देशभरातील पदव्युत्तर आणि पदवी वैद्यकीय शिक्षण क्षमता विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 24th, 05:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या राज्य सरकारी/केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालये/स्वतंत्र पदव्युत्तर संस्था/सरकारी रुग्णालये यांच्या सक्षमीकरण आणि अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5,000 जागा वाढवल्या जातील. तसेच एमबीबीएसच्या 5,023 जागा वाढवण्यासाठी विद्यमान सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अद्ययावतीकरणासाठी सुरू असलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा विस्तार करत प्रत्येक जागेसाठी 1.50 कोटी रुपयांच्या वाढीव खर्च मर्यादा देण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असलेल्यांची संख्या वाढून परिणामी अशा स्वरुपातील वैद्यकीय क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, अतिरिक्त पदव्युत्तर जागा निर्माण झाल्यामुळे तज्ञांची उपलब्धता वाढेल, आणि सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये नवीन तज्ञांची सेवा सुरू करता येईल. यामुळे देशभरातील डॉक्टरांची एकूण उपलब्धता बळकट होऊ शकणार आहे.