या केंद्राच्या उभारणीसाठी दिलेल्या पाठींब्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी पंतप्रधान मोदी यांचे मानले आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध केंद्र स्थापन केल्याबद्दल जागतिक नेत्यांनी मानले भारताचे आभार
“जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राची स्थापना म्हणजे भारताचे या क्षेत्रातील योगदान आणि क्षमता यांना मिळालेली मान्यता आहे”
“या भागीदारीला भारत संपूर्ण मानवजातीच्या सेवेसाठीची प्रचंड जबाबदारी मानतो”
“जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राची स्थापना जामनगरमध्ये झाल्यामुळे या शहराच्या स्वास्थ्य क्षेत्रातील योगदानाला जागतिक ओळख मिळणार आहे”
“एक ग्रह,आपले आरोग्य”हे ध्येयवाक्य स्वीकारून जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे”
“भारताची पारंपरिक वैद्यकीय प्रणाली उपचारांपुरती मर्यादित नाही.तर ते जीवनाचे एक समग्र शास्त्र आहे”

नमस्कार !!

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ जी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक- डॉक्टर टेड्रोस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्वानंद  सोनोवाल, डॉक्टर मनसुख मांडवीय, मुंजपारा महेंद्रभाई  आणि इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, महिला आणि सज्जन हो!!

आज आपण सर्वजण, संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असलेल्या आरोग्य आणि निरामयता विषयी एका खूप मोठ्या कार्यक्रमाचे साक्षीदार बनत आहोत. याबद्दल मी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस यांचा विशेष आभारी आहे. आत्ताच डॉक्टर टेड्रोस यांनी भारताचे ज्या शब्दांत कौतुक केले, त्याबद्दल  त्यांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि ज्याप्रकारे त्यांनी गुजराती, हिंदी, इंग्लिश या एक प्रकारे त्रिवेणीची जाणीव करून दिली,  त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेली आहे. त्यासाठीही मी त्यांचे विशेषत्वाने अभिनंदन करतो. डॉक्टर टेड्रोस यांचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. आणि ज्या- ज्यावेळी आम्ही भेटतो, त्या- त्यावेळी भारतातल्या गुरूंकडून त्यांना कसे शिक्षण मिळाले, त्याबद्दल ते अतिशय गौरवाने उल्लेख करीत असतात. आणि ते याविषयी खूप प्रसन्नचित्ताने आपल्या भावना व्यक्त करतात. आणि त्यांना भारताविषयी जी आपुलकी वाटते, ती  आज एक संस्थेच्या रूपाने साकार  होत आहे. ते मला म्हणतात की, माझे हे एक अपत्य आहे, ते मी तुम्हाला देत आहे. आता त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे.  मी डॉक्टर टेड्रोस यांना विश्वास देवू इच्छितो की, आपण ज्या भरवशाने - विश्वासाने भारतावर ही जबाबदारी सोपविली आहे आणि ज्या  उत्साहाने आणि उत्कटतेने आपले इथले मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी ही जबाबदारी आपल्या शिरावर- खांद्यावर घेतली आहे, ते पाहून माझा पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता आपण नक्कीच करू.

माझे जिवलग मित्र आणि मॉरिशसचे पंतप्रधान जगुनाथ यांचेही मी आभार व्यक्त करतो.  त्यांच्या परिवाराबरोबर माझे जवळपास तीन दशकांपासून  जुने संबंध आहेत. ज्यावेळी मी मॉरिशसला गेलो आहे, त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या वडिलांना भेटणे, त्यांच्या परिवारातल्या सर्वांबरोबर संपर्क साधणे, असे करतो. तीन दशकांपासूनचे हे नाते आहे, आणि मला आनंद आहे की, आज माझ्या निमंत्रणावरून ते माझ्या गृह राज्यात- गुजरातमध्ये आले आहेत. आणि त्यांनीही गुजरातबरोबरच गुजराती भाषेबरोबरही आपले नाते जोडून आम्हा सर्वांची मने जिंकली आहेत. आत्ताच आपण बांगलादेशचे पंतप्रधान, भूतानचे पंतप्रधान आणि नेपाळचे पंतप्रधान यांचे विचार ऐकले. जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधांच्या वैश्विक केंद्रासाठी या सर्वांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांचा मी आभारी आहे.

मित्रांनो,

जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक औषधाच्या या केंद्राच्या रूपाने भारताबरोबर एक नवीन भागीदारी केली आहे. या पारंपरिक औषधांच्या क्षेत्रामध्ये भारताचा सहभाग आणि भारताची संभाव्य क्षमता अशा दोन्ही गोष्टींचा हा  सन्मान आहे. भारत यामध्ये सहभागी होवून , संपूर्ण  मानवतेच्या सेवेसाठी खूप मोठी जबाबदारी  पार पाडणार आहे. हे केंद्र, जगभरामध्ये पसरलेल्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीमंध्ये सहकार्य निर्माण करून जगभरातील  लोकांना अधिक चांगला वैद्यकीय पर्याय उपलब्ध करून देण्यास मदतगार ठरेल. आणि मला असेही म्हणावेसे वाटते की, जामनगरच्या भूमीवर डॉक्टर टेड्रोस आणि प्रविंद जी यांच्या उपस्थितीमध्ये फक्त या भवनाचा शिलान्यास झालेला नाही, हा काही फक्त एका संस्थेचा शिलान्यास झालेला नाही. मात्र मी जगभरातील  नैसर्गिक औषधोपचारावर विश्वास ठेवणा-या परंपरागत औषधोपचार पद्धतीवर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाला सांगू इच्छितो की, आज ज्यावेळी भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्याच काळामध्ये हा जो शिलान्यास झाला आहे, तो शिलान्यास म्हणजे,  आगामी 25 वर्षासाठी जगभरामध्ये पारंपरिक औषधोपचाराच्या युगाचा आरंभ करणारा आहे.

माझ्या डोळ्यासमोर समग्र- सर्वंकष आरोग्य दक्षतेविषयी वाढते आकर्षण दिसत आहे. त्यामुळे आगामी 25 वर्षांनंतर ज्यावेळी देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, त्यावेळी पारंपरिक औषधोपचार जगातल्या प्रत्येक परिवारासाठी अतिशय महत्वाचे केंद्र बनेल. त्याचाच आज शिलान्यास झाला आहे आणि आयुर्वेदमध्ये तर अमृत कलशाला खूप महत्व आहे आणि अमृत काळामध्ये या कार्यक्रमाचा आरंभ होत आहे. म्हणूनच मी एका नवीन विश्वासाबरोबरच एका दूरगामी प्रभावांचे परिणामही पाहत आहे. आणि या वैश्विक केंद्राची स्थापना आपल्या या जामनगरामध्ये होत आहे ही, माझ्यासाठी तर व्यक्तिगत स्तरावर खूप सुखद गोष्ट आहे. जामनगर आणि आयुर्वेद यांचे एक विशेष नाते आहे. पाच दशकांपेक्षाही जास्त आधी, याच जामनगरामध्ये जगातल्या पहिल्या आयुर्वेद विद्यापिठाची स्थापना झाली होती. इथे एक उत्कृष्ट आयुर्वेद संस्था – ‘’ इन्स्टिट्यूट ऑफ टिचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद’’ आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या या  वैश्विक केंद्रामुळे  आरोग्य कल्याणाच्या क्षेत्रामध्ये जामनगरचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचवून या शहराला वैश्विक स्तरावर नवीन उंची प्रदान करेल. रोगमुक्त राहणे, निरोगी राहणे हा आयुष्याच्या यात्रेचा एक महत्वपूर्ण भाग होवू शकतो. मात्र निरामय-आरोग्य हेच अंतीम लक्ष्य असले पाहिजे.

मित्रांनो,

आरोग्य कल्याण- निरामयता यांचे आपल्या जीवनामध्ये नेमके काय महत्व आहे, हे आपण कोविड महामारीच्या काळामध्ये अनुभवले आहे. म्हणूनच विश्वाला आज आरोग्य दक्षतेविषयी नवीन ‘आयाम’  शोधून काढायचे आहेत. मला आनंद वाटतो की, यावर्षासाठी ‘‘ अवर प्लॅनेट- अवर हेल्थ’’ अशी घोषणा देवून जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या ‘‘वन अर्थ- वन हेल्थ’’ हा दृष्टीकोन स्वीकारून, हा विषय पुढे नेला आहे. 


मित्रांनो,

आपल्याकडे हजारो वर्षे आधी रचण्यात आलेल्या अथर्ववेदामध्ये असे सांगितले आहे की, ‘‘जीवेत शरदः शतम्’’ याचा अर्थ असा आहे की, 100 वर्षांपर्यंत जगावे. आपल्या परंपरेमध्ये 100 वर्ष आयुष्य लाभावे, अशी इच्छा अतिशय सहजपणे केली जाते. कारण त्यावेळी 100 वर्षांपर्यंत आयुष्य असणे ही काही फार नवलाची गोष्ट नव्हती. आणि यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका आमच्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीची होती. भारताची पारंपरिक औषधोपचार पद्धती ही काही फक्त आजारावर औषधोपचारापुरती मर्यादित आहे असे अजिबात नाही. वास्तविक ही पद्धती म्हणजे आयुष्य जगण्यासाठीचे एक समग्र- सर्वंकष विज्ञान आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल की, आयुर्वेदामध्ये आजार बरा होण्यासाठी आणि दिलेल्या औषधोपचाराबरोबरच सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आनंद, पर्यावरणीय आरोग्य, करूणा, सहानुभूती, संवेदनशीलता आणि उत्पादकता असे सर्व काही या अमृत कलशामध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच आपल्या आयुर्वेदाला जीवनाचे ज्ञान असे म्हटले जाते. आणि आपल्याकडे जितकी प्रतिष्ठा चार वेदांना आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदाला पाचवा वेद असे म्हटले जाते.

मित्रांनो,

आज आधुनिक जगामध्ये ज्याप्रकारची जीवनशैली आहे, जे नव-नवीन आजार आपल्याला पहायला मिळत आहे. त्या आजारांच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी, त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपले पारंपरिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे चांगल्या आरोग्याचा थेट संबंध समतोल आहाराबरोबर आहे. आपले पूर्वज असे सांगतात की, कोणत्याही रोगावर अर्धे उपचार तर त्याच्या समतोल आहारामध्येच लपलेले असतात. आपल्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीमध्ये अशा प्रकारची खूप माहिती आहे. कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्ले पाहिजे, काय खावू नये, अशी सगळी माहिती यामध्ये आहे. अशा सगळ्या माहितीला आधार, शेकडो वर्षांचा अनुभव आहे. शेकडो वर्षांच्या अनुभवांचे हे संकलन आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे इथे भारतामध्ये एक काळ असा होता की, त्या काळामध्ये भरड धान्याचा वापर जास्त केला जात असे. मिलेटस् म्हणजेच भरड धान्याचा उपयोग करण्यावर आपल्याकडील वयस्कर मंडळी जास्त भर देत होती. काळाबरोबर अशा भरड धान्याचा वापर कमी झालेला दिसून आला. आणि आता आजकालच्या काळात पुन्हा एकदा भरड धान्याचा आहारामध्ये वापर करण्याविषयी चर्चा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. भरड धान्याचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा भारताचा प्रस्ताव, संयुक्त राष्ट्रानेही स्वीकारला आहे. वर्ष 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. वर्ष 2023 ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित करणे हे एक मानवतेसाठी अतिशय हितकारक पाऊल आहे.

सन्माननीय महोदय,  काही काळापूर्वी भारतामध्ये जे ‘राष्ट्रीय पोषण अभियान (नॅशनल न्यूट्रिशन मिशन’) सुरू झाले आहे, त्यामध्ये आपल्या प्राचीन आणि पारंपरिक ज्ञानाचे महत्व विशेषत्वाने जाणून घेतले आहे.  कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आम्ही आयुष प्रणालीचा व्यापक उपयोग केला. ‘‘आयुष काढा’’  या नावाने आयुर्वेद आधारित काढ्याचा खूप प्रसार झाला. आयुर्वेद, सिद्ध, युनानी, औषधांना वैश्विक स्तरावर खूप मोठी मागणी येत आहे. जगातले अनेक देश आता महामारीपासून बचाव करण्यासाठी पारंपरिक वनौषधीचा वापर करण्यावर भर देत आहेत.

मित्रांनो,

आयुर्वेद आणि एकात्मिक औषधांच्या क्षेत्रामध्ये भारताचा जो अनुभव आहे, तो जगाबरोबर सामायिक करणे,  ही भारत आपली जबाबदारी समजतो. मधुमेह, स्थुलता, नैराश्य यासारख्या अनेक आजारांबरोबर दोन हात करण्यासाठी भारताच्या योग परंपरेचा जगाला खूप मोठा उपयोग होत आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून योगाचा प्रसार होत आहे. आणि जगभरातल्या लोकांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी, मन-शरीर-चेतना यांच्यामध्ये संतुलन कायम राखण्यासाठी योगामुळे मदत होत आहे. योगचा विस्तार करण्यासाठीही या नवीन संस्थेने महत्वपूर्ण भूमिका बजावण्याची खूप आवश्यकता आहे.


सन्माननीय महोदय, आज या प्रसंगी मी या वैश्विक केंद्रासाठी पाच लक्ष्य ठेवू इच्छितो. पहिले लक्ष्य - तंत्रज्ञानाचा उपयोग करून पारंपरिक विद्यांचे संकलन करून त्याचा डेटाबेस तयार करण्याचे आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये पारंपरिक औषधांची वेगवेगळी परंपरा आहे. या केंद्रामध्ये या परंपरांचे संकलन करून एक वैश्विक संग्रह अथवा भांडार बनविले पाहिजे. हे केंद्र या परंपरांची माहिती, मूळ पद्धतींच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यांचे एक संकलन करू शकते. यामुळे वेग-वेगळ्या देशांमध्ये उपलब्ध असलेल्या पारंपरिक औषधोपचाराविषयी महत्वपूर्ण माहिती, येणा-या पिढीला मिळण्यासाठी मदत होवू शकणार आहे. यासाठी हे काम करणे अत्यावश्यक आहे.

मित्रांनो,

या वैश्विक केंद्राने पारंपरिक औषधांच्या चाचण्या आणि प्रमाणिकरणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाही निश्चित केला पाहिजे. हे आपल्या संस्थेचे दुसरे लक्ष्य असू शकते. यामुळे प्रत्येक देशामधल्या लोकांचा या औषधोपचारावर असलेला विश्वास अधिक वाढेल. आपण पाहतोय की, भारताची अनेक पारंपरिक औषधे, अतिशय प्रभावी आहेत असे परदेशी लोकांना दिसून आले आहे. परंतु वैश्विक परिमाणानुसार ती नसल्यामुळे त्यांचा नियमित व्यापार खूप मर्यादित असतो. म्हणूनच त्यांची उपलब्धताही कमी असते. मला वाटते की, इतर देशांनाही अशाच प्रकारची समस्या येत असणार. या वैश्विक केंद्राने  औषधांच्या परिमाणांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काम केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अलिकडेच आयुर्वेद, पंचकर्म आणि यूनानी यांच्यासाठी ‘मापदंड ’ तयार केले आहेत. त्याचा विस्तार करणेही आवश्यक आहे.


मित्रांनो,

सीजीटीएम अर्थात पारंपरिक औषध वैश्विक केंद्र म्हणजे एक असे व्यासपीठ बनले पाहिजे, जिथे जगभरातले  पारंपरिक औषधोपचार पद्धतींचे  तज्ज्ञ एकत्रित यावेत, त्यांनी आपले अनुभव सामायिक करावेत. या प्रयत्नांना या वैश्विक केंद्राच्या वतीने आपले तिसरे लक्ष्य बनवता येईल. या संस्थेच्या वतीने, दरवर्षी एक मोठा समारंभ केला जावू शकतो का? पारंपरिक औषधांविषयी वार्षिक महोत्सवाचे आयोजन करता येवू शकेल का? अशा महोत्सवामध्ये जगभरातून जास्तीत जास्त देशांतले तज्ज्ञ एकत्रित जमून चिंतन करू शकतील, आपल्या औषधोपचाराच्या पद्धती सामायिक करतील.

मित्रांनो,

मला असे वाटते की, या केंद्राचे चौथे लक्ष्य संशोधनाशी निगडित असले पाहिजे. ‘सीजीटीएम’ला पारंपरिक औषधांच्या क्षेत्रामध्ये संशोधनासाठी निधी अधिकाधिक मिळणे गरजे आहे. आपण पाहतो की, आधुनिक औषधनिर्माण कंपन्यांसाठी संशोधन क्षेत्रामध्ये लक्षावधी-अब्जावधी डॉलर्स उपलब्ध असतात. आपल्याला त्याच पद्धतीने पारंपरिक औषधांच्या संशोधनासाठीही  निधीचे स्त्रोत  तयार केले पाहिजेत. पाचवे लक्ष्य औषधोपचारामध्ये कार्यवर्तन पद्धतीविषयी संशोधन करून कार्यनियम तयार करण्याचे आहे. प्रत्येक, विशिष्ट आजारासाठी सर्वंकष-  समग्र ‘औषधोपचार नियमावली ’  विकसित करण्याचे काम ‘सीजीटीएम’ करू शकते. त्यामुळे रूग्णाला आधुनिक आणि पारंपरिक औषधोपचार अशा दोन्हींचा लाभ मिळू शकेल. आपल्या आरोग्य दक्षता कार्यप्रणालीमध्ये या प्राचीन विद्यांचे प्रभावी एकात्मिकरण केले तर अनेक आजारांविरूद्ध लढा देण्यास मदत मिळू शकते.

मित्रांनो,

आपण भारतीय वसुधैव कुटुंबकम् आणि सर्वे संतु निरामयः अशी भावना मनात बाळगून जगणारे लोक आहोत. संपूर्ण जग म्हणजे एक कुटुंब  आहे आणि कुटुंब  नेहमीच निरोगी रहावे  असे  आपले तत्वज्ञान आहे.  आज या वैश्विक पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेने भारताची ही परंपरा अधिक समृद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे हे केंद्र, जगभरातल्या लोकांचे आरोग्य अधिक चांगले बनवेल, या कामनेबरोबरच मी आपले भाषण समाप्त करतो. आणि मी आता,  दोन्ही अतिथींनी आपला बहुमूल्य वेळ देवून आणि या समारंभाला एक विशिष्ट उंची प्राप्त करून देण्‍याबरोबरच, त्याचे महत्व वाढविल्याबद्दल अगदी मनापासून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद! नमस्कार !!

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s digital landscape shows potential to add $900 billion by 2030, says Motilal Oswal’s report

Media Coverage

India’s digital landscape shows potential to add $900 billion by 2030, says Motilal Oswal’s report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi participates in Vijaya Dashami programme in Delhi
October 12, 2024

 The Prime Minister Shri Narendra Modi participated in a Vijaya Dashami programme in Delhi today.

The Prime Minister posted on X:

"Took part in the Vijaya Dashami programme in Delhi. Our capital is known for its wonderful Ramlila traditions. They are vibrant celebrations of faith, culture and traditions."