गेल्या दहा वर्षांत आपल्या दूरद़ृष्टीने आणि अंगभूत सामर्थ्याच्या बळावर देशाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आणि जागतिक राजकारणात ज्यांच्या शब्दाकडे संपूर्ण जगाचे कान लागलेले असतात, असे विश्वगुरू म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प सोडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचे देशभरात झंझावाती प्रचार दौरे सुरू आहेत. पुढील पाच वर्षांत विकसित महाराष्ट्र घडविणार, अशी गॅरंटी देत बेरोजगारी संपविण्यासाठी युवकांना संशोधनाकरिता एक लाख कोटींची गुंतवणूक करणार, अशी नि:संदिग्ध ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश प्र. जाधव यांना खास मुलाखतीत दिली.

 

प्रश्न : यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत भाजपने केलेल्या कामगिरीचे वर्णन तुम्ही कसे कराल?

पंतप्रधान मोदी : भाजप आणि ‘रालोआ’ने आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीत बावनकशी कामगिरी बजावली आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. माझ्या माहितीनुसार, आम्ही विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. सत्तेच्या परिघापाशी ते पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत
नाही. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण यापैकी कोणताही भूभाग घेतला, तरी तरुणाई, ज्येष्ठ, शेतकरी, कसलाही पेशा असलेले लोक किंवा महिला यापैकी सर्वांचा जोरदार पाठिंबा भाजप आणि ‘रालोआ’ला मिळत असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे भविष्यातील चौफेर विकासाचा रोडमॅपच आम्ही त्यांच्यासमोर ठेवला आहे. आमच्या नेतृत्वावर त्यांचा गाढ विश्वास असून, गेल्या दहा वर्षांतील आमची कामगिरी त्यांच्या नजरेसमोर आहे. भाजपने गेल्या दहा वर्षांत केलेला विकास लोकांना थेट जाणवू लागला आहे. त्याची चर्चा तुम्हाला जागोजागी ऐकायला मिळेल. काँग्रेसला अनेक दशके राज्य करून जे जमले नाही, ते आम्ही करून दाखविले आहे. काँग्रेसच्या विभाजनवादी आणि प्रतिगामी विचारसरणीला लोकांनी सपशेल नाकारले आहे. कारण, विरोधकांची आघाडी देशाला कशा पद्धतीने पुन्हा 20 व्या शतकाकडे घेऊन निघाली आहे, हेही आम जनता पाहत आहे. ना व्हिजन, ना मिशन अशी इंडिया आघाडीची दारुण अवस्था बनली आहे.

 

प्रश्न : तुम्हाला आणखी पाच वर्षांसाठी जनतेने पुन्हा संधी दिली, तर विकासाच्या तुमच्या पुढील योजना काय आहेत?

पंतप्रधान मोदी : या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण दहा वर्षांपूर्वी कोठे होतो आणि आता कोठे आहोत, याचा थोडा आढावा घेतला पाहिजे, असे मला वाटते. 2014 पूर्वी म्हणजेच केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’चे सरकार येण्यापूर्वी दररोज भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या भानगडींनी वृत्तपत्रांचे मथळे सजत होते. आता भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी उचललेल्या सणसणीत कारवाईच्या तपशिलाने वृत्तपत्रांची पाने सजल्याचे तुम्हाला दिसून येईल. येत्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यात आलेली असेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. 2014 पूर्वी देशभर साचलेपण जाणवत होते. आपल्या सुप्तशक्तीला न्याय न देणारा देश अशा द़ृष्टिकोनातून सारे जग भारताकडे पाहत होते. आज हे चित्र आमूलाग्र बदलले आहे. भारताने केलेल्या विस्मयकारक प्रगतीने सगळ्या जगाचे डोळे दीपले आहेत; मग ते अंतराळ, स्टार्टअप्स, डिजिटल पेमेंटस् किंवा क्रीडा यापैकी कोणतेही क्षेत्र असेल. जागतिक पातळीवर स्पर्धात्मक मूल्य असलेले बदल आम्हाला घडवायचे असून, त्यांचा व्यापक पातळीवर विस्तार करायचा आहे. 2014 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नव्हते. मात्र, आम्ही सत्तेवर आल्यानंतर बँकिंग, पतपुरवठा आणि आर्थिक क्षेत्रांत वेगाने सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा लौकिक भारताने संपादन केला आहे. येत्या काही वर्षांतच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. हे लक्ष्य आम्ही साध्य करणारच. येथे मला एक महत्त्वाचा खुलासा करायचा आहे आणि तो असा की, ‘संपुआ’ सरकारच्या कार्यकाळात तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले होते, भारत 2043 पर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होऊ शकतो. आम्ही हे उद्दिष्ट येत्या काही वर्षांतच गाठणार आहोत. काँग्रेसनेे केवळ स्वप्न पाहिले आणि आम्ही ते वास्तवात उतरवण्याचा ठाम संकल्प केला आहे. येत्या पाच वर्षांत आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकालाही मिळेल. गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीयांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत धान्य उपलब्ध करून दिले जाईल. देशाच्या इतिहासात तुम्ही प्रथमच पाहाल की, भारतीय जनता बुलेट ट्रेनने प्रवास करत आहे. युवकांमधील सुप्त संशोधन शक्तीला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची भरभक्कम गुंतवणूक केली जाणार आहे. तीन कोटी महिला लखपती दीदी होतील आणि स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून लाखो महिला ड्रोन पायलट म्हणून काम करतील.

 

प्रश्न : उद्धव ठाकरे यांच्या नव्हे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असे तुम्ही म्हणता. त्याचे कारण काय?

पंतप्रधान मोदी : हा चांगला प्रश्न आहे. आता असे बघा की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष म्हणजेच खरी शिवसेना. माझ्या राजकीय जीवनात मीसुद्धा बाळासाहेबांना प्रेरणास्थान मानतो. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाला कडाडून विरोध केला. असे असेल तर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन करणार्‍या पक्षाला खरी शिवसेना असे कसे म्हणता येईल? बाळासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त होते. औरंगजेब आणि त्याच्या धोरणांचा उदो उदो करणार्‍यांचा त्यांना मनस्वी तिटकारा होता. औरंगजेबाला मानणार्‍या मंडळींची गळाभेट घेणे म्हणजे बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवण्यासारखेच नाही काय? दहशतवादाच्या विरोधात बाळासाहेबांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. असे असताना मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला निवडणूक प्रचारात ठळक स्थान दिले जाते, हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पनाही करता येणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी काडीमोड घेऊन आनंदोत्सव साजरा करणारे कोण होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशी माणसे सोबतीला घेणारी मंडळी बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचे वारसदार असूच शकत नाहीत.

 

प्रश्न : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते तुम्हाला शिव्याशाप देत असतात, त्यातले बरेच काही वैयक्तिक पातळीवर उतरायलाही कमी करत नाहीत. तथापि, तुम्ही त्यांना कधीच प्रतिसाद देत नाही, हे कसे?

पंतप्रधान मोदी : सार्वजनिक जीवनाचा विचार केला, तर सर्वांचा आदर करण्यावर मी नेहमीच भर देत आलो आहे. राजकीय परिस्थिती कशीही असली, तरी बाळासाहेबांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मी आदर राखला आहे. याआधी शिवसेनेने ‘रालोआ’शी फारकत घेतली, तेव्हा राज्याच्या निवडणुकांमध्ये मी प्रचार केला होता. तथापि, तेव्हासुद्धा मी त्यांच्याविरोधात एक शब्दही उच्चारला नव्हता. जेव्हा एखादी व्यक्ती देशासाठी सुयोग्य कार्य करण्याचा निर्णय घेते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ आणि सेवाभिमुख सार्वजनिक जीवनासाठी उभी राहते, तेव्हा अशा व्यक्तीला टीकेचे बाण झेलावेच लागतात. तथापि, काहींची तर्‍हाच वेगळी असते. वैयक्तिक निंदानालस्ती हा राजकारण करण्याचा एकमेव मार्ग आहे, असे त्यांना वाटते. मला देशभरातून आम जनतेचे अफाट प्रेम मिळाले आहे. आजही मिळत आहे. त्यामुळे मला त्यातून हे शिव्याशाप सहन करण्याची ऊर्जा मिळते.

 

प्रश्न : या निवडणुकीत काँग्रेसचे भवितव्य काय?

पंतप्रधान मोदी : मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शहजाद्यांच्या (राहुल गांधी) वयापेक्षाही कमी जागा मिळणार आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी देशापुढे एकही रचनात्मक काम ठेवलेले नाही किंवा विकासाचा रोडमॅपही आम जनतेसमोर आणलेला नाही. त्यांचा जाहीरनामा तर टवाळीचा विषय बनला आहे. ज्याने कोणी तो तयार केला, त्याच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. या जाहीरनाम्याचा निम्मा भाग माओवाद्यांनी, तर निम्मा भाग 1947 च्या आधीच्या मुस्लिम लीगने लिहिला असावा, अशी माझी धारणा आहे. काँग्रेसला लोकांनी सातत्याने नाकारले आहे. त्यामुळे त्यांनी विभाजन आणि विध्वंसक धोरणे अवलंबून समाजमनात विष कालवण्याचे तंत्र अंगीकारल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये तरी पाहा. काबाडकष्टाने कमावलेली संपत्ती त्यांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू द्यायची नाही. ती ओरबाडून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे. कातडीच्या रंगावरूनही ते लोकांमध्ये फूट पाडायला निघाले आहेत. याला एक जबाबदार राजकीय पक्ष असे का म्हणता येईल?

 

प्रश्न : मुंबईच्या मतदारांनी ‘रालोआ’ला कशासाठी मते द्यावीत?

पंतप्रधान मोदी : याची अनेक कारणे सांगता येतील. त्यामुळेच आम्हाला मुंबईतून मतदारांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. मुख्य म्हणजे मुंबई हे देशाचे ग्रोथ हब आहे. ‘रालोआ’ने नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या दहा वर्षांत देशामध्ये विक्रमी थेट परकीय भांडवल आले आहे. जादा गुंतवणूक म्हणजे अधिकाधिक उद्योग. याचा अर्थ रोजगाराच्या सर्वाधिक संधी. अर्थविषयक उद्योग हा मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आमच्या सरकारने राबविलेल्या डिजिटल धोरणांमुळे या उद्योगांचा वेगाने विकास होऊ लागला आहे. मुंबईत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी आम्ही गेल्या दहा वर्षांत अविरतपणे काम केले आहे. या कालावधीत मुंबईमध्ये व आसपासच्या परिसरात अनेक मेगाप्रकल्प उभे राहिले आहेत आणि त्यातील अनेक प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अटल सेतू हा जगातील सर्वात लांब सागरी पुलांपैकी एक असून, मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसत आहे. मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास त्याद्वारे सुलभ बनला आहे. वर्षभरापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर ही महानगरे एकमेकांशी थेट जोडली गेली. त्याचा लाभ भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार असून, अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळेही मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होणार आहे. ऑरेंज गेट ते इस्टर्न फ्री वे हाही असाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईतून लवकरच बुलेट ट्रेन धावणार असून, मुंबई मेट्रोमुळेही लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

प्रश्न : दहशतवादाच्या संदर्भात तुमचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण वेगळे कसे आहे?

पंतप्रधान मोदी : नेशन फर्स्ट हा विषय आम्हीच सर्वप्रथम पुढे आणला. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवाद्यांच्या संदर्भातील प्राधान्यक्रम वेगळे होते. दहशतवाद्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली जावी, अशी मागणी समाजाच्या सर्व स्तरांतून होत असली, तरी काँगे्रसने त्यातही मतपेढीला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले. त्यांनी या विषयावर गुळमुळीत भूमिका घेतली. आपली मतपेढी दुखावली जाणार नाही, अशी भीती त्यांना सतत वाटत होती. त्यांनी दहशतवादाचे केवळ समर्थन केले असे नव्हे, तर दहशतवाद्यांसाठी अश्रूही गाळले. आताच्या पिढीला हे माहीतही नसेल की, मुंबईसह देशभर तेव्हा किती दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात किती निष्पाप लोकांची आहुती पडली. आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे चित्र ठामपणे बदलले. दहशतवाद्यांना दयामाया नाही, हा आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा केंद्रबिंदू होता व आजही आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या शेजार्‍यांना आम्ही अशी अद्दल घडवली की, त्यांनाही असे आततायी पाऊल उचलताना आता हजारदा विचार करावा लागत आहे. याखेरीज विविध तपास यंत्रणांत समन्वय आणून आम्ही दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करून टाकले. शिवाय, कोणतीही धोकादायक परिस्थिती हाताळताना तपास यंत्रणांना आम्ही पुरेशी स्वायत्तता दिली. आज आपण दहशतवादमुक्त वातावरणात जो मोकळा श्वास घेत आहोत, ती त्याचीच देणगी आहे.

 

प्रश्न : तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आदराने घेता; मग तुमच्या सरकारने दलितांचे सबलीकरण करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत?

पंतप्रधान मोदी : काही लोकांसाठी सामाजिक न्याय ही मते मिळवून देणारी पोकळ घोषणा आहे. आमच्यासाठी ती तशी नाही. लक्षात घ्या, केवळ बाबासाहेबांमुळेच आज माझ्यासारखी गरीब कुटुंबात जन्मलेली व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे. ही त्यांचीच देणगी आहे. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे बाबासाहेब हे माझे केवळ प्रेरणास्रोत नसून, ते माझ्या राजकीय जीवनाचे शिल्पकारही आहेत. आमच्या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या सकल कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांच्या आरक्षणाची टक्केवारीही वाढवली आहे. जेव्हा आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले असे अभिमानाने सांगतो, तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यातील बहुतांश कुटुंबे याच वंचित समुदायातील आहेत. अनेक वर्षे त्यांच्या वाड्यावस्त्यांवर शौचालये, नळाचे पाणी, बँक, वीज यासारख्या सुविधा पोहोचल्या नव्हत्या. आम्ही त्या पोहोचविल्या. गरिबीत पिचत असलेल्या या समुदायाचे पुनरुत्थान आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून केले. मुद्रा आणि स्वनिधी यासारख्या योजनांद्वारे आम्ही वंचित समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. आज जेव्हा भीम अ‍ॅपच्या माध्यमातून एखादा दलित उद्योजक आपले सर्व व्यवहार सहजगत्या पार पाडतो, तेव्हा ती बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरते.

 

प्रश्न : आरक्षणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याबद्दल काय सांगाल?

पंतप्रधान मोदी : हा फार चांगला प्रश्न आहे. आरक्षणावरून आमच्याविरोधात विरोधी पक्षांनी चालवलेले आरोपांचे सत्र हा निव्वळ बाष्कळपणा आहे. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आहे. विरोधक तेच तेच तुणतुणे वाजवत आहेत. मात्र, आरक्षणाला धक्का लावणे तर दूरच, उलट त्याची मर्यादा आमच्या सरकारने वाढवली आहे. कोणत्याही स्थितीत आरक्षणाला धक्का पोहोचविला जाणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही मला यानिमित्ताने देशभरातील जनतेला द्यायची आहे. मोदी स्वतः ओबीसी आहेत. मोदी मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातून आले आहेत. असे असताना आरक्षणाला धक्का लागेल, असे म्हणणे हाही खुळचटपणा म्हटला पाहिजे. काळजी केली पाहिजे ते आरक्षणाबद्दल काँगे्रसने घेतलेल्या भूमिकेबद्दल. ज्या राज्यात हा पक्ष सत्तेवर आहे, तेथे तो वंचितांचे आरक्षण कमी करून ते आपल्या मतपेढीला देत आहे. हा प्रकार घटनाविरोधी आहे. कारण, धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ नये, असा स्पष्ट उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी या निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवतील, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

 

प्रश्न : तुम्ही प्रत्येक सरकारी योजना परिपूर्ण असेल यावर भर दिल्याचे म्हणता. त्याबद्दल काय सांगाल?

पंतप्रधान मोदी : हे खरेच आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर गरिबांचे कल्याण हाच मुख्य आधार बनवून निर्णय घेतले आणि त्यांची प्रभावी कार्यवाही केली. समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचविणे हेच आमचे लक्ष्य राहिले आहे. आज हजारो खेड्यांत वीज पोहोचली आहे. त्यातील अनेक भाग आदिवासींचे वास्तव्य असलेले आहेत. एलिफंटा गुहा असलेल्या बेटावरही वीज पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशातील स्पिती खोर्‍यात मोबाईलची कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे. या सगळ्या योजना तळागाळातील जनतेसाठी राबविण्यात आल्या आणि त्यामुळे ही जनता मोदी सरकारला धन्यवाद देत आहे. आम्ही कामातून बोलतो.

 

प्रश्न : नारीशक्ती हे तुमचे सुरक्षा कवच आहे, असे तुम्ही म्हणता. महिलांच्या सबलीकरणासाठी तुमच्या सरकारने कोणती पावले उचलली आहेत?

पंतप्रधान मोदी : देशातील नारीशक्तीने मला भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान देण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. येत्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी महिला असतील. बचत गटांच्या माध्यमातून तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणावर आमचा भर आहे. उद्योजकता आणि सहकार्याच्या बळावर आतापर्यंत एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. पुढील टर्ममध्ये आम्ही आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यासाठी सक्षम करू. या महिला बचत गटांना आयटी, आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यटन इत्यादी क्षेत्रांमध्ये अधिक प्रशिक्षित केले जाईल. शिवाय, आम्ही ग्रामीण महिलांना ड्रोन पायलट बनविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेवर आहोत. आम्ही याआधीच नारीशक्ती वंदन अधिनियम संमत केला आहे. यामुळे संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढणार असून, लवकरच त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. एकंदरीत, जेव्हा मी विकसित भारत होण्याच्या प्रवासाबद्दल बोलतो, तेव्हा मी महिलांकडे या मिशनमध्ये सर्वात महत्त्वाचा गट म्हणून पाहतो.

 

प्रश्न : जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होत असताना या प्रक्रियेत तुम्ही महाराष्ट्राकडे कोणत्या द़ृष्टिकोनातून पाहता?

पंतप्रधान मोदी : महाराष्ट्रासाठी आमचा द़ृष्टिकोन विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र घडवणे अशा स्वरूपाचा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये, महाराष्ट्राच्या विविध सामर्थ्यांचा उपयोग करून, अनेक क्षेत्रांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आर्थिक केंद्र, आयटी हब, कष्टकरी शेतकरी, निकोप सहकारी क्षेत्र, दीर्घ किनारपट्टी आणि समृद्ध औद्योगिक पाया असलेले महाराष्ट्र हे अष्टपैलुत्वाचे प्रतीक आहे. धोरणे आणि पायाभूत सुविधांसह या शक्तीचा उपयोग करणे हे आमचे ध्येय आहे. जगाच्या भवितव्यासाठी कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे, हे महत्त्वाचे नसले, तरी त्यात महाराष्ट्र आधीच आघाडीवर आहे. राज्यात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, फिनटेक, ग्रीन एनर्जी, एआय आणि फिनटेक सेवा आणखी वाढतील, असा विश्वास वाटतो. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांसाठी आमचा प्रयत्न ‘पीएलआय’सारख्या योजनांद्वारे प्रोत्साहनांसह महाराष्ट्राच्या औद्योगिक भरभराटीला आणखी ऊर्जा देईल. बिझनेस हब असल्याने, डिजिटलायझेशन, अनावश्यक अनुपालन कमी करणे, जागतिक भांडवल आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणे इत्यादीसारख्या विविध उपक्रमांद्वारे व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला आधीच फायदा होत आहे. या आघाडीवर आमचे प्रयत्न सुरूच राहतील. तरुणांसाठी अनेक संधी निर्माण करणे, हेही आमचे ध्येय आहे.

आम्ही महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत. शेतकर्‍यांना विम्याचे संरक्षण मिळावे, त्यांच्या शेतांना पुरेसे पाणी मिळावे, त्यांना माती व्यवस्थापनात मदत मिळेल आणि भारत आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये त्यांचा प्रवेश वाढावा, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. ‘रालोआ’ सरकारमुळे महाराष्ट्रातील समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होईल, ही मोदींची गॅरंटी आहे, हे येथे ठळकपणे नमूक केले पाहिजे…

 

Following is the clipping of the interview:

Source: Pudhari
Explore More
৭৮ তম স্বাধীনতা দিবস উপলক্ষ্যে নয়াদিল্লির লালকেল্লার প্রাকার থেকে প্রধানমন্ত্রীর ভাষণ ১৫ই আগস্ট , ২০২৪

জনপ্রিয় ভাষণ

৭৮ তম স্বাধীনতা দিবস উপলক্ষ্যে নয়াদিল্লির লালকেল্লার প্রাকার থেকে প্রধানমন্ত্রীর ভাষণ ১৫ই আগস্ট , ২০২৪
UPI empowered marginal borrowers, boosted credit access: Study

Media Coverage

UPI empowered marginal borrowers, boosted credit access: Study
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
It is a matter of immense pride for India that Archbishop George Koovakad will be created as a Cardinal by His Holiness Pope Francis: Prime Minister
December 07, 2024

The Prime Minister remarked today that it was a matter of immense pride for India that Archbishop George Koovakad will be created as a Cardinal by His Holiness Pope Francis.

The Prime Minister’s Office handle in a post on X said:

“It is a matter of immense pride for India that Archbishop George Koovakad will be created as a Cardinal by His Holiness Pope Francis.

The Government of India sent a delegation led by Union Minister Shri George Kurian to witness this Ceremony.

Prior to the Ceremony, the Indian delegation also called on His Holiness Pope Francis.

@Pontifex

@GeorgekurianBjp”