रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
July 12th, 11:30 am
केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये तरुणाईला कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा आमचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. आणि आमची ओळखसुद्धा अशीच आहे – ना कागद ना खर्च! (शिफारस किंवा लाचेशिवाय निव्वळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे नोकऱ्या देणे). आज 51 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे दिली गेली आहेत. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुण-तरुणींना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आहेत. ही तरुणाई आता राष्ट्रनिर्मितीत मोठी भूमिका बजावत आहे. आजही आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेमध्ये आपले कार्यभार स्वीकारले आहेत. काही मित्र आता देशाच्या सुरक्षेचे रक्षक बनणार आहेत. टपाल विभागात नियुक्त झालेले मित्र गावागावात सरकारच्या सुविधा (योजना) पोहोचवतील. काहीजण ‘हेल्थ फॉर ऑल’ (सर्वांसाठी आरोग्य) या अभियानाचे शिलेदार असतील. अनेक युवक-युवती आर्थिक समावेशनाच्या इंजिनाला अधिक वेग देतील आणि बरेचसे युवक-युवती भारताच्या औद्योगिक विकासाला नवीन चालना देतील. आपले विभाग वेगवेगळे असले, पदे वेगवेगळी असली, तरी ध्येय एकच आहे. आणि ते ध्येय आपल्याला वारंवार लक्षात ठेवायचे आहे –‘राष्ट्रसेवा’! सूत्र एकच – ‘नागरिक प्रथम, Citizen First!’ आपल्याला देशवासियांच्या सेवेसाठी एक मोठे व्यासपीठ लाभले आहे. जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेल्या या मोठ्या यशाबद्दल मी आपणा सर्व तरुणाईचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
July 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले, यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 51,000 हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रेही वितरित केली. आज या युवा वर्गाची भारत सरकारच्या विविध विभागांमधील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. विविध विभागांमधील आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या युवा उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी राष्ट्रसेवा हेच त्यांचे परस्पर समान उद्दिष्ट आहे, आणि ते नागरिक प्रथम या तत्त्वावर आधारलेले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.