स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!