पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतली. जॉर्डनच्या राजांच्या अल हुसैनिया राजवाडा या निवासस्थानी मोदी यांचे आगमन झाल्यानंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनी त्यांची स्नेहपूर्ण वातावरणात भेट घेतली आणि त्यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत केले.
मर्यादित स्वरुपात आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवर दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या मागील भेटींची तसेच त्यात झालेल्या संभाषणांची मनापासून आठवण काढली आणि दोन्ही देशांमध्ये सामायिक असलेले हार्दिक तसेच ऐतिहासिक संबंध अधोरेखित केले. दोन्ही देशांदरम्यानच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 75 वर्षे साजरी करत असताना हा दौरा होत असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. भारत-जॉर्डन संबंध आणखी मजबूत करण्याप्रती जॉर्डनच्या राजांच्या कटिबद्धतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारताने सर्व पद्धतीच्या आणि प्रत्येक स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध छेडलेल्या लढाईला जॉर्डनच्या राजांनी मजबूत पाठींबा व्यक्त केला. दहशतवाद, कट्टरपंथ आणि मूलतत्त्ववादावर तोडगा काढण्यात तसेच या दुष्ट शक्तींच्या विरोधातील जागतिक लढ्यात योगदान देण्यात जॉर्डनच्या राजांनी केलेल्या नेतृत्वाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा,नवीकरणीय उर्जा, खते आणि कृषी, नवोन्मेष, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञाने, महत्त्वाची खनिजे, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि औषधनिर्मिती, शिक्षण आणि क्षमता, पर्यटन आणि वारसा तसेच संस्कृती आणि दोन्ही देशांच्या जनतेतील परस्परसंबंध या क्षेत्रांमध्ये आपापल्या देशाचा सहभाग आणखी वाढवण्यासाठीच्या मार्गांची दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे आहे हे लक्षात घेत, येत्या पाच वर्षात दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवावे असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी मांडला. जॉर्डनची डिजिटल व्यवहार प्रणाली आणि भारताचे एकात्मिक व्यवहार इंटरफेस (युपीआय) यांच्यामध्ये सहयोग घडवून आणण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.जॉर्डन हा भारताचा महत्त्वाचा खते पुरवठादार देश आहे आणि दोन्ही देशांतील कंपन्या भारतातील फॉस्फेटिक खतांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक भरीव गुंतवणुकीबाबत चर्चा करत आहेत.
दोन्ही देशांच्या नेत्यांनी या भेटीदरम्यान क्षेत्रीय विकास आणि इतर जागतिक मुद्द्यांबाबत आपापले दृष्टीकोन सामायिक केले. या भागात शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. संबंधित क्षेत्रात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताच्या पाठींब्याला दुजोरा दिला.
या भेटीनिमित्त, दोन्ही देशांनी संस्कृती, नवीकरणीय उर्जा, जल व्यवस्थापन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा,तसेच पेत्रा आणि एलोरा यांच्या दरम्यान जुळ्या व्यवस्था या क्षेत्रांशी संबंधित सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप दिले. हे करार भारत-जॉर्डन संबंध आणि मैत्रीला मोठी चालना देतील. सदर चर्चेनंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांना भारतभेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आणि ते राजांनी स्वीकारले.


