पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.