जागतिक व्यापार प्रदर्शन आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
पंतप्रधानांच्या नेतृत्वाची आणि उत्तर प्रदेशमधील विकासाच्या संधींची उद्योग जगतातील नेत्यांकडून प्रशंसा
उत्तर प्रदेश हे राज्य आता सुप्रशासन, कायदा- सुव्यवस्था, शांतता आणि स्थैर्यासाठी ओळखले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
उत्तरप्रदेश आज आशा आणि प्रेरणेचा स्त्रोत बनला आहे: पंतप्रधान
देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या मार्गावर चालायचे असून विकसित भारताचे साक्षीदार व्हायचे आहेत, असा पंतप्रधानांचा विश्वास
आज भारतात सुधारणा सक्तीने लादल्या जात नाहीत, तर सर्वमान्य दृढनिश्चयाने त्या होत असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
नवीन मूल्य आणि पुरवठा साखळी निर्माण करण्यामध्ये उत्तरप्रदेश ‘चॅम्पियन’ म्हणून उदयाला आल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
डबल इंजिन सरकारचा संकल्प आणि उत्तर प्रदेशमध्‍ये असलेल्या शक्यता, यांच्याइतकी उत्तम भागीदारी असू शकत नाही; असा पंतप्रधानांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा शुभारंभ केला. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख गुंतवणूक परिषद असून, ही परिषद धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रितपणे व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र आणणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

उद्योग जगतातील नेत्यांनी यावेळी आपले विचार मांडले. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, भारत उद्योजगतेमध्ये आणि नवोन्मेषामध्ये उल्लेखनीय गतिमानता दाखवत आहे. देशाच्या आर्थिक परिप्रेक्षात नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधानांना दिले. मुकेश अंबानी म्हणाले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पाने भारताचा एक विकसित देश म्हणून उदय होण्याचा पाया रचला आहे. ते म्हणाले की, भांडवली (कॅपेक्स) खर्चासाठी जास्त तरतूद केल्यामुळे आर्थिक वृद्धी आणि सामाजिक कल्याण होईल. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशात मोठा कायापालट झाला आहे, आणि पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने एक धाडसी नवीन भारत आकार घेत आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार आहे. "ही केवळ आर्थिक वाढ नसून, पंतप्रधानांनी 360-अंशातील विकासाला चालना दिली आहे." ते म्हणाले की, अर्थसंकल्पातील तरतूद पायाभूत सुविधा आणि उपभोग याच्या माध्यमातून आर्थिक विकास सुनिश्चित करेल आणि त्यामुळे ग्रामीण विकास देखील होईल. झुरिच विमानतळ आशियाचे सीईओ डॅनियल बिरचर म्हणाले की, भारत जसा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे, त्याचप्रमाणे झुरिच विमानतळ आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारताबरोबरच्या दीर्घकालीन भागीदारीचा उल्लेख करत ते म्हणाले की झुरिच विमानतळाने दोन दशकांपूर्वी बेंगळुरू विमानतळाच्या विकासाला पाठिंबा दिला होता आणि सध्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करत आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची यमुना एक्सप्रेसवेशी थेट जोडणी त्यांनी अधोरेखित केली. डिक्सन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष सुनील वाचानी म्हणाले की, भारतात विकले जाणारे जवळजवळ 65% मोबाईल फोन्स उत्तर प्रदेशमध्ये तयार केले जातात, आणि उत्तर प्रदेशला उत्पादन केंद्र बनवण्याचे श्रेय त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या गतिमान धोरणांना दिले. त्यांनी असेही नमूद केले की आज डिक्सन टेक्नॉलॉजीज जवळपास 100 अब्ज डॉलर किमतीचे मोबाईल फोन निर्यात करण्याची तयारी करत आहे. उद्योग जगतातील सर्व नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये उदयाला येत असलेल्या संधींबद्दल आशावाद दर्शविला.

मेळाव्याला मार्गदर्शन करताना, पंतप्रधानांनी, पंतप्रधान म्हणून आणि उत्तर प्रदेशचे खासदार या नात्याने गुंतवणूकदार समुदाय, उद्योग क्षेत्रातील नेते आणि धोरणकर्ते यांचे स्वागत केले.

उत्तर प्रदेशची भूमी सांस्कृतिक वैभव, गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा यासाठी ओळखली जाते यावर पंतप्रधानांनी भर दिला. राज्याच्या क्षमतेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, ‘अविकसित, बिमारू, आणि कायदा आणि सुव्यवस्थेची खराब स्थिती’ यासारख्या उत्तरप्रदेश राज्याबद्दलच्या नकारात्मक संबोधनांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. आधीच्या काळात रोजच्या रोज उघडकीला आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, 5-6 वर्षांच्या काळात उत्तर प्रदेशने स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. उत्तर प्रदेश आता सुप्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि स्थैर्य यासाठी ओळखला जातो. "संपत्ती निर्माण करणाऱ्यांसाठी इथे नवीन संधी निर्माण होत आहेत", पंतप्रधान पुढे म्हणाले. यूपीमध्ये चांगल्या पायाभूत सुविधांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना चांगलं फळ मिळत आहे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की लवकरच यूपी हे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले एकमेव राज्य म्हणून ओळखले जाईल. मालवाहू मार्गिका राज्याला थेट महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याशी जोडेल. व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी यूपीमधील सरकारच्या विचारसरणीत अर्थपूर्ण बदल झाल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. “आज यूपी आशा आणि प्रेरणास्थान बनले आहे”, पंतप्रधानांनी टिप्पणी केली. त्यांनी अधोरेखित केले की भारत जसा जागतिक स्तरावर एक उज्ज्वल स्थान बनला आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश राज्य देखील देशासाठी एक उज्ज्वल स्थान बनले आहे.  

पंतप्रधान म्हणाले, की पूर्ण जगातील प्रत्येक विश्वासार्ह आवाज, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाबद्दल, आशावादी भावना व्यक्त करतो आहे.आणि यातून, महामारी आणि युद्ध अशा संकटकाळात टिकून राहण्याचा भारतीय अर्थव्यवस्थेचा चिवटपणा तर दिसतोच, त्याशिवाय, जलद गतीने अशा संकटातून पुन्हा बाहेर निघण्याची गुणवत्ताही दिसते.

भारतीय समाजाच्या, विशेषतः युवकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत, आता फार मोठा बदल झाला आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.आज देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या मार्गावरून जायचे आहे, आणि येत्या काळात होणाऱ्या ‘विकसित भारताचे’ साक्षीदार व्हायचे आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतीय समाजाच्या आशाआकांक्षाच सरकारसाठी प्रेरणादायक ठरत आहेत, असे सांगत, देशात आज होणाऱ्या सर्व विकास कार्यामागे हीच प्रेरक शक्ती आहे, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तरप्रदेशाचा आकार आणि लोकसंख्या लक्षात घेता, भारताप्रमाणेच, उत्तरप्रदेशातील आकांक्षी समाज, आपल्या सारख्या गुंतवणूकदारांची वाट बघत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

डिजिटल क्रांतीमुळे, उत्तरप्रदेशातील समाज आज परस्परांशी जोडला जाऊन एकात्मिक झाला आहे, असे त्यांनी सांगितले. ‘एक बाजारपेठ म्हणून, भारत अत्यंत सुविधासंपन्न देश बनला आहे. सगळ्या प्रक्रिया आता सुलभ झाल्या आहेत. “आज भारतात सुधारणा सक्तीने लादल्या जात नाहीत, तर सर्वमान्य दृढनिश्चयाने त्या होत आहेत” असे ते पुढे म्हणाले.

आजचा भारत, खऱ्या अर्थाने, वेग आणि व्याप्ती या दोन्ही दिशांनी वाटचाल करतो आहे.आज देशातील सगळ्या मोठ्या घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत त्यामुळे ते त्या पलीकडे विचार करु शकत आहेत. हेच भारतावरचा विश्वास वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अर्थसंकल्पाविषयी बोलतांना त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढत असलेली तरतूद अधोरेखित केली. तसेच, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक पायाभूत सुविधा अशा क्षेत्रात, गुंतवणूकदारांना असलेल्या संधीविषयीही ते बोलले. त्याचप्रमाणे, त्यांनी गुंतवणूकदारांना भारताने अंगीकारलेल्या हरित विकासाच्या मार्गावर असलेल्या संधींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात, सरकारने 35,000 कोटी रुपयांची तरतूद केवळ ऊर्जा रूपांतरणासाठी (जीवाश्मपासून अक्षय ऊर्जा निर्मिती) केली आहे.

आज जेव्हा मूल्य आणि पुरवठा साखळी विकसित करण्याचा विषय आहे, अशा क्षेत्रात उत्तरप्रदेश अव्वल कामगिरी करतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पारंपरिक आणि आधुनिक एमएसएमई कंपन्यांचे गतिमान जाळे आज उत्तरप्रदेशात विकसित झाले आहे, असे संगत, त्यांनी भदोही आणि वाराणसी इथल्या रेशीम वस्त्राचे उदाहरण दिले, या वस्त्रामुळे, उत्तरप्रदेश आज भारताचे वस्त्रोद्योग केंद्र बनले आहे. आज देशातील 60 टक्के मोबाइल फोन आणि मोबाईल फोन्सचे सुटे भाग एकट्या उत्तरप्रदेशात तयार केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील दोन महत्वाच्या संरक्षण मार्गिकांपैकी, एक उत्तरप्रदेशात बनते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशात मेड इन इंडिया संरक्षण प्रणाली आणि प्लॅटफॉर्म विकसित करण्याविषयीच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

उत्तरप्रदेशातील संधी अधोरेखित करतांना, पंतप्रधानांनी दुग्धव्यवसाय, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि अन्नप्रक्रिया अशा क्षेत्रांचा उल्लेख केला. अशा काही क्षेत्रात, अजूनही खाजगी व्यवसायिकांचा सहभाग मर्यादित आहे, असे ते म्हणाले. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या पीएलआय योजनेची माहिती त्यांनी गुंतवणूकदारांना दिली. शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून ते पीक आल्यानंतरच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थापनात, निर्वेध अशी आधुनिक व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. छोटे गुंतवणूकदार, कृषी- पायाभूत निधीचा वापर करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.

पिकांच्या विविधतेविषयी बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांना अधिक स्त्रोत उपलब्ध करुन देणे आणि शेती खर्च कमी करण्यावर भर दिला, तसेच नैसर्गिक शेतीविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. आज गंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाच किमी शेतीक्षेत्रात, नैसर्गिक शेतीची सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले.

या अर्थसंकल्पात प्रस्तावित 10 हजार जैव-इनपुट संसाधन केंद्रांचाही त्यांनी उल्लेख केला. भारतात श्री अन्न असा उल्लेख केल्या जाणार्‍या भरड धान्याचे पौष्टिक मूल्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भारताच्या श्री अन्नाने जागतिक पोषण सुरक्षेच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखित केले. श्री अन्न म्हणजे भरड धान्यापासून तयार केलेले, रेडी टू ईट आणि रेडी टू कुक अशा क्षेत्रात, गुंतवणूकदारांना संधी मिळू शकतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

राज्यातील शिक्षण आणि कौशल्य विकासात झालेल्या विकासकामांवरही पंतप्रधानांनी प्रकाशझोत टाकला. त्यांनी महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ, अटल बिहारी वाजपेयी आरोग्य विद्यापीठ, राजा महेंद्र प्रताप सिंग विद्यापीठ आणि मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ अशा, विविध कौशल्ये प्रदान करणाऱ्या संस्थांचा उल्लेख केला. कौशल्य विकास अभियानांतर्गत 16 लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्तरप्रदेश सरकारने पीजीआय लखनौ आणि आयआयटी कानपूर इथे, कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केले आहेत असेही त्यांनी सांगितले. राज्यांची देशाच्या स्टार्ट अप योजनेतील वाढती भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. उत्तरप्रदेश सरकारने येत्या काही वर्षांत 100 इनक्यूबेटर आणि तीन अत्याधुनिक केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामुळे प्रतिभावान आणि कुशल तरुणांचा मोठा समूह तयार होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी डबल-इंजिन सरकारचा संकल्प आणि उत्तर प्रदेश राज्यातील शक्यता यांच्यातील भक्कम भागीदारीवर प्रकाश टाकला. गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी लवकरात लवकर इथे गुंतवणूक करत या समृद्धीचा एक भाग बनावे, असे आवाहन त्यांनी केले. "जगाची समृद्धी भारताच्या समृद्धीमध्ये आहे आणि या समृद्धीच्या प्रवासात तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे", अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री, परदेशी मान्यवर आणि उद्योजक उपस्थित होते.

पार्श्वभूमी:

10-12 फेब्रुवारी 2023 दरम्यान होत असलेली उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची एक पथदर्शी गुंतवणूक परिषद आहे. या परिषदेत, धोरणकर्ते, उद्योग धुरीण, अभ्यासक, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रित व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.

इन्व्हेस्टर युपी 2.0 ही उत्तर प्रदेशातील सर्वसमावेशक, गुंतवणूकदार-केंद्री आणि सेवा-केंद्री गुंतवणूक व्यवस्था आहे. या परिषदेतून गुंतवणूकदारांना सर्व संबंधित, निश्चित आणि प्रमाणित सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Sheetal Devi signs special jersey with foot, gifts to PM Modi

Media Coverage

Sheetal Devi signs special jersey with foot, gifts to PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 सप्टेंबर 2024
September 13, 2024

PM Modi’s Vision for India’s Growth and Prosperity Garners Appreciation from Across the Country