जोहान्सबर्गमध्ये जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी भेट
November 23rd, 02:18 pm
भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास, खाणकाम, युवा आदानप्रदान आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एआय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे नेत्यांनी स्वागत केले, विशेषतः पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले.