गंगटोक इथं होणाऱ्या सिक्किमच्या 50व्या स्थापना दिन समारंभात पंतप्रधान सहभागी होणार
पंतप्रधानांच्या हस्ते राज्यभरातील 4000 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचे होणार उद्घाटन, भूमीपूजन व पायाभरणी
पायाभूत सुविधा, संपर्कजाळे, आरोग्यसेवा, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, पर्यावरण, पर्यटन आणि शेती यांसारख्या विस्तृत श्रेणीतील प्रकल्पांचा समावेश
सिक्किमच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला गती देणे हा या प्रकल्पांचा उद्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 एप्रिल 2026 रोजी सिक्कीमला भेट देतील. 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे गंगटोक इथं आगमन होणार आहे. 28 एप्रिल रोजी साधारण सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान गंगटोकमधील ऑर्किडेरियम येथे भेट देणार आहेत. राज्याच्या पर्यावरणीय आणि पुष्पवारसाचे दर्शन घडवण्यासाठी 'स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' चा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे ऑर्किड अनुभव केंद्र म्हणून विकास करण्यात आला आहे.

त्यानंतर, सकाळी 10 च्या सुमारास, पंतप्रधान सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनाच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. यावेळी, ते संपूर्ण राज्यातील 4000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन आणि पायाभऱणी करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था , आरोग्यसेवा, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, पर्यावरण, पर्यटन आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांचा विकास या प्रकल्पाद्वारे होणार आहे आणि सिक्कीमधील सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने त्यांची आखणी करण्यात आली आहे.

आरोग्यसेवा क्षेत्रात, नामची जिल्ह्यात यंगांग  इथं 100 खाटांच्या आयुर्वेद रुग्णालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच एनआयटी देवराळी येथे 30 खाटांच्या सोवा रिग्पा या एकात्मिक रुग्णालयाचे उद्धाटन ते करतील; त्यामुळे राज्यातील पारंपरिक आणि एकात्मिक वैद्यकीय उपचार पद्धतींची उपलब्धता अधिक बळकट होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात, पंतप्रधान यंगांग येथील सिक्कीम विद्यापीठाच्या कायमस्वरूपी संकुलाचे उद्घाटन तसेच चाकुंग येथे नेताजी सुभाषचंद्र बोस उत्कृष्टता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे, गंगटोक जिल्ह्यातील सोचेयगँग येथे द हेलेन लेप्चा वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि ग्यालशिंग जिल्ह्यातील डेनटम् येथील डेनटम व्यावसायिक महाविद्यालय यांचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या हस्ते ही ग्याथांग येथे मॉडेल निवासी शाळांचे उद्घाटन होईल, मनगन जिल्ह्यातील मांगशैला इथं एका नवीन मॉडेल डिग्री महाविद्यालयाचे उद्घाटन आणि नामची जिल्ह्यात बूमदर गुम्पा येथे वसतिगृहासह वर्गखोलीचे उद्घाटन ते करणार आहेत. त्या व्यतिरिक्त, ते सिक्कीममधील 160 शाळांमधील माहिती तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करतील.

सिक्किममधील दळणवळण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, पंतप्रधान नामची आणि गंगटोक जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिरवानी आणि लोअर सामडोंग येथील तीस्ता नदीवर दुहेरी मार्गिकेच्या पोलादी कमान पुलांची पायाभरणी करतील. यासोबतच, पंतप्रधान बिरधांग ते नामची (किचुदुमरा मार्गे) रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामाचे उद्घाटन करतील. यामुळे जिल्ह्यांमधील संपर्क वाढेल, प्रवासाचा वेग वाढून नागरिक तसेच मालाची वाहतूक अधिक सुलभ होईल.

ऊर्जा क्षेत्रात, पंतप्रधान गंगटोक येथील वीज पारेषण आणि वितरण व्यवस्थेची सुधारणा, आधुनिकीकरण आणि नूतनीकरण कामाचे उद्घाटन करतील. यामुळे या परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल.

शहरी विकास आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात, पंतप्रधान लुमसे येथील जन सेवा सचिवालय (मिनी सचिवालय) आणि गंगटोक येथील नागरी सेवा अधिकारी संस्थेचे उद्घाटन करतील. यासोबतच, ते लिंगदिंग येथील सिक्कीम शहरी गरीब आवास योजना, पोलीस कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने आणि पांगथांग येथील श्रेणी ‘क’ निवासस्थानांसह विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे उद्घाटन करतील. याव्यतिरिक्त, ते एमजी मार्ग येथील सद्भाव मंडप (सार्वजनिक सुविधा केंद्र) या वास्तूची पायाभरणी करतील.

पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत, नद्यांचे प्रदूषण रोखण्याच्या उपक्रमांतर्गत पंतप्रधान सिंगताम शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रणालीच्या पुनर्वसन कामाची पायाभरणी करतील. यासोबतच, गंगटोक येथील झोन-3 मध्ये रोरो चू नदीद्वारे राणी चू नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या योजनेचेही ते उद्घाटन करतील. या उपक्रमांमुळे शहरातील स्वच्छता सुधारेल आणि शाश्वत परिसंस्थेच्या विकासात मदत होईल.

पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये , पंतप्रधान गंगटोक येथील रिज परिसराच्या पुनर्विकासाचे, तसेच सोरेंग मधील डोडक येथे पर्यावरणपूरक पर्यटन आणि तीर्थक्षेत्र पायाभूत सुविधांचे उद्घाटन करतील. यासोबतच, 18 व्या मैल आणि हांगू तलाव येथील सुविधांसह कैलास मानसरोवर यात्रेशी संबंधित पायाभूत सुविधांचे आणि नामफिंग येथील कृष्ण प्रणामी मंगलधाममधील यात्री निवासचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. तसेच, गयालशिंग जिल्ह्यातील सिलनोन येथे उभारल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक तीर्थक्षेत्र संकुलाची पायाभरणी देखील पंतप्रधान करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीम इफ्को प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन होणार असून, राज्यातील कृषी प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन तसेच मूल्य साखळी अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, तरुणांचा सहभाग आणि क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, पंतप्रधान पाक्योंग जिल्ह्यातील रंगपो येथील मायनिंग येथे असलेल्या इनडोअर क्रिकेट सुविधांचे उद्घाटन करतील.

पंतप्रधानांचा हा दौरा सिक्कीमच्या राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा दौरा सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या जलद आणि शाश्वत विकासाप्रति  सरकारची  सातत्यपूर्ण वचनबद्धता दर्शवतो.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi