहे.

 

पंतप्रधान: मला असे वाटते की, तुम्ही लोक खूप प्रेरणा देऊ शकता…. कारण तुमच्याकडे यशाची एक खूप मोठी ताकद…..पार्श्वभूमी तुमच्याकडे आहे. जसे एक छोटे काम करा…. तुम्ही तुमच्या घरी जाल, तेव्हा साहजिकच तिथे एक आनंदाचे वातावरण…हर्षोल्हास असेल, उत्साह असेल, सगळे काही असेल. पण काही दिवसांनंतर आपापल्या शाळेत जा…..ज्या शाळेतून तुम्ही शिकून बाहेर पडला आहात…. आणि एक दिवस फक्त शाळेत घालवा. फक्त मुलांशी बोला….ते तुम्हाला खूप प्रश्न विचारतील, भरपूर प्रश्न विचारतील आणि तुम्हाला जे सहजपणे वाटेल, ते त्यांच्याशी बोला. मला वाटते की, ती शाळाही तुमची कायम आठवण ठेवेल आणि ती मुले आयुष्यभर तुमची  आठवण काढतील. जिथे तुम्ही शिकला आहात, तीच शाळा. मी असं म्हणत नाहीये….पण जर तुमचा अनुभव चांगला राहिला, तर मग तुम्ही तीन शाळा निवडा. वर्षातून जेव्हा कधी संधी मिळेल….एक दिवस-एक शाळा (वन डे-वन स्कूल), तीन शाळा करा एका वर्षात. तुम्ही बघा, यामुळे तुम्हालाही एका प्रकारे प्रेरणा मिळेल. तुम्ही तर त्यांना प्रेरित करालच, पण तेही तुम्हाला प्रेरित करतील. दुसरे, ही जी फिट इंडिया चळवळ आहे….आता जशी आपल्या देशात लठ्ठपणा एक खूप मोठी समस्या बनत चालली आहे…. तर फिट इंडिया हाच त्यावर उपाय आहे. जसे मी नेहमी म्हणतो, की तुम्ही तुमच्या खाण्यातील खाद्यतेलाचे प्रमाण 10% कमी करा. खरेदी करतानाच कमी तेल खरेदी करा. तर या गोष्टी जेव्हा लोक तुमच्या तोंडून ऐकतील, तेव्हा मला वाटते की, खूप फायदा होतो आणि मुलींसाठी फिट इंडियाचा आग्रह तुम्ही धरा. मला वाटते, खूप मोठा लाभ होईल आणि त्यात जर तुम्ही काही योगदान देऊ शकता, तर तुम्ही मंडळींनी हे करायला पाहिजे. तर मला आनंद झाला की, मला तुमच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. यातील अनेकजण आहेत, ज्यांना मी अनेकदा भेटलो आहे. अनेकांना पहिल्यांदा भेटत आहे. पण माझा प्रयत्न असतो की, तुम्हाला लोकांना भेटण्याची संधी मिळावी. तर तुम्ही लवकरात लवकर स्थिरस्थावर व्हा….मजेत रहा.

स्मृती मंधाना: तुम्ही जे सांगितले, ते आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. जसजशी आम्हाला लोकांशी बोलण्याची संधी मिळेल, तेव्हा आम्ही हा संदेश जरूर देऊ…आमच्या संघातर्फे, जर तुम्हालाही कधीही आम्हाला या संदेशासाठी बोलवायचे असेल, तर आम्ही सगळे कधीही पोहोचू, कारण नक्कीच हा संदेश...

पंतप्रधान: आपल्याला सर्वांनी मिळून देशाला पुढे घेऊन जायचे आहे.

स्मृती मंधाना: हो सर.

पंतप्रधान: चला, खूप खूप शुभेच्छा!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A big deal: The India-EU partnership will open up new opportunities

Media Coverage

A big deal: The India-EU partnership will open up new opportunities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2026
January 28, 2026

India-EU 'Mother of All Deals' Ushers in a New Era of Prosperity and Global Influence Under PM Modi