स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने भारताच्या आत्म्याचे प्रतीक होते: पंतप्रधान
भारताची युवा पिढी जागतिक विकासाला देत आहे चालना : पंतप्रधान
स्वामी विवेकानंदांचे भारताविषयीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे: पंतप्रधान

"एल्लरिगू नन्ना नमस्कारगळु."

रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, बेलूर मठाचे अध्यक्ष परमपूज्य स्वामी गौतमानंदजी महाराज, रामकृष्ण आश्रम, म्हैसूरचे अध्यक्ष पूज्य स्वामी मुक्तिदानंदजी, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे विश्वस्त पूज्य स्वामी यादवेंद्रानंदजी, राज्यपाल थावरचंद गहलोतजी, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमारजी, खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियारजी, आमदार विजयेंद्र येडियुरप्पाजी, के. हरीश गौडा, उपस्थित मान्यवर, पूज्य संतगण तसेच बंधू-भगिनींनो,

सर्वप्रथम मी म्हैसूरच्या अधिष्ठात्री देवी माता चामुंडेश्वरी यांना साष्टांग प्रणाम करतो. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपण सर्व जाणता की, माझ्या जीवनप्रवासाची सुरुवात जिथून झाली आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासात रामकृष्ण मिशनचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. तीन महिन्यांपूर्वी मला हावडा येथील बेलूर मठाला भेट देण्याची संधी मिळाली होती. तेथे सर्व पूज्य संतांचा सहवास लाभला. आज पुन्हा म्हैसूरमध्ये श्री रामकृष्ण आश्रमाशी संबंधित संत, माझे गुरुभाऊ यांची भेट घेण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचे भाग्य मला लाभले आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आज म्हैसूरच्या या पवित्र भूमीवर मला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे. मी सर्व पूज्य संतांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो.

मित्रांनो,

म्हैसूर हे भारताच्या सनातन सांस्कृतिक चेतनेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. येथील मंदिरे, परंपरा, उत्सव, म्हैसूरचा दसरा, येथील भव्य राजवाडे, संगीत आणि साहित्य या सर्वांमध्ये भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रत्येक कणात सामावलेला आहे. या शहराने हा वारसा जपण्याबरोबरच त्याला अधिक समृद्धही केले आहे, हे पाहून अत्यंत समाधान वाटते. श्री रामकृष्ण आश्रम आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृती हाही म्हैसूरच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा आणि समृद्ध भाग आहे. काही वेळापूर्वी मला त्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी मिळाली, जिथे स्वामी विवेकानंदांनी आपल्या मुक्कामादरम्यान काही काळ व्यतीत केला होता. कर्नाटकातील अनेक विद्वान आणि विचारवंत या स्थळाशी जोडले गेले आहेत. राष्ट्रकवी कुवेंपू यांसारखे महान व्यक्तिमत्त्व जेव्हा म्हैसूरमध्ये होते, तेव्हा त्यांचा श्री रामकृष्ण आश्रमाशी अतिशय जवळचा संबंध होता. आज स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र, अर्थात विवेक स्मारकाच्या उद्घाटनाद्वारे, आपण या महान कार्याला नवे परिमाण आणि नवी दिशा देत आहोत. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी मी श्री रामकृष्ण आश्रम आणि त्याच्याशी संबंधित सर्व विद्वान व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

व्यक्तीचे विभूतीमध्ये रूपांतर एका क्षणात होत नाही. त्यासाठी आपल्याला जीवनाच्या असंख्य परीक्षा द्याव्या लागतात. साधना करावी लागते, तप करावे लागते, स्वतःला तपवावे लागते, झिजवावे लागते. ख्याती मिळाल्यानंतर तर संपूर्ण जग मागे उभे राहते. परंतु, तपस्येच्या काळात महान विभूतींना ओळखणे सोपे नसते. जो साधकाला त्याच्या तपस्येच्या काळात ओळखतो, तो त्याच्या सिद्धीचा सहभागीही होतो.

म्हणूनच बंधू-भगिनींनो,

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात म्हैसूरचे इतके महत्त्वपूर्ण योगदान होते. सुमारे 130 वर्षांपूर्वी, स्वामीजी एक युवा संन्यासी म्हणून भ्रमण करत असताना म्हैसूरला आले होते. तेव्हा त्यांची प्रसिद्धी आजच्यासारखी नव्हती. मात्र, त्यांचे विचार तितकेच उच्च होते. त्यावेळी ज्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्याशी जोडले गेले, त्यांच्यामध्ये म्हैसूरच्या तत्कालीन महाराजांचेही एक प्रमुख नाव होते. स्वामी विवेकानंद जी अमेरिकेत असताना त्यांनी तेथून म्हैसूरच्या तत्कालीन महाराजांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी स्वतः महाराजांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला होता.

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद जी यांनी भारतीय चेतना आत्मसात केली होती. त्यांनी त्या शास्त्रांना आत्मसात केले होते, ज्यामध्ये म्हटले आहे—“परं परोपकारार्थं यो जीवति स जीवति”. अर्थात, खऱ्या अर्थाने तोच जगतो, जो इतरांसाठी जगतो. याच मंत्रावर चालत म्हैसूरच्या या श्री रामकृष्ण आश्रमाने गेल्या वर्षी आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत. शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित सेवा असोत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य असो, श्री रामकृष्ण आश्रमाने स्वामी विवेकानंद जी यांचा वारसा जिवंत ठेवला आहे. मला विश्वास आहे की विवेक स्मारक साधक आणि श्रद्धाळूंसाठी आत्मिक उन्नतीचे तीर्थक्षेत्र बनेल.

स्वामी विवेकानंद जी यांची प्रेरणा होती—‘शिव ज्ञाने जीव सेवा’. म्हणजेच जीवांची सेवा हीच शिवाची सेवा आहे. म्हणूनच, या विवेक स्मारकात आपल्याला अशा युवकांची जडणघडण करायची आहे, ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्राचे हित, गरीब-वंचितांचे दुःख, हे त्यांच्या स्वतःच्या सुख-दुःखांपेक्षा अधिक महत्त्वाचे असेल. असे युवक, ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम हाच सर्वोच्च मंत्र असेल आणि भारतमातेची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय असेल.

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद जी युवकांच्या शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचा मजबूत आधार मानत होते. जगातील देश आपल्या युवकांना कशा प्रकारे शिक्षित करत आहेत, हे त्यांनी स्वतः पाहिले होते. परंतु दुर्दैवाने, त्यावेळी भारत गुलाम होता. भारतातील युवकही गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेले होते. त्या काळापासून आजपर्यंत भारताच्या युवकांनी एक मोठा प्रवास पूर्ण केला आहे. भारताचा जो युवक कधीकाळी बेड्यांमध्ये जखडलेला होता, तोच युवक आज जगाच्या विकासाला गती देत आहे.

आज भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने पुढे जात आहे.

कोणामुळे? 

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे.

कोणामुळे? 

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक बनला आहे.

कोणामुळे?

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

आज भारतात विकसित झालेले डिजिटल सोल्यूशन्स जगातील अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

कोणामुळे?

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

आज भारत सेमीकंडक्टर उत्पादनाच्या नव्या प्रवासात वेगाने पुढे जात आहे.

कोणामुळे?

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

आज भारत एआय, डीपटेक, अंतराळ तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नवे अध्याय लिहित आहे.

कोणामुळे?

भारतातील युवकांच्या सामर्थ्यामुळे.

काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले आहे की, भारताच्या युवकांनी अंतराळात कमाल करून दाखवली आहे. पहिल्यांदाच युवकांनी तयार केलेल्या एका खासगी कंपनीच्या रॉकेटने अंतराळात झेप घेतली आहे. आज कोणतेही क्षेत्र असो, भारताचा युवक आपले सामर्थ्य दाखवत आहे.

आपण सर्वजण आपल्या आजूबाजूला पाहत आहोत. आज छोट्यातील छोट्या व्यवसायात कार्यरत असलेला युवक भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला पुढे नेत आहे. तो मुद्रा कर्जाच्या माध्यमातून नवी सुरुवात करत आहे. तो देशाच्या स्टार्ट-अप क्रांतीचे नेतृत्व करत आहे.

आत्मनिर्भर भारताचे अभियान असो किंवा मेक इन इंडियाचे अभियान असो, त्याच्या यशामागे भारताच्या युवकांचीच ताकद आहे.

मित्रांनो,

कोणत्याही देशात युवकांचे सामर्थ्य त्या राष्ट्राची शक्ती तेव्हाच बनते, जेव्हा त्यांना योग्य संधी मिळते, योग्य दिशा मिळते आणि स्वतःच्या भूमीत मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा विश्वास मिळतो. आणि यामध्ये आपल्या शिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मला आनंद आहे की आज भारतात शिक्षण संस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 12 वर्षांत 650 हून अधिक नवीन विद्यापीठे स्थापन झाली आहेत. गेल्या 12 वर्षांत सुमारे 14 हजार नवीन महाविद्यालये सुरू झाली आहेत. 4 हजारांहून अधिक नवीन आयटीआय स्थापन करण्यात आल्या आहेत. 9 नवीन आयआयएम, 7 नवीन आयआयटी आणि 13 नवीन एम्स देखील स्थापन करण्यात आले आहेत. आज देशात वैद्यकीय जागांची संख्या सुमारे 1 लाख 40 हजार झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 823 झाली आहे.

मित्रांनो,

एकीकडे आपण शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करत आहोत. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेलाही आधुनिक गरजांनुसार आकार दिला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या युवकांना 21व्या शतकानुरूप तयार करण्याचे माध्यम बनत आहे.

मित्रांनो,

शालेय शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. देशभरात 14 हजारांहून अधिक पीएम श्री शाळा विकसित करण्यात आल्या आहेत. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता, मुलांमध्ये नवोन्मेष आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन करण्यात आल्या आहेत.

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद जी राष्ट्राच्या उत्थानासाठी शिक्षणासोबतच समानतेलाही तितकेच महत्त्व देत होते. शिक्षणात भेदभाव होऊ नये, संधींमध्ये भेदभाव होऊ नये, हे आज देशाचे ध्येय बनले आहे. आज मुलींनाही सैनिक शाळांमध्ये प्रवेश मिळत आहे. NDAमध्ये मुली राष्ट्रासाठी योगदान देत आहेत. आज वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे शिक्षण मातृभाषेत घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भाषेच्या आधारावर संधींमध्ये होणाऱ्या भेदभावाला आळा बसत आहे.

मित्रांनो,

युवाशक्तीचे निरोगी, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण असणे तितकेच आवश्यक आहे. ज्या देशांमध्ये खेळांना महत्त्व दिले जाते, तेथील युवकांमध्ये या तिन्ही गुणांचा वेगाने विकास होतो. म्हणूनच आज खेळांकडे राष्ट्रनिर्मितीचा एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून पाहिले जात आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, पॅरा गेम्स आणि विंटर गेम्स यांसारख्या आयोजनांनी देशभरातील युवकांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आज देशभरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे, खेलो इंडिया केंद्रांच्या माध्यमातून सुविधा वाढत आहेत, तसेच गावांपासून छोट्या शहरांपर्यंत नव्या प्रतिभांची ओळख पटवली जात आहे.

आणि मित्रांनो,

आज या अभियानाचे परिणामही स्पष्टपणे दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सातत्याने सुधारत आहे. आपले खेळाडू नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत, आपल्या मुली देशाचा गौरव वाढवत आहेत.

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद जी यांच्याप्रमाणेच, विवेक स्मारक आपल्याला मोठ्या उद्दिष्टासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. अशा ठिकाणी उभे राहून मला आपल्या युवकांना काही आवाहन करायचे आहे.

मित्रांनो,

म्हैसूरला अनेकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. यासाठी मी येथील जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. या निमित्ताने आपण असा संकल्प करू शकतो का, की भविष्यात स्वच्छतेचा संकल्प अधिक दृढ करत राहू? आपल्याला येथील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. पर्यावरणाशी संबंधित संकल्प केले पाहिजेत. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आपल्याला मिशन मोडमध्ये काम करावे लागेल.

मित्रांनो,

आज येथेच ‘वाल्मीकी रामायण’च्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन देखील झाले आहे. कन्नड भाषेसंदर्भात मला एक आवाहन करायचे आहे. कर्नाटक ही महान लेखक आणि कवींची भूमी आहे. कन्नड भाषिक लोक नेहमीच वाचनाच्या संस्कृतीसाठी ओळखले जातात. स्मार्टफोनच्या या युगात या सवयीला आणखी प्रोत्साहन मिळायला हवे. आपण युवा पिढीला कन्नड साहित्याशी अधिक सखोलपणे जोडण्यासाठी प्रेरित करू शकतो का?

मित्रांनो,

म्हैसूर आपल्या रेशीम, चंदन आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा आपण कोणाला भेटवस्तू देतो, तेव्हा ती वस्तू एखाद्या भारतीयाच्या हातांनी आणि घामाने तयार केलेलीच असेल, याची आपण खात्री करू शकतो का? यामुळे आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन मिळेलच, त्यासोबतच आणखी एका कुटुंबाला आर्थिक आधारही मिळेल.

मित्रांनो,

स्वामी विवेकानंद जी यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. मला विश्वास आहे की, विवेक स्मारक यासाठी ऊर्जास्रोत म्हणून कार्य करेल.

मी पुन्हा एकदा येथे उपस्थित पूज्य संतजन, गुरूबंधू आणि म्हैसूरच्या जनतेला नमन करून माझी वाणीला विराम देतो.

आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership