नमस्कार,

सर्वात आधी मी प्राध्यापक क्लॉज श्वाब आणि जागतिक आर्थिक मंचच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या कठीण काळातही आपण जागतिक अर्थव्यवस्थेचे हे महत्त्वाचे व्यासपीठ सक्रीय ठेवले आहे. जागतिक अर्थव्यवस्था आता पुढे कशी जाईल हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा असताना प्रत्येकाचे लक्ष या मंचाकडे असणे फारच स्वाभाविक आहे.

मित्रांनो,

सर्व विवंचना असताना देखील, आज मी 1.3 अब्जाहून अधिक भारतीयांच्या वतीने संपूर्ण जगासाठी विश्वास, सकारात्मकता आणि आशेचा संदेश घेऊन आलो आहे. कोरोना साथीच्या आजाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भारतासमोर देखील खूप अडचणी होत्या. मला आठवते गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च-एप्रिलमध्ये जगातील अनेक प्रसिद्ध तज्ञ आणि मोठ्या संस्था काय म्हणाल्या होत्या. संपूर्ण जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल अशी भविष्यवाणी केली होती. भारतात कोरोना संसर्गाची त्सुनामी येईल असे म्हटले होते, तर कोणी सांगितले होते, 700-800 दशलक्ष भारतीयांना कोरोनाचा संसर्ग होईल, कोणीतरी दोन दशलक्षाहून अधिक मृत्यू होतील असा अंदाज वर्तविला होता.

त्या काळात जगाच्या मोठ्या-मोठ्या आणि आरोग्याच्या आधुनिक पायाभूत सुविधा असणाऱ्या देशांची जी स्थिती होती ती पाहून भारतासारख्या विकसनशील देशाबद्दल जगाची काळजी फारच स्वाभाविक होती. त्यावेळी आमची मनःस्थिती काय असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. पण भारताने निराशेला कधीच आपल्यावर अधिराज्य करून दिले नाही. भारत सक्रिय आणि लोकसहभागाच्या दृष्टीकोनासह पुढे मार्गक्रमण करत राहिला.

आम्ही कोविड विशिष्ट आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला, आम्ही आमची मनुष्यबळाला कोरोनाशी लढण्यासाठी, चाचणी आणि मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले आणि त्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा संपूर्ण उपयोग केला.

या युद्धात भारतातील प्रत्येक व्यक्तीने धैर्याने आपले कर्तव्य पार पाडले आणि कोरोनाविरूद्धच्या लढाईला जनआंदोलनात रूपांतरीत केले. आज भारत जगातील अशा अनेक देशांपैकी एक आहे ज्याने आपल्या अधिकाधिक नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले आहे. आज प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

मित्रांनो,

भारताच्या यशाची तुलना कोणत्याही एका देशा सोबत करणे योग्य ठरणार नाही. जगातील 18 टक्के लोकसंख्या असलेल्या या देशाने कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवून संपूर्ण जगाला, मानवतेला मोठ्या संकटातून वाचवले आहे.

कोरोना सुरू झाल्यावर आम्ही मास्क, पीपीई किट्स, चाचणी किट आयात करत होतो. आज आम्ही केवळ आमच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करत नाही तर या सगळ्या गोष्टींची निर्यात करून इतर देशातील नागरिकांची सेवा करीत आहोत. आज संपूर्ण जगात केवळ भारत हा एक असा देश आहे ज्याने जगातील सर्वात मोठा कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरु केला आहे.

पहिल्या टप्प्यात आम्ही आमच्या 30 दशलक्ष आरोग्य आणि अग्रणी आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे लसीकरण करीत आहोत. आम्ही केवळ 12 दिवसांमध्ये 2.3 दशलक्षाहून अधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे, यावरून तुम्ही भारताच्या वेगाचा अंदाज घेऊ शकता. येत्या काही महिन्यांत आम्ही जवळजवळ 300 दशलक्ष वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करू.

मित्रांनो,

सर्वे सन्तु निरामया- संपूर्ण विश्व आरोग्यदायी राहो! भारताने आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या प्रार्थनेचे अनुसरण करून या संकटाच्या काळात देखील भारताने अगदी सुरुवातीपासून आपली जागतिक जबाबदारी पार पाडली आहे. जेव्हा जगातील बर्‍याच देशांमध्ये हवाई वाहतूक बंद होती, तेव्हा भारताने एक लाखाहून अधिक नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यासोबतच दीडशेहून अधिक देशांमध्ये आवश्यक औषधे देखील पाठविली. भारताने अनेक देशांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले. भारतातील पारंपारिक औषध उपचार पद्धती – आयुर्वेद ही रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात कशी मदत करते याविषयी आम्ही जगाला मार्गदर्शन केले.

आज भारत, कोविडची लस जगातील बऱ्याच देशांमध्ये पाठवून, तेथे लसी संबंधित पायाभूत सुविधा तयार करून, इतर देशांच्या नागरिकांचे प्राण वाचवत आहे, आणिजागतिक आर्थिक मंच मधील प्रत्येकाला हे ऐकून दिलासा वाटेल की आता तर केवळ दोन मेड इन इंडिया कोरोना लस आल्या आहेत परंतु येत्या काळात भारतात अजून काही लस तयार होतील.या लस जगातील इतर देशांना अजून मोठ्या स्तरावर आणि वेगाने मदत करतील.

भारताच्या यशाचे हे चित्र, भारताच्या ताकदीच्या या चित्रासोबातच मी जागतिक आर्थिक विश्वाला ही खात्री देऊ इच्छितो की, आर्थिक पातळीवर देखील परिस्थिती वेगाने बदलेल. कोरोनाच्या काळातही भारताने कोट्यवधी रुपयांचे पायाभूत प्रकल्प सुरू करून, रोजगारासाठी विशेष योजना राबवून आर्थिक क्रियाशीलता कायम ठेवली होती. तेव्हा आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यावर भर दिला होता, आता भारतातील प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

आता भारत स्वावलंबी होण्याच्या संकल्पनेसह पुढे जात आहे. भारताच्या स्वावलंबनाची ही आकांक्षा वैश्विकतेला नव्याने मजबूत करेल; आणि मला खात्री आहे की उद्योग 4.0 या मोहीमेल मोठ्या प्रमाणात मदत करेल. यामागे कारण देखील आहे तसेच या विश्वासाचा आधार देखील आहे.

मित्रांनो,

तज्ञांचे मते उद्योग 4.0 चे कनेक्टिव्हिटी, यांत्रिकीकरण , कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग आणि वास्तविक (रिअल-टाइम) डेटा हे चार मुख्य घटक आहेत. आज भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध आहे, जिथे दुर्गम भागात देखील मोबाइल कनेक्टिव्हिटी, स्मार्ट फोन आहे. भारतात यांत्रिकीकरण, डिझाईन या क्षेत्रातील तज्ञ मोठ्या प्रमाणत आहेत. आणि बर्‍याच जागतिक कंपन्यांचे अभियांत्रिकी केंद्रेही भारतात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंगमधील भारताचे सॉफ्टवेअर अभियंते अनेक वर्षांपासून जगाला आपली सेवा देत आहेत.

मित्रांनो,

गेल्या 6 वर्षात भारतात डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात ज्या प्रकारे काम झाले आहे, ते जागतिक अर्थव्यवस्था मंचच्या तज्ज्ञांच्या ही अभ्यासाचा विषय आहे. या पायाभूत सुविधांनी डिजिटल उपायांना भारतीय लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवले आहे. आज, भारतातील 1.3 अब्जाहून अधिक लोकांकडे विशेष ओळखपत्र (आयडी) - आधार आहे. लोकांची बँक खाती आणि त्यांचे आधार हेही त्यांच्या फोनशी जोडलेले आहेत. डिसेंबर महिन्यातच भारतात यूपीआयमार्फत 4 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जगातील मोठे देश भारताने विकसित केलेल्या यूपीआय प्रणाली सारखीच प्रणाली आपल्या देशात राबविण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करीत आहेत हे इथल्या बँकिंग क्षेत्रातील लोकांना माहितच आहे.

मित्रांनो,

कोरोन संकटाच्या काळात अनेक देशांना आपल्या नागरिकांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचविण्याची चिंता भेडसावत होती, कोरोना संकटाच्या काळात आम्हाला हे देखील निदर्शनाला आले होते. पण तुमाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या काळात भारताने 760 दशलक्षाहून अधिक लोकांच्या बँक खात्यात थेट 1.8 ट्रिलियन रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. हे भारताच्या मजबूत डिजिटल पायाभूत सुविधेच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. आमच्या डिजिटल पायाभूत सुविधेने सार्वजनिक सेवा वितरण प्रणालीला सक्षम आणि पारदर्शक बनविले आहे. आता भारत आपल्या 1.3 अब्ज नागरिकांपर्यंत सहज आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी युनिक हेल्थ आयडी उपलब्ध करुन देण्याची मोहीम देखील सुरू करत आहे.

आणि मित्रांनो,

भारताचे प्रत्येक यश हे संपूर्ण जगाच्या यशास मदत करेल, या प्रतिष्ठित मंचाच्या माध्यमातून आज प्रत्येकाला मी हे आश्वासन देतो. आज आम्ही राबवीत असलेले आत्मनिर्भर भारत अभियान हे जागतिक हित आणि जागतिक पुरवठा साखळी प्रती पूर्णपणे वचनबद्ध आहे. जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्याची भारताची क्षमता आणि सक्षमता आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताकडे विश्वसनीयता आहे. आज भारताकडे ग्राहकांची मोठी संख्या आहे याचा जितका विस्तार होईल तितका त्याचा फायदा जागतिक अर्थव्यवस्थेला होईल.

मित्रांनो,

प्राध्यापक क्लॉज श्वाब देखील म्हणाले होते - भारत हा एक संभाव्य जागतिक खेळाडू आहे. मी आज यात आणखी थोडं बोलू इच्छितो की भारत शक्यतांसह आत्मविश्वासाने देखील परिपूर्ण आहे, नवीन उर्जेने भरलेला आहे. मागील काही वर्षांत भारताने सुधारणांवर आणि प्रोत्साहन आधारित उत्तेजनावर जोर दिला आहे.

कोरोनाच्या या कठीण काळातही भारताने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात संरचनात्मक सुधारणांच्या गतीला वेग दिला आहे. या सुधारणांना उत्पादनआधारीत प्रोत्साहन योजनेअंतर्गत सहाय्य दिले जात आहे. भारतामध्ये आता कर प्रणाली पासून थेट परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणका पर्यंत आता खात्रीपूर्वकपणे सांगता येईल असे मैत्रीपूर्ण वातावरण आहे.

भारतात व्यापार सुलभीकरणाची स्थिती देखील निरंतर सुधारत आहे, या दिशेनेही काम चालू आहे; आणि एक विशेष बाब म्हणजे भारत त्याची प्रगती जागतिक हवामान बदलाच्या लक्ष्यासह जुळवून घेत आहे.

मित्रांनो,

उद्योग 4.0 बाबत होत असलेल्या या चर्चेच्या दरम्यान, आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटाने आपल्याला पुन्हा एकदा मानवतेच्या मूल्याची आठवण करून दिली आहे. उद्योग 4.0 हे यंत्रमानवासाठी नाही तर मानवांसाठी आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तंत्रज्ञान हे जीवन सुलभीकरणासाठी कोणताही सापाळा न बनता एक साधन बनले पाहिजे याची खात्री करुन घ्यावी लागेल. यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित पावले उचलली पाहिजेत, आपण सर्वांनी एकत्रित पाऊल उचलले पाहिजे. मला विश्वास आहे की यात आपण यशस्वी होऊ.

याच विश्वासाने, आता मी प्रश्नोत्तराच्या सत्राकडे वळतो आणि आपण त्या दिशेने पुढे जाऊया ...

धन्‍यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India on track to becoming third-largest economy by FY31: S&P report

Media Coverage

India on track to becoming third-largest economy by FY31: S&P report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 सप्टेंबर 2024
September 20, 2024

Appreciation for PM Modi’s efforts to ensure holistic development towards Viksit Bharat