योग आपल्याला एकमेकांशी जोडतो आणि आपल्याला एकत्र आणतो: पंतप्रधान
जेव्हा योग ही जीवनशैली बनते, तेव्हा ती मानवी एकतेचा पाया बनते : पंतप्रधान
योग आपल्या शरीराला लवचिक बनवण्यास मदत करतो, आपली ऊर्जा पातळी उच्च राखतो: पंतप्रधान
योग आपल्याला संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो: पंतप्रधान
योग मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग दाखवतो: पंतप्रधान

आदरणीय राज्यपाल आर. एन. रवी जी, उर्जावान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी प्रतापराव जाधव जी, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, कोलकाता येथे जमलेले सर्व सहभागी, तसेच भारतभरातून आणि जगभरातून या योग उत्सवात सहभागी होणारे सर्वजण आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.

21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागांमध्ये सर्वात मोठा  दिवस असतो. तसेच, 'आंतरराष्ट्रीय योग दिना'मुळे 21 जून हा दिवस जगातील सर्वात मोठ्या सामूहिक उत्सवाचा दिवसही बनला आहे. जगभरातून योगाभ्यासाची अद्भुत दृश्ये समोर येत आहेत. भारतात, हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत आणि पूर्वेकडील ईशान्य व बंगालपासून पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत, संपूर्ण देश योगाच्या ऊर्जेने आणि चैतन्याने भारलेला  दिसत आहे. संपूर्ण देश आणि संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले पहायला मिळत आहे - आणि हीच तर योगची खरी ताकद आहे. योग सर्वांना जोडतो, योग सर्वांना एकत्र आणतो. या निमित्ताने, मी संपूर्ण जगाला आणि समस्त मानवजातीला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज, योग दिनानिमित्त, मी कोलकाता आणि विशेषतः बंगालमधील लोकांचे 'स्वच्छतेचा योग' साठी  कौतुक करू इच्छितो. हा एक अद्भुत उपक्रम आहे – 'स्वच्छता से स्वागत' या मोहिमेअंतर्गत येथे करण्यात आलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांचे कर्तव्यपालन हे आपल्या सर्व देशवासियांसाठी एक मोठी प्रेरणा ठरले आहे.

मित्रहो,

योग दिनाच्या निमित्ताने  बंगालमध्ये असणे ही खरोखरच एक विशेष बाब आहे. बंगालची ही पवित्र भूमी – जिथे भगवान रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या संतांचा जन्म झाला, जिथे स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली, जिथे महर्षी अरविंद यांच्यासारख्या महान योगींचा  जन्म झाला आणि जिथे लाहिरी महाशयांनी योग परंपरेला नव्या उंचीवर नेले – अशा या भूमीवर सामूहिक योगाचा अनुभव घेणे ही एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते. याच भूमीवर जन्मलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा ठाम विश्वास होता की, माणसाची ओळख ही वेगळे राहण्यात नसून आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडले जाण्यात असते. हा परस्पर संबंध म्हणजेच योगाचे मूलतत्व आहे. महर्षी अरविंद यांनीही म्हटले आहे की – आपले संपूर्ण जीवन हाच योग आहे, भले  आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो. जेव्हा योग हा आपल्या स्वभावाचा भाग बनतो, तेव्हा तो मानवी एकतेचा पाया बनतो.

योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नाही. योग कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित देखील नाही. भारतात आपण जाणतो  आणि आपण पाहिले आहे की, योग हा मानवी जीवनातील एक प्रकाश आहे; तो चेतना आणि ऊर्जा यांचा संगम आहे. म्हणूनच, आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी या वर्षी 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही संकल्पना निवडण्यात आली आहे. वाढत्या वयातही  आपण निरोगी, उत्साही आणि सक्रिय राहू शकतो, यासाठी योग आपल्याला मार्ग दाखवतो.

मित्रांनो, जेव्हा आपण 'निरोगी वृद्धत्वासाठी योग'  याबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, वाढत्या वयामुळे मानवी क्षमता कमी होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. मानवी जीवनात सतत प्रगतीची आकांक्षा बाळगण्यासाठी योग मदत करू शकतो. विसाव्या वयाच्या  तुलनेत चाळीशीत आपण अधिक लवचिक असणे, हे आपले ध्येय असायला हवे. तिशीच्या तुलनेत पन्नाशीत आपण अधिक उत्साही असणे आणि पन्नाशीच्या तुलनेत सत्तरीत जीवनशैलीशी संबंधित आजारांविरुद्ध अधिक चांगली प्रतिकार शक्ती असणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे. अशा वेळी योग आपल्याला मदत करतो. तो आपल्या शरीराला लवचिक बनवण्यास मदत करतो. योग आपली ऊर्जा पातळी उच्च राखण्यास तसेच शांत आणि तणावमुक्त जीवन जगण्यास आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. शिवाय, नियमित सरावामुळे योग आपल्याला आयुष्यभर आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि मनाबद्दल सतत शिकवत  असतो. आपण स्वतःबद्दल जितके अधिक जाणून घेऊ, तितकेच आपण स्वतःचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकू. म्हणूनच, 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' ही संकल्पना केवळ वृद्धांसाठीच नाही, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, या दृष्टीने पाहिले  पाहिजे.

मित्रहो, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी योगविषयी सांगितले आहे: युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्न अव-बोधस्य, योगो भवति दुःखहा॥म्हणजेच, संतुलित आहार आणि विहार, संतुलित कृती आणि कर्तव्ये, तसेच संतुलित झोप आणि जागृती यांच्या माध्यमातून योग दुःखाचा नाश करणारा ठरतो. हे संतुलन हाच योगाचा पाया आहे आणि आपल्या जीवनाचाही तोच आधार आहे. मात्र आजच्या काळात बहुतेक लोकांना जीवनातील असंतुलनाशी संघर्ष करावा लागत आहे. योग आपल्याला संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो. योग आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे शिकवतो.  आणि जेव्हा आपण आपल्या शरीराला योग्य दिशा द्यायला शिकतो, तेव्हा आरोग्य हा आपला नैसर्गिक स्वभाव  बनतो.

मित्रहो,

योग केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर तो मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्गही दाखवतो. म्हणूनच योगबाबत 'युक्तचेष्टस्य कर्मसु' असे म्हटले आहे – ज्याचा अर्थ आहे, काय करावे आणि काय करू नये याची जाणीव असणे. ही जाणीव आपल्या जीवनात शांततेचा स्रोत बनते आणि जागतिक शांततेचा मार्गही सुकर  करते. म्हणूनच, आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे, तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे.

मित्रहो,

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लाखो लोक योगसाधनेशी जोडले जातात. परंतु, हा दिवस आपल्याला आपला सामूहिक संकल्प नव्याने करण्याचीही संधी देतो. आपण असा संकल्प करूया की, योग केवळ एका दिवसापुरता किंवा एखाद्या कार्यक्रमापुरता मर्यादित राहणार नाही. आपण योगाभ्यासाला आपल्या जीवनाचा, आपल्या कुटुंबाचा आणि भावी पिढ्यांचा एक अविभाज्य भाग बनवूया.

याच दिशेने, या वर्षी 'योग  365 ' या उपक्रमही गती देण्यात आली आहे. या अंतर्गत 100 दिवसांचा ऑनलाइन योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लोकांचा अभूतपूर्व सहभाग दिसून आला. यात 130 देशांमधील 30 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला.

मित्रहो,

जेव्हा समाज निरोगी बनेल तेव्हा राष्ट्र अधिक सक्षम, अधिक समृद्ध आणि अधिक आत्मविश्वास असलेले बनेल. मी तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो: "सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः". याचबरोबर, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s solar power generation jumps 138% in four years: MNRE

Media Coverage

India’s solar power generation jumps 138% in four years: MNRE
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
August 05, 2026

Prime Minister Narendra Modi will share 'Mann Ki Baat' on Sunday, August 30th. If you have innovative ideas and suggestions, here is an opportunity to directly share it with the PM. Some of the suggestions would be referred by the Prime Minister during his address.

Share your inputs in the comments section below.