शेअर करा
 
Comments
“आज तुमच्यासारख्या खेळाडूंचा उत्साह उंचावला आहे, प्रशिक्षणही चांगले होत आहे आणि देशात खेळाप्रती वातावरणही जबरदस्त आहे”
“तिरंगा उंचच उंच फडकताना पाहणे, राष्ट्रगीत वाजत राहाताना ऐकणे हेच ध्येय”
“देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहेत
“तुम्ही सर्वजण, जगातील सर्वोत्तम सुविधांनी प्रशिक्षित आहात. हे प्रशिक्षण आणि तुमची इच्छाशक्ती यांची सांगड घालण्याची हीच वेळ आहे”
“तुम्ही आतापर्यंत जे काही साध्य केले ते नक्कीच प्रेरणादायी आहे. पण आता तुम्हाला नव्या विक्रमांचा वेध घ्यायचा आहे"

खेळाडूंशी संवाद साधण्यापूर्वी मी दोन शब्द बोलणार आहे त्यानंतर त्यांच्याशी  संवाद साधणार आहे.

मित्रहो,

आपणा सर्वांना भेटण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रत्यक्ष भेट झाली असती तर अधिक आनंद झाला असता.मात्र आपल्यापैकी बरेच जण परदेशात आपल्या प्रशिक्षणात व्यस्त आहेत तर दुसरीकडे संसदेचे सत्र सुरु असल्याने मी सुद्धा यात व्यस्त आहे.

मित्रहो,  

आज 20 जुलै आहे.क्रीडा जगतासाठीही हा महत्वाचा दिवस आहे. आपल्यापैकी काही जणांना नक्कीच माहिती असेल की आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे. 28 जुलैला ज्या दिवशी बर्मिंगहॅम मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु होतील त्याच दिवशी तामिळनाडूच्या महाबलीपुरम इथे बुद्धीबळ ऑलिम्पियाडला सुरवात होईल . म्हणजे  येते 10-15 दिवस भारताच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची, जगभरात आपला दबदबा निर्माण करण्याची सुवर्ण संधी आहे. देशातल्या प्रत्येक खेळाडूला यासाठी मी खूप-खूप शुभेच्छा देतो.

आपल्यापैकी अनेक खेळाडूंनी याआधीही मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे. या वेळीही आपणा  सर्व   खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये मोठा उत्साह आणि उमेद आहे. ज्यांनी या आधीराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतला आहे त्यांना स्वतःला आजमवण्याची ही पुन्हा संधी आहे. 65 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहेत, हे खेळाडूही आपली छाप पडतील असा मला विश्वास आहे. आपणाला काय करायचे आहे, कसे खेळायचे आहे यात तर आपण निपुण आहातच.मी इतकेच सांगेन, जीव ओतून खेळा, जोमाने आणि संपूर्ण ताकदीने खेळा आणि कोणत्याही  दडपणाशिवाय खेळा. आपणा सर्वाना तो जुना संवाद माहीतच असेल,

‘कोई नहीं है टक्कर में, कहां पड़े हो चक्कर में’, हीच वृत्ती बाळगत आपणा सर्वाना तिथे जायचे आहे, खेळायचे आहे आणखी उपदेश मी आपल्याला करू इच्छित नाही.सर्वप्रथम कोणाशी संवाद साधायचा आहे मला ?

सादरकर्ता : महाराष्ट्रातून  अविनाश साबळे आहेत, अ‍ॅथलीट आहे 

पंतप्रधान : अविनाश नमस्कार.

अविनाश साबळे : जय हिंद  सर, मी  अविनाश साबळे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स मध्ये 3,000 मीटर प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

पंतप्रधान : अविनाश, आपण लष्करात आहात आणि सियाचेनमधेही काम केले आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येऊन हिमालयात कर्तव्य बजावणे याबद्दल सर्वप्रथम आपला  अनुभव सांगा.

अविनाश साबळे :  हो सर, मी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातला आहे. 2012 मध्ये भारतीय लष्करात दाखल झालो. सर, त्यानंतर लष्कराची जी सेवा असते, चार वर्षे म्हणजे नित्याची ड्युटी असते ती केली आणि त्यातून मला बरेच शिकायला मिळाले. चार वर्षे ड्युटी आणि 9 महिन्यांचे प्रशिक्षण, जे भक्कम असते आणि खूप कठीण असते.त्या प्रशिक्षणाने मला बळकट केले आणि कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी चांगली कामगिरी करेन असा विश्वास त्या प्रशिक्षणामुळे निर्माण झाला. चार वर्षानंतर लष्कराने मला अ‍ॅथलेटिक्समध्ये जाण्याची संधी दिली, मी अतिशय आभारी आहे.लष्कराची शिस्त आणि कर्तव्य बजावण्यासाठी इतक्या कठीण ठिकाणी राहिलो होतो त्याचा  मला खूप फायदा होत आहे. 

पंतप्रधान : ठीक, अविनाश,लष्करात भर्ती झाल्यानंतरच स्टीपलचेसची निवड केली असे मी ऐकले आहे. सियाचीन आणि स्टीपलचेस यांचा काही संबंध आहे का ?

अविनाश साबळे : हो सर. आम्हाला जे प्रशिक्षण दिले जाते म्हणजे तिथे असे प्रशिक्षण दिले जाते,ज्याप्रमाणे स्टीपलचेस हा सुद्धा अडथळे पार करण्याचा क्रीडा प्रकार आहे.यामध्ये आपल्याला अडथळ्यावरून उडी मारून जायचे असते, त्यानंतर पाण्यात उडी. अशाच प्रकारे लष्कराचे जे प्रशिक्षण असते त्यामध्ये आम्हाला अनेक अडथळ्यातून जावे लागते, ज्याप्रमाणे सरपटत जावे लागते,9 फुट खंदकावरून उडी मारावी लागते. म्हणजे प्रशिक्षणात असे खूप  अडथळे असतात आणि इथे मला हे  खूप सोपे वाटत आहे. लष्कराच्या प्रशिक्षणानंतर स्टीपलचेस  सारखे प्रकार मला खूपच सोपे वाटत आहेत.

पंतप्रधान : ठीक आहे, अविनाश मला सांगा की याआधी आपले वजन खूप होते आणि अतिशय कमी वेळात आपण आपले वजन कमी केले आहे. आज मी पण पाहत आहे.खूपच बारीक दिसत आहात. आपला एक मित्र नीरज चोपडा यानेही अतिशय कमी वेळेत आपले वजन कमी केले होते. आपण आपला अनुभव सांगितला, आपण वजन कसे कमी केले हे सांगितले  तर इतरही लोकांसाठी ते उपयोगी ठरेल.

अविनाश साबळे : सर,मी लष्कराचा जवान म्हणून कर्तव्य बजावत असताना माझे वजन जास्त होते. तेव्हा मी विचार केला की क्रीडा विश्वात जायला हवे.तेव्हा माझ्या युनिटने आणि लष्करानेही मला यासाठी प्रोत्साहन दिले. धावण्यासाठी माझे वजन खूपच जास्त होते. किमान 74 किलो वजन होते. मी विचार करत होतो की हे कसे होईल ?मात्र त्यांनी मला खूपच पाठींबा दिला. प्रशिक्षणासाठी मला वेगळा वेळ तिथे मिळत असे, तर वजन कमी करण्यासाठी मला 3-4 महिने लागले.  

पंतप्रधान  : वजन किती कमी केले ?

अविनाश साबळे : सर, आता माझे वजन साधारणपणे  53 किलो राहते,तेव्हा 74 किलो, म्हणजे सुमारे 20 किलो घटवले.

पंतप्रधान  : ओह, खूपच कमी केले. अविनाश मला खेळामधली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे जय-पराजय याचे जास्त ओझे राहत नाही. प्रत्येक वेळी स्पर्धा नवी असते आणि आपण सांगितले आहे की आपण सज्ज आहात. संपूर्ण देशवासियांच्या शुभेच्छा आपण समवेत आहेत. आपण जोमाने खेळा. आता कोणाशी संवाद साधायचा आहे ?

सादरकर्ता : सर  अचिंता  शेअुली, पश्चिम बंगालमधून आहे,भारत्तोलक आहे.

पंतप्रधान  : अचिंता जी नमस्ते.

अचिंता  शेअुली : नमस्ते सर, सर मी पश्चिम बंगालमधून आहे,

पंतप्रधान  : आपल्याविषयी थोडे सांगा जरा.

अचिंता शेअुली : 73 किलो वजनी गटात खेळतो मी,सर

पंतप्रधान  : ठीक, अचिंता, लोक सांगतात की आपण खूप शांत स्वभावाचे आहात.एकदम शांत. मात्र आपला क्रीडा प्रकार  आहे त्यामध्ये  ताकद लागते, शक्तीचा क्रीडा प्रकार आहे हा. तर शक्ती आणि शांती या  दोन्हींचा मेळ आपण कसा घालता

अचिंता शेअुली : सर,योग करतो, त्यानंतर डोके शांत राहते. प्रशिक्षणाच्या वेळी तो शांतपणा  बाजूला ठेवत एकदम जोशपूर्ण असतो.

पंतप्रधान  : अच्छा अचिंता, योग नियमित करता का ? 

अचिंता  शेअुली : हो सर,नियमित करतो मात्र कधी कधी राहतो.

पंतप्रधान  : अच्छा, आपल्या कुटुंबात कोण- कोण आहे ?

अचिंता  शेअुली :  आई आहे आणि माझा मोठा भाऊ आहे सर,

पंतप्रधान  : कुटुंबाकडूनही  सहकार्य मिळते ?

अचिंता  शेअुली : हो सर, कुटुंबाकडून पूर्ण पाठींबा असतो. कर, उत्तम कर,असे त्यांचे सांगणे असते. रोज बोलणे होते, त्यांचा नेहमीच पाठींबा असतो, सर. 

पंतप्रधान : आईला काळजी  वाटत असेल,कुठे लागू नये,कारण भारत्तोलनात नेहमी जखमी होण्याची चिंता असते,तर

अचिंता  शेअुली :  सर , मी आईशी बोलतो तेव्हा उत्तम खेळ असे ती सांगते.

पंतप्रधान  : आपली खूप प्रगती व्हावी,सरस कामगिरी आपण करावी असे मला वाटते. मला सांगा, जखमी होण्यापासून आपण स्वतःला कसे दूर ठेवता ? त्याची विशेष तयारी केली आहे का ?

अचिंता  शेअुली : नाही  सर, जखमा तर होतच राहतात मात्र त्यासाठी आम्ही त्यावर थोडे लक्ष देतो की माझे काय चुकले आहे म्हणून जखमी झालो. मग त्यात मी दुरुस्ती केली.त्यानंतर हळू-हळू जखमी होणे नाहीसे झाले.   

पंतप्रधान  : ठीक, अचिंता, मला सांगण्यात आले आहे की आपल्याला चित्रपट पाहण्याची मोठी आवड आहे,प्रशिक्षणामुळे चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नसेल.  

अचिन्ता शेअुली : हो सर, वेळ तर मिळत नाही पण कधीकधी जेंव्हा सवड मिळते तेंव्हा थोडा वेळ पाहतो सर.

पंतप्रधान : याचा अर्थ असा की, तेथून पदक जिंकून आल्यानंतर चित्रपट पहाण्याचेच काम करत राहणार आहात ?

अचिन्ता शेअुली : नाही, नाही सर.

पंतप्रधान : अच्छा, माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. मी तुमच्या कुटुंबाचे कौतुक करू इच्छितो. विशेषत्वाने तुमच्या आई आणि भावाचे मी कौतुक करतो. त्यांना माझा नमस्कार, कारण त्यांनी तुमच्या तयारीत कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मी असे मानतो की जेंव्हा कोणी खेळाडू बनतो तेंव्हा त्या खेळाडू सोबत त्याच्या पूर्ण कुटुंबाला तपस्या करावी लागते. तुम्ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करा. तुमच्या आईसह सर्व देशवासीयांचे आशिर्वाद तुमच्या बरोबर आहेत. अचिन्ता, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

अचिन्ता शेअुली : धन्यवाद सर, धन्यवाद सर.

निवेदक: सर, आता केरळमधील ट्रीसा जॉली, ज्या बॅडमिंटन खेळतात.

ट्रीसा जॉली : सुप्रभात सर, मी ट्रीसा जॉली. सर, मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन या क्रिडा प्रकारात सहभागी होणार आहे, सर. 

पंतप्रधान : अच्छा, ट्रीसा तुम्ही कन्नूर जिल्ह्यातील आहात. तेथील शेती आणि फुटबॉल दोन्ही खूपच प्रसिद्ध आहे. तुम्हाला बॅडमिंटन खेळण्यासाठी कोणी प्रेरित केले ?

ट्रीसा जॉली : सर, माझ्या वडिलांनी मला क्रीडापटू बनण्यासाठी प्रोत्साहन दिले, कारण माझ्या गावात व्हॉलिबॉल आणि फुटबॉल हे खेळ फारच लोकप्रिय आहेत. पण, त्या वयात बॅडमिंटन खेळणे जास्त सोयीस्कर होते. वयाच्या पाचव्या वर्षी.

पंतप्रधान : अच्छा ट्रीसा मला असे सांगण्यात आले आहे की गायत्री गोपीचंद आणि तुमच्यात चांगली मैत्री आहे आणि तुम्ही डब्लस पार्टनर देखील आहात. मला तुमची मैत्री  आणि टेनिस कोर्टवरील भागिदारी बद्दल सांगाल का?

ट्रीसा जॉली : सर, गायत्री बरोबरच्या मैत्री बंधाचा मला आनंद आहे. जेव्हा आम्ही खेळत असतो तेव्हा हा बंध आमच्यात चांगले संयोजन तयार करतो. जेव्हा आपण कोर्टवर खेळत असतो तेव्हा हे खूप महत्वाचे असते. मला वाटते की भागीदाराबरोबर चांगले संबंध ठेवणे खूप महत्वाचे आहे.

पंतप्रधान : अच्छा ट्रीसा, तुम्ही आणि गायत्री स्पर्धा जिंकून परतल्यावर आपले यश कसे साजरे करायचे याचा बेत आखला आहे का?

ट्रीसा जॉली : सर, तिकडे जाऊन पदक जिंकले तर आम्ही आनंद साजरा करु. सर, आता तरी आनंद कसा साजरा करु याची कल्पना नाही.

पंतप्रधान : पी.व्ही सिंधू यांनी परतून आल्यावर आईस्क्रीम खाण्याचा बेत आखला आहे. तुम्ही शानदार सुरुवात केली आहे. तुमची संपूर्ण कारकीर्द घडणे अजून बाकी आहे. आता कुठे तुमच्या यशाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्यात आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावा. प्रत्येक सामना गांभीर्याने खेळा. सामन्याच्या निकालाचा विचार करू नका. हे पहा, तुम्हाला बिलकुल असे वाटले पाहिजे की आपण आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चला, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संपूर्ण चमूला देखील माझ्या हार्दिक शुभेच्छा.

ट्रीसा जॉली : धन्यवाद सर.

निवेदक : सर, आता झारखंडच्या कुमारी सलीमा टेटे ज्या हॉकीपटू आहेत, सर.

पंतप्रधान : सलीमाजी नमस्ते.

सलीमा टेटे : सुप्रभात सर.

पंतप्रधान : सलीमाजी कशा आहात तुम्ही?

सलीमा टेटे : मी ठीक आहे सर. आपण कसे आहात?

पंतप्रधान : तर सध्या कुठे आहात तुम्ही. प्रशिक्षणासाठी कुठे बाहेर आहात का तुम्ही?

सलीमा टेटे : हो सर, सध्या आम्ही इंग्लंडमध्ये आहोत. आमचा पूर्ण संघ आहे.

पंतप्रधान : अच्छा सलीमा, कोठेतरी माझ्या वाचनात तुमच्याबद्दल असे आढळले की, तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी हॉकीसाठी खूप संघर्ष केला आहे. त्या दिवसांपासून आजवरच्या तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगितले तर देशातील खेळाडूंना देखील प्रेरणा मिळेल.

सलीमा टेटे : हो सर बिलकुल. मी एका छोट्या गावातून आले आहे. पूर्वी माझे वडील पण खेळायचे. बऱ्याच काळापूर्वी त्यांनी खेळणे सोडून दिले. माझे वडील खेळण्यासाठी जिथे कुठे जातील तिथे मी सायकलवर त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी जात असे. मी तिथे बसून पहात राहायची की हा खेळ कसा खेळला जातो. मी हॉकी कशी खेळायची हे वडिलांकडून शिकत होते कारण मलाही हॉकी खेळायची आवड होती. यशवंत लकडा जे झारखंडचे आहेत, मी पहात होते की ते कसे हॉकीपटू आहेत. मलाही तसेच बनायचे आहे. तर मी वडिलांबरोबर सायकलवर जायची आणि बसून पहायची की हा खेळ कसा असतो. नंतर हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की हॉकी माझ्या आयुष्याला खूप काही देऊ शकते. तर मी माझ्या वडिलांकडून शिकले की संघर्ष केला तर बऱ्याच गोष्टी मिळवता येतात. तर मला माझ्या कुटुंबाबद्दल आदर वाटतो कारण त्यांच्याकडून मला इतके चांगले ज्ञान मिळाले.

पंतप्रधान : अच्छा सलीमा, टोकियो ऑलिंपिकमधील तुमच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते आणि मला वाटते की जर तुम्ही तुमचा टोकियोमधील अनुभव सांगितला तर मला वाटते की संगळ्यांना तो ऐकायला आवडेल.

सलीमा टेटे : हो सर बिलकुल, टोकियो ऑलिंपिकमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याबरोबर बोलणे झाले होते. आणि आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी तुमच्याबरोबर बोलत आहे. पण सर्वात आधी तुम्हीच आम्हाला प्रोत्साहित केले होते, जसे आम्ही टोकियो ऑलिंपिकमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधला होता. आम्हाला खूप चांगले वाटले होते. त्यामुळे आम्ही खूप जास्त प्रेरित झालो होतो. यावेळी चांगली कामगिरी करायची फक्त हाच विचार करून टोकियो ऑलिंपिकमध्ये गेलो होतो. या स्पर्धेत देखील हाच विचार मनात आहे की आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. टोकियो ऑलिंपिकच्या वेळी कोविड होता त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण तिथे आमच्यासाठी खूप चांगले नियोजन करण्यात आले होते. टोकियोला जाऊन आम्ही खूप काही शिकून आलो आणि मग स्वतःवर विश्वास ठेवून खूप चांगली कामगिरी करुन आलो. बस तुम्ही सर्व जण आम्हाला असाच पाठिंबा देत रहा म्हणजे आम्ही पुढे पुढे जात राहू. जसे टोकियो ऑलिंपिकमध्ये आमची एक खास ओळख निर्माण झाली, आमच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. आम्हाला भविष्यात अशीच कामगिरी करायची आहे.

पंतप्रधान : सलीमा तुम्ही कमी वयात अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळला आहात. आणि माझा पक्का विश्वास आहे की हा अनुभव तुम्हाला भविष्यातही कामी येईल. तुम्ही खूप प्रगती कराल. मी तुमच्या मार्फत महिला आणि पुरुष दोन्ही हॉकी संघांना माझ्याकडून आणि संपूर्ण देशांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण कोणत्याही तणावाशिवाय आनंदाने खेळा. सर्व खेळाडू जेंव्हा सर्वश्रेष्ठ कामगिरी करतील तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत पदक मिळवतील. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सलीमा टेटे : धन्यवाद सर.

निवेदक : सर, आता शर्मिला आहेत हरियाणामधून, या पॅरा ॲथलेटिक्समध्ये शॉटपुटच्या खेळाडू आहेत सर.

शर्मिला : नमस्ते सर.

पंतप्रधान : शर्मिलाजी नमस्ते.

शर्मिलाजी तुम्ही हरियाणाच्या आहात. हरियाणामध्ये तर खेळांना प्राधान्य असतेच असते. अच्छा, तुम्ही वयाच्या 34 व्या वर्षी आपली खेळातील कारकीर्द सुरू केली. आणि तुम्ही दोन वर्षातच सुवर्णपदक जिंकून दाखवले आहे. हा चमत्कार कसा झाला हे मी जाणून घेऊ इच्छितो. तुम्हाला कशापासून प्रेरणा मिळाली?

शर्मिला : सर मी हरियाणामधल्या महेंद्रगड जिल्ह्यातील रिवाडी इथे राहते. आणि सर माझ्या आयुष्यात अनेक वादळे आली आहेत. लहानपणापासून मला खेळाडू बनायचे होते पण मला संधी मिळाली नाही. माझे कुटुंब गरीब होते, माझे वडील, माझी आई अंध होती, तीन बहिणी एक भाऊ असा आमचा खूपच गरीब परिवार होता, सर. लहान वयातच माझे लग्न लावून देण्यात आले. पण माझे पती चांगले नव्हते. त्यांनी माझ्यावर अनेक अत्याचार केले. मला दोन मुली आहेत आणि त्या दोघीही क्रीडापटू आहेत. आम्हा तिन्ही माय लेकींवर अनेक अत्याचार झाले म्हणून माझे आई-बाबा मला माहेरी घेऊन आले. गेल्या सहा वर्षापासून मी माहेरीच राहते सर. लहानपणापासूनच काहीतरी करून दाखवण्याची मला इच्छा होती. पण मार्ग सापडत नव्हता मला सर. दुसऱ्या विवाहानंतर हा मार्ग मला क्रीडा प्रकारात सापडला. टेकचंद भाई जे ध्वजवाहक होते ते माझे नातेवाईक आहेत. त्यांनी मला खूप जास्त मदत केली आणि त्यांनी रोज आठ तास, चार तास सकाळी चार तास संध्याकाळी माझ्याकडून मेहनत करून घेतली आणि त्यांच्यामुळेच आज मी राष्ट्रीय स्पर्धेत एक दोन वर्षातच सुवर्णपदक जिंकू शकले सर.

पंतप्रधान : शर्मिलाजी तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत ज्या ऐकून कोणीही हा विचार करेल की आता जगात पुढे जायचे सोडून देऊ, पण तुम्ही कधीही हिंमत हरला नाहीत. शर्मिला जी तुम्ही खरेच प्रत्येक देशवासीयासाठी एक आदर्श आहात आणि तुमच्या दोन मुली देखील आहेत. जसे तुम्ही सांगितले की आता त्यांनाही खेळांबाबत समज येऊ लागली आहे. देविका देखील रस घेत असेल आणि तुम्हाला खेळासंबंधी प्रश्न विचारत असेल. त्या मुलींना कोणत्या क्रीडा प्रकारात रुची आहे ?

शर्मिला : सर मोठी मुलगी आता 14 वर्षाखालील भालाफेक स्पर्धेत खेळणार आहे. खूप चांगली खेळाडू होईल ती. आता कदाचित युटोपिया हरियाणामध्ये क्रीडा स्पर्धा होतील, त्यावेळी कळू शकेल. सर, धाकटी मुलगी टेबल टेनिसमध्ये आहे.  माझी इच्छा आहे की, यापूर्वी ज्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावे लागले आहे, ते या मुलींना सामोरे जावे लागू नये, म्हणून माझ्या मुलींनाही क्रीडा क्षेत्रात आणून त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने घडवायचे आहे.

पंतप्रधान : अच्छा,शर्मिला जी, तुमचे प्रशिक्षक टेकचंद जी हे देखील पॅरालिम्पियन आहेत.  तुम्हालाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असेल?

शर्मिला: हो सर, त्यांनी मला प्रेरणा दिली आहे आणि चार-चार तास  सराव करून घेतला आहे.  जेव्हा मी स्टेडियममध्ये जात नसे तेव्हा ते  मला घरी येऊन  घेऊन जात असत.  मी थकून जायचे मग त्यांनी हार मानू नकोस, जितकी  मेहनत करशील तितके यश मिळेल, मेहनतीकडे लक्ष दे असे सांगत माझा उत्साह वाढवला.

पंतप्रधान: शर्मिला जी, ज्या वयात तुम्ही खेळण्याचा विचार केला होता, त्या वयात खेळायला सुरुवात करणे अनेकांना अवघड जाते.  जिंकण्याची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते हे तुम्ही सिद्ध केले आहे. प्रत्येक आव्हान तुमच्या धैर्यासमोर पराभूत होते. तुमचे समर्पण संपूर्ण देशाला प्रेरणा देते. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मुलींना पुढे घेऊन जाण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, ज्या तळमळीने तुम्ही काम करत आहात, तुमच्या मुलींचे आयुष्यही तितकेच उज्वल राहील. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मुलांना आशीर्वाद!

निवेदक: हॅवलॉकमधील डेव्हिड बेकहॅम, ते अंदमान आणि निकोबारचे आहेत. सायकलिंग करतात.

डेविड : नमस्कार सर!

पंतप्रधान : नमस्कार डेव्हिड! कसे आहात?

डेविड : ठीक आहे सर!

पंतप्रधान : डेव्हिड तुझे नाव एका मोठ्या फुटबॉलपटूच्या नावाप्रमाणे  आहे.  पण तुम्ही सायकल चालवता. लोक तुम्हाला फुटबॉल खेळण्याचा सल्ला देत असतील ना? तुम्हाला कधी वाटले आहे का, तुम्ही व्यावसायिक फुटबॉल खेळला पाहिजे की सायकलिंग हीच तुमची पहिली पसंती होती?

डेव्हिड:  फुटबॉल खेळण्याची आवड होती. पण आमच्या इथे अंदमान निकोबारमध्ये फुटबॉलला तेवढा वाव नव्हता. म्हणूनच तिथे फुटबॉल खेळाचा विकास होऊ शकला नाही.

पंतप्रधान : अच्छा डेव्हिड, मला सांगण्यात आले की, तुमच्या संघातील आणखी एका सहकार्याचे  नाव  प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूच्या नावाप्रमाणे आहे. तुम्ही दोघे मोकळ्या वेळेत फुटबॉल खेळता का?

डेव्हिड : आम्ही फुटबॉल खेळत नाही कारण आम्ही प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करतो, आम्ही आमच्या ट्रॅक सायकलिंगवर लक्ष केंद्रित करतो. आम्ही बराच वेळ प्रशिक्षणात घालवतो.

पंतप्रधान : अच्छा डेव्हिड  जी, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे पण सायकवरचा हात कधीच सुटला नाही आणि त्यासाठी खूप प्रेरणेची गरज असते. ही प्रेरणा आणि स्वतःला प्रेरित ठेवणे हे एक आश्चर्य आहे, तुम्ही ते कसे करता?

डेव्हिड : माझ्या कुटुंबीय मला खूप प्रोत्साहन देतात की, तुला पुढे जायचे आहे आणि  पदक जिंकून यायचे आहे. इथे आणि मी बाहेर जाऊन  पदक जिंकेन  ही मोठी गोष्ट असेल.

पंतप्रधान: डेव्हिड जी, तुम्ही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.  खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांनी तुम्हाला कशाप्रकारे मदत केली? या विजयामुळे तुमचा जिंकण्याची इच्छाशक्ती  आणखी  किती बळकट झाली आहे?

डेव्हिड : सर हा माझा पहिला प्रवास होता ज्यात मी माझा राष्ट्रीय विक्रम दोनदा मोडला होता आणि मला खूप आनंद झाला की, तुम्ही ‘मन की बात’ मध्ये माझ्याबद्दल खूप काही बोलले होता. आणि त्यावेळी मला खूप आनंद झाला की तुम्ही मला ‘मन की बात’ मध्ये प्रोत्साहित केले आणि मी अंदमान आणि निकोबारचा खेळाडू आहे की मी तिथून बाहेर पडून राष्ट्रीय संघात पोहोचलो आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की, मी  भारतीय संघात इथे आंतरराष्ट्रीय संघापर्यंत पोहोचलो याचा माझ्या अंदमान संघालाही. अभिमान वाटतो

पंतप्रधान : डेव्हिड बघा, तुम्हाला अंदमान निकोबारची आठवण आली आणि मला म्हणायचे आहे की, तुम्ही देशातील सर्वात सुंदर प्रदेशातून येता. तुम्ही एक दीड वर्षांचे असाल, तेव्हा निकोबारमध्ये आलेल्या त्सुनामीने तुमच्या वडिलांना तुमच्यापासून दूर नेले. एका दशकानंतर तुम्ही तुमची आईही गमावली. मला आठवते की, मी 2018 मध्ये कार निकोबारला गेलो होतो, तेंव्हा मला त्सुनामी स्मृतीस्थळाला भेट देण्याची आणि ज्यांना आपण गमावले आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी तुमच्या कुटुंबाला सलाम करतो. प्रत्येक देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आपणास शुभेच्छा!

डेव्हिड : धन्यवाद सर!

मित्रांनो,

मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटू शकलो असतो, सर्वांशी बोलू शकलो तर बरे झाले असते. पण मी म्हटल्याप्रमाणे, तुमच्यापैकी बरेच जण जगातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत आणि मी देखील सध्या संसदेच्या अधिवेशनामुळे खूप व्यस्त आहे आणि त्यामुळे यावेळी ते शक्य झाले नाही. पण, मी तुम्हाला आश्वस्त करतो की, जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा आपण नक्कीच तुमचा विजय एकत्र साजरा करू. नीरज चोप्राच्या कामगिरीवर देशाचे विशेष लक्ष असणार आहे.

मित्रांनो,

आजचा हा काळ हा एक प्रकारे भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. आज तुमच्यासारख्या खेळाडूंचा उत्साहही दुणावला आहे, प्रशिक्षणही चांगले होत आहे आणि देशात खेळाप्रती असलेले वातावरणही विलक्षण आहे.तुम्ही सगळे नवीन शिखरे पादाक्रांत करत आहात, नवीन शिखरे सर करत आहात.  तुमच्यापैकी तुमचे अनेक सहकारी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने प्रशंसनीय कामगिरी करत आहेत. तुमच्यामधला हा अभूतपूर्व आत्मविश्वास आज संपूर्ण देशाला जाणवत आहे. आणि मित्रांनो, यावेळी आपला राष्ट्रकुल चमू अनेक अर्थांनी खूप खास आहे. आपल्याकडे अनुभव आणि नवीन ऊर्जा या दोन्हींचा अप्रतिम संगम आहे. या चमूत 14 वर्षांची अनहत आहे, 16 वर्षांची संजना सुशील जोशी आहे, शेफाली आणि बेबी सहाना आहेत, ही 17-18 वर्षांची मुले आहेत, ही आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी जात आहेत. तुम्ही केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर नव्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहात.  भारताच्या प्रत्येक कानाकोपरा क्रीडा प्रतिभा भरलेला आहे हे तुमच्यासारखे युवा खेळाडू हे सिद्ध करत आहेत .

मित्रांनो,

तुम्हाला प्रेरणा, प्रोत्साहनासाठी बाहेर पाहण्याची गरज पडणार नाही.  जेव्हा तुम्ही तुमच्या संघातील मनप्रीतसारखे तुमचे सहकारी पाहाल तेव्हा उत्साह अनेक पटींनी वाढेल. पायाच्या फ्रॅक्चरमुळे त्यांना धावपटूऐवजी शॉटपुटमध्ये  नवीन भूमिका स्वीकारावी लागली आणि त्यांनी  या खेळात राष्ट्रीय विक्रम केला. कोणत्याही आव्हानासमोर हार न मानता, सतत वाटचाल करत राहण्याचे, ध्येयासाठी समर्पित राहण्याचे नावच खेळाडू आहे. त्यामुळे जे पहिल्यांदाच मोठ्या आंतरराष्ट्रीय मैदानात उतरत आहेत, त्यांना मी म्हणेन की मैदान बदलले आहे, वातावरणही बदललेले आहे, पण तुमचा स्वभाव बदलला नाही, तुमची जिद्द बदललेली नाही. तिरंगा फडकताना पाहणे, राष्ट्रगीताची वाजणारी धून ऐकणे, हेच  ध्येय  आहे. म्हणूनच दबाव घेऊ नका, तुम्ही चांगल्या आणि दमदार खेळाने प्रभाव पाडून या.  देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना तुम्ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जात आहात. या निमित्ताने देशाला सर्वोत्तम कामगिरीची भेट द्याल, या ध्येयाने मैदानात उतरल्यावर समोर कोण आहे, यामुळे फरक पडणार नाही.

मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले आहे, जगातील सर्वोत्तम सुविधांच्या माध्यमातून प्रशिक्षित आहात. हे प्रशिक्षण आणि तुमची इच्छाशक्ती एकत्र समाविष्ट करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही साध्य केले आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे. पण आता तुम्हाला नव्याने नव्या विक्रमांकडे पाहावे लागेल. तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करा, कोट्यवधी देशवासीयांना तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, तुम्हाला देशवासियांच्या शुभेच्छाही आहेत, तुम्हाला देशवासीयांचे आशीर्वादही आहेत. आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !  खूप खूप आभार आणि तुम्ही विजयी झाल्यावर, इथे येण्याचे मी तुम्हाला आतापासूनच  निमंत्रण देतो शुभेच्छा! धन्यवाद !

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India achieves 166GW of renewable energy capacity till October: R K Singh

Media Coverage

India achieves 166GW of renewable energy capacity till October: R K Singh
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2022
December 08, 2022
शेअर करा
 
Comments

Appreciation For PM Modi’s Relentless Efforts Towards Positive Transformation of the Nation

Citizens Congratulate Indian Railways as it Achieves a Milestone in Freight Transportation for FY 2022-23