शिवगिरी यात्रेचा 90 वा वर्धापनदिन आणि ब्रह्म विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहोळ्याच्या उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम उद्या, 26 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता, नवी दिल्ली येथील 7,लोककल्याण मार्ग येथे होणार आहे. पंतप्रधान या समारंभात वर्षभर चालणाऱ्या संयुक्त सोहोळ्याचे बोधचिन्ह देखील जारी करतील. शिवगिरी यात्रा आणि ब्रह्म विद्यालय या दोन्ही गोष्टी महान समाज सुधारक नारायण गुरु यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने सुरु झाल्या होत्या.
दर वर्षी 30 डिसेंबर ते 1 जानेवारी अशा तीन दिवसांच्या कालावधीत तिरुवनंतपुरम येथील शिवगिरी देवस्थानच्या परिसरात ही यात्रा भरते. नारायण गुरूंच्या शिकवणीनुसार, लोकांमध्ये समावेशक ज्ञानाची निर्मिती हा यात्रेचा उद्देश असायला हवा आणि या यात्रेने त्यांचा समग्र विकास आणि भरभराट होण्यास मदत व्हायला हवी. म्हणून ही यात्रा, शिक्षण, स्वच्छता, धार्मिकता, हस्तकला, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संघटीत प्रयत्न या आठ घटकांवर लक्ष केंद्रित करते.
सर्वप्रथम 1933 मध्ये मूठभर भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा भरली होती पण आता मात्र ही यात्रा म्हणजे दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक उत्सवांपैकी एक झाली आहे. दर वर्षी, विविध जाती, संप्रदाय, धर्म यातले विविध भाषा बोलणारे लाखो भाविक जगभरातून या यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात.
नारायण गुरु यांनी या स्थळी समतोल वृत्तीने आणि समान सन्मानाने सर्व धर्मांतील उत्तम तत्वांची शिकवण देणाऱ्या विद्यालयाची संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवगिरीचे ब्रह्म विद्यालय स्थापन करण्यात आले. ब्रह्म विद्यालयात नारायण गुरु यांचे साहित्य आणि जगातील सर्व प्रमुख धर्मांचे धर्मग्रंथ यांच्या अध्यापनासह भारतीय तत्वज्ञान शिकविणारा 7 वर्षांचा अभ्यासक्रम शिकविला जातो.


