आयएफएस म्हणजेच भारतीय परराष्ट्र सेवेतील 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. 2024 च्या तुकडीमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 33 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या बहुध्रुवीय विश्वाबद्दल आणि सर्वांशी मैत्री सुनिश्चित करणारा ‘विश्वबंधू’ म्हणून भारताच्या अद्वितीय भूमिकेबद्दल चर्चा केली. गरजू देशांना सर्वप्रथम प्रतिसाद देऊन मदत करणारा देश म्हणून भारत कसा उदयास आला आहे, याची उदाहरणे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उद्धृत केली. ‘ग्लोबल साऊथ’ला मदत करण्यासाठी भारताने केलेल्या क्षमता बांधणीच्या प्रयत्नांवर आणि इतर कार्यांवरही त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी परराष्ट्र धोरणाच्या विकसित होत असलेल्या क्षेत्राबद्दल आणि जागतिक व्यासपीठावर त्याचे महत्त्व, यावर चर्चा केली. जागतिक व्यासपीठावर विश्वबंधू म्हणून देशाच्या उत्क्रांतीत राजदूतांची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. 2047 पर्यंत देश विकसित होण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना भविष्यातील राजदूत म्हणून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर व्यापक संवाद साधला आणि सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना आतापर्यंतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल विचारणा केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यानी त्यांच्या प्रशिक्षण आणि संशोधन कार्यांमधील त्यांचे अनुभव सामायिक केले. ज्यामध्ये सागरी राजनैतिक कूटनीती, एआय – कृत्रिम प्रज्ञा आणि सेमीकंडक्टर, आयुर्वेद, सांस्कृतिक संपर्क, अन्न आणि ‘सॉफ्ट पॉवर’ इत्यादी विषयांचा समावेश होता.
पंतप्रधान म्हणाले की, आपण विविध देशांमधील तरुणांमध्ये 'नो युवर भारत' – म्हणजेच –‘तुमचा भारत जाणून घ्या’ याविषयावर प्रश्नमंजुषा आणि चर्चा-संवाद कार्यक्रम यातून भारताबद्दल उत्सुकता निर्माण केली पाहिजे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, या प्रश्नमंजूषांचे प्रश्न नियमितपणे अद्यतन केले पाहिजेत. त्यामध्ये महाकुंभ, गंगाईकोंडा चोलापुरम मंदिराच्या एक हजार वर्षांच्या पूर्ततेचा उत्सव इत्यादी भारतातील समकालीन विषयांचा समावेश केला गेला पाहिजे.
आजच्या तंत्रज्ञानाष्ठित जगात संवाद साधण्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याना मिशनच्या सर्व संकेतस्थळांची पाहणी करावी, त्यातून माहिती जाणून घेण्याचे काम करावे आणि परदेशस्थ भारतीयांबरोबर प्रभावी संवाद साधण्यासाठी या संकेतस्थळांमध्ये कशाप्रकारे सुधारणा करता येईल, हे शोधण्याचे आवाहन केले.
खाजगी उद्योजकांसाठी अंतराळ क्षेत्र खुले करण्याबाबत चर्चा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्रात येणाऱ्या भारतीय स्टार्टअप्सची व्याप्ती वाढवण्यासाठी इतर देशांमध्ये संधी शोधण्यावर भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, अंतराळ क्षेत्रातील या रिक्त जागा भरण्याची क्षमता भारतात आहे.
Interacted with Officer Trainees of 2024 Batch of IFS. Discussed many aspects, including various global challenges, how they can increase the use of technology, deepening the interface with the diaspora and more. https://t.co/KcLdRPAnh3 pic.twitter.com/Kyw3pbPDMu
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2025


