पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, 12 जानेवारी रोजी ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होणार

January 10th, 09:21 pm

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिना निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025’ मध्ये सहभागी होतील. यावेळी ते देशभरातील 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्याची 25 वर्षांची परंपरा खंडित करणे, हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगचे उद्दिष्ट आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख युवकांना राजकारणात आणून विकसित भारताची त्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या घोषणेला अनुसरून हा उपक्रम आहे. या अनुषंगाने, यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, पंतप्रधान देशाच्या भावी नेत्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आखलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यावेळी हे नवोन्मेशी युवा नेते पंतप्रधानांच्या समोर भारताच्या विकासाकरता महत्वाच्या असलेल्या दहा क्षेत्रांवर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करतील. या सादरीकरणांमध्ये युवा नेत्यांनी भारतापुढील काही सर्वात गंभीर आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सुचवलेल्या नवोन्मेशी कल्पना आणि उपायांचे प्रतिबिंब उमटेल.