पंतप्रधानांनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क पूल असलेला चिनाब पूल आणि भारताचा पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी पुलाचे केले उद्घाटन
आज उद्घाटन करण्यात आलेले भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल - पंतप्रधान
आपण भारत मातेचे वर्णन नेहमीच श्रद्धापूर्वक काश्मीर ते कन्याकुमारी असे केले, आज आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे: पंतप्रधान
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प हा नवीन, सक्षम जम्मू-काश्मीरचे प्रतीक असून ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा जयघोष आहे - पंतप्रधान
चिनाब आणि अंजी पूल जम्मू-काश्मीरच्या समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून काम करतील: पंतप्रधान
जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
दहशतवादापुढे भारत झुकणार नाही, जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे: पंतप्रधान
पाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकेल, तेव्हा त्याला आपल्या लज्जास्पद पराभवाचे स्मरण होईल : पंतप्रधान

ॐ.. माता वैष्णो देवी दे चरने च मत्था टेकना जय माता दी!

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, जितेंद्र सिंह, व्ही सोमण्णा  जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार जी, जम्मू काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील जी, संसदेतील माझे सहकारी  जुगल किशोर जी, अन्य लोकप्रतिनिधिगण आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो , वीर जोरावर सिंह जी यांची ही भूमी आहे , या भूमीला मी वंदन करतो.

मित्रहो,

आजचा हा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे भारताच्या रेल्वे जाळ्याशी जोडले गेले आहे. भारतमातेचे वर्णन करताना, आपण आदराने म्हणतो - काश्मीर ते कन्याकुमारी. हे आता रेल्वे जाळ्यासाठीही वास्तव बनले आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला, हे रेल्वे मार्ग प्रकल्प, ही फक्त नावे नाहीत.  ही जम्मू आणि काश्मीरच्या नवीन सामर्थ्याची ओळख आहे. हा  भारताच्या नवीन सामर्थ्याचा जयघोष आहे. काही वेळापूर्वीच मला चिनाब पूल आणि अंजी पुलाचे लोकार्पण  करण्याची संधी मिळाली. आजच जम्मू आणि काश्मीरला दोन नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. जम्मूमध्ये एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात आली आहे. 46 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला नवी गती  मिळेल. विकासाच्या या नवीन युगासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीरच्या अनेक पिढ्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहतच निघून गेल्या आहेत.  मी काल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जी यांचे एक वक्तव्य पाहत होतो आणि त्यांनीही आता त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला, ते देखील म्हणाले होते की ते जेव्हा सातवी-आठवीत शिकत होते , तेव्हापासूनच हा  प्रकल्प  पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते. आज जम्मू-काश्मीरच्या लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आणि हे देखील खरे आहे, जेवढी चांगली कामे आहेत ना , ती  माझ्यासाठीच  शिल्लक राहिली आहेत.

मित्रहो,

हे आमच्या सरकारचे भाग्य आहे की आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाने गती घेतली आणि आम्ही तो पूर्ण करून दाखवला. मधल्या  कोविडच्या काळात अनेक अडचणी आल्या, परंतु आम्ही ठाम राहिलो.

 

मित्रहो,

मार्गात येण्याजाण्याच्या अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत कोसळणाऱ्या  दरडी , हा  प्रकल्प पूर्ण करणे कठीण होते, आव्हानात्मक होते. मात्र आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान देण्याचा मार्ग निवडला आहे. आज जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधले जाणारे सर्व प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेणारे पायाभूत सुविधा प्रकल्प हे याचे एक उदाहरण आहेत. काही महिन्यांपूर्वीच सोनमर्ग बोगदा सुरू झाला  आहे. आता काही वेळापूर्वीच मी चिनाब आणि अंजी पुलावरून तुम्हाला भेटायला आलो आहे.या पुलांवरून चालताना, मी भारताच्या बुलंद आकांक्षा, आपले अभियंते आणि कामगारांचे कौशल्य आणि धाडस अनुभवले आहे. चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. लोक पॅरिसमधील फ्रान्स येथे आयफेल टॉवर पाहण्यासाठी  जातात. आणि हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही खूप उंच आहे. आता लोक चिनाब पुलावरून काश्मीर पाहण्यासाठी तर जातीलच , हा  पूल देखील एक आकर्षक पर्यटन स्थळ बनेल.  सर्वजण सेल्फी पॉइंटवर जातील आणि सेल्फी काढतील. आपला अंजी ब्रिज देखील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. हा भारतातील पहिला केबल-समर्थित रेल्वे पूल आहे. हे दोन्ही पूल केवळ विटा , सिमेंट,स्टील आणि लोखंडापासून बनवलेले नाहीत, तर ते पीर पंजालच्या दुर्गम डोंगरांवर उभे , भारताच्या शक्तीचे जिवंत प्रतीक आहेत. ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची सिंहगर्जना आहे. यावरून दिसून येते की विकसित भारताच्या स्वप्नाइतकेच आपले धैर्य आणि ताकद  बुलंद  आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले चांगले हेतू आणि उद्दिष्टे आहेत.

मित्रहो,

चिनाब पूल असो किंवा अंजी पूल, हे जम्मू आणि काश्मीर,  दोन्ही प्रदेशांच्या समृद्धीचे माध्यम  बनतील. यामुळे पर्यटन तर वाढेलच , अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही प्रदेशातील व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील. यामुळे येथील उद्योगाला चालना मिळेल, आता काश्मीरमधील सफरचंदे कमी किमतीत देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचू शकतील आणि वेळेवर पोहोचू शकतील.  सुकामेवा असो किंवा पश्मीना शाल, येथील हस्तशिल्पे  आता देशाच्या कोणत्याही भागात सहज पोहोचू शकतील . यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना देशाच्या इतर भागात प्रवास करणे देखील खूप सोपे होईल.

मित्रहो,

मी इथल्या संगलदान येथील एका विद्यार्थ्याने वर्तमानपत्रात लिहिलेली टिप्पणी वाचत होतो. त्या विद्यार्थ्याने सांगितले की आतापर्यंत त्याच्या गावातील जे लोक गावाबाहेर गेले होते त्यांनीच रेल्वे पाहिली होती. गावातील बहुतेक लोकांनी  रेल्वेचा केवळ व्हिडिओ पाहिला होता.  त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की त्यांच्या डोळ्यासमोरून खरोखरच एक रेल्वेगाडी जाईल. मी असेही वाचले आहे की अनेकजण गाड्यांच्या येण्याजाण्याच्या  वेळा लक्षात ठेवत आहेत. आणखी एका मुलीने खूप चांगली गोष्ट सांगितली, ती मुलगी म्हणाली - आता रस्ते सुरु राहतील  की बंद राहतील  हे हवामानावर ठरणार नाही, आता ही नवीन रेल्वे सेवा प्रत्येक ऋतूत लोकांना  मदत करत राहील.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट एकाहून एक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती,इथले संस्कार , इथली आध्यात्मिक चेतना, निसर्ग सौंदर्य, इथल्या वनौषधी , फळे आणि फुलांचा विस्तार, इथल्या युवकांमध्ये , तुमच्याकडे असलेली प्रतिभा मुकुटातील मण्याप्रमाणे  चमकत आहे .

 

मित्रहो,

तुम्हाला चांगलेच माहित आहे की मी गेल्या अनेक दशकांपासून जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहे. मला इथल्या दुर्गम भागात भेट देण्याची आणि राहण्याची संधी मिळाली आहे. मी कायमच  इथली क्षमता पाहिली आहे आणि अनुभवली आहे आणि म्हणूनच मी जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी पूर्ण समर्पणाने झटत  आहे.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या शिक्षण आणि संस्कृतीचे वैभव  राहिले आहे. आज भारत,आपले जम्मू आणि काश्मीर जगातील सर्वात मोठ्या ज्ञान केंद्रांपैकी एक बनत आहे, त्यामुळे यामध्ये भविष्यात जम्मू आणि काश्मीरचा  सहभागही वाढणार आहे. इथे आयआयटी, आयआयएम, एम्स आणि एनआयटी सारख्या संस्था आहेत. जम्मू आणि श्रीनगरमध्ये केंद्रीय विद्यापीठे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये संशोधन परिसंस्था देखील विस्तारत आहेत .

मित्रहो,

शिक्षणाबरोबरच येथे वैद्यकीय उपचारासाठीही अभूतपूर्व काम केले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन राज्यस्तरीय कर्करोगविषयक  संस्था स्थापन झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये येथे सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. जेव्हा वैद्यकीय महाविद्यालय सुरू होते  तेव्हा  त्याचा रुग्णांबरोबरच त्या भागातील युवा वर्गालाही सर्वात जास्त फायदा होतो हे तुम्हाला माहितच  आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता एमबीबीएसच्या जागांची संख्या 500 वरून वाढून 1300 पर्यंत पोहोचली आहे. मला आनंद आहे की आता रियासी जिल्ह्यालाही नवीन वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे. श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स हे आधुनिक रुग्णालय तर आहेच, ते आपल्या दान-पुण्य करण्याची आपली जी संस्कृती आहे त्याचेही उदाहरण आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जी रक्कम खर्च झालेली आहे त्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून माता वैष्णो देवीच्या चरणी आलेल्या लोकांनी दान केले आहे. मी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि त्याचे अध्यक्ष मनोज जी यांना या पवित्र कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या रुग्णालयाची क्षमताही 300 खाटांवरून वाढवून 500 खाटांची केली जात आहे. कटरामध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनाही यामुळे खूप दिलासा मिळणार आहे.

मित्रहो,

केंद्रातील भाजपा-एनडीए सरकारला आता 11 वर्षे होत आहेत. ही 11 वर्षे, गरीब कल्याणासाठी समर्पित राहिली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे 4 कोटी गरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उज्ज्वला योजनेमुळे 10 कोटी स्वयंपाकघरे धुरमुक्त झाली आहेत, आपल्या बहिणी, मुलींच्या आरोग्याचे रक्षण झाले आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे 50 कोटी गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळाले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे प्रत्येक ताटात पोटभर अन्नधान्याची सुनिश्चिती झाली आहे. जनधन योजनेमुळे पहिल्यांदाच 50 कोटींहून अधिक गरिबांसाठी बँकेचे दार उघडले आहे. अंधारात जगत असलेल्या  अडीच कोटी कुटुंबांपर्यंत सौभाग्य योजनेमुळे विजेचा प्रकाश पोहोचला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या 12 कोटी शौचालयांनी उघड्यावर शौचाला जाण्याच्या विवशतेतून सुटका केली आहे. जल जीवन अभियानामुळे 12 कोटी नवीन घरांमध्ये नळाने पाणी पोहोचू लागले आहे, महिलांचे जीवन  सुलभ झाले आहे. पीएम किसान सन्मान निधीमुळे 10 कोटी लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली आहे.

 

मित्रहो,

सरकारच्या अशा अनेक प्रयत्नांमुळे मागील 11 वर्षांत 25 कोटींहून अधिक गरिबांनी, आपल्याच गरीब बंधू-भगिनींनी, गरिबीविरुद्ध लढा दिला आणि 25 कोटी गरीब, गरिबीला पराभूत करून, विजयी होऊन, गरिबीतून बाहेर आले आहेत. आता ते नव मध्यमवर्गाचा भाग बनले आहेत. जे लोक स्वतःला समाज व्यवस्थेचे तज्ज्ञ मानतात, मोठे तज्ज्ञ मानतात, जे लोक पुढचा-मागचा या राजकारणात बुडालेले असतात, जे लोक दलितांच्या नावावर राजकीय पोळ्या भाजत आले आहेत, जरा मी फक्त ज्या योजनांचा उल्लेख केला आहे, त्याकडे नजर टाका. कोण लोक आहेत ज्यांना या सुविधा मिळाल्या आहेत, ते कोण लोक आहेत जे स्वातंत्र्यानंतर 7-7 दशकांपर्यंत या प्राथमिक सुविधांपासून वंचित राहिले होते. हे माझे दलित बंधू-भगिनी आहेत, हे माझे आदिवासी बंधू-भगिनी आहेत, हे माझे मागासलेले बंधू-भगिनी आहेत, हे डोंगरांवर उदरनिर्वाह करणारे, हे जंगलात वस्ती करणारे, झोपडपट्टीत संपूर्ण आयुष्य घालवणारे, अशी ही ती कुटुंबे आहेत, ज्यांच्यासाठी मोदींनी आपली 11 वर्षे खर्च केली आहेत. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की गरिबांना, नव मध्यमवर्गाला जास्तीत जास्त ताकद द्यावी. वन रँक वन पेन्शन असो, 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगाराला करमुक्त करणे असो, घर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे असो, स्वस्त हवाई प्रवासासाठी मदत देणे असो, प्रत्येक प्रकारे सरकार, गरीब आणि मध्यमवर्गासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहे.

मित्रहो,

गरिबांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांना  मदत करणे, पण प्रामाणिकपणे जगणाऱ्या, देशासाठी वेळोवेळी कर देणाऱ्या, मध्यमवर्गाची ताकद वाढवणे, यासाठीही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतके काम झाले आहे, जे आम्ही करून दाखवले आहे.

मित्रहो,

आम्ही आपल्याकडे युवा वर्गासाठी सातत्त्याने रोजगाराच्या नवीन संधी वाढवत आहोत आणि याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे- पर्यटन. पर्यटनामुळे रोजगार मिळतो, पर्यटन लोकांना जोडते. पण दुर्दैवाने आपला शेजारचा देश, मानवतेचा विरोधक, सलोख्याचा विरोधक, पर्यटनाचा विरोधक, इतकेच नाही तो असा देश आहे, गरिबांच्या पोटापाण्याचाही विरोधक आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही झाले, ते याचेच उदाहरण आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये माणुसकी आणि काश्मीरियत, या दोन्हीवर वार केला. त्याचा हेतू भारतात दंगे घडवण्याचा होता. त्याचा हेतू काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवण्याचा होता. त्यामुळेच पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला. ते पर्यटन, जे गेल्या 4-5 वर्षांपासून सतत वाढत होते, दरवर्षी इथे विक्रमी संख्येने पर्यटक येत होते. ज्या पर्यटनामुळे, जम्मू काश्मीरमधील गरिबांचे घर चालते, त्याला पाकिस्तानने लक्ष्य केले. कोणी घोडे हाकणारे, कोणी हमाल, कोणी गाईड, कोणी गेस्ट हाऊसवाला, कोणी दुकान-ढाबा चालवणारा, पाकिस्तानचे   हे कारस्थान या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचे होते. दहशतवाद्यांना आव्हान देणारा तरुण आदिल, तोही तर तिथे मेहनत-मजुरी करण्यासाठी गेला होता,  आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू, म्हणून मेहनत करत होता. दहशतवाद्यांनी त्या आदिललाही मारले.

मित्रहो,

पाकिस्तानच्या या कारस्थानाच्या विरोधात ज्या प्रकारे जम्मू-काश्मीरचे लोक उभे ठाकले आहेत, जम्मू काश्मीरच्या जनतेने यावेळी जी ताकद दाखवली आहे, हे फक्त पाकिस्तानलाच नाही, तर जगभरातील दहशतवादी मानसिकतेला, जम्मू काश्मीरच्या लोकांनी ठाम संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी आता दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचे मनाशी पक्के केले आहे. हा तो दहशतवाद आहे, ज्याने खोऱ्यात शाळा जाळल्या, आणि फक्त शाळा म्हणजे इमारत नव्हती जाळली, दोन-दोन पिढ्यांचे भविष्य जाळून टाकले होते. रुग्णालये उद्ध्वस्त केली. ज्याने अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या. इथे जनता आपल्या पसंतीचे प्रतिनिधी निवडू शकेल, इथे निवडणुका होऊ शकतील, हेही दहशतवादामुळे मोठे आव्हान बनले होते.

मित्रहो,

वर्षानुवर्षे दहशतवाद सहन केल्यानंतर जम्मू-काश्मीरने इतका विध्वंस पाहिला होता की जम्मू काश्मीरच्या लोकांनी स्वप्ने पाहणेच सोडून दिले होते, दहशतवादालाच आपले प्रारब्ध मानले होते. जम्मू-काश्मीरला या स्थितीतून बाहेर काढणे गरजेचे होते, आणि आम्ही ते करून दाखवले आहे. आज जम्मू-काश्मीरचा तरुण नवीन स्वप्नेही पाहत आहे आणि ती पूर्णही करत आहे. आता काश्मीरचा तरुण बाजारपेठांना, शॉपिंग मॉल्सना, सिनेमा हॉलना गजबजलेले पाहून आनंदी आहे.येथील लोक जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा चित्रपटांच्या चित्रणाचे प्रमुख केंद्र होताना पाहू इच्छित आहेत, या भागाला खेळांचे मोठे केंद्र झालेले पाहू इच्छित आहेत. हीच भावना आपण आत्ताच माता खीर भवानीच्या जत्रेत देखील पाहिली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक मातेच्या द्वारी आले त्यातून नव्या जम्मू-काश्मीरचे चित्र दिसते. आता 3 तारखेपासून अमरनाथ यात्रा देखील सुरु होत आहे. ईदच्या सणाचा उत्साह देखील चोहीकडे दिसतो आहे. विकासाचे जे वातावरण जम्मू-काश्मीरमध्ये तयार झाले होते ते पहलगाम हल्ल्यामुळे डळमळणार नाही. जम्मू-काश्मीर मधील सर्व लोकांना, तुम्हा सर्वांना नरेंद्र मोदी असे वचन देतो की मी येथील विकास थांबू देणार नाही,येथील तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात एखादा अडथळा अथवा समस्या निर्माण होत असेल तर त्या समस्येला आधी मोदीचा सामना करावा लागेल.  

 

मित्रांनो,

आज 6 जून आहे, आठवून बघा, बरोबर एका महिन्यापूर्वी, 6 मे च्या त्या रात्री पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा थरकाप उडाला होता. आता पाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्या देशाला त्यांचा लाजिरवाणा पराभव आठवेल. पाकिस्तानी सेना आणि दहशतवाद्यांनी कधी असा विचार देखील केला नसेल की भारताचे सैन्य पाकिस्तानात शेकडो किलोमीटर अंतर्भागात जाऊन दहशतवाद्यांवर अशा पद्धतीने वार  करेल. वर्षानुवर्षे  त्यांनी दहशतवादाचे जे इमले उभे केले होते ते काही मिनिटांतच उध्वस्त झाले. आणि हे पाहून पाकिस्तान खवळला आणि तो राग जम्मूतील, पूँछ मधील तसेच इतर जिल्ह्यांतील लोकांवर काढला. संपूर्ण जगाने पाहिले की पाकिस्तानने या भागातील घरे कशी उध्वस्त केली, लहान मुलांवर तोफगोळ्यांचा हल्ला केला, शाळा-रुग्णालये उडवून दिली, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारांवर देखिल बॉम्ब फेकले. तुम्ही ज्या प्रकारे पाकिस्तानच्या हल्ल्यांचा सामना केलात ते प्रत्येक देशवासीयाने पाहिले आहे. म्हणूनच, प्रत्येक देशवासी संपूर्ण शक्तीनिशी तुमच्या कुटुंबांसोबत उभा आहे.

मित्रांनो,

ज्या लोकांचा सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना काही दिवसांपूर्वीच नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे प्रभावित 2 हजारहून अधिक कुटुंबांची वेदना ही  आमची स्वतःची वेदना आहे. या कुटुंबांना तोफांच्या माऱ्यानंतर घराच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्यात आली होती.  आता केंद्र सरकारने असे ठरवले आहे की ही मदत आणखीन वाढवण्यात यावी. आजच्या या कार्यक्रमात मी याबद्दल देखील माहिती देऊ इच्छितो.

मित्रांनो,

या आपत्तीमध्ये ज्या घरांचे बरेच नुकसान झाले आहे त्यांना आता 2 लाख रुपये आणि ज्या घरांची थोड्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना 1 लाख रुपयांची वेगळी मदत आधीच्या मदतीसह अतिरिक्त सहाय्य म्हणून दिली जाईल. म्हणजेच आता त्यांना पहिल्या वेळी मिळालेल्या मदतीसह ही अधिकची रक्कम मिळणार आहे.

मित्रांनो,

आमचे सरकार सीमावर्ती भागातील रहिवाशांना देशाचे प्रथम रखवालदार मानते. गेल्या दशकात सरकारने सीमेवरील जिल्ह्यांमध्ये विकास आणि सुरक्षा यासाठी अभूतपूर्व कार्य केले आहे, या दरम्यान सुमारे दहा हजार नवे खंदक तयार करण्यात आले आहेत. या खंदकांनी, ऑपरेशन सिंदूरनंतरच्या परिस्थितीत लोकांचे जीव वाचवण्यास बरीच मदत केली. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, जम्मू आणि काश्मीर विभागासाठी दोन सीमा तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. दोन महिला तुकड्या तयार करण्याचे कार्य देखील पूर्ण झाले आहे.

मित्रांनो,

आपली जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तिच्या आसपास अतिशय  दुर्गम असलेल्या  भागात  शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्या पायाभूत सुविधा तयार करण्यात येत आहेत. कथुआ ते जम्मू महामार्गाचे रुपांतर सहा पदरी द्रुतगती महामार्गात करण्यात येत आहे, अखनूर ते पूँछ महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमांतर्गत देखील सीमेवरील गावांमध्ये विकासकार्यांना वेग देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 400 गावांशी सर्व मोसमात संपर्क शक्य नसे , त्यांना 1800 किमी लांबीच्या नव्या रस्त्यांचे बांधकाम करून इतर भागाशी जोडण्यात येत आहे. या कामासाठी सरकार 4200 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे.

 

मित्रांनो,

आज मी जम्मू-काश्मीरच्या तुम्हा सर्वांना, विशेषतः येथील तरुणांना एक विशेष आग्रह देखील करण्यासाठी आलो आहे आणि जम्मू-काश्मीरच्या भूमीवरून मी देशाला देखील आग्रह करू इच्छितो. ऑपरेशन सिंदूरद्वारे आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य कसे दिसून आले हे तुम्ही पाहिलेच असेल. आज संपूर्ण जग भारताच्या संरक्षण परिसंस्थेची चर्चा करत आहे. आणि याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या सैन्यदलांचा ‘मेक इन इंडिया’वरील विश्वास. आपल्या सैन्यांनी जे करून दाखवले त्याचे अनुकरण आता प्रत्येक भारतवासीयाला करायचे आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही उत्पादन अभियानाची घोषणा केली. या अभियानांतर्गत सरकार देशातील उत्पादन क्षेत्राला नवी झेप घेण्यासाठी तयार करत आहे. मी जम्मू-काश्मीरच्या युवकांना असे सांगेन की तुम्ही या आणि या अभियानाचा भाग व्हा. देशाला तुमची आधुनिक विचारधारा हवी आहे, तुमच्या नवोन्मेषाची देशाला गरज आहे. तुमच्या संकल्पना, तुमची कौशल्ये भारताच्या संरक्षण क्षेत्राला, भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जातील. गेल्या 10 वर्षांमध्ये भारत एक मोठा संरक्षण सामग्री निर्यातदार देश बनला आहे. आता जगातील सर्वोत्कृष्ट दहा संरक्षण सामग्री निर्यातदार देशांमध्ये भारताचे नाव समाविष्ट व्हावे हे आमचे लक्ष्य आहे. या लक्ष्याच्या दिशेने आपण जितक्या वेगाने वाटचाल करू तितक्याच वेगाने भारतात रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो,

आपल्याला आणखी एक निश्चय करायचा आहे. ज्या वस्तू भारतात तयार झाल्या आहेत, ज्यासाठी आपल्या देशवासियांनी घाम गाळला आहे, अशाच वस्तू आपण आधी खरेदी केल्या पाहिजेत आणि हीच खरी देशभक्ती आहे, हीच देशाची सेवा आहे. आपल्याला सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या सेनादलांचा सन्मान वाढवायचा आहे आणि बाजारपेठांमध्ये आपल्याला ‘मेड इन इंडिया’ च्या गौरवात भर घालायची आहे. 

 

मित्रांनो,

एक सोनेरी आणि उज्ज्वल भविष्य जम्मू-काश्मीरची वाट पाहत आहे. केंद्र सरकार आणि येथील सरकार एकत्र येऊन विकास कार्यांमध्ये गुंतलेले आहेत, परस्परांना सहयोग देत आहे. शांतता आणि समृद्धीच्या ज्या मार्गाने आपण पुढे निघालो आहोत, त्या मार्गाला आपण सतत बळकट केले पाहिजे. माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीरचा हा निश्चय पूर्ततेपर्यंत पोहोचावा याच इच्छेसह तुम्हा सर्वांचे या अनेकानेक विकास प्रकल्पांसाठी आणि एकापेक्षा एक भव्य प्रकल्पांसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. दोन्ही मुठी उंचावून  संपूर्ण शक्तीनिशी माझ्याबरोबर जयघोष करा -

 

भारत माता की जय ! आवाज हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दुमदुमला पाहिजे.

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप-खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors

Media Coverage

PLI schemes attract ₹2 lakh crore investment till September, lift output and jobs across sectors
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 डिसेंबर 2025
December 13, 2025

PM Modi Citizens Celebrate India Rising: PM Modi's Leadership in Attracting Investments and Ensuring Security