भारताची "कॉन्सर्ट इकॉनॉमी": 2036 ऑलिम्पिकच्या आशा वाढवणारे मनोरंजनाचे पॉवरहाऊस
January 29th, 04:28 pm
अनेक वर्षे भारतात भव्य स्वरुपात आंतरराष्ट्रीय मैफिलींचे आयोजन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव होता. देशात बॉलीवूडचे संगीत विकसित होत असताना, पुरेशा सुविधा नसलेली स्थळे, लाल फितीमुळे आणि लॉजिस्टिकमुळे येणाऱ्या अडचणींमुळे जागतिक कॉन्सर्ट संस्कृतीने मात्र भारताकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले. लंडन, न्यूयॉर्क किंवा सिंगापूर शहरांप्रमाणे जागतिक दर्जाची स्टेडियमची कमतरता, कार्यक्रमासाठी परवाने मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि ढिसाळ कार्यक्रम व्यवस्थापन यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना आकर्षित करण्यासाठी भारताला झगडावे लागत होते. जागतिक स्टार्सनी कला सादर केली तरीही मैफिलींच्या वेळी अनेकदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची चांगली व्यवस्था नसल्याचा, अस्वच्छतेच्या आणि तांत्रिक बिघाडांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असे, त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही समाधान मिळत नसे.