पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास "कृषी आणि ग्रामीण समृद्धी" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
या वेबिनारचा उद्देश यंदाच्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीची रणनीती आखण्यावर केंद्रित चर्चेसाठी प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हा आहे. कृषी विकास आणि ग्रामीण समृद्धीवर भर देत हे सत्र अर्थसंकल्पातील दृष्टिकोनाला कृतीयोग्य निष्कर्षांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सहकार्याला चालना देईल. वेबिनारमध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विषय तज्ज्ञ सहभागी होऊन प्रयत्नांना अनुरूप प्रभावी अंमलबजावणीला चालना देतील.


